डोंबिवली :- कल्याण डोंबिवलीकरांसाठी चिंताजनक अशी माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला तरुण आता ओमीक्रोन पोजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रातील हा पहिला ओमीक्रोन संक्रमित रुग्ण असून राज्यात ओमीक्रोनचा आता शिरकाव झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
२४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून हा ३३ वर्षीय युवक दुबई-दिल्ली मार्गे मुंबई विमानतळावर उतरला होता. तिथुन टेक्सीने तो डोंबिवलीत आला. मात्र तो आला तेव्हाच त्याला हलका ताप होता. पुढे टेस्ट दरम्यान त्याचा रिपोर्ट कोरोना पोजिटिव्ह आला होता. मात्र त्याचे सेंपल्स मुंबईत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला ज्यात तो ओमीक्रोन संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णावर आता पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना जवळपास आटोक्यात आलेला आहे. असे असताना आता ओमीक्रोनने शिरकाव केल्याने महानगरपालिका प्रशासनाची तारांबळ उडालेली आहे. महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यावर काय उपाययोजना करणार हे आता लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी घाबरून न जाता मास्कचा वापर, हात व तोंड स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे हे सर्व नियम पाळण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेला व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक मात्र या नव्या प्रकरणामुळे अधिक हवालदिल झाले आहेत.
ओमीक्रोन हा कोरोनाचा नवीन व्हेरीयंट आहे. भारतात आतापर्यंत चार रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकातुन ओमीक्रोनने भारतात आपले खाते उघडले. पहिले दोन रुग्ण या राज्यात आढळले. त्यानंतर तिसरा रुग्ण गुजरात मध्ये आढळला. आणि आता महाराष्ट्रात डोंबिवलीत चौथा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.
-संतोष दिवाडकर