कल्याण :- पूर्वेतील भारतीय जनता पार्टी व श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थान यांच्या संयुक्त विध्यमाने भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात जवळपास दिड हजार लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. यातील मुलाखतीद्वारे शेकडो लोकांच्या हाताला नवे काम लागले आहे. या उपक्रमासाठी कल्याण पूर्व भाजप अध्यक्ष संजय बा. मोरे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.
कोरोनाच्या दोन लाटांमुळे अनेक लोकांच्या हातचे काम सुटले. बेरोजगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नवतरुण तसेच गरजूंच्या हाताला पुन्हा काम लागावे यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देता यावा यासाठी हा मेळावा आयोजित करीत असल्याचे कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले. बँकिंग, कॉल सेंटर, सेक्युरिटी, बॅक ऑफिस, शैक्षणिक, वैदयकीय, रिअल इस्टेट, मॅकेनिक अशा विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या मेळाव्यात उपलब्ध होत्या. असंख्य नव तरुण व तरुणी यांनी फॉर्म भरून मुलाखती दिल्या. विविध क्षेत्रातील संस्थांना या मेळाव्यामार्फत आपल्यासाठी उपयुक्त असे एम्प्लॉय या मेळाव्यात मिळाले. शेकडो लोकांना लागलीच कॉल लेटर देण्यात आले.
कल्याण पुर्वेत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या मेळाव्यात रोजगारासाठी हजारोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते. या समवेत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थानचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड हे देखील उपस्थित होते.
“आजच्या तरुणाईच्या हातात ताकद आहे, बुद्धी आहे. परंतु रोजगार नसल्याने अनेक प्रश्न उद्भवतात. याकरिता रोजगार मेळावा आयोजित करून केलेला हा एक छोटासा प्रयत्न. कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी व अन्य बाबी पाहता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन भाजपा कल्याण पूर्व मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यांना त्याचा लाभही झाला. भाजपा सदैव युवकांसोबत आहे अशी ग्वाही देतो.”
–संजय मोरे (अध्यक्ष, भाजपा कल्याण पूर्व)
-संतोष दिवाडकर