कल्याण :- शहरातील चिकनघर परिसरात हत्ये प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. मुलानेच वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या हल्ल्यात मध्ये येणाऱ्या आईवरही प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी जखमी मुलगा लोकेश आणि जखमी आई या दोघांवर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी लोकेशच्या विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न या आरोपाखाली गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.
कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात राहणाऱ्या प्रमोद बनोरिया यांचा २७ वर्षीय मुलगा लोकेश हा विद्यार्थीदशेत आहे. या पिता पुत्रांमध्ये सतत वाद होत होते. शनिवारी रात्री देखील दोघांमध्ये वाद झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने वडील प्रमोद यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत वडिलांची हत्या केली. याच दरम्यान प्रमोद यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या प्रमोद यांची पत्नी व लोकेश ची आई कुसुम वर देखील लोकेशने ८ते १० वार करून तिला देखील जखमी केले. यानंतर कट रचून स्वतःच्या बचावासाठी त्याने स्वतःच्या पोटावर वार करून घेतले. यानंतर रात्रभर त्याने जखमी आईसह वडिलांचा मृतदेह घरातच ठेवला. संपूर्ण घरात रक्ताचा सडा पडला होता.
पहाटे च्या सुमारास सुरक्षा रक्षकाला फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितले. मात्र रात्री उशिरा त्यांच्या घरातून भांडणाचे आवाज येत असल्याने सुरक्षा रक्षकाचा काहीतरी अनुचित घडले असल्याचा संशय बळावला. त्याने सोसायटीच्या सदस्यांना याबाबत माहिती दिली. सोसायटी मधील लोकांनी घरात येऊन पाहिले असता त्यांना घरात सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याचे दिसले. आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पुढे पोलीस आल्यानंतर मात्र लोकेश याने वडिलांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला करत आईला जखमी करत स्वतः आत्महत्या केल्याचा कांगावा केला. तसेच आईने आपल्या विरोधात पोलिसांना माहिती दिल्यास तिला मारण्याची धमकी दिली होती. मात्र पोलिसांनी लोकेशवर संशय व्यक्त करीत तपास सुरू केला.
डॉक्टर आणि पोलिसांनी लोकेशच्या आईला विश्वासात घेत विचारणा केल्यानंतर तिने मुलाच्या कृत्याचा पाढा वाचला. यानंतर दोघांवरही मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी मुलगा लोकेश विरोधात गुन्हा दाखल करत पूढील तपास सुरू केला आहे. या हत्या मागे नक्की कोणते कारण आहे की इतक्या टोकाचे पाऊल उचलून जन्मदात्या बापाला आयुष्यातुन संपवले ही बाब मात्र अद्यापही गुलदस्त्याबाहेर येऊ शकलेली नाही. मात्र लोकेशच्या चौकशी नंतर हत्येमागचे नेमके कारण पोलिसांच्या हाती लागणार आहे.
-रोशन उबाळे