कल्याण :- कल्याण कोळसेवाडी पोलीसांनी एका सराईत चोरट्याला सापळा रचत अटक केली आहे. अलि हसन जाफरी अस या चोरट्याचं नाव आहे. २२ वर्षीय अलि हसन हा सराईत गुन्हेगार आहे. चैन स्नेचिंग व दुचाकी चोरी मध्ये त्याचा हातखंडा आहे. चैन स्नेचिंग करण्यासाठी तो आधी महागड्या दुचाक्या चोरायचा त्यानंतर या चोरलेल्या दुचाकीवरून चैन स्नेचिंग करायचा व ही दुचाकी रस्त्यात उभी करून तेथून पळ काढायचा.
कल्याण कोळसेवाडी परिसरात गर्दीच्या आणि रहदारीच्या ठिकाणी चैन स्नेचिंग, दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कोळसेवाडी पोलिसांनी चार पथके नेमली व या चोरट्यांचा शोध सुरु केला. गुप्तहेरां मार्फत त्यांना अलीहसन हा आंबिवली इराणी वस्तीत राहत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने आंबिवली इराणी वस्तीत सापळा लावून अली हसनला अटक केली. त्याच्याकडून पाच मोटरसायकल, तीन साखळ्या, ४लाख ५३ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आतापर्यंत कल्याण-डोंबिवली, भिवंडी, ठाणे, मुंबई या ठिकाणी देखील चोऱ्या केल्याचे तपासात समोर आले असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. दरम्यान कल्याण नजीकच्या आंबिवली येथील इराणी वस्तीतून या आधी देखील अनेक सोनसाखळी चोरट्यांना अटक करण्यात आली आहे. अली हसनच्या अटकेनंतर ही वस्ती पुन्हा एकदा पोलिसांच्या रडारवर आली आहे. दरम्यान उमेश माने पाटील (कल्याण एसीपी) यांनी माहिती देत सहकाऱ्यांचे कामगिरी बाबत कौतुक केले. मात्र या इराणी वस्तीत वाढलेली गुन्हेगारी आणि गुन्हेगार हे संपूर्ण शहरासाठी डोकेदुखी ठरत आहे. मागील वेळेस गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या ताफ्यावर देखील हल्ला झाला होता. त्यामुळे यावर कायमचा तोडगा काढणे सर्वांच्या हिताचे ठरणार आहे.
-रोशन उबाळे