एप्रिल फुल म्हणजे १ एप्रिल रोजी मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवली येथे ‘एप्रिल फुल डब्बा गुल’ आंदोलन केले होते. या आंदोलनातुन पुलाच्या संथगतीने होत असलेल्या कामावर निशाणा साधला होता. मात्र कोरोना निर्बंधांचे उल्लंघन झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडवली पुलाच्या उदघाटनावेळी गर्दी झाली होती तर मग त्यांच्यावर गुन्हे का नाहीत ? पोलिसांनी पक्षपातीपणा करू नये असे ट्वीट मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.
क.डों.म.पा. क्षेत्रात सध्या अनेक पुलांची कामं झालेली आहेत व काही सुरू देखील आहेत. ही काम अत्यंत संथ गतीने होत असल्याचे म्हणत मनसेने १ एप्रिल ला केक कापून आंदोलन केले होते. ‘एप्रिल फुल डब्बा गुल कधी होणार कोपर पूल?’ अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र महापालिकेने आखलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे म्हणत त्यांच्यावर आता गुन्हे दाखल केले गेले आहेत.
मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसेला गृहीत धरू नये. प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनू नये. तसेच पोलिसांबद्दल आम्हाला आदर आहे आणि पोलिसांनी पक्षपातीपणा करू नये असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे. आयुक्त व डीसीपी यांच्या उपस्थितीत वडवली पुलाचे उदघाटन झाले यावेळी झालेली गर्दी तसेच कोपर पुलाच्या गर्डर लॉंचिंगला गर्दी करणाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल करणार ? असा सवाल त्यांनी केला आहे.

