कल्याण : वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांवर उपचार करण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने डोंबिवलीच्या एमआयडीसी भागात जम्बो कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. मात्र या कोविड सेंटर मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीचे महासचिव राहुल काटकर यांनी केला असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.
डॉबिवली औद्योगिक क्षेत्र फेज – १ मधील इंडस्ट्रियल युनिट मेकानो इंडीया प्रा. लि. या कंपनीतील इमारत क्र. २ मध्ये डेडिकेटेड कोविद हॉस्पिटल तयार करण्यात येत आहे. हे हॉस्पिटल तयार करण्यासाठी महानगरपालिकेतर्फे हॉस्पिटल तयार करण्याचे काम मे. एम अंक इंजिनियर्स या कंपनीला दिलेले आहे. याठिकाणी सार पत्रकाप्रमाणे कोणतेही काम करण्यात आलेले नाही. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीने केला आहे.
याठिकाणी प्लायवुड ज्या कंपनीचे व जेवढ्या जाडीचे लावण्यास सांगितले होते ते लावण्यात आलेले नाही. तसेच जे लावण्यात आलेले आहेत ते देखील निकृष्ट बर्जाचे भंगार मधील घेऊन लावण्यात आलेले आहे. सनमाईका देखील सुमार दर्जाच्या लावण्यात आल्या असून त्यामध्ये देखील बरेचसे सनमाईका तुटलेले वापरण्यात आले आहे. अल्युमिनियम व स्टील अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आलेले आहे. बाथरूम मध्ये लावण्यात आलेले सर्व साहित्य निकृष्ट व दुष्यम दर्जाचे आहेत. लोकल कंपनीचा कलर वापरण्यात आला आहे, तसेच तो देखील योग्य प्रकारे लावण्यात आलेला नाही. तात्पुरते स्वरूपात सर्व बाजूने लावण्यात आलेले पत्रे भंगार मधून घेऊन लावण्यात आलेले आहेत.
निविदा प्रमाणे कंपनी ने दुसऱ्या कोणालाही काम देऊ नये असे असताना कंपनी ने थर्ड पार्टीला काम दिले आहे. मे. एम डॅक इंजिनियर्स या कंपनीचे मालक दिलीप महादेव गावडे यांचा मृत्यू झालेला आहे. तसेच कंपनीचे मालक यांच्या बनावट सही करून महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणूक करण्यात येत आहे. त्यामुळे या सर्व कामांची तृतीय पक्षातर्फे तपासणी करण्यात यावी, जेणेकरून कामाची गुणवत्ता आपल्या निदर्शनास येईल. निविदा देण्यात आलेल्या कंपनीचे एकही बिल देण्यात येऊ नये तसेच आतापर्यंत देण्यात आलेल्या बिलाची रक्कम देखील कंपनी कडून वसूल करण्यात यावी आणि या कंपनीला काळ्या यादीमध्ये टाकण्यात यावे, तसेच ज्यांनी महानगरपालिकेची दिशाभूल व फसवणूक करून भ्रष्टाचार केला आहे त्यांच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा व कर्त्यव्यात कसूर करून कंत्राटदार यांना पाठीशी घालणाऱ्या जबाबदार अधिकारयांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीने केली आहे.
-कुणाल म्हात्रे