मलंगगड : कल्याण शहराजवळ असलेल्या मलंगगड भागात आज सकाळी मालवाहतूक करणारा ट्रक आणि दुचाकीस्वाराचा अपघात झाला. या अपघातात ट्रक खाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. सध्या ट्रकचालक फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
खोणी तळोजा (Khoni Taloja) महामार्ग हा प्रचंड रहदारीचा मार्ग मानला जातो. या मार्गावर सततच्या होणाऱ्या अपघातामुळे या मार्गाला मृत्यूचा सापळा म्हटले जात आहे. आज सकाळी ११:३० च्या दरम्यान झालेल्या अपघातात जवळच्याच पाली गावातील रवी ठाकरे नामक इसमाला आपला जीव गमवावा लागला आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवुन दिला. अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला असून ट्रक आणि क्लिनरला ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार याच ठिकाणी मागील महिन्यात ट्रक आणि एर्टीगा गाडीत भीषण अपघात झाला होता. यात देखील दोघा तिघांना प्राणाला मुकावे लागले होते. हा महामार्ग आणखी किती जणांचा जीव घेणार हे काही सांगता येत नाही. मात्र प्रशासनाने सतत होणाऱ्या अपघातांचे कारण जाणून घेऊन तांत्रिक बाबींचा अभ्यास करणे काळाची गरज बनली आहे. वेळीच यावर तोडगा न निघाल्यास मृत्यूची मालिका अशीच सुरू राहू शकते.
-संदेश दाभने
Accident on Khoni Taloja Highway; The truck crushed down and killed the biker