कल्याण-डोंबिवली घडामोडी

Kalyan Murder : कल्याण पूर्वेत आणखी एक हत्या; टोळक्याच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Kalyan Murder : कल्याण पूर्व भागातील वाढती गुन्हेगारी शहरवासीयांसाठी चिंतेची बाब बनली असताना आता आणखीन एका हत्येची बातमी समोर येत आहे. खडेगोळवली येथे वास्तव्यास असलेल्या एका मुलाची हत्या झाली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाली असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सदर मुलाला काही जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

समीर लोखंडे असं मृत मुलाचे नाव असून तो काल सायंकाळी कैलाशनगर परिसरात गेला होता. तेथे जुन्या वादातून एका टोळक्याने त्याला घेराव घालून अमानुषपणे मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र पोलिसांना पाहताच टोळक्याने तेथून पोबारा केला. त्या टोळक्यातील एका आरोपीला पोलिसांनी पकडले तसेच जखमी समीरला उपचारार्थ रुग्णालयात हलवले. मात्र आज पहाटेच्या दरम्यान समीरचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली. सध्या काही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून मुकेश आणि नीरज दास अशी त्यापैकी दोघांची नावे आहेत.

कल्याण पूर्व भागात सध्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढत असून शहरवासीयांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. तिसगावातील अल्पवयीन मुलीचे हत्या प्रकरण ताजे असताना आणखी एका मुलाच्या हत्येने आता पूर्व भागात खळबळ माजली आहे. स्थानिक आमदार तसेच शिवसेनेचे शहरप्रमुख यांनी नुकतेच आणखी एक पोलीस स्थानक तसेच पोलीस कुमक वाढवण्याची मागणी केली आहे. कल्याण पूर्वेतील लोकसंख्या, क्षेत्रफळ, फोफावलेली गुन्हेगारी आणि एकट्या कोळसेवाडी पोलीस स्थानकावरील ताण लक्षात घेता आता गृहखात्याने गांभीर्याने विचार करून आणखी एक पोलीस स्थानक निर्माण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे.

शहरातील तरुणाईला गांचाचा नाद ?

अलिकडल्या काळातील तरुणाई ही गांजाच्या अधीन गेली असून शहरात ठिकठिकाणी गल्ली बोळात घोळका करून गांजा सेवन केले जाते. खडेगोळवली भागातील असंख्य अल्पवयीन मुलं या नशेच्या आहारी गेली असल्याचे स्थानिकांमार्फत सांगण्यात येत आहे. या अगोदर मानापाडा पोलिसांनी अनेकदा गांजा पकडला होता. मात्र तरी देखील शहरात तरुणांना गांजा कुठून मिळतो? गांजा विक्रेते कोण आहेत? हा गांजा कुठून सप्लाय होतो? याचा शोध घेऊन तरुणाईला वाचवणे ही देखील येणाऱ्या काळाची गरज बनली आहे.

संतोष दिवाडकर

Kalyan Murder : A minor boy died in a gang attack in Kalyan East

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *