Dombivli Building Collapse : आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी ५:४० दरम्यान डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील आदिनाथ बिल्डिंगचा (G+3) काही भाग कोसळला असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनास्थळी क.डों.म.पा. अग्निशमन दलाचे जवान, फायर इंजिन, आपत्ती व्यवस्थापन टीम, TDRF दाखल असून सदर ठिकाणी मलबा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सदर इमारतीतील नागरिकांना या अगोदर इमारत खाली करण्यासाठी सूचना देण्यात आल्या होत्या. सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाली असल्याची माहिती नसून प्रशासन घटनास्थळी कामकाज करीत असून महापालिका आयुक्तांनी देखील प्रत्यक्ष भेट दिली होती. मात्र या इमारतीच्या मलब्यात दोन रहिवासी अडकले असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
इमारत खचत असताना रहिवासी आपला जीव वाचवण्यासाठी बाहेर पळाले. मात्र याच इमारतीत राहत असलेले ७० वर्षीय वृद्ध आणि एक ४५ वर्षीय महिला आजारी असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. आणि काही वेळातच पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे इमारत कोसळली. या दोन्ही रहिवाशांना वाचविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी आयुक्त डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
–संतोष दिवाडकर
Dombivli Building Collapse : Building collapsed in Ayre village