कल्याण : शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख व मा.नगरसेवक निलेश शिंदे यांच्यावर पक्षाने पुढील वर्षभरासाठी नवी जबाबदारी सोपवली आहे. आगामी महानगरपालिका, लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका लक्षात घेत निलेश शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेते तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील वडगाव शेरी, शिवाजीनगर व कोथरूड विधानसभा संपर्कप्रमुख पदावर नेमणूक करण्यात आलेली आहे. पुढील वर्षभरासाठी निलेश शिंदे सदर विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेच्या पक्षाचा कार्याचा आढावा घेत राहतील.
शिवसेना सचिव संजय मोरे यांनी नुकतेच नियुक्ती पत्र निलेश शिंदे यांना देऊन त्यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. निलेश शिंदे यांनी शिवसैनिक म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या समवेत पक्षाचे कार्य आजतागायत पुढे नेले आहे. प्रभागातील नागरिकांच्या समस्या असोत की गरजूंना मदतीचा हात यामध्ये ते नेहमी एक पाऊल पुढे राहिले आहेत. समाजातील कामकाज तसेच पक्षासाठीचे आतापर्यंतचे योगदान पाहता त्यांना आता विधानसभा क्षेत्रांच्या संपर्कप्रमुख पदावर नियुक्त करण्यात आले आहे.
शिवसेनेचे मुख्य नेते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार मिळालेली नवी जबाबदारी मोठ्या विश्वासाने पार पाडू, तसेच आतापर्यंत पक्षासाठी ज्या उमेदीने काम करीत आलो तसेच काम इथून पुढेही करीत राहणार असल्याच्या भावना यावेळी निलेश शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत.
–संतोष दिवाडकर
Shiv Sena official Nilesh Shinde has a big responsibility from the party