कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. मृत्यू दर देखील वाढताहेत. रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सीजन मिळत नाही. व्हेटीलेटर मिलत नाही. या गंभीर परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.
कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बिकट झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही सूचना राजू पाटील यांनी या भेटीदरम्यान आयुक्तांना केल्या आहेत. मुख्यत: लसीकरणाच्या कामासाठी जी काही मदत लागेल ती करण्याची तयारी राजू पाटील यांनी दर्शविली. लसीकरण काही केंद्रावर सुरु आहे मात्र लसीचे डोस कमी प्राप्त होत आहेत. तेव्हा आधी केंद्रे जास्त उभारा. त्यानंतर डोस प्राप्त झाल्यावर लसीकरण थांबणार नाही.
मुंबई आणि पुण्यात महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. मात्र क.डों.म.पा. मध्ये प्रशासक म्हणून आयुक्तच आहेत. महापौर पद अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत पालकमंत्री कुठे आहेत ? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.