Chakkinaka : कल्याण पूर्वेतील श्री मलंगगड रोड सध्या वाहतुकीसाठी डोके दुखी बनला आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबरोबरच रस्त्यालगत होणाऱ्या वाहनांच्या पार्किंगमुळे जवळपास अर्धा रस्ता व्यापला जात आहे. यासंदर्भात कल्याण पूर्व वाहतूक उपविभाग शाखेकडेही तक्रारी प्राप्त होत असून यावर कायमचा अंकुश लावण्याची गरज निर्माण झाली आहे.
नेवाळी नाक्याहून चक्कीनाक्याकडे दिवसभरात हजारो वाहनांची रेलचेल असते. यात परिवहन बसेस सह, अवजड वाहने, रिक्षा तसेच असंख्य खाजगी वाहनांतून हजारो प्रवासी ये जा करीत असतात. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे सध्या या मार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. नांदिवली ते चक्कीनाका पर्यंतचा परिसर हा विशेष वर्दळ असणारा परिसर आहे. मात्र याच रस्त्यालगत अनेकदा डबल ट्रिपल लेन मध्ये चारचाकी वाहने उभी केली जातात. यामुळे जवळपास निम्मा रस्ता अडवून निम्माच रस्ता वाहतुकीसाठी शिल्लक राहतो. यावर वाहतूक विभागाने बेकायदा रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहनांवर अनेकदा दंड ठोठावला आहे.
केवळ हाच मार्ग नव्हे तर शहरात अनेक ठिकाणी रस्त्याकडेला उभ्या असणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. प्रशासनाने बऱ्याच मार्गावर नो पार्किंगचे बोर्ड लावले असून काही ठिकाणी P1, P2 अशी संकल्पना राबवली आहे. आता हाच नियम श्री मलंगगड मार्गावर देखील लागू करावा अशी मागणी वाहतूक विभागाकडे होऊ लागली आहे. त्यामुळे आता वाहतूक विभाग यावर काय कार्यवाही करतेय ते आता पहावे लागणार आहे.
Nandivali – Chakkinaka road to become a private parking zone?
