Dwarli : श्री मलंगगड रोडवरील द्वारली ते नेवाळी नाका परिसरात अलीकडल्या काळात चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढले असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याचबरोबर या भागात गर्दुल्ल्यांचा वावर वाढला असून महिलांची छेडछाड होत असल्याची माहिती मनसेचे शाखाध्यक्ष युवराज कांबळे यांनी हिल लाईन पोलिसांना निवेदनाद्वारे दिली असून रात्रीच्या वेळी पोलीस गस्त सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कल्याण पूर्व भागात असलेला द्वारली ते नेवाळी नाका पर्यंतचा भाग हा शहरी वर्दळीपासून बाहेर असलेला भाग आहे. त्यामुळे येथील लोकवस्ती ही अलीकडे हळूहळू वाढू लागली आहे. त्याचबरोबर परिसरात घरफोड्या, दुकानफोडी वाढल्याने परिसरातील नागरिक व व्यापारी वर्ग भयभीत झाला असल्याचे मनसे पदाधिकारी सांगत आहेत.
गर्दुल्ल्यांचा वावरामुळे या भागात महिला सुरक्षित नसून छेडछाडीच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी या भागात रात्रीच्या वेळी गस्त घालावी अशी मागणी निवेदनात केली असून, हिल लाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांना भेटून प्र.क्र.११९ चे शाखाध्यक्ष युवराज कांबळे यांनी निवेदन दिले आहे.
Burglary increased from Dwarli to Newali Naka; MNS’s demand for night police patrolling