नवी दिल्ली : आगामी विधानसभा निवडणुक तयारीच्या अनुषंगाने राज्याच्या भाजप कोअर कमिटीची बैठक सोमवारी मुंबईत संपन्न झाली. त्यानंतर दिल्ली मध्ये देखील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री रविंद्र चव्हाण आणि अन्य मंत्री मंडळी व केंद्राच्या कोअर कमिटी समवेत एक बैठक पार पडली. या दोन्ही बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीच्या दृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर सोमवारी चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे आदींनी मार्गदर्शन केले. कोकणच्या दृष्टीने निवडणूक संदर्भात मुद्यांवर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी माहिती दिली, त्यावर सखोल चर्चा झाली. कोकण पट्ट्यातील ४८ विधानसभांबाबत माहिती देऊन सद्यस्थिती यावेळी सांगण्यात आली.
आयोजित बैठकीला माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महाराष्ट्राचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांच्यासह अनेक मान्यवरही उपस्थित होते. आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद असून निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने राज्यातील राजकीय रणधुमाळी सुरू होणार आहे.
BJP core committee meeting concluded in Delhi in connection with assembly election preparations