डॉक्टर्स आर्मी, फॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर या संकल्पनांची सर्व देशभरात वाहवा झाली, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांनी आज काढले. आजच्या डॉक्टर्स डे चे औचित्य साधून वसंत व्हॅली येथील महापालिकेच्या प्रसुतीगृहात आयोजिलेल्या डॉक्टरांच्या गौरवपर कार्यक्रमात ते बोलत होते.
मी रुजू झाल्यावर कोविड सुरु झाला, परंतू डॉक्टर्स संघटनांनी ऊत्साह वाढविला, आशा दिल्या त्यामुळे ‘डॉक्टर्स आर्मी’ ही संकल्पना कल्याण डोंबिवलीत रुजली, रुळली. डॉक्टर्स आर्मी, फॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर ही संकल्पना आता सर्व देशभर वाखाणली गेली आहे. अत्यंत अल्प कालावधीत जॅंम्बो फॅसिलीटी उभारणारी महाराष्ट्रातील ही एकमेव महापालिका आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. व्हॅलेंटाईन दिनाला रुजू झालो कारण काम हेच माझे व्हॅलेंटाईन आहे. अशी मिश्किल पुस्ती देखील त्यांनी यावेळी जोडली.
कोविडच्या दुस-या लाटेनंतर आता महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयात मॉडयुलर ओटी सुरु होणार असून सर्व शस्त्रक्रिया तिथे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वसंतव्हॅली, शक्तिधाम, विठ्ठलवाडी आणि रुक्मिणी प्लाझा या ४ ठिकाणी आता कायम स्वरुपी रुग्णालये सुरु केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेची १६ नागरी आरोग्य केंद्रे असून आता नागरिकांच्या सेवेसाठी सध्या एकुण २५ आणि भविष्यात ३६ नागरी आरोग्य केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. महापालिकेमार्फत डायलेसिस सेंटरही सुरु केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमात महापालिकेचे डॉक्टर्स, आयएमए, कॅम्पा, निमा, होमिओपॅथिक इ. वैदयकीय संघटनांच्या पदाधिका-यांचा व कोविड काळात इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मदत करणाऱ्या इंजिनिअर्सचा प्रातिनिधिक स्वरूपात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांच्याहस्ते तुळशीचे रोप व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून ऑपरेशन थिएटर, ओपिडी इ. सुविधांयुक्त प्रसुतिगृह वसंत व्हॅली येथे आज सुरु करण्यात आले आणि एक बाळंतपणही सुखरुपरित्या पार पडले.