कल्याण-डोंबिवली घडामोडी

कल्याण मध्ये लस घेण्यासाठी निघालेल्या महिलेचा खड्ड्याने घेतला बळी

कल्याण पश्चिमेतील गांधारी रोडवर दीरासोबत दुचाकीवरून लस घेण्यासाठी जाताना दुचाकीला खड्ड्यांमुळे अपघात होऊन  महिला जखमी झाली होती. उपचारा दरम्यान या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेचे नाव दिव्या राहुल कटारिया असे आहे.

कल्याण पश्चिम भागातील ऋतू कॉम्प्लेक्स या हायप्रोफाईल सोसायटीत राहणाऱ्या  शिक्षिका दिव्या कटारिया या २३ जून रोजी त्यांच्या दीरा सोबत दुचाकीवरून घेण्यासाठी निघाल्या होत्या. त्यांच्या दुचाकीतले पेट्रोल संपल्याने त्या पेट्रोल पंपाच्या दिशेने निघाल्या होत्या. त्यांची दुचाकी त्यांचे दीर चालवत होते. गांधरी रस्त्यावर त्यांच्या दुचाकीने एका वाहनाला ओव्हरटेक केले. मात्र रस्त्यावरील पाण्याने भरलेला खड्डा त्यांच्या लक्षात आला नाही त्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्यातील  खड्ड्यात जोराने आदळली.

यावेळी दिव्या यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. घटनेच्या चार दिवसानंतर उपचार घेत असताना दिव्या यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती दिव्याचे दीर अर्जुन कटारिया यांनी दिली आहे. खड्यांनी एका महिलेचा बळी गेल्याने कटारिया कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे रस्त्यावरील खड्डे आता नागरिकांचा जीव घेउ लागले असल्याची बाब प्रकर्षाने समोर आली आहे.

-कुणाल म्हात्रे

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *