कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सुमारे १०० कुटुंब बेघर होण्याच्या उंबरठ्यावर असून कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोडचे चुकीचे अलाईन्मेंट बनविल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत येथील नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देत रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली आहे.
डिसेंबर २०२० पासून मलंगगड रोड ते उल्हासनगरकडे जाणारा १०० फुट रोडचे चिंचपाडा हद्दीत रस्ता बनविण्यास सुरवात केली असून, हा रस्ता चुकीच्या रोड अलाईन्मेंट प्रमाणे बनविण्यास घेतल्याचे येथील नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्याबाबत पालिकेकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार केला. त्याचप्रमाणे दोन वेळा आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेवून या रस्त्याचे काम चुकीचे होत असल्याची माहिती त्यांना दिली.
त्या अनुशंगाने आयुक्तांनी कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांना सुचना देवून प्रशांत भुजबळ यांना प्रत्यक्ष जागेवर जावून दोन्ही इमारती मधील मोकळया जागी असलेल्या २८ मीटर मध्ये पूर्णपणे रस्ता बनविण्याची सुचना केली. त्यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील हजर होते. मात्र आयुक्तांनी केलेल्या सूचनाचे पालन व अंमलबजावणी न करता उलट मनमानी पद्धतीने चूकीचे काम करून १०० कुटूंबाना बेघर करण्याचा प्रयल होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
या प्रकरणात आयुक्तांनी लक्ष घालून करधारक नागरीकांना न्याय देण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली असून याबाबत फ्रेंड्स कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.
-कुणाल म्हात्रे