शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात आरंभ करण्यात आलेली ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळा’ची ‘विठाई’ बससेवा लोकप्रिय झाली आणि तिचा राज्यभरात विस्तार करण्यात आला. विठुमाऊलीच्या नावे आरंभ करण्यात आलेली ही बससेवा स्तुत्यच असून या माध्यमातून शासनाने वारकर्यांच्या श्रद्धांचा सन्मान केला आहे. मात्र काही दिवसांनी आम्हाला या बसच्या बाहेरील भागात असलेल्या विठ्ठलाच्या चित्रावरील धूळ, थुंकल्याचे डाग, चिखलाचे डाग दिसू लागले, ही एकप्रकारे श्री विठ्ठलाच्या चित्राची विटंबनाच आहे. असे हिंदू जनजागृती समितीने आता म्हटले आहे.
अनावधानाने का होईना, श्री विठ्ठलाची प्रतिमा मलिन होत आहे. हा श्री विठ्ठलाचा अनादर असून ही होत असलेली विटंबना रोखण्यासाठी ‘विठाई’ बसच्या बाहेर असलेले श्रीविठ्ठलाचे चित्र त्वरित काढावे, अशी आग्रही मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे. यावर उपाय म्हणून श्री विठ्ठलाचे चित्र प्रत्येक बसच्या आतील बाजूस लावून प्रतिदिन त्या चित्राचे पूजन करून त्याचे पावित्र्य राखावे, अशी विनंतीवजा सूचनाही समितीने केली आहे.
या संदर्भातील निवेदन राज्याचे परिवहन मंत्री श्री. अनिल परब, परिवहन सचिव, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. या निवेदनात पुढे म्हटले आहे, बसमधील प्रवासी हे मुद्दाम ही विटंबना करत नाहीत. अनावधानाने का होईना, खिडकीतून बाहेर थुंकणे, चूळ भरणे, तोंड धुणे, उलटी करणे आदी कृत्ये करतांना ती विठुरायाच्या चित्रावर त्याचे शिंतोडे उडतात. तसेच सध्या पावसाळा असल्याने अनेकदा रस्त्यावरील चिखल चित्रावर उडतो. प्रतिदिन ज्या विठ्ठलाला पुजतो, त्याच्या चित्राला घाणीने माखलेला पहाणे, हे अतिशय वेदनादायी आहे. त्यामुळे श्री विठ्ठलाच्या प्रतिमेची विटंबना तत्काळ थांबवायला हवी, असे विनंतीपूर्वक आवाहन समितीने केले आहे. यावर तुम्हाला काय वाटत ते आम्हाला खाली कमेंटमध्ये कळवा.
-कुणाल म्हात्रे