आधारवाडी डम्पिंग ग्राउंड बंद करण्यासाठी केडीएमसीच्या वतीने विविध ठिकाणी कचरा प्रक्रिया केंद्र आणि कचरा वर्गीकरण केंद्र उभारली असून रात्री झालेल्या पावसामुळे हे कचरा प्रकल्प पाण्यात गेले आहेत. कल्याण मधील बारावे आणि उंबर्डे येथील या प्रकल्पांमध्ये पाणी साचल्याने हे प्रकल्प नियमांचे उल्लंघन करून बांधले असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
बारावे येथे उभारण्यात आलेला कचरा वर्गीकरण प्रकल्प कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने एन.जी.टी कोर्टाच्या सर्व नियमांचे उल्लंघन करत हा प्रकल्प बारावे येथे चालू केला आहे. घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांनी नागरिकांना आश्वासन दिले होते की सर्व नियमांचे पालन करून हा प्रकल्प येथे चालवला जाईल परंतु या ठिकाणी कचराच कचरा अस्तव्यस्त पडलेला आहे यावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया केली जात नाही महापालिकेने लावलेल्या सर्व मशिन्स बंद आहेत.
केडीएमसी आयुक्तांनी आधारवाडी डंपिंग ग्राउंड बंद करून एका ठिकाणी नागरिकांना दिलासा दिला तर दुसऱ्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून प्रकल्प चालु केला असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. या प्रकल्पाला विरोध नसून सर्व नियमांचे पालन करून तो झालाच पाहिजे मात्र हे प्रकल्प नागरिकांच्या जीवावर बेतता कामा नये अशी प्रतिक्रिया बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे यांनी दिली.
-कुणाल म्हात्रे