कल्याण पडघा मार्गावर असलेला गांधारी पुल आज रात्रीच्या सुमारास वाहतुकीसाठी अचानकपणे प्रशासनाने बंद केला आहे. मागील काही दिवसांत आलेल्या पुरामुळे या पुलाचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात असून उद्या PWD द्वारे पुलाची पाहणी होणार आहे.
कल्याणहुन पडघामार्गे नाशिकला जाण्यासाठी गांधारी पुलाचा वापर केला जातो. या पुलावरून दररोज हजारो वाहने ये जा करीत असतात. शिवाय स्थानिक गावकऱ्यांना कल्याणकडे येण्यासाठी हा सोयीस्कर असा मार्ग आहे. याच मार्गावर गांधारी येथे असलेल्या खाडीवर एक मोठा पूल आहे. नुकत्याच आलेल्या पुरामुळे या पुलाच्या पिलरला तडे गेले असल्याचा संशय प्रशासनाला लागून आहे. त्यामुळे कसलीही दुर्घटना टाळण्यासाठी पुलावरील वाहतुक सोमवारी रात्रीच्या दरम्यान प्रशासनाने तात्काळ बंद केली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून उद्या या पुलाची पाहणी होणार आहे. पाहणी दरम्यान पुलाचे नुकसान झाल्याचे आढळल्यास डागडुजीचे काम सुरू केले जाईल. पुलाच्या कामासाठी सहा महिने ते एक वर्ष देखील लागू शकतात अशी शक्यता आहे. या पुलावरील वाहतूक बंद झाल्याने पर्यायाने भिवंडी मार्गाचा अवलंब वाहनचालकांना करावा लागणार आहे. तसेच आसपासच्या गावातील गावकऱ्यांची मात्र मोठी गैरसोय होणार हे निश्चित.
-संतोष दिवाडकर