कल्याण : कल्याण पूर्वेतील सेंट मेरीज हाईस्कूलने आयोजित केलेला शांती उत्सव या कार्यक्रमाकरिता उपस्थित मान्यवरांचे हिंदू संस्कृतीप्रमाणे कपाळी चंदन टिळा लावून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. सेंट मेरीज शाळेच्या ऍडमिन सी. इ. ओ. श्रीमती डॉ. विंदा भुस्कुटे मॅडम यांनी व्यासपीठावर उपस्थित प्रमुख पाहुणे, यंगिस्तान फाउंडेशनचे अध्यक्ष वकील श्री. पुरुषोत्तम खानचंदानी, कोळशेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र देशमुख , श्री. वाघ,हिराली संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सरिता खानचंदानी, यंगिस्तान संस्थेचे संस्थापक आणि संयोजक श्री. मिथीलेश झा, आर्य ग्लोबल संस्थेचे संस्थापक श्री भरत मलिक सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
सेंट मेरीज हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती दिव्या बोरसे मॅडम यांनी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांची ओळख आणि त्यांच्या कार्याविषयी माहिती आपल्या स्वागतपर भाषणांमधून करून दिली.
शांतिवार्ता याविषयी आपले मनोगत व्यक्त करताना श्रीमती डॉ. विंदा भुस्कुटे यांनी ध्वनी प्रदूषणाविषयी माहिती आणि मोलाचे मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या भाषणातून आवश्यक नसताना सुद्धा हॉर्न वाजवणाऱ्या चालकांना हॉर्न न वाजवता सुरक्षित गाडी चालवू शकतो याबाबत मार्गदर्शन दिले.
अपघातांचे मुख्य कारण ध्वनी प्रदूषण आहे . अपघाती मृत्यू हेडफोन्स घालून वाहन चालवणारे वाहन चालक व हेडफोन्स घालून रस्त्यावर चालणारे प्रवासी यांच्या निष्काळजीपणामुळे होतात.ज्या गोष्टी आपल्या हातात असतात त्या आपण सतर्कपणे आणि काळजीपूर्वक पाळल्या पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
कोळशेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र देशमुख सर यांनी सांगितले की, जितक्या पटीने रेल्वे ट्रॅकवर आणि कॅन्सरने मृत्यू होतात तितक्याच पटीने अपघाती मृत्यू देखील होतात आणि याचे एकमेव कारण कानामध्ये हेडफोन घालून चालणे आणि दिलेल्या सूचनांचे पालन न करणे हे होय. तसेच वाहतुकीच्या नियमांची माहिती करून दिली.
हॉर्न न वाजवता इतर वाहतुकीच्या नियमांद्वारे रस्त्यावरील वाहनांची नागरिकांना लक्षवेधी सूचना देता येईल, तसेच सुरक्षित वाहन चालवता येईल याबाबत मार्गदर्शन केले. पोलीस उप निरीक्षक श्री. धनराज वाघ यांच्याबरोबर ध्वनी प्रदूषण करणार नाही अशी शपथ सर्वानी घेतली.
हिराली फाउंडेशनचे संस्थापक आणि संयोजक वकील श्री. पुरुषोत्तम खानचंदानी यांनी आपल्या भाषणातून सेंट मेरीज शाळेच्या शांती वार्ता कार्यक्रमाचे कौतुक व प्रशंसा केली तसेच विभागातील नागरिकांकरिता शाळा वाहन कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.
हिराली फाउंडेशनचा अध्यक्षा श्रीमती सरिता खानचंदानी यांनी शाळेच्या विविध कार्यक्रमाद्वारे हिराली फाउंडेशन आणि सेंट मेरीज शाळा यांच्यामध्ये समन्वय साधला.आर्य ग्लोबल संस्थेचे संस्थापक श्री भरत मलिक सर यांनी मार्गदर्शनपर भाषणात फोन मुळे डोळ्यांचे व कानांचे किती मोठे नुकसान होते हे मुलांना पटवून दिले. येणाऱ्या पुढील समस्यांमध्ये सर्वात मोठी समस्या ही मोबाईलची असेल असे देखील त्यांनी वक्तव्य केले.
त्यानंतर सेंट मेरीज हायस्कूल ते चक्की नाका ८०० विद्यार्थी आणि ३० हून अधिक शिक्षक घेऊन तसेच शाळेतील मावशी व दादा यांना सोबत घेऊन जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली
या फेरीतून नको तेथे नको तेव्हा हॉर्न वाजूवून डोके भंडावून सोडणाऱ्या वाहन चालकांना पोलिसांसह सामाजिक कार्यकर्ते आणि सेंट मेरीज हायस्कूल कल्याण पूर्व च्या विद्यार्थ्यांनी वाहतूक नियमांचे धडे दिले.
कर्णकर्कश हॉर्न वाजवणे हे असभ्यवर्तन असून त्याद्वारे इतरांना त्रास देऊ नका असे आव्हान करण्यात आले म्हणून नो हॉर्न हा कार्यक्रम राबवण्यात आला.
हॉर्नचा कर्णकर्कश आवाजाचे दुष्परिणाम दर्शविणारे फलक मुलांनी हाती धरले होते. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.