विकृत मुलाने वयोवृद्ध आई बापावर केला लाठीमार ; आईचा मृत्यू तर बाप जखमी

रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुन्हा एकदा उजेडात आली आहे. शिरूर तालुक्यातील एका विकृत मुलान आपल्या जन्मदात्या वयोवृध्द आई वडिलांनाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या मारहाणीत उपचारादरम्यान त्याच्या आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. तर जखमी वडिलांवर उपचार सुरू आहेत.

एकीकडे संपूर्ण जग फादर डे साजरा करीत होत तर शिरूर तालुक्यातील घाटशीळ पारगाव येथे मात्र एक विकृत आपल्या जन्मदात्या आई बापावर काठीने हल्ला करीत होता. बाबासाहेब खेडकर असं या विकृत मुलाचं नाव आहे. ज्या आई बापाने या बाबसाहेबाला वाढवलं, मोठं केलं त्याच आई बापांना हा मुलगा इतक्या क्रूरतेने मारताना या व्हडीओ मध्ये दिसतोय.

७० वर्षीय शहाबाई खेडकर आणि ७५ वर्षीय त्रिंबक खेडकर जिवाच्या आकांताने घाव सोसत विव्हळत होते. “धावा धावा पांडुरंगा” अशी आर्त साद त्याचे वडील घालत होते. मदतीसाठी ते दुरून पाहणाऱ्या जमावाला हाक मारत होते. जवळपास गावकरी शेजारीपाजारी जमले होते. मात्र कोणीही पुढे जाण्याची हिंमत करत नव्हता. त्यातीलच एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये हे दृश्य कैद केले. जर कुणी पुढे गेला असता आणि सैतानी वृत्तीच्या त्या निर्दयी मुलाला थांबवलं असत तर त्याला जन्म देणाऱ्या माऊलीचा जीव नक्कीच वाचला असता. मात्र जो पर्यंत गावकऱ्यांनी मध्यस्थी केली तोपर्यंत उशीर झाला होता. मारहाण झालेल्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान दुर्दैवाने त्या माउलीला मृत घोषित करण्यात आले. तर पित्यावर अद्याप उपचार सूरु आहेत.

बीड रिपोर्टर डॉट कॉम ने दिलेल्या माहितीनुसार या घटने विरोधात पोलीस ठाण्यात भा द वि कलम 302 307 आणि 323 अनव्ये गुन्हा दाखल केला असल्याचे समजते. शिवाय आरोपीला देखील जेरबंद करन्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार मारहाण करणारा मुलगा हा मानसिक रुग्ण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याच्या जाचाला कंटाळून पत्नी देखील माहेरी निघून गेली असल्याची माहिती मिळाली आहे. या विकृतीचे आई वडील देखील आपल्या लेकीकडे राहतात. मात्र आपल्या लेकाला कोरोना झाल्याचे समजल्याने जीवाची पर्वा न करता दोघेही आपल्या मुलाला भेटायला घरी परतले होते. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. या गुम्ह्णाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरोक्षक रामचंद्र पवार हे करीत आहेत

आई वडील जन्म देतात, तळहाताच्या फोडाप्रमाणे त्यांना वाढवतात आणि काही विकृत मुलं त्याचे असे पांग फेडताना दिसतात. जन्मदात्या माता पित्यांना मारहाण करण्यासाठी यांचे मन आणि हात कसे धजावतात हे समजायला कठीणच. पण गुन्हा घडला आहे आणि आता अशा विकृतांना धडा शिकवला जाणं ही काळाची गरज बनू लागली आहे.

संबंधित घटनेचा व्हिडीओ

-संतोष दिवाडकर

आंबिवली अटाळी परिसरातील पाणीपुरवठ्यासाठी शिवसेना नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन

आंबिवली, अटाळी परिसरात पाणी पुरवठा सुरळीतपणे होत नसल्याने शिवसेना अटाळी शाखेच्या वतीने मंगळवारी ‘अ’  प्रभागक्षेत्र कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

आंबिवली, अटाळी परिसरातील नव्वद टक्के भागात दिवसातून एक तास पाणी वितरीत होते. त्यात पाणी पुरवठा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष असुन अनेक वर्ष तक्रार करूनही पाणी पुरवठ्यात सुधारणा होत नसल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक दशरथ तरे, शिवसेना शाखाप्रमुख ऋषीकांत पाटील, माजी नगरसेविका हर्षाली थविल, लीलाबाई तरे, माजी नगरसेवक दुर्योधन पाटील  आदींसह शिवसैनिकांनी मंगळवारी अ प्रभाग कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करीत पाणी वितरण सुरळीतपणे करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.                               

        अ प्रभाग क्षेत्रात अनेक वर्षांपासून पाणी पुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता नसल्याने “अ” प्रभागक्षेत्राचा संपूर्ण कार्यभार उप अभियंता संभाळत आहेत. यामुळे त्यांच्यावर कामाचा जास्त भार येतो व ते फोन घेत नाहीत तसेच पाणी पुरवठा संबंधित कामांना गती मिळत नाही. तसेच “अ” प्रभागासाठी मोहेली येथुन ९८ एमएलडी तसेच टिटवाळा येथून ७ एमएलडी पाणी पुरवठा होत असताना देखील पाणी पुरवठ्याचे समान वितरण का होत नाही, पाणी जाते कुठे असा खडा सवाल  उपस्थित  करीत प्रशासनाला माजी नगरसेवक दशरथ तरे यांनी धारेवर धरले.

केडीएमसीच्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रावरून वडवली पाणी पुरवठा लाईनला दैनंदिन होणारा पाणी पुरवठा हा शहाड, वडवली, अटाळी, आंबिवली, नेपच्यून या भागात होत असतो. परंतु या पाणी पुरवठ्याचे सर्व भागात समान वितरण होत नाही. काही भागांना दिवसातील चौदा ते सोळा तास पाणी वितरत होते. तर अटाळी, आंबिवली परिसरातील नव्वद टक्के भागात दिवसाला एकच तास पाणी वितरित होते. पंरतु एक तास होणारा होणारा पाणी पुरवठा सुध्दा कमी दाबाने होत असल्याने नागरिकांची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. अनेक वर्ष याबाबत तक्रार करूनही कुठलीही सुधारणा होत नाही. सर्वांना समान पाणी बील आहे. त्याप्रमाणे पाण्याचे वितरण समान वाटप करावे ही जनतेची मागणी असुन याबाबत प्रशासनाने दखल घेऊन पाण्याचे समान वाटप करावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

“अ” प्रभागक्षेत्र आधिकारी राजेश सावंत यांच्या दालनात झालेल्या बैठकीत पाणी पुरवठा उप अभियंता उदय सूर्यवंशी यांनी  तंत्रिक अडचणीमुळे उशीराने पाणी पुरवठा होतो, येत्या आठवड्यात पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांमार्फत  ज्या परिसरात पाणी टंचाई होत आहे. त्या बाबत तपासणी करून पाणी पुरवठा सुरळीतपणे होईल याकडे लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले.  या ठिय्या आंदोलनात माजी नगरसेवक दशरथ तरे, दुर्योधन पाटील, माजी नगरसेविका लीलाबाई तरे, हर्षाली थवील, शाखाप्रमुख ऋषीकांत पाटील शिवसेना पदाधिकारी रमेश पाटील, लता भोईर, चतुर सोनावणे आदींसह स्थानिक नागरिक सहभागी झाले होते.

-कुणाल म्हात्रे

‘बी.एल.ओ’ चे आदेश रद्द करण्याची मुख्याध्यापक संघाची तहसीलदारांकडे मागणी

शिक्षकांना दिलेले बी.एल.ओ चे आदेश रद्द करण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने तहसीलदारांकडे केली असून शिक्षकांनी दहावीचे निकाल तयार करायचे कि  बी.एल.ओ.चे काम असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

दहावीची परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता नववीचे गुण व इयत्ता दहावीच्या अंतर्गत गुणांवर आधारित दहावीच्या निकालाचे काम शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविल्याने निकाल तयार करण्याची धावपळ सुरू आहे. यातच विधानसभा क्षेत्र  १४२ मतदार संघातील शिक्षकांना केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) कामाचे आदेश काढण्यात आले आहेत.  शिक्षकांना मतदार यादीचा अभ्यास करणे, यादीतील दुरुस्ती, दुबार, मयत, स्थलांतरित, छायाचित्र चिटकवणे नोटिसा बजावणे इत्यादी कामे करण्याकरिता आदेश काढण्यात आले आहेत.

 मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव पाटील, सचिव अनिल पाटील व इतर पदाधिकारी ए.व्ही. पाटील, आप्पाराव कदम यांनी विधानसभा क्षेत्र १४२ चे प्रमुख तहसीलदार सुरेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व  निवेदनाद्वारे बी.एल.ओ.चे आदेश रद्द करण्याची मागणी केली.

-कुणाल म्हात्रे

विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याबाबत कल्याण डोंबिवलीत सर्वपक्षीय कृती समिती समर्थन संघटना स्थापन

नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी समर्थन करण्यासठी कल्याण डोंबिवलीतील सर्व पक्षीय पदाधिकार्यांनी  सर्वपक्षीय कृती समिती समर्थन संघटना स्थापन केली असून नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देणेच नैसर्गिक न्याय हक्काचे असल्याचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

नवी मुंबई विमानतळाला मा.दि.बा.पाटील यांचे नाव देणे हे रायगड जिल्ह्यातील शेतकरी भूमिपुत्रांचा नैसर्गिक हक्क आहे. नवी मुंबई निर्माण करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील शेतकरी भूमित्रांच्या जमीनी महाराष्ट्र सरकारने बंदुकीच्या जोरावर हिसकावून घेतल्या. त्यांचे राहते घर सोडून संपूर्ण जमीनी जबरदस्तीने ताब्यात घेऊन त्यांना भूमिहीन केले. व त्यांची पारंपरिक वडिलोपार्जित असलेली शेती, मच्छीमार, मिठागरे ही उत्पन्नाची साधने देखील हिरावून घेतली व त्यांना कायमस्वरूपी बेरोजगार करून उध्वस्त केले आहे.

    महाराष्ट्र शासनाच्या या जुलमी जमीन संपादन प्रक्रियेच्या विरोधात दि.बा.पाटील यांनी शेतकरी भूमिपुत्रांचा एक ऐतिहासिक व क्रांतिकारक आंदोलन, लढा उभा केला. त्या आंदोलनावर तत्कालीन सरकारने लाठीमार केला,अश्रुधुर सोडले, गोळीबार केला व पाच शेतकरी भूमिपुत्र ठार मारले.  त्यात दि.बा. पाटील देखील रक्तबंबाळ झाले होते. नवी मुंबई स्थापन करण्यासाठी सरकारने रायगड जिल्ह्यातील पाच शेतकरी ठार मारलेच शिवाय लाखो शेतकरी भूमिपुत्रांना भूमिहीन करून त्यांचा जीवंतपणीच बळी घेतला आहे. आणि नवी मुंबईतून भूमिपुत्रांचे अस्तित्वच उध्वस्त केले आहे. व त्यांच्यावर घोर अन्याय केला आहे.

   सरकारच्या या अन्यायकारक कृती विरोधात आणि भूमिपुत्रांच्या पुनर्वसनासाठी दि.बा.पाटील हे अतिशय प्रामाणिकपणे जीवनाच्या शेवटपर्यंत लढले. व तेथील भूमिपुत्रांना साडे बारा टक्के विकसित प्लाँट परत देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाकडून पदरात पाडून घेतला. परंतु सिडको प्रशासनाने व राज्य सरकारने आश्वासन दिल्याप्रमाणे आजही प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांच्या उर्वरित मागण्या मान्य केल्या नाहीत. वाढीव प्लाँट, गावठाण विस्तार योजना, गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करणे, नोकऱ्या,रोजगार इत्यादी मागण्या प्रलंबित ठेवल्या आहेत.

    त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रास्तावित असल्यापासून तेथील प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे हि मागणी वेगवेगळ्या प्रकारे करत आहेत. हा त्या सिडको प्रकल्पग्रस्तांचा नैसर्गिक हक्क आहे.  त्यामुळे नवी मुंबई प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा मान राखून नवी मुंबई विमानतळाला “लोकनेते दि.बा.पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ” असे नाव देऊन सिडको प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांना व अखिल बहुजन समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी सर्व पक्षीय कृती समिती समर्थन संघटनेने मुख्यमंत्र्याकडे केली आहे.  

      या संघटनेत  काँ. काळू कोमास्कर, काँ. आत्माराम विशे, कॉ. पी के लाली, रवी भिलाने, ज्ञानेश पाटील, आनंद नवसागरे, काँ. जी आर पाटील, शैलेंद्र दोंदे, ज्योती बडेकर, गणेश सोस्टे, बाबा रामटेके, संजय शिंदे, संजय गायकवाड, अमित दुखंडे, काँ. महेश आवारे, संदीप पवार, विलास डिके आदींचा समावेश आहे.

-कुणाल म्हात्रे

रावसेना सामाजिक संस्थेतर्फे सिटीपार्क मध्ये वृक्षरोपण

कल्याण येथील गौरी पाड्यातील केडीएमसी सिटी पार्क परिसरात रविवारी  राव सेना सामाजिक संस्थेमार्फत वृक्षरोपणाचा अभियान राबविण्यात आले.

कोरोना काळात ऑक्सीजनचे महत्त्व संपूर्ण जगाला समजले असून ऑक्सीजन न भेटल्यामुळे अनेक जणांनी आपले प्राण गमावले. त्यामुळे ऑक्सीजन कीती महत्वपूर्ण आहे समजले. या गोष्टी लक्षात घेता रावसेना सामाजिक संस्थेमार्फत केडीएमसी सिटी पार्क परिसरात ३०  रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमांत रावसेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अमोलराव सोळंके यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. वृक्षरोपण कार्यक्रम प्रमुख साहिल आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम राबवण्यात आला.

यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आकाश आखाडे, संपर्क प्रमुख आशुतोष आहेर, क्रीडा सेना अध्यक्ष निलेश शेलार, कार्याध्यक्ष चंदन वझे, जिल्हा अध्यक्ष तेजस कोंडार, रवी शर्मा,  ज्ञानेश ननावरे, शहर अध्यक्ष दीपक बांडे, जयेश मराठे, तनय गायकवाड, वेध मोरे, शुभम चौधरी, दैविक वझे, गितेश शेलार,  यश आदी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

मलंगगड भागात नागासह ६ नवजात पिल्लांना सर्पमित्राने दिले जीवदान

कल्याण पुर्वेतील नेवाळी नाका मलंगरोड येथील मोहमद शाहजाद यांच्या कपाट दुरुस्तीच्या दुकानाबाहेर नाग जातीचा साप आढळून आल्याने सर्पमित्र दत्ता बोंबे,  तसेच त्या परिसरातील सर्पमित्र कुर्ला पोलिस ठाण्यात कर्तव्य करणारे,मुंबई हायकोर्ट येथे मानद पशु कल्याण अधिकारी म्हणून  नियुक्त असलेले पोलीस शिपाई मुरलीधर जाधव, स्थानिक सर्पमित्र कुलदीप चिखलकर यांना कळविले असता तातडीने घटनास्थळी सर्पमित्रांनी पोहचत  दुकानाच्या बाजुला आढोश्याला बसलेल्या नाग जातीचा पाच फुट लांबीचा विषारी सापास पकडले.

तिथे सर्पमित्रांनी अंड्यातून बाहेर पडणारी नवजात नागांची सहा पिल्ले देखील पकडुन नागासह पिल्लांना जीवनदान दिले. सर्पमित्रांनी विषारी पाच फुट नागासह नवजात नागांच्या पिल्लांना पकडल्याचे पाहून उपस्थितांनी सुटकेचा निश्वास टाकला. सर्पमित्रांनी ताब्यात घेतलेल्या नागासह पिल्लांना  वन विभागाला कळवून नंतर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

-कुणाल म्हात्रे

शिक्षकांना लोकल प्रवासास परवानगीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे लक्षवेधी आंदोलन

शिक्षकांना लोकल प्रवासा करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कल्याण रेल्वे स्थानकात लक्षवेधी आंदोलन केले.

१५ जून पासून राज्यातील शैक्षणिक वर्षाला सुरवात झाली. शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मुंबई उपनगरासह  ठाणे जिल्ह्यातील अनेक  शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी रेल्वेने प्रवास करत असतात. परंतू कोव्हीड 19 मुळे रेल्वेने प्रवास करण्यास बंदी आहें. रेल्वे प्रवास करण्याची अनुमती द्यावी. या संदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने मुख्यमंत्री, शिक्षण मंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. परंतू अनुमती  मिळालेली नाही.

इयत्ता दहावीची परीक्षा रद्द झाल्याने इयत्ता नववी व दहावीच्या अंतर्गत गुणांवर आधारित दहावीच्या निकालाची कामे शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविली आहेत. ही कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करणे अनिवार्य असल्याने मुंबई  उपनगरातून अनेक शिक्षक शाळेत येण्यासाठी निघाले असता  त्यांना स्टेशन वरती तिकीटे नाकारलीत त्यामुळे शिक्षकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने कल्याण रेल्वे स्टेशन येथे कोव्हीड नियमांचं पालन करून लक्षवेधी आंदोलन केले.

कल्याण रेल्वे स्थानक मूख्य व्यवस्थापक अनुप कुमार जैन यांना निवेदन देवून त्यांच्या मार्फत मध्य रेल्वे मुख्य व्यवस्थापक सीएसटी मुंबई यांच्याकडे तातडीने पत्रव्यवहार करून शिक्षकांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शिक्षक परिषेदेने केली. लक्षवेधी आंदोलना प्रसंगी कल्याण डोंबिवली महानगराचे कार्यवाह गुलाबराव पाटील, ठाणे शहर अध्यक्षा हेमलता मुनोत इतर पदाधिकारी ए. व्ही. पाटील,  आप्पाराव कदम, संध्या वाबळे, सलीम सर, अमित मिश्रा व विनोद मिश्रा उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

नाल्याच्या त्रासामुळे भाजपा पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी नाल्यात बसून केले आंदोलन

कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले नगरमध्ये नाल्याचे काम होत नसल्याने भाजपा पदाधिकाऱ्यासह नागरिकांनी नाल्यात उतरून आंदोलन केले.

 नाल्याचे काम न झाल्याने पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात जाते. याचा त्रास नागरिकांना होत आहे. पावसाळ्यात तर परिस्थिती एकदम वाईट असते, वारंवार तक्रार करून सुद्धा महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप करत भाजपा पदाधिकारी सुशील पायल आणि स्थानिक काही नागरिक नाल्यात उतरले, नाल्यात बसून अनोखे आंदोलन करण्यात आले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील अ प्रभाग हद्दीतील वार्ड क्र- १३  मोहने गावठाण  परिसरात  बहुचर्चित नाल्याचे रखडलेले काम  अनेक वर्षांपासून होत नसल्याने भाजपचे मोहने टिटवाळा मंडळ सचिव सुशिलकुमार पायाळ यांनी वारंवार तक्रारी करून सुद्धा नाले गटाराचे काम मार्गी लागत नसल्याने २१ जून रोजी नाल्यात बसून आंदोलन करण्याचा इशारा केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी  यांना पत्राव्दारे दिला होता. पालिकेला इशारा देऊन सुद्धा या नाल्याचे काम सुरु न झाल्याने अखेर आज सुशील पायल यांनी स्थानिकांसमवेत याठिकाणी नाल्यात बसून आंदोलन करत पालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

दरम्यान त्या नाल्याचे काम सुरु झाले होते. मात्र त्याठिकाणी काही लोकांनी जागेसंदर्भात हरकती घेतल्या, सध्या प्रक्रिया सुरु असून जागेचा वाद मिटल्यानंतर नाल्याचे काम पूर्ण केले जाईल अशी प्रतिक्रिया  महापालिकेचे अ प्रभाग अधिकारी राजेश सावंत यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवली एमआयडीसीमधील जुन्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलण्याची मागणी

डोंबिवली एमआयडीसी मधील जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्या तातडीने बदलणे अतीआवश्यक असून त्या बदलण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी एमआयडीसी प्रशासनाकडे केली असून यासाठी लोकप्रतिनिधींनी देखील लक्ष देण्याचे आवश्यक असल्याचे मत राजू नलावडे यांनी व्यक्त केले आहे.

  डोंबिवली एमआयडीसीची स्थापना १९६४ साली झाल्यावर येथील उद्योगांसाठी रासायनिक व इतर सांडपाणी वाहून नेण्यासाठी सत्तरच्या दशकात जमिनीखालील सांडपाणी वाहिन्यांची कामे करण्यात आली होती. निवासी भागातील सांडपाणी वाहिन्यांची कामे १९८५ नंतर सुरू करण्यात आली होती. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी वाहिन्या या कंपन्यांचे सांडपाणी वाहून त्या सामूहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रापर्यंत सीइटीपी त्यानंतर प्रक्रिया करून शुद्धीकरण केलेले हे सांडपाणी खाडीत सोडले जाते.

औद्योगिक क्षेत्रातील तयार होणारे कंपन्यांचे सांडपाणी मधील सिओडी (केमिकल ऑक्सिजन डिमांड) याचे ठरवून दिलेल्या प्रमाणापेक्षा त्यात वाढ झाल्यास व इतर रासायनिक घन कचरा आल्यास त्या जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्यांमधून वाहून जातांना वाहिन्यांवर दाब येऊन किंवा चोकअप होऊन त्या वाहिन्या नादुरुस्त होत आहेत. या नादुरुस्त वाहिन्यामधून प्रक्रिया न केलेले सांडपाणी बाजूचा उघड्या नाल्यात किंवा रस्त्यावर वाहते. त्यावेळी त्याचे रासायनिक प्रदूषण होऊन त्याचा उग्र वास आजूबाजूचा परिसरात पसरला जातो. शिवाय ते प्रदूषित न प्रक्रिया केलेले सांडपाणी उघड्या नाल्याद्वारे खाडी, नदीत जाऊन त्यातील पाणी प्रदूषित होत असते.

       एमआयडीसी निवासी भागातील सांडपाणी वाहिन्यांची स्थिती पण अतिशय खराब झाली आहे. त्या जुन्या झालेल्या वाहिन्यांना रस्ते दुरुस्ती, महानगर गॅस, पाण्याच्या पाइपलाइन तसेच केबल टाकताना त्यांना धक्के बसून त्या नादुरुस्त झाल्या असाव्यात. शिवाय त्यात वृक्षांची खोलवर गेलेली खोड/मुळे वाहिन्यांत शिरून वाहिन्या खराब झाल्या आहेत. निवासी भागात अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या आणि त्यांचे चेंबर फुटलेले आढळून येत असून त्यातून बाहेर पडणारे सांडपाण्यामुळे दुर्गंधी येत असते.

   नादुरुस्त, जीर्ण, जुन्या झालेल्या सांडपाणी वाहिन्यांमुळे रासायनिक प्रदूषण, दुर्गंधी, आरोग्य, पर्यावरण इत्यादी यांचे गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. एमआयडीसी कडून जुन्या वाहिन्या बदलून नवीन वाहिन्या टाकण्याचे प्राथमिक स्तरावर कागदावर नियोजन चालू आहे. याकामासाठी जरी काही दिवसांनी प्रस्ताव पाठविला तरी त्यानंतर मुख्य कार्यालयाकडून मंजुरी मिळणे, टेंडर काढणे इत्यादी कामांसाठी काही महिने/वर्षे जातील त्यानंतर सदर हे मोठे काम पूर्णत्वास येण्यास अजून काही वर्ष जातील. त्यामुळे आरोग्य, प्रदूषण याविषयी असलेल्या या महत्त्वाचा प्रश्नात हे काम तातडीने लवकर कसे मार्गी लागेल यासाठी येथील सर्व लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी केली आहे.

-शरद शिंदे

‘निरोगी तन व शांत मन हीच खरी योगाची गुरुकिल्ली आहे’ – केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

“निरोगी तन व शांत मन” हीच खरी योगाची गुरुकिल्ली आहे असे उद्गार कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून  डोंबिवलीतील सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित असलेल्या नागरिकांसमोर, सोशल डिस्टनसिंगच्या सर्व नियमांचे पालन करून संपन्न झालेल्या योग दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी हे उद्गार काढले.

सध्या रुग्ण संख्या कमी झाली असून मृत्यूचे प्रमाणही अत्यंत कमी झाले आहे. परंतु कोविडचे संकट टळले आहे असे समजून निर्धास्त राहू नका, मोठ्या प्रयत्नांनी  कोविडच्या दुसऱ्या लाटेवर नियंत्रण ठेवण्यात आपण यशस्वी झालो आहोत. तरी  सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे, मास्कचा कटाक्षाने वापर करणे, हात वारंवार धुणे या त्रिसूत्रीचे अवलंब करावा, असे आवाहन आयुक्तांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले. जरी लसीकरणाचे 2 डोस झाले असले तरीही ही बंधने पाळावीत असेही ते पुढे म्हणाले.

 कोविडच्या पहिल्या लाटेत टीव्हीवर सतत दिसत असलेल्या कोविड विषयक बातम्या आणि त्यामुळे त्याचा जनमानसावर येणारा ताण दूर व्हावा याकरिता  नागरिकांना विरंगुळ्याचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून महापालिकेने गेल्या वर्षभरात जवळजवळ १५०० विविध मनोरंजनाचे कार्यक्रम फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांसाठी सादर केले. योगासनांचे कार्यक्रमही नागरिकांच्या माहितीसाठी सादर करण्यात आले आणि कोविड कालावधीत योगाचा फायदा झाल्याबाबत नागरिकांच्या प्रतिक्रियाही प्राप्त झाल्याची माहिती आयुक्तांनी या कार्यक्रमात दिली.

जागतिक योग दिनानिमित्त सावित्रीबाई नाट्यगृहात कोविड लसीकरणासाठी उपस्थित नागरिकांसमोर कल्याण-डोंबिवलीतील प्रख्यात योग शिक्षक सचिन गोडांबे, श्रीकांत देव यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योगासनाचे प्रकार उपस्थित नागरिकांसमोर सादर केले. यासमयी कलर्स वाहिनीवर “सुर नवा, ध्यास नवा, आशा उदयाची “या संगीत पर्वात पारितोषिक मिळवून कल्याण डोंबिवली नगरीच्या बहुमान वाढविलेल्या प्रज्ञा साने या युवतीचा आयुक्तांच्या हस्ते सन्मानपत्र व फुलझाडाचे रोपटे देवून  सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमा समयी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, उप आयुक्त पल्लवी भागवत, उप आयुक्त विनय कुलकर्णी, महापालिका सचिव संजय जाधव, सहा. जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे व अन्य अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन दत्तात्रय लदवा यांनी केले.

-संतोष दिवाडकर