Baipan Bhari Deva review : बाईपण भारी देवा चित्रपट का गाजतोय ? हा अनेकांना पडलेला एक प्रश्न आहे. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी अनेकांचे पाय सध्या सिनेमागृहाकडे वळत आहेत. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी फक्त स्त्रिया गर्दी करीत असून जेमतेम १०% पुरुषच सिनेमागृहात हजेरी लावत आहेत ते ही आपल्या बायकोच्या इच्छेखातर.
केदार शिंदे दिग्दर्शीत हा चित्रपट रितेश देशमुखच्या वेड चित्रपटा नंतर महाराष्ट्रभरात गाजला असून या चित्रपटाने बॉलिवूडची मात्र महाराष्ट्रात चांगलीच वाजली आहे. पाच करोड खर्च करून बनवलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत ३२ करोडचा पल्ला पार केला आहे. इतकेच कायतर कधी नव्हे ते सिनेमागृहात फक्त मराठी चित्रपटासाठी स्क्रीन लागत असून बॉलिवूड करिता पुरेश्या स्क्रीन मिळणे आणि चित्रपट चालणे अतिशय अवघड बनल्याचे भासू लागले आहे.
कल्याण मेट्रो मॉल मधील आयनॉक्स सिनेमा मध्ये या रविवारी हिंदी चित्रपटाला जेमतेम स्क्रीन मिळाल्या असून ‘बाई पण भारी देवा’ या मराठी चित्रपटाला तब्बल १६ स्क्रीन दिल्या असून ही अभिमानाची बाब आहे. याबद्दल प्रेक्षकांनाही तितकेच धन्यवाद द्यायला हवे.
चित्रपटाला फक्त महिलांची उपस्थितीच का ?
चित्रपटाच्या नावाप्रमाणेच हा चित्रपट महिलांचाच आहे अशी या चित्रपटाची ओळख पडली आहे. मुळात चित्रपटाचे कथानकच महिलांच्या जीवनातील रोजच्या संघर्षावर आधारित आहे. त्यामुळे चित्रपट पहायला येणारी प्रत्येक महिला स्वतःला कुठे ना कुठे त्या चित्रपटात पाहत आहे. असे असल्याने हा चित्रपट गाजत असून त्याची चर्चा महिलांमध्ये सुरू असते. म्हणून महिला एकत्रितपणे येऊन ग्रुप बनवून चित्रपट पाहत आहेत. काही महिलांच्या ग्रुपने तर संपूर्ण स्क्रीनच बुक केले आहे.
महिला आपल्या जीवनात कोणत्या खडतर वाटचालीतुन जात असतात? त्या कसा संघर्ष करीत असतात? त्यांची सुख त्यांची दुःख हे खर तर पुरुषांनाही समजणे तितकेच गरजेचे आहे. म्हणून हा चित्रपट केवळ महिलाच नव्हे तर पुरुषांनी देखील पाहणे तितकेच गरजेचे आहे. हा चित्रपट सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत एक संघर्ष दाखवतो. ज्यात हसण्यासाठी कॉमेडी देखील समाविष्ट आहे. मात्र हा चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात जाणारी स्त्री आणि सिनेमागृहातून बाहेर पडणारी स्त्री ही काहीशी वेगळी असते. सिनेमा पाहिल्या नंतर महिलांमध्ये एक वेगळाच आत्मविश्वास येत असल्याचे पाहायला मिळत असून ही सकारात्मक बाब महिलांच्या आयुष्याला कलाटणी देण्यासाठी फायद्याची ठरू शकते.
–संतोष दिवाडकर
Baipan Bhari Deva review ; Why is the movie Baipan Bhari Deva popular?