मावळ तालुक्यातील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्धीच्या झोतात ; दिवसाला होते शेकडो गाड्यांची गर्दी

लेखन :- संतोष दिवाडकर

मावळ तालुक्यातील वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर आता प्रसिद्धीच्या एका झोतात उतरले आहे. गावातील तरुणांच्या व्हॉट्स अप स्टेट्स आणि इन्स्टाग्रामच्या स्टोरी मुळे हे मंदिर इतकं लोकांपर्यंत पोहोचलं आहे की पुण्यातील लोक या मंदिराकडे आता गर्दी करू लागले आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात पर्यटकांचा वावर हा मागील १० वर्षांपासून प्रचंड वाढीस लागला आहे. त्याचे कारण म्हणजे या तालुक्याला निसर्गाने दिलेल्या सौन्दर्याची देणं. शिवाय छत्रपती शिवाजी महाराजांची कर्मभूमी म्हणून मावळ तालुका ओळखला जातो. आणि स्वराज्यातीलच काही महत्त्वाचे किल्ले याच तालुक्यात ताठ मानेने आभाळ स्पर्शीत आहेत. लोहगड, विसापूर, तिकोणा, तुंग सारखे अभेद्य किल्ले, भुशी आणि पवना सारखी धरण, टायगर, लायन पॉईंट सारखी उंच ठिकाण, कारल्याची एकविरा देवी, येथील लेण्या आणि जंगले येथील पर्यटनाचे मुख्य स्रोत आहेत. यामुळे ऋतू कोणताही असो ईथे पर्यटन संपत नाही. मुंबई पुण्याहून येणाऱ्या पाव्हन्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी दर शनिवारी रविवार हा मावळ प्रांत जणू काही सज्जच असतो.

काय आहे मंदिराचा इतिहास ?

Courtesy – Being Maharashtrian FB

मावळ तालुक्यातील पवना धरणा जवळ असलेले शिळीम हे गाव. या धरणाला लागून असलेल्या वाघेश्वर या खेडेगावावरून येथील एका पुरातन मंदिराला वाघेश्वर शिवमंदिर म्हणून ओळख मिळाली आहे. तिकोणा किल्ल्याच्या डोंगराच्या पायथ्यापासून बरोबर समोरच हे मंदिर उभे आहे. काही जाणकारांनी हे मंदिर शिवाजी महाराजांच्या काळातील असल्याचे सांगितले तर काहींनी हे मंदिर त्याही पेक्षा पुरातन म्हणजे हेमाडपंथी असल्याचा दावा केला आहे. हे मंदिर नेमके कधी बांधले ? हा शोध लावण्यासाठी अद्याप कोणत्याही इतिहास संशोधकाने या मंदिराला भेट दिली असल्याचे ऐकण्यात नाही. त्याचे कारण म्हणजे मुख्य रस्त्या पासून आडबाजूला हे मंदिर उभे आहे.

सोशल मीडियामुळे मंदिर प्रसिद्ध

पवना धरणाची निर्मिती झाल्या नंतर पावसाळ्या पासून वर्षातील अर्ध्यापेक्षा जास्त काळ हे मंदिर खोल पाण्यात सामावलेले असते. फक्त उन्हाळ्यातच मंदिर कोरडे असते. महाशिवरात्रीच्या काळात पाणी ओसरून मंदिराच्या कळसाचे दर्शन शिवभक्त घेऊ शकतात. यंदाच्या महाशिवरात्रीला काही तरुण शिवभक्त कंबरभर पाण्यातून महादेवाला अभिषेक करण्यासाठी गेले होते. आणि इथूनच सुरू झाले इंस्टा आणि व्हॉट्सअपवर स्टेट्स पडणे. एखाद्याने स्टेट्स पाहिल्यानंतर त्याचे मित्र देखील मागायचे. अलीकडे सोमवारी महादेवाला स्टेट्स टाकणे एक ट्रँड बनला आहे. आणि याच ट्रेण्डमुळे हे मंदिर देखील ट्रेंड मध्ये आले आणि लोकांनी प्रत्यक्ष मंदिर पाहावे असा बेत आखला.

वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर हे तसे पाहता फारसे कुणाला माहिती नव्हते. गावात एखाद्याच्या घरी पाव्हने आले की त्यांना गाव फिरवता फिरवता सर्वात आधी हे मंदिर दाखवण्यासाठी गावकरी नेत असत. गावाशी संबंध असलेली माणसं सोडली तर हे मंदिर संपूर्ण जगापासून लपून राहिलेले होते. पण २०२१ मध्ये सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्या नंतर आता मात्र मंदिरात लोकांची गर्दी होऊ लागली आहे. परंतु या आधी क्वचित एखादाच माणूस दिवसा गेला तर जाई. सर्व गावांपासून दूर धरणात असल्याने फारसे कुणाची रेलचेल नसे.

मंदिरात प्रथमच तोब्बा गर्दी आणि रांगा

अनलोकची प्रक्रिया सुरू झाल्या पासून अनेक दिवस घरात असलेले लोक आता पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत. सर्व मंदिरे बंद असल्याने कायम खुल्या असलेल्या महादेवाच्या या मंदिरात भक्तगण देखील गर्दी करू लागले आहेत. जवळच्याच शिळीम गावातील गावकऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार शनिवार, रविवार आणि सोमवार या तीन दिवसांत शेकडो गाड्या येत असतात. पाचशे ते सहाशे माणसं येत असतात. या मंदिरात होणारी गर्दी इतकी वाढली आहे की आता दर्शनासाठी रांगा लावाव्या लागत आहेत. काहीवेळेस तर पोलिसांना सुद्धा या ठिकाणी गस्त करावी लागत आहे. मंदिरात अचानकपणे होणारी पर्यटकांची गर्दी पाहता ग्रामस्थ देखील अवाक झाले आहेत. कारण अगोदर कधीही इतकी गर्दी झाली नाही. पुणे शहरातील लोक सध्या गर्दी करतच आहेत मात्र भविष्यात मुंबई सह महाराष्ट्रातुन इथे प्रचंड गर्दी उफाळू शकते.

नुकतीच झाली मंदिराची डागडुजी

२०१९ साली एका शिवभक्ताने राजस्थानहुन काही कारागीर आणून या पडझड झालेल्या मंदिराची कसलाही गाजावाजा न करता डागडुजी करून घेतली होती. खोदकाम करून माती खाली गेलेल्या पायऱ्या बाहेर केल्या. त्यामुळे हे मंदिर आता काहीसे चांगल्या स्थितीत वाटत आहे. आता पावसाळा सुरू झालं असून महिन्याभरात पुन्हा हे मंदिर पवनेच्या जलाशयात गायब होणार आहे. ते थेट २०२२ सालातच दृष्टीस येणार आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी मात्र मोठी गर्दी इथे उसळू शकते. यासाठी स्थानिक आमदार, ग्रामपंचायत आणि राज्यसरकार या सर्व यंत्रणांना सज्ज रहावे लागणार आहे.

भविष्यात व्यवसायाला मिळणार चालना

लवकरच हे मंदिर पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित होईल. त्यामुळे दररोज पर्यटक आणि त्यातल्या त्यात शिवभक्त इथे मोठ्या संख्येने येऊ शकतात. असे झाल्यास इथे मोठ्या प्रमाणावर व्यावसायास चालना मिळेल. फुलांचे स्टोल, प्रसादाचे स्टोल, दुग्धजन्य पदार्थांची विक्री, चहा नाश्त्यासाठीचे स्टोल, जेवणासाठी हॉटेल्स अश्या सर्व व्यवसायांना येथे भविष्यात चालना मिळणार आहे. आणि हे सर्व व्यावसाय कुणी बाहेरून येणाऱ्या लोकांनी थाटायचा आत गावकऱ्यांनीच उभारले तर जवळपासच्या गावातील तरुणांसाठी हा एक रोजगार देखील ठरणार आहे. आता या मंदिरामुळे आणखी काय काय बदल भविष्यात घडून येणार आहेत हे आपण पाहूच.

-संतोष दिवाडकर ( पत्रकार 8767948054 )

गुणे सर आणि एक आठवण…

३ जून २०२१…. गुणेश डोईफोडे सरांनी सकाळी सकाळी या जगाचा निरोप घेतला. सकाळी उठल्यानंतर ऐकलेल्या या दुःखद बातमीवर विश्वास करणे खूप कठीण होऊन बसले. हृदयविकाराच्या झटक्याने अचानक त्यांना देवाज्ञा झाली आणि संपूर्ण विद्यार्थी वर्ग हळहळला.

शाळेत असताना व्हिलन प्रमाणे वाटणारे परंतु प्रत्यक्ष जीवनात हिरो असणारे आमचे गुणेश सर आज आमच्यात नाहीत. खरं तर अजूनही वाटत नाही की त्यांचं असं झालं आहे. चालता बोलता ते निघून गेलेत. रोज त्यांचे स्टेट्स पाहायला मिळायचे. विद्यार्थी मोठे झाले पण रोज काही ना काही ज्ञानात भर पाडणे त्यांनी सोडले नाहीत. व्हॉट्सऍप ग्रुप असो किंवा पर्सनल बोलणं. सरांनी प्रत्येक क्षणाला काही ना काही नवीन शिकवण्याचा प्रयत्न सोडला नाही.

आजपासून १७ वर्षांपूर्वी… चौथ्या इयत्तेत शिकत होतो. आणि वर्गातल्या मुलांमध्ये एक चर्चा सुरू होती. त्यातील दोघा तिघांनी गुणेश सरांचा मार खाल्ला होता. असे असे सर आहेत त्यांचा पासून सावध रहा असे सर्व पोर म्हणत होती. हे गुणे सर कोण ? तेव्हा सरांना मोस्ट ऑफ गुणे सर म्हणत. शाळा सुटताना चौथ्या माळ्यावरून गोंगाट करत खाली येणारे आम्ही पहिल्या माळ्यावर शांतपणे चालायचो. कारण इथेच गुणे सर उभे असायचे. आणि मी पहिल्यांदा त्यांना पाहिले. डोळ्यावर चष्मा आणि त्यातून करडी नजर, फॉर्मल राहणी. पुढच्या वर्षी पासून ते आपल्याला शिकवणार याची भीती आम्हाला लागलेली. ते आमच्या वर्गाला नकोत असे त्यावेळी वाटे. पाचवी झाली सहावी झाली. पण नेमके सातवीत गेल्या नंतर विज्ञान शिकवायला ते आम्हाला आले. त्यावेळी परीक्षा म्हणजे ट्वेन्टी ट्वेन्टी. म्हणजेच 20 गुणांच्या चाचणी परीक्षा. पहिल्याच चाचणी परीक्षेत बरेच विद्यार्थी विज्ञान विषयात फेल झाले. मी कसाबसा काठावर पास झालो. पण सगळ्या वर्गाने हातावर छड्या खाल्ल्या. पुढे आम्हाला त्यांची सवय बनली. त्यांचा तास सुरू झाला की वर्ग शांत होत असे. ते वर्गात येऊ न येऊ वर्ग शांत होत असे. एक तास संपलेले शिक्षक बाहेर पडले की गुणे सर दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला वर्गात येत असत. सहामाई परीक्षा संपली आणि इतिहास हा विषय देखील ते शिकवू लागले. तसा हा विषय आम्हाला शाळेच्या मुख्यध्यापिका शिकवायच्या. पुढे त्यांनी तो ही विषय गुणे सरांना दिला.

एके दिवशी मधली सुट्टी संपलयाची घंटा कानावर पडली. आता गुणे सरांचा तास. वर्गातली पोर धावपळ करीत जागेवर बसली. इतिहासाची पुस्तक दप्तरातुन बाहेर पडून बेंचवर आली. जो धडा आज सर शिकवणार तो ही काढून ठेवला. दाराला डोळे खिळले. ५ मिनिटे झाली सर येईना. १० मिनिटे झाली सर येईना. म्हणजे हा ऑफ पिरेड दिसतोय. वर्गात हळूहळू आवाज सुरू झाला. आमच्या बेंच वर हळूहळू मस्ती सुरू झाली. मी त्या दिवशी कडेला बसलो होतो. मध्य भागी माझा मित्र सागर आणि भिंतीकडे धीरज. पाठीमागे तीन मुली बसल्या होत्या. मी खिशातला रुमाल काढून तो डोक्यावर ठेवला आणि अरबी लोकांसारखा डान्स करू लागलो. या पाचही जनांनी मला प्रोत्साहन दिलं. आणि मला आणखी एकदा नाचायला सांगितलं. मी पुन्हा नाचायला लागलो तोच अचानक वाऱ्याच्या वेगाने सर वर्गात शिरले आणि खुर्चीवर बसले. डोळ्यावर रुमाल असल्याने मला काही दिसले नाही. पण सरांनी मला पाहिले हे सर्वांना माहीत होते. आजूबाजूला कुजबुज सुरू झाली. एकसाथ नमस्ते म्हणत सरांचे स्वागत झाले. आणि आम्ही बसलो.
“ते दोन बेंच उभे रहा” सर म्हणाले.
बापरे ! आता काय खरं नाय… आम्ही हळूहळू घाबरत घाबरत उभे राहिलो. आणि ते बाहेर निघून गेले. ते पट्टी आणायला गेलेत हे आम्हाला कळलं. आणि ते वर्गात आले आणि खुर्चीवर बसले.
“चला या लवकर लवकर पुढे या” सरांनी आम्हाला पुढं बोलवलं.
या पाचही जणांनी मजा घेतली आणि सगळं माझ्यावर ढकलून मोकळे झाले.
“सर मी फक्त हसले हा दिवाडकर नाचत होता” त्यातली एक मुलगी म्हणाली.
सरांनी तिघींना चार चार छड्या ओढल्या ते पण वेताच्या काठीने.
“हम्म काय मग कसा होता डान्स ?” सागर आणि धिरजला विचारत दोघांना बिब्बार चार चार फटके ओढले. बिचारे हात चोळत जागेवर गेले. आता माझी बारी होती. मला माहित होतं मुख्य आरोपी असल्याने माझं काय खरं नाही. समोर गुणे सर. काही होण्या आगोदरच मी लटपट लटपट करू लागलो. हात थरथर कापायला लागले. चौथीत असल्या पासून ज्यांच्या पासून स्वतःला वाचवत राहिलो. आज शेवटी त्यांच्या समोर उभा आहे. मी पुरता घाबरलो.
“अरे तू तर… त्यांचा मेन रिमोट कंट्रोल आहे.” सर असं म्हणतात मी जाणले की मला लय बेदम मारतील वाटत.
मी एकदम गरीब आणि निरागस चेहरा केला. माझा चेहरा पाहून सरांचा मूड बदलला त्यांना मला मारावेसे वाटेना. पण बाकीच्या पोरांना मारलं आणि मी मुख्य आरोपी मग मला कस सोडावं. अक्खा वर्ग बिनपैशाचा तमाशा बघत होता.
“काय रे काय झालं ? रडतो काय ? मघाशी कसा नाचत होतास ?” सर बोलले.
“सर नाय मला ते लोक बोलले डान्स कर.. म्हणून मी केला” मी पण खरं काय ते सांगितलं. माझ्या कडे पाच बोट केलीत म्हणल्यावर मला पण त्या पाच बोटांकडे एक बोट नको होय करायला. तसे आम्ही सगळे तितकेच सामील होतो.
“काय नाव काय तुझं ?” सरांनी विचारले.
मला आठवतंय मला नाव पण सांगता येत नव्हतं इतका मी घाबरलो होतो.
“काय रे ?” सर पुन्हा बोलले.
“संतोष दिवाडकर…” खाली मान घालून हळूच बोललो.
“चांगला नाचतोस रे… हात पुढे कर” फार वेळ न घालवता बोलले.
आता काय करावं सहन पर्याय नाही. असे म्हणत मी हात पुढे केला. खरं सांगतो मी मुख्य आरोपी असून मला सरांनी मारायचं म्हणून वरच्या वर चार फटके मारले. एक फॉर्मलिटी बाकीच्यांना दाखवायचं म्हणून त्यांनी मला मारलं हे मला समजलं. जागेवर गेलो आणि शांत बसलो.

पुढे त्यांच्या सोबतची ही आठवण मी शाळा संपल्या नंतर २०१६ मध्ये शेअर केली. जेव्हा एका कार्यक्रमात माझी त्यांच्याशी भेट झाली. काही माजी विद्यार्थ्यां समवेत माझी ओळख करून दिली. आणि आमच्या जनशक्ती स्टुडिओ मध्ये त्यांच्या ग्रुपचा एक प्रोग्रॅम आयोजित केला होता. तो त्यांनीच विद्यार्थ्यांसाठी करून घेतला होता. यानंतर सर माझ्या संपर्कात कायम राहिले.

२०२१ च्या एका सकाळी सरांबाबतची बातमी ऐकून विश्वासच बसला नाही. रोज त्यांना स्टेट्स मागायचो. आणि ते ही कंटाळा आला असला तरी पाठवायचे. शाळेत असल्या पासून शाळेतील विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन ते आतापर्यंत करीतच होते. विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या बद्दल एक आदरपूर्वक दरारा आजही कायम आहे. सर फार लवकर सोडून गेले हेच दुःख.

भावपूर्ण श्रद्धांजली…

– तुमचाच आजी माजी विद्यार्थी

पुण्यात वाढदिवसा निमित्त युवकाने शेकडो गरजूंना केले अन्नदान

अलीकडल्या काळात वाढदिवसाला केकचा सत्यानाश करण्याची प्रथा अलीकडे खूप वाढू लागली आहे. ज्याचा वाढदिवस आहे त्याच्या अंगावर कसलेही द्रव्य ओतून अभिषेक घातला जातो. त्याचबरोबर अंडी फोडून त्याला माखवले जाते. या सगळ्या गोष्टी एकाबाजूला ठेवून पुण्यातील एका तरुणाने स्वतःचा वाढदिवस अन्नाची नासाडी न करता गरिबांना अन्नदान करून साजरा केला आहे.

शुभम शिंदे या तरुणाचा १ जून रोजी २१ वा वाढदिवस होता. त्याने त्याच्या मित्रांच्या मदतीने अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. आधल्या दिवसा पासूनच त्याने लागणारे साहित्य जसे की पेकिंग बॉक्स, बिसलेरी, कच्च्या भाज्या, मसाले, तांदूळ असे साहित्य आणायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळ पासूनच शुभम आणि त्याचे मित्र कामाला लागले. एकत्र बसून त्यांनी आणलेल्या भाज्या कापायला सुरुवात केली. काही मित्रांनी भात घातला. असे करून उत्तम आचारी मित्रांच्या मदतीने व्हेज बिर्याणी बनवली. या बिर्याणीचे जवळपास शंभर पेकेट्स त्यांनी पेक केले.

दुपार पासूनच शुभम आणि त्याचे मित्र पुण्यातील शनिवार वाडा आणि आसपासच्या परिसरात फिरू लागले. कोरोना उपासमारीच्या काळात रस्त्यावर उपाशीपोटी दिसणारे बेघर, गोर गरीब, दोन वेळच्या अन्नासाठी भटकणारे कष्टकरी, लहान मुले या सर्वांना शुभमने हे अन्नाचे पेकेट्स वाटले. त्यानंतर मात्र एक केक कापून थोडासा एन्जॉयमेंट केला गेला.

“केक कापून थोडासा एन्जॉयमेंट केला. काही उत्साही मित्र असतात. माखवा माखवी होतेच थोडीफार. परंतु अति नासाडी टाळून तेच अन्न गरिबांच्या पोटात गेलं याच मला समाधान आहे. माझ्या मित्रांनी यासाठी मला खूप मदत केली. मला याचा कुठं गवगवा करायचा न्हवता. नायतर लोक म्हणतील देखावा करतोय. पण माहीत नाही मित्रांनी व्हडीओ काढलीच थोडीशी. हे अन्नदान करून मला खूप समाधानी वाटलं. कदाचित असंच इतरांनी देखील करावं. आणि पुण्या सारख्या सुसंस्कृत शहरात वाढदिवस असाच साजरा व्हावा असं मलाही वाटत.”

– शुभम शिंदे

अलीकडे तरुणाई मध्ये केक खाणारे कमी आणि माखवुन वाया घालवणारे आपल्याला अधिक मिळतात. बऱ्याचदा अक्खाच्या अखा केक तोंडावर मारून वाढदिवस साजरा करतात. यात कोणते समाधान आहे हे समजणे कठीणच. पण केक आणि अंड हा एक अन्नाचा प्रकार असल्याने ती एक उतमात आहे हे निश्चित. आपण मात्र गरिबांना अन्नदान करावं असं शुभमने ठरवलं. यासाठी त्याला त्याचे कुटुंबीय आणि मित्रांचे देखील सहकार्य लाभले. करण गायकवाड, साहिल शेलार, आकाश खरात, आकाश जाधव, हर्षद भिकुले, सचिन वाघमारे,अभिषेक ठोंबरे, देवा गाडे, संकेत जोरी, तेजस साठे, प्रतीक आरसकर या मित्रांनी पुढाकार घेतला होता. यानंतर सर्व स्तरातून शुभमची व त्याच्या मित्रांची स्तुती होत असून इतर तरुणांनी ही असा आदर्श घ्यावा असे अनेक समाजसेवक म्हणत आहेत.

“गेल्या अनेक वर्षांत मी हजारो केक बनवले असतील. प्रत्येक केक हा आम्ही मनापासून बनवत असतो. अर्थात आम्हाला कस्टमर पैसे देतात खरे परंतु त्या केकची नासधूस झालेली आम्हाला खरोखर आवडत नाही. ते एक अन्न आहे ते एखाद्याच्या मुखी लागणे उत्तम. काही लोक आपला वाढदिवस आश्रम अथवा आदिवासी पाड्यावर जाऊन साजरा करतात. त्यासाठी मला केकच्या ऑर्डर येतात. अशावेळी मी बऱ्याचदा त्यांना डिस्काउंट देत असतो. कारण ज्या लोकांसाठी ते करणार आहेत त्याबद्दल आम्हालाही आपुलकी आहे. नासधूस करण्यापेक्षा अन्नदान केव्हाही श्रेष्ठ”

– महेश बनकर (रोसो कॅफे,कल्याण)

– संतोष दिवाडकर

कल्याण डोंबिवलीतील प्रश्न मार्गी लावणाऱ्या आयुक्तांची बदली ?

कल्याण मधील आधारवाडी डम्पिंग ग्राउंड नुकताच बंद करण्यात आलेला आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील कचऱ्यासाठी एक वेगळे नियोजन देखील करण्यात आले आहे. शिवाय डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर आता सुशोभिकरण होऊन त्या जागेचा कायापालट करण्याच्या तयारीत महापालिकेचे आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी आहेत. आशा परिस्थितीत त्यांची बदली होऊ शकते अशी शंका समाज माध्यमांवर शहरवासीय करू लागले आहेत.

डॉ.विजय सुर्यवंशी क.डों.म.पा.चे आयुक्त झाल्या पासून त्यांनी अनेक गोष्टींची दखल गांभीर्याने घेत विविध प्रश्न शक्य तितक्या लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे. तसे पाहता या महापालिका क्षेत्रात या अगोदरही येणारे नवे आयुक्त जोर लावून काम करताना दिसले होते. मात्र कुणी तरी आतून त्यांना दबाव टाकल्या सारखे ते अचानक थंड पडत आणि परिणामी त्यांची बदली होते असं शहरवासीय सोशल मीडियावर व्यक्त होतात. सध्याच्या आयुक्तांनी कोरोना काळात संपूर्ण मेहनत घेऊन परिस्थितीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले आहे. शहरात नगरसेवक महापौर ही पदे अस्तित्वात नसतानाही ते स्वतःच संपूर्ण जोर लावून काम करीत आहेत. त्यामुळे चांगल्या काम करणाऱ्या माणसांची बदली होते असा एक मानस या शहरातील जाणकारांच्या मनात आहे.

आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कोरोनाच्या दोन्ही लाटेत महापालिका क्षेत्राला बऱ्यापैकी नियंत्रणात ठेवले आहे. पत्रिपुल देखील त्यांच्याच काळात खुला झाला आहे. शहराच्या विकासासाठी लागणारी सौन्दर्यदृष्टी त्यांच्या कडे आहे असे काही राजकीय पक्षातील मंडळीचे देखील म्हणणे आहे. याचबरोबर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत शहरात करावयाच्या उपाययोजना देखील त्यांनी सुरू केल्या आहेत. अशा परिस्थितीत जर त्यांची खरोखरच बदली झाली तर ते कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांसाठी दुर्भाग्यची बाब ठरेल यात शंका नाही. जर प्रशासनाला या परिस्थितीत त्यांची बदली करणे योग्य वाटले तर ती विनाशकालीन विपरीत बुद्धी ठरणार यात शंका नाही.

कापूराचं झाडं अर्धा किलोमीटर पर्यंत खरच हवा शुद्ध करते का????
पावसाळा जवळ आला आहे, त्यातच कोरोना सारख्या आजाराने प्राणवायू आणि झाडांचं महत्व काय आहे ह्याची जाणीव कित्तेक लोकांना झाली आहे आणि येत्या पावसाळ्यात कित्तेक लोक वृक्षारोपण करण्याचा चंग बांधून आहेत. परंतु त्याच वेळी काही संधीसाधू लोकं आपल्या नर्सरी मधली कापुराची झाडं खपवण्यासाठी अशास्त्रीय दावे करत सुटली आहेत. ज्या मुळे भविष्यात भारतीय वनांची वाट लागणार आहे ह्याच भान त्यांना नाही. 
   सर्वच झाडं हवा शुद्ध करत असतात आणि त्यांची हवा शुद्ध करण्याची प्रक्रिया त्यांनी केलेल्या प्रकाश संस्लेशन प्रक्रियेवर अवलंबून असते. जी त्या झाडामध्ये किती प्रमाणात क्लोरोफिल पिगमेंट आहे ह्यावर अवलंबून असते. सर्वसामान्य माणसाच्या भाषेत सांगायचं झाल्यास जे झाड जेवढे अधिक गडद हिरवे तेवढे त्यात क्लोरोफिल पिगमेंट अधिक. आणि तेवढं त्याच प्राणवायू बनवण्याच प्रमाण अधिक.
    
     सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वड पिंपळ ही झाडे सर्वाधिक हवा शुद्ध करतात. पण आपण त्याची लागवड करतच नाही. त्यांची लागवड करणे अत्यंत सोपे, आणि स्वस्त असते. पावसाळ्याच्या वेळी वडाच्या झाडाची चार एक फूट लांब फांदी. पारई ने नुसती जमिनीत खोवली तरी पुढल्या पावसाळ्यात वड मोठा झालेला असतो. 
     
    आता मूळ मुद्यावर येऊया कपूरचे झाड हे मूळचे जपान आणि चीन मधले. भारतीय आयुर्वेदात गेली कित्तेक वर्ष कापूर आपण वापरत असलो तरी कापुरची झाडं भारतात कधीच आयात केली गेली नव्हती. त्या ऐवजी कापूर आयात केला जात होता. कदाचित परदेशी वृक्ष लावू नयेत ह्याच पुरेपूर ज्ञान आपल्या ऋषीमुनींना असाव म्हणून त्यांनी कधी कापराची लागवड केली नव्हती. त्याऐवजी थेट कापूरच आयात केला जात असे.
    
    आता थोडं कापुराच्या झाडा बद्दल जणून घेऊयात. कापुराचे झाड मूळचे जपान चीन आणि इंडोनेशिया मधले तेथील वनांमध्ये ही झाडे सापडतात काही दशकांपूर्वी कापुराची झाडे फ्लोरिडा राज्यात लावली गेली होती अगदी पाच दहा वर्षात त्यांची संख्या हाताबाहेर गेली आहे ज्या मुळे फ्लोरिडा मधील कीटक आणि परदेशी उपद्रवी वृक्ष निवारण मंडळाने कपुराच्या झाडाला क्रमांक एक चे आक्रमक झाड म्हणून घोषित केलं आहे.
    
त्या मागची कारणे देखील तशीच आहेत. हे झाड अगदी चटकन वाढते आणि स्थानिक हळु हळू वाढत असलेल्या झाडांशी स्पर्धा करते. उंच होते आणि जवळपास ५०% सूर्यप्रकाश अडवणारी सावली निर्माण करते. ज्या मुळे स्थानिक हळू हळू वाढत असलेली झाडं मरून जातात किव्वा त्यांची वाढ खुंटते. आता हे झाड मोठे झाल्या नंतर त्याला काळ्या रंगाची खूप सारी फळे येतात. जी पक्षांना आवडतात. ज्या मुळे पक्षी ही फळे खाऊन त्यांच्या बिया इतरत्र पसरवतात. आणि काही बिया जर वनांमध्ये जाऊन पडल्या तर तिथल्या सर्व वृक्षांसोबत स्पर्धा करतात. ज्या मुळे स्थानिक वाढ कमी असलेली वृक्ष स्पर्धेतून बाद होऊन त्यांच्यावर अवलंबून असलेले कित्तेक प्राणी नष्ट होतात. शिवाय कापुरच्या झाडांखाली तयार झालेल्या दाट सावली मुळे लहान मोठी झुडपे देखील वाढत नाही. ज्या मुळे पावसाळ्यात मातीची धूप होते. शिवाय कापुरचे झाड कमकुवत असल्याने सोसाट्याच्या वारा पावसात उन्मळून पडते आणि खाली वाढत असलेली कित्तेक स्थानिक वृक्षांची रोप मारून टाकते. जिथे कापुराची झाडं अधिक असतात तिथे भुसख्खलन होण्याचा संभव वाढतो. कारण त्यांच्या मुळे लहान सहान माती धरून ठेवणारी झुडुपे उगवत नाहीत.
    
   तरी जर प्राणवायू हवा असेल तर वड, पिंपळ, अवदुंबर, कडुलिंब , फणस , आंबा, अशी मोठी वाढणारी कोणतीही स्थानिक जैवविविधता टिकवून ठेवणारी झाडे लावा. एवढी मोठी झाड लावणे शक्य नसल्यास स्थानिक बांबूचे बेट तयार केलं तरी चालेल. पण आणखी विदेशी वृक्ष नकोत. आधीच गलिरिसिडिया- गिरिपुष्प, विदेशी निलगिरी, घाणेरी, सारख्या झाडांनी भारतीय वनांची वाट लावली आहे त्यात आणखीन भर नको. 


प्रा. भूषण वि. भोईर,
सह. प्रा. प्राणीशास्त्र विभाग,
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय,
पालघर.
८२३७१५०५२३.