कल्याण पूर्वेत सलमान खान कार अपघाताची झाली असती पुनरावृत्ती; थोडक्यात बचावल्या फूटपाथवर झोपलेल्या महिला

कल्याण :- पूर्वेतील पुणे लिंक रोड तिसगाव नाक्या जवळ शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास विचित्र अपघात झाला. एका वाहन चालकाने आपली लक्झरिअस कार डिव्हायडरला ठोकली. यामुळे ती गाडी तेथील जवळच्याच एका झाडाला अडकून थांबली. याच रस्त्याच्या फूटपाथवर झोपलेल्या नागरिकांचा बळी जाण्यापासून वाचला. सुदैवाने कार ड्रायव्हर आणि त्याचा मुलगा त्याचसोबत फुटपाथवरील दोन महिला बचावल्या.

अपघातग्रस्त कार जर फूटपाथ वर गेली असती तर फुटपाथवर झोपलेले नक्कीच चिरडले गेले असते. मात्र सुदैवाने दैव बलवत्तर असल्याने या विचित्र अपघातात होणारी मोठी दुर्घटना टळली. लक्झरिअस कार जणू काही पार्किंगच्या स्लॉटमध्ये उभी आहे असं भासत आहे. मात्र वास्तवात काय घडलं हे तेथील प्रथम दर्शनीनी सांगितले.

या सर्व घटनेने सलमान खानच्या कार अपघाताची पुनरावृत्ती कल्याणमध्ये शुक्रवारी मध्यरात्री झाली असती असं म्हणायला हरकत नाही. एअर बॅग मुळे गाडीतील प्रवासी बचावले तर गाडी फुटपाथवर जाण्या पूर्वी थांबल्याने गरीब महिलांचे देखील प्राण वाचले. याबद्दल त्या महिलांनी देवाचे आभार मानले.

-संतोष दिवाडकर

कल्याणमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान वाचविण्यासाठी ८५ वर्षीय महिलेने सुरू केलं आमरण उपोषण

कल्याण :- पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे स्मारक कल्याण डोंबिवली महापालिका यांच्या कडून स्मारक तोडण्याच्या कारवाई विरोधात एका ८५ वर्षाची आजी लक्ष्मीबाई मारुती ससाणे यांनी उद्यान वाचण्यासाठी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. १९ नोव्हेंबर २०२१ पासून उद्यानातच आमरण उपोषणासाठी त्या बसल्या आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेने विकासाच्या नावाने व्यापाऱ्यांचा फायदा आणि बहुजन अस्मिता असणाऱ्या आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचा काही भाग घेण्याचा घाट घातला असल्याचे आंबेडकर अनुयायी म्हणत आहेत. एका बाजूला स्मार्ट सिटी साठी प्रस्तावित जागा असतांना काही हॉटेल मालकांना इमारती बांधण्याच्या परवानग्या दिल्या जात असल्याचा आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे आंबेडकर वादी आणि आंबेकरांना मानणारा वर्ग आणि समाज पालिकेच्या निर्णयाच्या विरोधात उभा ठाकला आहे.

उद्यानाची जागा आजपर्यंत दोन वेळा तोडण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा स्मार्ट सिटी अंतर्गत पुन्हा उद्यानाची जागा घेऊ पाहत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक वाचवण्यासाठी या ८५ वर्षाच्या आजीच्यामागे आपण खंबीरपणे उभे राहून समर्थन देण्यासाठी विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि सामाजिक संघटना पाठींबा देताना समोर येत आहेत.

आयुक्त बंगल्याची भिंत बाधित होत असल्याने डीपी रस्ता थोडा नागमोडी करण्यात आला. काही वेगळा पर्याय करवून विकास पण झाला पाहिजे आणि उद्यान ही बाधित झाले नाही पाहिजे अशी काही पर्यायी व्यवस्था पालिकेने करण्याची वेळ आली आहे. अन्यथा उद्यानाचे प्रकरण चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत बीएम सी ऍक्ट कलम ४८७ नुसार हजारो हरकती घेण्यात आल्या आहेत.

-रोशन उबाळे

कल्याण मध्ये मुंगूसाची हत्या; चार जणांना वनखात्याची कोठडी

कल्याण :-   कल्याण फोर्टीस् हाँस्पीटल परिसरात बुधवारी  सकाळी मुंगुसाची हत्या केल्याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी चौघांना अटक केली. पोलिसांनी पुढे या सर्व आरोपींना कल्याण वनखात्याच्या ताब्यात दिले. या आरोपीना वन खात्याच्या कोठडीत ठेवण्यात आले होते. गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता शनिवार पर्यंत कोठडी सुनावण्यात आली असल्याचे कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांनी सांगितले.

सांधेदुखीवर औषध म्हणून मुंगुसाच्या चरबीच्या तेलाला मोठी मागणी असून मुंगसाच्या केसाचा वापर ब्रश बनविण्यासाठी होतो. यामुळे मुंगूसाला बाजारात चांगली किंमत मिळत असल्याने आरोपींनी मुगंसाची शिकार केली असावी असा प्राथमिक अंदाज अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. 

संजू समय्या मोटम (वय 32), भोलानाथ शंकर पास्तम (वय 30), जलाराम समय्या पास्तम (वय 32), बसवय्या शंकर पास्तम (वय 32) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत. सर्व आरोपी मांडा टिटवाळा येथील व वासुंद्री रोड परिसरात राहणारे आहेत.

-रोशन उबाळे

डोंबिवलीत हैदोस घालणाऱ्या ‘माकडोबा’ला झाली अटक !!!

डोंबिवली : गेले अनेक दिवस डोंबिवली शीळ रोडवरील लेक शोर परिसरात एका माकडाने उच्छाद घातला होता. सुरुवातीला येथील लोक मुलांना माकड दाखविण्याच्या हौसे खातर त्या माकडाला अन्न आणि फळे देत होती. यामुळे ते माकड सोकावलं आणि तेथून जाण्यास तयार नव्हतं. काही लोकांच्या घरातुन फळे न मिळाल्याने माकड जबरदस्ती घरात घुसून नासधूस करू लागलं. त्यामुळे घाबरलेल्या लोकांनी वन विभागाच्या टोल फ्री नंबर 1926 यावर संपर्क केला. यानंतर वनपाल मच्छिंद्र जाधव, वनरक्षक रोहित भोई आणि योगेश रिंगने यांनी तेथे प्रथम पाहणी केली. तसेच वॉर संस्था प्राणीमित्र विशाल कंथारिया यांच्या मदतीने माकडाला खायला देऊ नये ते निघून जाईल त्याला त्रास देऊ नये. अशा पद्धतीने नागरिकांमध्ये मध्ये जनजागृती केली.

एके दिवशी या माकडाने स्थानिक रहिवासी फरीदा बरूचा यांच्या फ्लॅट मध्ये शिरून नासधूस केली. याबाबत अधिक माहिती विशाल यांना मिळाली. त्यांनी तत्काळ वनविभागाकडे याबाबत माहिती दिली व त्यांच्या परवानगीने वॉर संस्थेच्या टीमने ते माकड सुरक्षितरित्या पकडुन वनविभागाकडे सुपूर्द केले. याप्रसंगी स्थानिक रहिवासी बिनु एलेक्स आणि सतीश बोर यांची खूप मदत मिळाली.

माकड बचाव मोहिमेत संस्थेचे अध्यक्ष योगेश कांबळे, विशाल कंथारिया, स्वप्नील कांबळे, महेश मोरे, कुलदीप चिकणकर यांनी खूप मेहनत घेतली. तसेच प्रेम आहेर, पार्थ पाठारे, सुहास पवार, वनविभागाचे वनपाल मच्छिंद्र जाधव, वनपाल दिलीप भोईर, वनरक्षक योगेश रिंगने व रोहित भोई यांचे मार्गदर्शन लाभले. जखमी माकडाला वैद्यकीय उपचारासाठी पुढे पाठवणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी सांगितले आहे.

-कुणाल म्हात्रे

‘अ’ प्रभाग सहाय्यक आयुक्तांना माजी नगरसेवकाकडून मारहाण; खडक पाडा पोलीस ठाण्यात १५ ते २० जणांवर गुन्हा दाखल

आंबिवली :- मोहने येथील मंदिराच्या बांधकामावर झालेल्या तोडक कारवाई दरम्यान केडीएमसी सहाय्यक उपायुक्ताना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मोहने परिसरात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याच्या माहितीनुसार निष्कासन कारवाई मोहीम हाती घेण्यात आली होती. याच मोहिमे दरम्यान एक कारवाई करून अधिकारी ‘अ’ प्रभाग कार्यालयात आले. त्यांच्या पाठोपाठ माजी नगरसेवक मुकुंद कोट आपल्या सोबत १५ ते २० जणांचा सोबत ‘अ’ प्रभाग क्षेत्रातील सावंत यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या कार्यालयात शिरले.

यावेळी मुकुंद कोट यांना समजवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र या माजी नगरसेवकाने सहाय्यक उपायुक्त राजेश सावंत यांच्या कानशिलात लगावली. धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त अर्चना दिवे यांच्या समोर सहाय्यक उपायुक्तांना मुकुंद कोट या माजी नगरसेवकाने मारहाण केल्याने कल्याण डोंबिवली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी मुकुंद कोट यांच्या समवेत त्यांच्या पत्नी माजी नगरसेविका सुनंदा कोट देखील उपस्थित होता.

एकिकडे बेकायदेशीर बांधकामे कुठलेही परवानगी न घेता करायची आणि तोडकाम केल्यावर दादागिरी करून मारहाण करायची. असे म्हणत अधिकारी वर्गात संताप पसरला आहे. गुरुवारी काळ्या फिती लावून या घटनेचा निषेध पालिका अधिकारी वर्गाकडून करण्यात येणार आहे.

याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात मुकुंद कोट आणि पंधरा ते वीस जणांवर
सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे अशापद्धतीचा गुन्हा दाखल केला गेला आहे.

मारहाण होतानाचा व्हिडीओ

-रोशन उबाळे

आघाडी सरकारने पेट्रोल डिझेलवरील कर कपात करावी; कल्याणमध्ये भाजपने दिलं निवेदन

कल्याण : केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल – डिझेल वरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने पेट्रोल व डिझेलवरील करात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात केली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य करात कपात करून जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल – डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे, अशी सामान्य माणसाची अपेक्षा आहे. मात्र इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करताना केंद्र सरकारला दूषणे देणाऱ्या आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी राज्य सरकारच्या करात कपात करण्यासाठी अजून हालचाली केल्याचे दिसले नाही. यावरून आघाडी सरकारमधील घटक पक्षांचे आंदोलन हे केवळ ढोंग होते, असेच सिद्ध होते.

भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी करात तातडीने कपात केली आहे. देशातील २२ राज्ये/ केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या करात कपात करून पेट्रोल डिझेलच्या दरात जनतेला आणखी सवलत दिली आहे. महाविकास आघाडी सरकारनेही आपल्या करात कपात करावी, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत रस्ता रुंदीकरणासाठी डॉ.आंबेडकर उद्यान बाधित ? कल्याणात आंबेडकरी जनतेत संतापाचे वातावरण

कल्याण :- कल्याणातील आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे प्रतिक असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे स्मार्ट सिटी प्रकल्पा अंतर्गत कल्याण पश्चिमेतील महात्मा फुले ते सुभाष चौक मधील २४ मीटरचा ३० मीटर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बाधित होणार असल्याने आंबेडकरी जनते मध्ये संतापाची लाट आहे. प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन पालिकेत लेखी हरकती नोंदवित आपला निषेध व्यक्त केला. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनेने मोर्चे बांधणी करून आंबेडकरी समाज आणि जागृत नागरिकांनी महाराष्ट्र पालिका नियम कलम ४८७ अंतर्गत हरकत वाजण्याची मागणी होऊ लागली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या पुर्वी मुरबाड रस्ता रुंदीकरणासाठी दोन वेळा या उदयानाची जागा घेतलेली होती. तसेच रुक्मिणीबाई हॉस्पिटलसाठी उदयानाची काही जागा रस्त्यासाठी घेण्यात आली होती. त्यावेळेस सदरचे ठिकाणे केडीएमसी विकसित करून देणार होती. परंतु आजपर्यंत सदरचे ठिकाण विकसित केले नाही. आता पुन्हा स्मार्ट सिटी अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानका बाहेरील परिसर विकसित करण्यात येणार असून त्या अंतर्गत कल्याण पश्चिम मधील महात्मा फुले चौक ते सुभाष चौक पर्यँत केडीएमसी २४ मीटरचा ३० मीटर करण्यात येणार असून यात डॉ बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची जागा घेतली जाणार आहे. याबाबत प्रशासनाने हरकती सूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये मोठ्या प्रमाणत नाराजी पसरली आहे.

कल्याण पश्चिमेकडील तहसीलदार कार्यालया लगत असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान हे आंबेडकरी जनतेच्या अस्मितेचे प्रतीक असून या उद्यानातील भारत रत्न डॉ.बाबासाहेब आबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी हजारो आंबेडकरी समाजाचे अनुयायी एकत्र येत असतात. तसेच आंबेडकरी चळवळीचे मुख्य ठिकाण असल्याने या उद्यानाशी समाजाची नाळ जुळालेली आहे.

सन १९९६ च्या शहर विकास आराखडया प्रमाणे २४ मीटर रस्ता हा शहरी भागासाठी परिपुर्ण असतानाही केडीएमसी या उदयानाची जागा रस्त्यासाठी घेत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्पासाठी रस्ता रुंदीकरणात उद्यान बाधित होणार असल्याने कल्याण मधील सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी सोशल मीडियावर जनतेला जागृत करून हरकती घेण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. गुरुवार ११ नोव्हेंबर रोजी कल्याण पश्चिम मधील आंबेडकर उद्यान मध्ये प्रस्तावित रस्ता रुंदीकरणाच्या विरोधात आंबेडकरी जनतेने एकत्र येऊन पालिकेत लेखी हरकती नोंदवीत आपला निषेध व्यक्त केला आहे. यावेळी दलित मित्र आण्णा रोकडे, आंबेडकरी चळवळीतील बाबा रामटेके, भारत सोनावणे, सुदाम गंगावणे, कुमार कांबळे, संजय जाधव, शेखर केदारे, विलास गायकवाड, राजू रणदिवे, रंजना जाधव
आदी प्रमुख कार्यकत्यांनी एकत्र येऊन प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.

तर काहीं आंबेडकरी संघटनांनी पालिका मुख्यालय मध्ये धाव घेत लेखी हरकत घेतली. कल्याण शहरातील वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष महिला मायाताई कांबळे, कल्याण पश्चिम अध्यक्ष संतोष गायकवाड, रुपेश हुंबरे, ठाणे जिल्हा महासचिव रेखा कुरवारे, सदस्य मनिषा झेंडे, कल्याण पूर्व सचिव देवानंद कांबळे आदी पदाधिकाऱयांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करून चर्चा केली.

याबाबत पालिका अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, उद्या पालिकेच्या नगररचना विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करतील मग पुढील धोरण ठरवले जाईल. तर सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी सांगितले की आज हरकती नोंदवत असून उद्या आम्ही आंदोलनाची भूमिका स्पष्ट करू. पालिकेने हा प्रश्न हाताळला नाही तर सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी शिष्ठ मंडळाला सकारात्मक विचार करणार असल्याचे सांगत अनेक राजकीय पक्षांनी निवेदने दिली आहेत.

-रोशन उबाळे

कल्याण मधील तरुणांनी सर केला शहापूर तालुक्यातील ‘वजीर’ सुळका

कल्याण : महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला २६० फूट उंच आणि ९० अंश कोनात असलेला “वजीर” सुळका कल्याण शहरातील सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या गिर्यारोहक संघाने खडतर प्रयत्नांनंतर सर केला आहे.

कल्याण मधील सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाने या “वजीर” सुळका पार करण्याच्या मोहिमेचे आयोजन केले होते. यात पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, अक्षय जामधरे, देविदास गायकवाड, महेश पाडवी हे सहभागी झाले. हे सर्व तरुण कल्याण शहरातील रहिवासी आहेत. या सर्व तरुणांनी सर्वात प्रथम सुळक्याच्या पायथ्याला शिवमूर्तीचे आणि सुळक्याचे हार नारळाने पूजन करून मोहिमेची सुरुवात केली. आणि नंतर १ तासात दोरखंडाच्या सहाय्याने वर चढले. वजीर सुळका सर करतांना हा ५ स्थानकात भागला जातो, त्यात तब्बल १०० फुटांचा ओव्हरहँग झूमरिंग करून पार करावा लागतो. हा सुळखा शहापूर तालुक्यातील वशिंद स्थानकापासून जवळ आहे.

याबाबत भूषण पवार यांनी सांगितले की हा सुळका सर करायला गिर्यारोहणाचे अत्याधुनिक साहित्य वापरूनचं सर करणे शक्य होते. ज्यात रोप म्हणजेच दोरखंड आवश्यक आहे. सुळक्यावर ठराविक ठिकाणी हा दोरखंड लावायला बोलटिंग म्हणजे खिळे ठोकले आहेत. त्यात आपण ही रोप लावून सर करता येतो. दोरखंड आणि बोलटिंग ह्यांना क्यूडी ह्या साहित्याने आपण बांधून ठेवतो. एकदा का आपण टॉपला गेलो की इतर सदस्य हे बोलटिंग आणि रोपला झुमर हे साहित्य अडकवून शरीराची ताकत लावून वर सरकतात.एकदा का वर पोहचलो की राप्पेल्लिंग करून म्हणजे दोरीच्या मदतीने आपण सुळक्याच्या पायथ्याशी येतो असे भूषण पवार यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा. मुख्यालयात तिरंग्याच्या प्रतिकृतीचा कंदील; मनसेकडून गुन्हा दाखल

कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या येवू घातलेल्या निवडणुकीत मतदारांना जागृत करण्या साठी लावण्यात आलेल्या कंदीलच्या प्रतिकृती मध्ये राष्ट्रध्वजाचा वापर करून राष्ट्रध्वजाचा अपमान करण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी दाखल केला आहे.

       १ नोव्हेंबर २०२१ ते २० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत राबविल्या जाणाऱ्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत  महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात भव्य आकाश कंदिलाचे अनावरण अतिरिक्त आयुक्तांच्या हस्ते  करण्यात आले होते. यात राष्ट्रध्वजाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. या बाबत कल्याणच्या बाजारपेठ पोलीस स्थानकात राष्ट्र गौरव प्रतिष्ठा अवमान अधिनियम १९७१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस एफआयआर मध्ये आरोपीचे नाव अज्ञात म्हणून टाकण्यात आलेले आहे. पोलिसांनी सदर झेंड्याची प्रतिकृती ही जप्त केली आहे.

 राष्ट्रध्वज संहिते अनुसार आपला राष्ट्रध्वज ‘तिरंगा’ हा देशाच्या सन्मानाचे आणि गौरवाचे प्रतीक आहे. तिरंग्याचा अवमान होऊन नये याकरिता ‘राष्ट्रध्वज संहिता’ बनविण्यात आली आहे. विविध नियम करण्यात आले आहेत, तर त्याच्या चुकीच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत. राष्ट्रध्वजाचा अवमान करणारा हा कायद्याचा गुन्हेगार तर आहेच किंबहुना देशद्रोही आहे. भारताच्या महानतेचे प्रतीक असणाऱ्या या तिंरग्याची आचारसंहिता १९६४ साली सी. व्ही. वारद यांनी लिहिली. ध्वजारोहण, अभिवादन, ध्वजावतरण आणि ध्वजाचा सन्मान कसा करावा, याबाबत एक नियमावली बनविण्यात आली. त्यालाच ‘राष्ट्रध्वज संहिता’ असे म्हणतात. या अनुसार हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

 याबाबत मनपा सचिव संजय जाधव यांच्याशी संपर्क साधला असता मतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रांगणात भव्य आकाश कंदिलाचे अनावरण करीत मतदारांना जागृत करण्यासाठी ही थीम साकरली होती. याबाबत मनपाला कोणाची तक्रार प्राप्त नव्हती असे सांगितले गेले.

-कुणाल म्हात्रे

लालचौकी येथील सिग्नलचा खांबाआड लपंडाव; मनसेने चिटकवले खांबाला स्टिकर

कल्याण : लालचौकी येथील सिग्नल वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत असून सिग्नल समोर पथदिव्याचा खांब आडवा येत असल्याने वाहन चालकांचे अपघात होत आहेत. याबाबत मनसे शहर संघटक रुपेश भोईर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पथदिव्यांवर स्टिकर लावून आंदोलन केले.

केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा दावा करत पालिका प्रशासनाकडून स्मार्ट सिटी योजनेसाठीच्या दिखाव्यावर कोट्यवधींचा खर्च करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी मधून शहरात सिग्नल यंत्रणा सुरू करण्यासाठी लाखो रुपये मोजून समंत्रकाच्या माध्यमातून शहराचा सर्व्हे करत २० ठिकाणी सिग्नल ची संख्या निश्चित करण्यात  आली. या मधील लालचौकी चौकात काही महिन्यापूर्वी सुरू करण्यात आलेल्या सिग्नल समोर पथदिव्याचा खांब असल्याने  दोन बाजूने येणाऱ्या वाहनचालकांना सिग्नल दिसतच नाही. यामुळे दुचाकीवर मागच्या सीट वर बसलेल्या प्रवाशाला गाडीवरून उतरून सिग्नल चेक करावा लागतो.

एखाद्या वाहनचालकाला सिग्नलचा अंदाज न आल्याने त्याने सिग्नल तोडल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई होत आहे. तर अनेकांना सिग्नल दिसत नसल्यामुळे दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनचालकांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून सिग्नल योजना योग्य पद्धतीने कार्यान्वित करण्या साठी कल्याण मनसे कार्यकर्त्यांनी लालचौकी परिसरात आंदोलन छेडत सिग्नल समोर असलेल्या पथदिव्यावर सिग्नलच्या रंगाचे स्टिकर चिपकवून नारेबाजी करत निषेध व्यक्त केला.

स्मार्ट सिटीच्या या कामामुळे नागरिकांना त्रास होत असून महानगरपालिकेची पैशाची उधळपट्टी होत असल्याने हे नियोजन शून्य पद्धतीने प्रकल्प राबविणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून हा खर्च वसूल केला जावा अशी मागणी मनसे शहर संघटक रुपेश भोईर यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे