कल्याणच्या छम छम मध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांचा धिंगाणा; महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण :- पश्चिमेतील ताल बार मध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्राबार मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यांसह कल्याण डोंबिवली मनपाचे भाजपा माजी उपमहापौर यांच्या भावासह सहा जणांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरू ठेवा अशी धमकी बार मॅनेजरला दिली. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात या पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण सत्र न्यायालयाने आरोपीना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. मंगलसिंह भंवरसिंह चौहान, हरीश्याम सिंह, रिकिन गज्जर, पोलीस कर्मचारी उत्तम घोड़े, विक्रांत बेलेकर आणि  शेखर सरनोबत आरोपींची अशी नावे आहेत .सर्व आरोपी आंबिवली, मोहने, यादवनगर, टिटवाला और हीराबाग-शनिवार पाटीलनगर  मधील रहिवाशी आहेत 

दरम्यान या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम घोडे असं या पोलीस कर्मचार्‍याचे नाव असून तो टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत असून चाळ माफियाकडून हफ्ते वसुली करत आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि याच चाळ माफिया सोबत हा पोलिस कर्मचारी पार्टी करायला आला होता. हॉटेल मालकाला शेरकी मिरवण्याच्या नादात सर्वत्र स्वतःची बदनामी करून घेतली आहे.

-रोशन उबाळे

कल्याणमध्ये एअरटेल मोबाईल टॉवरसाठी लाखो रुपयांची वीजचोरी; सुयोग टेलेमॅटिक्स विरोधात गुन्हा दाखल

कल्याण : कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी मार्केट) इमारतीच्या छतावर असलेल्या एअरटेल मोबाईल टॉवरसाठी फिडर पिलरमधून थेट वीजचोरी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यात टॉवरसाठी ८ लाख १९ हजार रुपये किंमतीची ५६ हजार १५० युनिट वीज चोरून वापरल्याबद्दल मे. सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वीजचोरी शोध मोहिमेत शिवाजी चौक शाखा एकचे सहायक अभियंता मोहम्मद आरिफ शब्बीर खान, कर्मचारी विलास गायकवाड यांच्या पथकाने ८ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सी टाइप इमारतीच्या छतावरील मोबाईल टॉवरच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली. याठिकणी अधिकृत वीजजोडणी न घेता विनामीटर थेट वीजवापर होत असल्याचे आढळले. सुयोग टेलेमॅटिक्सने एअरटेल मोबाईल टॉवरसाठी काळ्या रंगाची ४० मीटर केबल वापरून फिडर पिलरमधून थेट व अनधिकृतपणे वीजचोरी केल्याचे तपासणीतून उघड झाले.

१८ मे पासून वीज चोरीचा हा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वीज चोरीचे देयक व दंड भरण्याबाबत सुयोग टेलेमॅटिक्सला नोटीस बजावण्यात आली. परंतु संबंधित रकमेचा भरणा न झाल्याने सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध सहायक अभियंता खान यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध वीजचोरी गुन्हा दाखल केला आहे.

-कुणाल म्हात्रे

सहजानंद चौकात वृद्धाला चिरडलं; अपघात सीसीटीव्हीत कैद

कल्याण :- कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौंकात कामावर जात असताना एका वृद्धाला भरधाव जाणाऱ्या वाहनाने चिरडले आहे. रविवारी सकाळी वाहनांची रहदारी कमी असल्याने वाहनाने पळ काढला आहे. मात्र चिरडण्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याबाबत लवकरच वाहनधारक महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. या घटने प्रकरणी अज्ञात वाहनधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पश्चिमेतील सहजानंद चौकात रविवारी सकाळी खडक पाडा भागातील सर्वोदय नगर मध्ये राहणारे अनिल महादेव मांडुळकर(६४) हे कामासाठी निघाले असता चौकात भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. सकाळी रहद्दारी कमी असल्याने याचा फायदा घेत वाहनधारक पळ काढण्यात यशस्वी झाला. मात्र सभोवताली लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहनाचे नंबर फलक आणि किती निर्दयी पणे चिरडले याचे भयावाहक चित्रीकरण झाले आहे. दरम्यान या घटनेचा तपास महात्मा फुले चौक पोलिसांनी सुरू केला असून लवकरच निर्दयीं वाहनचालक ताब्यात असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने सहजानंद चौक परिसर हादरून गेले होते.

-रोशन उबाळे

पत्रकार कुणाल म्हात्रे गोल्डन प्रेस्टीज पुरस्काराने सन्मानित

कल्याण : नवी मुंबई परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या होप मिरर फाउंडेशनच्या वतीने पत्रकारितेतील कार्याबद्दल युवा पत्रकार कुणाल म्हात्रे यांना गोल्डन प्रेस्टीज अवॉर्ड 2021 या पुरस्काराने अंधेरी येथील दिमाखदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेते अरुण बक्षी, सिनेअभिनेत्री आरती नागपाल, होप मिरर फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान शेख यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

होप मिरर फाउंडेशनने गुरुवारी पहिला गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार आणि पहिला गोल्डन प्रेस्टीज पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, एसीपी सुनील बोंडे आणि चंद्रकांत मते हे पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला एकता मंचने पाठिंबा दिला. वर्सोवा, अंधेरी येथे झालेल्या कार्यक्रमात संपुर्ण भारतातील  पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

 सामाजिक कार्यकर्ते सागर उत्वल, शाहनवाज शेख, डॉ नूरी परी, मनीष गुप्ता, सुमन ऑस्कर, अरुणा नाभ, सदफ शेख, सिंधू नायर, स्वामी अभिनंदगिरी महाराज, स्वप्नील शिरसाठ आणि सुंदरी ठाकूर यांना चांगल्या कार्यासाठी कौतुकाचे प्रतिक म्हणून गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार देण्यात आला.  तर समाजकल्याण क्षेत्र सुप्रसिद्ध कलाकार, गायक आणि विनोदी कलाकारांना त्यांच्या उद्योगातील उत्कृष्टतेसाठी गोल्डन प्रेस्टीज पुरस्कार प्राप्त झाला. मीनाक्षी दीक्षित, केट शर्मा, निकिता रावल, व्हीआयपी, गायक दिलीप सेन, संदिप सोपरकर, आरती नागपाल, पंकज बेरी, शर्लिन चोप्रा, शिव्या पठाणिया, पायल घोष, नायरा बॅनर्जी, वेरोनिका वनीज आणि अरुण बक्षी, पत्रकार कुणाल म्हात्रे, मिलिंद जाधव यांना गोल्डन  प्रेस्टीजियस पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.

होप मिरर फाउंडेशन ही नवी मुंबई स्थित सामाजिक संस्था आहे. जी लॉकडाऊन, मार्च २०२० पासून वंचितांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक आणि संचालक रमजान शेख यांनी कृतज्ञता व्यक्त करताना “सामाजिक कार्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या कौतुकास्पद प्रयत्नांचे कौतुक करणे हा हेतू होता. त्यांचे कल्याण करा आणि त्यांचा सन्मान करा या उद्देशाने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केल्याचे रमजान शेख यांनी सांगितले.

-संतोष दिवाडकर

डोंबिवलीत आघाडीमध्ये बिघाडी? रस्त्याच्या कामातील दर्जा वरून शिवसेना राष्ट्रवादीत तुंबळ हाणामारी

डोंबिवली :- कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका जस जश्या जवळा येऊ लागल्या तश्या राजकीय पक्षां मध्ये राजकीय वादाचा भडका उडू लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. जनमानसात आपला ठसा उमवटवण्यासाठी राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत. त्याचा एक भाग म्हणून राजकीय पक्षां पक्षांतील कलगीतुरा आणि धुमश्चक्री निर्माण होउ लागल्या आहेत.

डोंबिवली एमआयडीसी भागातील खड्डेमय रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रस्ता दुरुस्ती कामाच्या दर्जा वरून राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष व शिवसेना दोन्हीच्या कार्यकर्त्याची चांगलीच जुंपली व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. डोंबिवली शहरातील खड्डेमय रस्त्याचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. पालिका प्रशासनाकडून खड्डेमय रस्त्याची दुरूस्ती थातूर मातूर पणे केली जात असल्याने अल्पवधीतच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले दिसून येत आल्याने या रस्त्याच्या कामा बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे .

डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी निवासी विभागातील कावेरी परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना एका नागरिकाने रस्त्याच्या कामाच्या दर्जा बाबत विचारणा केली होती. यामुळे सामान्य नागरिकाशी शिवसेनेचे कार्यकर्ते वाद घालत असताना नजीकच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस डोंबिवली जिल्हा सरचिटणीस तेजस पाटील यांचे कार्यालय असल्याने त्यांच्या कार्यालयात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी सुरू असलेला वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरू झालेला हा वाद सामान्य नागरिकानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्या मध्ये झाला. शाब्दीक बाचाबाची तुन दोन्ही कडुन तुफान हाणामारी झाली. दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

-रोशन उबाळे

कल्याण पश्चिमेत चाळीवर कोसळला अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीचा लोखंडी रॅम्प

कल्याण :- पश्चिमेतील बिर्ला कॉलेज नजीक कोकण वसाहतीच्या चाळीच्या घरांवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रँम्प ९ रुमवर पडल्याने या रूमचे पत्रे फुटले आहेत. तसेच दोन रुमवर आंब्याचे झाड कोसळल्याने या रूमचे देखील पत्रे फुटल्याची घटना घडली. सुदैवाने दैवबलव्तर असल्याने जिवितहानी टळली. घराचे पत्रे फुटल्याने ११ कुटुबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण? निसर्ग की बिल्डर ? अशी चर्चा सुरू झाली असून कोण भरपाई देणार? असा सवाल निर्माण झाला आहे.


      कल्याण डोंबिवली मध्ये मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कल्याण मधील बिर्ला कॉलेज नजीक कोकण वसाहत चाळ नं ३३ च्या ९ खोल्यांवर १६ मजली  निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रँम्प् (परांची)  संध्याकाळी ८ च्या दरम्यान कोसळला. या घटनेत सुमारे ९ खोल्यांच्या छप्पराचे पत्रे फुटले मात्र सुदैवाने जिवित हानी झाली नाही. वंदना शिर्के, दिपक सुर्वे, वसंती कदम, दिंगबर चिंदरकर, संतोष सुर्वे , दिलिपकुमार चव्हाण, रजंना खरात, जयनंद व्ही कुदंर, राजु उपाध्याय, यांच्या घराचे पत्रे तुटल्याने ऐन दसारा सणाच्या तोंडावर संसार उघाड्यावर पडले  आहेत. तर त्याच परिसरात आंब्याचे झाड पडल्याने अभय धनावडे, श्रीपाद कुलकर्णी यांच्या खोल्याचे पत्रे फुटले.

या दोन्ही घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नाही.दरम्यान या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे याची नक्की कोण भरपाई देणार यासाठी घटनाग्रस्त नागरिक बोलत आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून  आपत्कालीन निधीतून खर्च करावा असा सूर आवळला जात आहे.

-रोशन उबाळे

दूध विक्रेत्या महिलेला लुटून पळाले; उल्हासनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले

उल्हासनगर :- एका दूध विक्रेत्या महिलेचा पाठलाग करून तिच्याकडील रोख रक्कम जबरीने चोरून पळून जाणाऱ्या चोरट्यांना सापळा रचून उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी चोरट्यांकडून ५४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

उल्हासननगर कॅम्प-३ येथील फॉरवर लाइन चौक येथे एका महिलेचा दुधाचा व्यवसाय आहे. दूध विक्री केल्यानंतर आलेले पैसे घरी घेऊन जात असतांना तीन इसमानी तिच्या हालचालीवर पाळत ठेऊन तिचा पाठलाग केला. आणि मोका साधत रोख रक्कम ५४ हजार रुपये जबरीने चोरून पलयन केले. गुन्ह्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन संशयीत व्यक्तिंना ताब्यात घेऊन चौकशी केली. यात आरोपी सागर चव्हाण, बॉबी लभाना आणि साथीदार आनंद कांबळे यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जबरीने चोरी केलेली रोख रक्कम हस्तगत केली आहे. आरोपींना २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी दिली.

-संतोष दिवाडकर

गर्भवती महिलेच्या उपचारासाठी मनसेची ५० हजारांची मदत

कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वसंत व्हॅली रुग्णालयात शुक्रवारी ८ ऑक्टोबर रोजी एका गर्भवती महिलेसह पल्स रेट तसेच शरीरातील शुगर अतिरिक्त वाढ झाल्याने फिजिशियन डॉक्टर नसल्याचे कारण देऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देऊन दारातच ताटकळत ठेवले होते. याबाबत मनसेचे कल्याण शहर संघटक रुपेश भोईर यांनी तत्परता दाखवत या महिलेला एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करून तिचा जीव वाचवला होता. तसेच या महिलेला उपचारासाठी ५० हजार रुपयांची मदत देखील केली आहे.

 वसंत व्हॅली येथे पालिकेने प्रसूतिगृह नव्याने सुरू केले असून बैल बाजार येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ईरफाना शेख या महिलेला प्रसूती करिता ८ ऑक्टोबर तारीख दिली होती. आपली आई व भावा यासोबत सकाळी ८ च्या दरम्यान प्रसुती साठी ऍडमिट होण्यासाठी हि महिला आली होती. प्रचंड वेदना सुरू असताना ईरफानाला डॉक्टरांनी उपचारार्थ दाखल करून न घेता विविध कारणे देऊन अन्य रुग्णालयात दाखल करावे असे नातेवाइकांनी सांगितले. ४ तास ती गरोदर महिलेला बाहेर बसून होती.

याबाबत कल्याण शहर मनसे संघटक रुपेश भोईर यांना या बाबत माहिती समजली असता डॉक्टरांन सोबत चर्चा करून गर्भवती महिलेची शारीरिक अवस्था बघता कल्याणातील खाजगी हॉस्पिटल मध्ये या गर्भवती महिलेला  उपचारार्थ दाखल केले. या रुग्णालयात गर्भवती महिलेची योग्य उपचार होत प्रसूती व्यवस्थित  पार पडली. यात डॉ. अनिता मैथयू,  आणि डॉ. रेनुमा यांच्या विशेष सहकार्यामुळे मातेचा जीव वाचू शकल्याने मनसे तर्फे त्यांचे आभार मानण्यात आले.

-कुणाल म्हात्रे

अहमदनगर कल्याण एसटीने कोरोनाचा शिरकाव ?

कल्याण :- कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता कल्याणमध्ये व्यक्त केली जात नसली तरी कल्याणच्या एसटी डेपोत दररोज अहमदनगरहून जवळपास ८० बसेस येतात. या बसमधून कल्याणमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालिकेने विविध अँटिजेंन टेस्ट आणि इतर सेवा पुरवली पाहिजे अन्यथा कोरोना रुग्णाचा आकडा या माध्यमातून वाढू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
         

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने शिरकाव केला आहे. या जिल्ह्यातील ६९ गावे लॉकडाऊन करण्यात आली आहे. या जिल्ह्यातील ४० टक्के कोरोना रुग्ण पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार घेतात अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतीच पुण्यात दिली. कल्याण हे देखील वाहतूकीच्या दृष्टीने जंक्शन आहे. कल्याण अहमदनगर या मार्गावर रेल्वे मार्ग नाही. अहमदनगरहून शेतकरी शेतमालाची वाहतूक याच मार्गे करतात. तसेच सामान्य प्रवाशाला खाजगी बस आणि वाहनाने प्रवास परवडत नाही. त्यामुळे हा प्रवासी एसटीला पसंत देतो.

कल्याण अहमदनगर हा एसटीच्या उत्पन्नाचा मार्ग आहे. या मार्गावर ८०  एसटी बसेस चालविल्या जातात. या मार्गे अहमदनगरहून कल्याणमध्ये कोरोनाची तिसरी लाट दाखल होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. वेळीच काळजी घेतली नाही तर हा मार्ग कोरोना मार्ग होऊ शकतो अशी भिती व्यक्त केली जात आहे.

दरम्यान अहमदनगर वरून येणाऱ्या प्रवाशांची एसटी महामंडळाने चाचणी करणं बंधनकारक केले पाहिजे. अन्यथा पुन्हा कल्याण डोंबिवली मध्ये कोरोना थैमान घालेल अशी भीती  रुपेश भोईर (मनसे शहर संघटक कल्याण) यांनी निवेदन देऊन वर्तवली आहे या गंभीर मुद्द्या कडे लक्ष देणे महत्वाचे आहे.

-रोशन उबाळे

खड्ड्यांच्या तक्रारीसाठी KDMC ने जारी केला टोल फ्री नंबर

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील रस्त्यांवर मोठ्या प्रमणात खड्डे झाले असून नागरिकांना आता या खड्ड्यांची तक्रार टोल फ्री क्रमांकावर नोंदविण्यात येणार आहे. नागरिकांच्या सोयीसाठी महापलिकेने हि सुविधा सुरु केली आहे.

गेले तीन महिने कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात सतत होणाऱ्या अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबतच्या तक्रारी सोशल मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्रातून मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. पावसाची उघडीप मिळाल्याबरोबर महानगरपालिकेने यापूर्वीच खड्डे भरण्याचे, रस्ते दुरुस्तीचे कामास प्रारंभ केला आहे. आता महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांच्या सुविधेसाठी, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांसाठी तक्रार नोंदविण्याकरिता 1800 233 0045 या टोल फ्री क्रमांक ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. तरी नागरिकांनी रस्त्यांवरील खड्डयांबाबतच्या आपल्या तक्रारी कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळी या टोल फ्री क्रमांकावर नोंदवाव्यात असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्या मार्फत करण्यात आले आहे.

खड्डे पडणे आणि खड्डे बुजवणे याकरिता योग्य ठोस उपाययोजना राबवायला हव्यात. तात्पुरत्या स्वरूपाची किंवा काही ठराविक काळा पुरती केलेली मरमपट्टी यातून ही समस्या सुटणार नसून तेच तेच चित्र पुन्हा पुन्हा दिसत आहे. त्यामुळे शहरातील समाजिक क्षेत्रातील जाणकारांच्या मते ठोस पावलं उचलणं जास्त महत्वाचे वाटत आहे.

3 वर्षांपूर्वी खड्ड्याची समस्या कायमची सोडवण्यासाठी प्लॅस्टिकयुक्त डांबरी रस्त्याचा यशस्वी प्रयोग गणेशवाडी येथे केला होता , चार खड्ड्यांवर हा प्रयोग केला होता , आजही तेथे खड्डा पडला नाही … पेट प्लास्टिक 160 डिग्री पर्यंत गरम करून त्यात डांबर व खडी एकत्र करून जर खड्ड्यात टाकले व त्यावर रोलर फिरविला तर 10 वर्षे तेथे खड्डा पडत नाही …

सदर कार्यक्रमाला त्यावेळचे तत्कालीन आयुक्त बोडके साहेब / शहर अभियंता / बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते … दुर्दैव पुढे यांनी काहीच केले नाही.

नितीन निकम (मा.नगरसेवक)

त्या टोल फ्रिवर call केला खड्यांची नोंद घेण्याचे आदेश देणात आले आहेत. त्यावर पुढे कोणती कार्यवाही केली जाणार ह्याबद्दल टोल फ्रिवर उपलब्ध असणा-या कर्मचा-यांनी सांगितले. अधिकारी कडोमपा पालिका हद्दीतुमच मुख्यालय किंवा प्रभाग कार्यालयात जातात की प्रावेट जेट घेवुन महापालिकेत उतरतात. नागरिकांनीच खड्डे कुठे आहेत ते सांगायचे का ? मग जो नागरिक खड्डा सांगेल त्याला अधिका-याच्या पगारातुन अर्धा पगार दिला जाईल का? हे नकली काम बंद करा आणि पहिला खड्डे भरुन काढा.

प्रथमेश सावंत (अध्यक्ष, जाणीव सामाजिक संस्था)

जो पर्यंत आधिका-यांचा व लोक प्रतिनीधी यांचा टक्केवारी बद्दलचा फाटलेला खिसा शिवला जात नाही , तो पर्यंत रस्त्यावर १००% खड्डे पडणार.

रवी केदारे (आम आदमी पार्टी)

-संतोष दिवाडकर