कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी वापरत असणाऱ्या घंटागाडीच्या ताफ्यात आता सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या येणार आहेत. कल्याण डोंबिवली मनपाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या मनपाच्या ११३, खाजगी ५७ घंटागाड्या असुन १२२ प्रभागातील ओला, सुका कचरा सकंलनासाठी त्यांचा वापर होत आहे. सोमवारी नवीन सीएनजी वर धावणाऱी पहिली घंटागाडी मनपाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.
मनपाच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या नवीन २५ घंटागाड्या येणार असल्याने कचरा संकलनाचे काम आणखी जलद गतीने करता येईल तसेच दोन गँस् सिलेडर क्षमता असलेल्या एका सीएनजी सिलेंडर मध्ये २००किमी. चालणार असुन इंधनाची बचत होणार आहे. अगामी काळात प्रत्येक आठवड्याला ६ सीएनजीवर चालणाऱ्या घंटागाड्या अशा एकुण २५ घंटागाड्या पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पर्यावरण पूरक असल्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होईल तसेच भारतात पहिल्यांदा सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या कल्याण डोंबिवली मनपात येत असल्याचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.
आज पासून राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास सरकारने परवानगी दिल्या नंतर बहुतांश शाळा आणि महाविद्यालये सुरु झाले आहेत. आज कोरोना काळानंतर पहिल्यांदा विद्यार्थी शाळेत अथवा महाविद्यालयात आल्याने या सर्वांमध्ये उस्त्साहाचे वातावरण होते. अशाचप्रकारचा उत्साह डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थ्यामध्ये पाहायला मिळाला.
कोविड १९ च्या प्रादुर्भाव काळात बंद असलेल्या शाळा व महाविद्यालये सुरु करण्याबाबत शिक्षण विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार शाळा कॉलेज उघडण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोनाचा धोका लक्षात घेता कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करणारे फलक महाविद्यालयात लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावरच विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. यानंतर सॅनिटायजरद्वारे हात निर्जंतुकीकरण करत विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात आला.
वर्गामध्ये देखील प्रत्येक बाकावर एका विद्यार्थ्याला बसविण्यात आले.विशेष म्हणजे शाळा कॉलेजचा आज पहिला दिवस असल्याने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि चॉकलेट देत स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंद पाहायला मिळाला. डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेजमध्ये एक हजारच्या आसपास विद्यार्थी असून प्रत्येक तुकडीचे दोन गट करण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक बाकावर एका विद्यार्थांला बसविले जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र बांबार्डेकर यांनी सांगितले.
कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत
तब्बल दीड वर्षानंतर कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयातही शाळेची घंटा वाजल्यानंतर विद्यार्थ्याचे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शाळा व्यवस्थापनाच्या विद्यमाने या शाळेच्या शिक्षकांनी ढोल ताशांच्या गजरात विद्यार्थ्यांवर पुष्प उधळून व औक्षण करून जंगी स्वागत केले. इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी फक्त घड्याळी तीन तासाचे वर्ग भरविले जाणार असून विद्यार्थ्यांचे काही दिवस समोपदेशन केले जाणार असल्याचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शासन परिपत्रकाप्रमाणे सर्व अटी शर्तीचे पालन करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष म्हणाले. विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर आल्यावर काही विद्यार्थी भावूक होऊन त्यांचे डोळे आनंद अश्रूने ओले झाल्याचे दिसून आले.
टिम वर्क हेच कोविड कालावधीतील यशाचं गमक आहे, असे उद्गार महापालिकेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कला मंदिरात कोविड नियमांचे पालन करुन संपन्न झालेल्या महापालिकेच्या वर्धापन दिन समारोहात महापालिका सचिव संजय जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलतांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे उद्गार काढले. या मुलाखतीत बोलतांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या कारर्किदीतील वेगवेगळया घडामोडींची माहिती दिलखुलासपणे प्रेक्षकांसमोर मांडली. कोविडच्या लढाईने एक वेगळीच उर्जा सगळयांना दिली, ती वापरुन नागरिकांचे प्रश्न सोडवू या, नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा वचनबध्द होऊ या असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित सर्व अधिकारी वर्गाला केले.
महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजिलेल्या या छोटेखानी समारंभात कोविड कालावधीत महापालिकेला मदत केलेल्या /करणा-या डॉक्टर्स आर्मीतील डॉक्टरांचा, आयएमए, निमा, धारपा, केम्पसवा या वैदयकीय संघटनांतील अध्यक्षांचा, बाज आर आर रुग्णालयाचे डॉ. अमिर कुरेशी, निऑन रुग्णालयातील मिलींद शिंदे हॉलिक्रॉस हॉस्पिटलच्या सिस्टर शिबा यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महापालिकेला कोविड कालावधीत मदत करणा-या विविध एनजीओ, कोविडच्या पहिल्या लाटेत अन्नधान्य पुरवठा करणा-या दानशुर व्यक्ती, गुरुद्वारा, कल्याण पश्चिम, संत गजानन सेवा ट्रस्ट या सारख्या सेवाभावी संस्था यांनादेखील या समयी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कोविड कालावधीत महापालिकेस सातत्याने सहकार्य करणा-या पोलिस अधिकारी कर्मचारी वर्गाचा, महापालिका क्षेत्रातील स्मशानभूमीमध्ये सेवा देणा-या व्यक्तींचाही महापालिका आयुक्त यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच कोविड कालावधीत उत्कृष्ठ काम केलेल्या अधिकारी/कर्मचारी वर्गाचा तसेच विविध पत्रकार संघटनांचा देखील प्रतिकात्मक स्वरुपात यावेळी सत्कार करण्यात आला. या समारोहास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सपत्नीक उपस्थित होते. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आई-वडील देखील हा सोहळा पाहण्यासाठी समक्ष उपस्थित होते. तसेच महापालिका क्षेत्रातील डॉक्टर्स आर्मीतील डॉक्टर्स, एनजीओज, अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त गुंजाळ, महापालिकेचा अधिकारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता.
महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने विशेषत: आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाने बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त विनय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी स्वत:च्या आवाजात सुमधुर आवाजात गाणी गाऊन तसेच कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांनी आपल्या एकपात्री अभिनयाने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महापालिका सचिव तथा विभागप्रमुख, माहिती व जनसंपर्क -संजय जाधव , दत्तात्रय लदवा, महेश देशपांडे यांनी केले.
कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील ग्रामीण “अ” प्रभागक्षेत्रातील आंबिवली येथे आरक्षित भुखंडावर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते वुक्षारोपण करीत वुक्ष लागवड करण्यात आली. याप्रसंगी आरक्षित भुखंडावर सद्य स्थितीत खेळाची मैदाने कशी साकारता येतील याबाबत मानस असल्याचे प्रतिपादन आयुक्तांनी केले.
महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधत आंबिवली येथील स्वराज्य नेपच्यून गुहप्रकल्प परिसरात मनपाच्या आरक्षित भुखंडावर शनिवारी सकाळी वुक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण समयी मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, सहा. आयुक्त अ प्रभाग राजेश सावंत, उयान अधिक्षक अनिल तामोरे तसेच धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अनुयायी उपस्थित होते.
याप्रसंगी आयुक्त यांनी या आरक्षित भुखंडावर कबड्डीचे मैदान करण्यात यावे. तसेच हा ग्रामीण भाग तीन दशकापुर्वी कबड्डीपटु खेळाडूचा परिसर म्हणुन जो नावलौकिक होता. ते गतवैभव पुनःश्च प्राप्त व्हावे या दुष्टीकोनातुन “अ” प्रभागात आरक्षित भुखंडाच्या जागेत कबड्डी, खो ,खो, व्हाँली बाँल या खेळासाठी मैदाने करण्याबाबत प्रशासन पुढाकार घेणार आहे. आंबिवली स्वराज्य गुहप्रकाल्प परिसर या आरक्षित भुखंडावर दसर्या पर्यंत कबड्डीचे क्रीडांगण साकारण्याचे आदेश दिले. तसेच कबड्डी साठी प्रशिक्षकांची गरज भासल्यास त्याबाबत प्रशासन मदत करेल असे प्रतिपादन केले. तसेच याठिकाणी नागरिकांना चालण्यासाठी पेव्हर ब्लॉक ऐवजी मातीचे जॉगिंग ट्रॅक तयार करण्याचे देखील आयुक्तांनी सुचवले.
यामुळे एकेकाळी या ग्रामीण पट्यातील नामंकित कबड्डी संघ ए व्ही कबड्डी संघ, नवरत्न कबड्डी संघ, दिपक कबडी संघ, एनआरसी बाईज्, गर्ल्स कबड्डी संघ, बजरंग कबड्डी संघ, क्रांतीसंघ, नारायण कबड्डी संघ अशा संघातुन अनेक नामवंत कबड्डी पट्टू घडले त्यांनी कबड्डीची मैदाने आपल्या कबड्डी खेळाच्या प्रर्दशानात गाजवली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आरक्षित भुखंडावर कबड्डी ची मैदाने साकारण्याच्या संकल्पनेमुळे “अ ” प्रभागातील ग्रामीण पट्यातील गावातील कबड्डीखेळातील गत वैभव प्राप्त होणार असे चित्र या निमित्ताने दिसत आहे.
“अटाळी येथील स्थानिक रहिवाशी माजी महाराष्ट्र राज्य संघातील कबड्डी पट्टू प्रकाश पाटीलयांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कबड्डी खेळाडू साठी कबड्डी ची हक्काची मैदाने साकरण्याच्य निर्यणाचे कौतुक करीत याबाबत आम्ही देखील नवीन कबड्डी पट्टू कसे तयार होतील याबाबत मदत करु असे सांगितले.”
“प्रशासनाच्या खेळाच्या मैदानाबाबत असलेला सकारात्मक निर्याणाचे आम्ही स्वागत करतो. तसेच कबड्डीची मैदाने साकरल्याने निश्चितच ग्रामीण पट्यात कबड्डी पट्टू तयार होतील. ग्रामीण पट्यातील कबड्डीचे गत वैभव प्राप्त होईल अशी प्रतिक्रिया स्थानिक कबड्डी पट्टू सुभाष पाटील यांनी दिली.”
“आजची मुले मैदानी खेळापासुन दूर जात मोबाईल गेमच्या खेळात रस दाखवित आहेत. आयुक्तांनी आरक्षित भुखंडावर खेळाची मैदाने साकरण्याबाबत मानस जाहीर केल्याने मैदानी खेळांसाठी मैदाने उपलब्ध झाल्यास याकडे तरूणाई आकर्षित होऊन कसरती मुळे आरोग्य उत्तम राहत व्यवसनाधितापासुन अल्पित राहण्यासाठी मदत होईल असे मोहने येथील रहिवासी प्रविणा कांबळे यांनी सांगितले.”
डोंबिवली मधील भोपर भागातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच कल्याण मध्ये देखील आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या शिकवणी शिक्षकाने (ट्युशन टीचर) मुदूर टेलवाला (४८) ने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आरोपीला कठोर कारवाई करण्याची मागणी बाजार पेठ पोलिसांना निवेदन देऊन केली आहे.
कल्याण पश्चिमेतील राहणारा आरोपी हा शिकवणी घेणाऱ्या शिक्षीकेचा नवरा आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत या नराधमला अटक करण्यात आली आहे. या नाराधाला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सदर पीडित मुलगी आरोपीकडे अनेक महिन्यांपासून ट्युशन साठी जात होती. दीड महिन्यापूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली आणि या नराधमाने डाव साधला. घडलेल्या प्रकारानंतर घाबरलेल्या पिडीतीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर या नराधमाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
या प्रकरणी योग्य पद्धतीने कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी पत्राद्वारे केली आहे. कल्याण डोंबिवली सारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहरात लागोपाठ दुसरी संवेदनशील आणि संतापजनक घटना घडली असून या घटनांना आवर घालण्यासाठी आता कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली असल्याचे दिसत आहे.
कल्याण परिमंडळात गेल्या तीन आठवड्यात वीजबिल थकबाकीपोटी जवळपास ४२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांकडून विजबिलाची वसुली अथवा त्यांच्या वीजपुरवठा खंडित करणे, हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ५०० रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे २ लाख १ हजार ३२ वीज ग्राहक रडारवर असून त्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो. चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून कठीण आर्थिक परिस्थितीत असलेल्या महावितरणला सहकार्य करावे व अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.
गेल्या तीन आठवड्यात कल्याण मंडल एक (कल्याण व डोंबिवली) अंतर्गत ५ हजार ४६५, कल्याण दोन मंडल दोन (उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग) अंतर्गत ७ हजार ९७२, वसई मंडल (वसई व विरार) अंतर्गत १३ हजार २१४ आणि पालघर मंडल (वसई व विरार वगळून उर्वरित पालघर जिल्हा) अंतर्गत १५ हजार २५० ग्राहकांचा तसेच २५ पाणीपुरवठा योजना व १४९ पथदिवे जोडणीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यातील २० हजार २११ ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुनरजोडणी शुल्काचा भरणा करून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला आहे. तर सप्टेंबर महिन्यापूर्वी १ लाख ६५ हजार थकाबाकीदारांचा शिवाय ३११ पाणीपुरवठा योजना व ७८६ पथदिवे जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील ६ लाख ७२ हजार ग्राहकांकडे ६६९ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. या थकबाकीदार ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून महावितरणला संकटाच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर चालू वीजबिल व थकबाकी तसेच पुनरजोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या ग्राहकांनी शेजारून अथवा परस्पर जोडणी किंवा अन्य माध्यमातून विजेचा अनधिकृत वापर केल्याचे आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे. याची परिमंडलातील सर्व वीज ग्राहकांनी नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत दुकान मालक आणि फेरीवाल्यांनी पथ रस्ते अडविल्याने नागरिक वाटसरू यांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रभाग क्षेत्र अधिकारी सविता हिले यांनी पदभार स्वीकारून काही दिवस झाले असतांना कुठल्याही दबावाला न जुमानता पूना लिंक रोड श्रीराम टॉकीज ते चक्की नाका मलंगगड रोड परिसरातील फेरीवाले आणि ६५ अतिक्रमणे हटवले आहेत.
जेसीबी आणि इतर साहित्य तसेच पालिका कर्मचारी यांचा लवाजमा घेऊन ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे कल्याण पूर्वेच्या मुख्य रस्त्याने तात्पुरता मोकळा श्वास घेतला आहे. अशी कारवाई नेहमी करण्यात यावी अशी स्थानिक नागरिक व वाहन धारक, प्रवासी यांनी मागणी केली आहे.
कल्याण पूर्वीतील पूना रोड परिसरातील श्रीराम टॉकीज ते चक्की नाका, चेतना शाळा, मलंगगड रोड भागात मुख्य रस्त्यावर दुकान मालक व फेरीवाले यांनी पथ रस्ते वर शेड कोणी वाढीव बांधकाम केल्याने वाटसरू आणि नागरिक याना रस्त्याने चालताना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे आता ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवाजमा घेऊन धडक कारवाई केली आहे.
नवनियुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी सविता हिले व पथक विभागातील जयेश काळण, उमेश जाधव, संजय पवार, सुमित गायकर, समीर ठाकूर, हरेश बुचाडे व इतर कर्मचाऱ्यांनी श्रीराम टॉकीज, खडेगोळवली, अपर्णा डेरी पूनालिंक रोड ते चक्कीनाका, व पुढे चेतना शाळा, मलंगगड रोड वरील ६५ अतिक्रमणे,वाढीव बांधकामे जेसीबी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आली आहेत. या धडक कारवाई ने कल्याण पूर्वेतील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण आणि ठाणे भरारी विभागीय पथकाने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माणेरे गावात धडक कारवाई करत ६० लिटर गावठी दारू तर ६३ हजार ३०० लिटर नवसागर मिश्रित रसायन नष्ट केले आहे. एकाच दिवशी एकूण १४ लाख ६० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल नष्ठ केला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आवश्यक असे साहित्य नसल्याने कारवाई दरम्यान पथकांना मोठी अडचण निर्माण होत असे. मात्र आता कारवाई साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक इंजिन आणि ड्रोन उपलब्ध झाले असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांना कारवाई करणे आणि दारू निर्मितीचे तळ शोधण्यात यश हे जलदगतीने येत आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील स्मार्ट झालेले दिसून येत आहे.
गावठी दारू हि ग्रामीण भागातून शहराकडे घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला सापडताच ४० लिटर दारू सह दुचाकी पथकाला कल्याण मध्ये मिळाली आहे. मात्र या गाडीवरील चालक दारू माफिया हा फरार झाला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे विभागीय दुय्यम निरीक्षक आर.एन.राणे हे करत आहेत.
डोंबिवली शहरात धक्कादायक अशी घटना घडली आहे. भोपर परिसरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ३० जणांनी या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने देशभरात घटनेसह खळबळ माजली आहे.
पीडित अल्पवयीन तरुणी हिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र या तरुणाने प्रेमाचे अमिश दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवले. यादरम्यान त्याने शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ चित्रित केला. यानंतर याच व्हडीओच्या माध्यमातून या नराधमाने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत त्याने त्याच्या मित्रांकडून लैंगिक अत्याचार सहन करण्यास भाग पाडले. २९ जानेवारी पासून आजतागायत ९ महिने तिच्यावर डोंबिवली,बदलापूर, मुरबाड,रबाळे अशा विविध ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार सुरू होते. तब्बल ३० जणांकडून या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले.
गुन्हा नोंद झालेल्या आरोपींपैकी २३ जनांना डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील २ आरोपी हे नाबालिग आहेत. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून राजकीय पक्ष्याच्या नगरसेवकांचा दबाव होत असल्याचे देखील बोलले जात आहे. या गंभीर प्रकरणात कोणत्या राजकीय व्यक्ती दडपशाही करीत होत्या ही बाब देखील तपासा नंतर उघडकीस येणार आहे. दरम्यान भाजप महिला नेत्या चित्रा वाघ या तात्काळ डोंबिवली कडे निघाल्या असून या प्रकरणाला राजकिय वलय प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या गुन्हयाचे गांभीर्य पाहता अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त परीमंडळ ३, कल्याण सचिन गुंजाळ यांनी लागलीच तपास चालु केला. परीमंडळ ३, कल्याण मधील इतर पोलीस ठाण्याचे तसेच मानपाडा पोलीस ठाण्याची एकंदर ०४ पोलीस पथके स्थापन करुन या गुन्हयातील आरोपींची पुर्ण नांवे व पत्ते माहिती नसतानाही गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे नमुद गुन्हयात २३ आरोपीत यांना गुन्हा दाखल होताच ४ तासात ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी करुन त्यांना गुन्हयात अटक केली आहे. या प्रकरणात जे जे समाविष्ट आहेत व ते कोणत्याही मोठ्या पदावर असले तरी त्यांची गय केली जाणार नाही असे अप्पर पोलीस आयुक्तांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार ई प्रभाग सहा. आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व, देसलेपाडा येथील विकासक विकास राठोड, जागा मालक अशोक म्हात्रे यांचे तळ अधिक ३ मजली चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. या बांधकाम धारकास यापूर्वी ते बांधकाम निष्कासित करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. ही कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलीस कर्मचारी आणि १ पोकलेन, ४ कॉम्प्रेसर व २ ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात आली.
त्याचप्रमाणे ग प्रभागातही सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी डोंबिवली पूर्व येथील टावरेपाडा, नांदीवली येथे चालू असलेले अक्षय सोलकर यांच्या तळ अधिक ७ मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. हि कारवाई सहा.आयुक्त भरत पाटील यांच्यासह संयुक्त रित्या अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने तसेच ४ कॉम्प्रेसर यांच्या सहाय्याने करण्यात आली.
आय प्रभागातही विभागीय उप आयुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे आडीवली-ढोकळी गावठाण येथील विकासक जगदंब सिंग राणा यांच्या तळ अधिक ४ मजली अनधिकृत इमारतीवर, सहा. आयुक्त, आय प्रभाग राजेश सावंत यांनी निष्कासनाची कारवाई केली. हि कारवाई ४ ब्रेकर, १ जेसीबी, 1 गॅस कटर यांच्या सहाय्याने करण्यात आली. यासमयी आय प्रभाग अधिक्षक किशोर खुताडे, ड प्रभाग सहा आयुक्त सविता हिले, क प्रभाग सहा आयुक्त संजय साबळे, अधिक्षक सुखदेव धापोडकर, मानपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.