सामाजिक क्षेत्रातील हसरा चेहरा निखळला; अरुण दिघेंच्या निधनानं कल्याण पूर्वेवर शोककळा

कल्याण :– कल्याण पूर्वेतील सामाजिक कार्यकर्ते व भाजपाचे सरचिटणीस अरुण दिघे यांचे आज हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने आकस्मिक निधन झाले आहे. त्यांच्या अचानकपणे जाण्याने त्यांच्या कुटुंबियांसह संपूर्ण कल्याण पूर्वेतील सामाजिक तसेच राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार अरुण दिघे हे कारने आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. मात्र त्यांना प्रवासा दरम्यानच हृदय विकाराचा तीव्र झटका आला होता. यानंतर त्यांना खासगी इस्पितळात दाखल करण्यात आलं. मात्र इस्पितळात त्यांना मृत घोषित करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सामाजिक तसेच राजकिय क्षेत्रातील नेत्यांनी,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी इस्पितळाकडे धाव घेतली. त्यांच्या निधनाच्या बातमी नंतर कल्याण पूर्वेत शोककळा पसरली आहे.

अरुण दिघे हे पूर्वापार सामाजिक क्षेत्रात कार्यरत होते. याचबरोबर ते राजकीय पक्षाचे देखील पदाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत होते. सामाजिक क्षेत्रात काम करत असताना त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली आहे. यासाठी अनेकदा त्यांनी पक्ष बाजूला ठेवून समाजकार्य केल्याचे देखील बोलले जाते. काही मंडळ,संस्था यांच्याशी देखील ते संलग्न होते. तर क्रीडा क्षेत्रासाठी देखील त्यांचे अत्यंत मोलाचे योगदान लाभले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ते भारतीय जनता पार्टी असा एक त्यांचा राजकिय प्रवास. मात्र असे असतानाही पक्ष बाजूला ठेवून त्यांनी हितसंबंध जोपासले होते. कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड आणि माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड यांचे ते खंदे समर्थक म्हणून ओळखले जात होते. सर्वांना एकत्रित बांधून सलोख्याचे संबंध त्यांनी निर्माण केले होते. म्हणूनच इतर राजकीय पक्षांत देखील त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. पक्षाची कोणतीही आंदोलने, मेळावे, कार्यक्रम यात ते हिरहिरीने पुढाकार घेत. याचबरोबर सार्वजनिक जयंती, उत्सव, शिबिरे आणि विविध उपक्रमात त्यांचा पुढाकार असे.

समर्थक आणि विरोधक या दोघांनाही हसऱ्या चेहऱ्याने उत्तर देण्याची त्यांची एक कला होती ज्यातून त्यांनी असंख्य मनांवर अधिराज्य केले होते. मात्र कल्याण पूर्वेचा हाच उमदा आणि हसरा चेहरा निखळल्याने कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे असे त्यांचे निकटवर्तीय आता म्हणू लागले आहेत. अश्या या व्यक्तीमत्वास ‘एम एच मराठी’ कडून ‘भावपूर्ण श्रद्धांजली’.

-संतोष दिवाडकर

कल्याणमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि वाढत्या गुन्हेगारीने माजवले स्तोम; आमदार गणपत गायकवाड यांची आक्रमक पवित्रा

छाया – कुणाल म्हात्रे

कल्याण : कल्याण मधील वाढत्या अमली पदार्थांच्या विक्री व सेवना पाठोपाठ वाढणाऱ्या गुन्हेगारी बाबत शासन तसेच पोलीस प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांनी कल्याण पूर्वेतील काटेमानिवली येथे आंदोलन केले.

कल्याण शहरातील पूर्व भागात वारंवार होणारी गुन्हेगारी व दहशतीचे वातावरण नुकत्याच वयात आलेल्या मुलांना व्यसनाच्या आधीन लावणारे व त्या अनुषंगाने होणारी अंमली पदार्थाची विक्री व सेवन ही चिंताजनक बाब बनली आहे. या सर्वांना वाचा फोडण्यासाठी भारतीय जनता पार्टी आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी कल्याण मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या नियोजनात आंदोलन छेडून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

मागील काही काळापासून कल्याण पूर्वेत अश्या अनेक घटना समोर येत आहेत. रातोरात लोकांच्या गाड्या फोडणे, चोऱ्या माऱ्या, लुटमार, मारहाण, टोळके करून रस्त्यांवर धिंगाणा घालणे अशा घटना वारंवार पुढे येत आहेत. या घटनेत प्रामुख्याने घरच्यांनी मोकाट सोडलेली ऐन विशीतील नुकतेच मिसरुट फुटलेल्या नवतरुणांचा सर्वाधिक समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे. कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस स्थानकात अश्या अनेक तक्रारी देखील प्राप्त होऊ लागल्या आहेत. आणि आणखीन धक्कादायक बाब म्हणजे याच गुन्हेगारांच्या पाठीमागे काही राजकीय नेतेमंडळी देखील हस्तक्षेप करीत असतात. त्यामुळे कुणाच्याही दबावाला न जुमानता गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी शक्य तितकी कठोर पावलं उचलावी आणि संबंधित गुन्हेगारांना अद्दल घडवावी अशी अपेक्षा भाजपा कल्याण पूर्व कडून केली जात आहे. तर पालकांनी देखील आपला पाल्य घराबाहेर काय करतो ? कुठे जातो ? याचाही सुगावा आताच लावलेला बरा. अन्यथा भविष्यात पश्चाताप करायची वेळ येऊ नये म्हणजे मिळवलं.

-संतोष दिवाडकर

‘केडीएमसी’च्या ताफ्यात ‘सीएनजी’वर धावणाऱ्या नवीन घंटागाड्या

कल्याण :- कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलनासाठी वापरत असणाऱ्या घंटागाडीच्या ताफ्यात आता सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या येणार आहेत. कल्याण डोंबिवली मनपाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्या मनपाच्या ११३, खाजगी ५७ घंटागाड्या असुन १२२ प्रभागातील ओला, सुका कचरा सकंलनासाठी त्यांचा वापर होत आहे. सोमवारी नवीन सीएनजी वर धावणाऱी पहिली घंटागाडी मनपाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. 

मनपाच्या ताफ्यात सीएनजीवर धावणाऱ्या नवीन २५ घंटागाड्या येणार असल्याने कचरा संकलनाचे काम आणखी जलद गतीने करता येईल तसेच दोन गँस् सिलेडर क्षमता असलेल्या एका सीएनजी सिलेंडर मध्ये २००किमी. चालणार असुन इंधनाची बचत होणार आहे. अगामी काळात प्रत्येक आठवड्याला ६ सीएनजीवर चालणाऱ्या घंटागाड्या अशा एकुण २५ घंटागाड्या पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. पर्यावरण पूरक असल्याने  प्रदूषण कमी होण्यास मदत होईल तसेच भारतात पहिल्यांदा सीएनजीवर धावणाऱ्या घंटागाड्या कल्याण डोंबिवली मनपात येत असल्याचे उप आयुक्त रामदास कोकरे यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

दीड वर्षांची धूळ उडाली; कल्याण डोंबिवलीमध्ये शाळा-कॉलेजच्या बाकांवर विद्यार्थी पुन्हा विराजमान

आज पासून राज्यात शाळा आणि महाविद्यालये सुरु करण्यास सरकारने परवानगी दिल्या नंतर बहुतांश शाळा आणि महाविद्यालये सुरु झाले आहेत. आज कोरोना काळानंतर पहिल्यांदा विद्यार्थी शाळेत अथवा महाविद्यालयात आल्याने या सर्वांमध्ये उस्त्साहाचे वातावरण होते. अशाचप्रकारचा उत्साह डोंबिवलीतील मॉडेल कॉलेजच्या विद्यार्थ्यामध्ये पाहायला मिळाला.

कोविड १९ च्या प्रादुर्भाव काळात बंद असलेल्या शाळा व महाविद्यालये सुरु  करण्याबाबत शिक्षण विभागाकडून मिळालेल्या सुचनेनुसार शाळा कॉलेज उघडण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोरोनाचा धोका लक्षात घेता कोरोना नियम पाळण्याचे आवाहन करणारे फलक महाविद्यालयात लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश देतांना कोविड १९ च्या सर्व नियमांचे पालन करून महाविद्यालयाच्या प्रवेश द्वारावरच विद्यार्थ्यांचे थर्मल स्क्रीनिंग करण्यात आले. यानंतर सॅनिटायजरद्वारे हात निर्जंतुकीकरण करत विद्यार्थ्यांना आत प्रवेश देण्यात आला.

वर्गामध्ये देखील प्रत्येक बाकावर एका विद्यार्थ्याला बसविण्यात आले.विशेष म्हणजे शाळा कॉलेजचा आज पहिला दिवस असल्याने शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प आणि चॉकलेट देत स्वागत केले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये देखील आनंद पाहायला मिळाला. डोंबिवलीच्या मॉडेल कॉलेजमध्ये एक हजारच्या आसपास विद्यार्थी असून प्रत्येक तुकडीचे दोन गट करण्यात आले आहेत. यामुळे प्रत्येक बाकावर एका विद्यार्थांला बसविले जाणार असून सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची पूर्ण काळजी घेतली जाणार असल्याचे प्राचार्य डॉ. रवींद्र बांबार्डेकर यांनी सांगितले.

कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

तब्बल दीड वर्षानंतर कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयातही शाळेची घंटा वाजल्यानंतर विद्यार्थ्याचे शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ शाळा व्यवस्थापनाच्या विद्यमाने या शाळेच्या शिक्षकांनी ढोल ताशांच्या गजरात  विद्यार्थ्यांवर पुष्प उधळून व औक्षण करून जंगी स्वागत केले. इयत्ता आठवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी फक्त घड्याळी तीन तासाचे  वर्ग भरविले जाणार असून विद्यार्थ्यांचे काही दिवस समोपदेशन केले जाणार असल्याचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांनी सांगितले. शासन परिपत्रकाप्रमाणे  सर्व अटी शर्तीचे पालन करण्यात येईल असे संस्थेचे अध्यक्ष म्हणाले. विद्यार्थी आणि शिक्षक समोरासमोर आल्यावर काही विद्यार्थी भावूक होऊन त्यांचे डोळे आनंद अश्रूने ओले झाल्याचे दिसून आले.

-कुणाल म्हात्रे

      

टिम वर्क हेच कोविड कालावधीतील यशाचं गमक; -आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

टिम वर्क हेच कोविड कालावधीतील यशाचं गमक आहे, असे उद्गार महापालिकेच्या ३७ व्या वर्धापन दिनानिमित्त डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कला मंदिरात‍ कोविड नियमांचे पालन करुन संपन्न झालेल्या महापालिकेच्या वर्धापन दिन समारोहात महापालिका सचिव संजय जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलतांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी हे उद्गार काढले. या मुलाखतीत बोलतांना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आपल्या कारर्किदीतील वेगवेगळया घडामोडींची माहिती दिलखुलासपणे प्रेक्षकांसमोर मांडली. कोविडच्या लढाईने एक वेगळीच उर्जा सगळयांना दिली, ती वापरुन नागरिकांचे प्रश्न सोडवू या, नागरिकांच्या सेवेसाठी पुन्हा एकदा वचनबध्द होऊ या असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित सर्व अधिकारी वर्गाला केले.

महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजिलेल्या या छोटेखानी समारंभात कोविड कालावधीत महापालिकेला मदत केलेल्या /करणा-या डॉक्टर्स आर्मीतील डॉक्टरांचा, आयएमए, निमा, धारपा, केम्पसवा या वैदयकीय संघटनांतील अध्यक्षांचा, बाज आर आर रुग्णालयाचे डॉ. अमिर कुरेशी, निऑन रुग्णालयातील मिलींद शिंदे हॉलिक्रॉस हॉस्पिटलच्या सिस्टर शिबा यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महापालिकेला कोविड कालावधीत मदत करणा-या विविध एनजीओ, कोविडच्या पहिल्या लाटेत अन्नधान्य पुरवठा करणा-या दानशुर व्यक्ती, गुरुद्वारा, कल्याण पश्चिम, संत गजानन सेवा ट्रस्ट या सारख्या सेवाभावी संस्था यांनादेखील या समयी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

कोविड कालावधीत महापालिकेस सातत्याने सहकार्य करणा-या पोलिस अधिकारी कर्मचारी वर्गाचा, महापालिका क्षेत्रातील स्मशानभूमीमध्ये सेवा देणा-या व्यक्तींचाही महापालिका आयुक्त यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच कोविड कालावधीत उत्कृष्ठ काम केलेल्या अधिकारी/कर्मचारी वर्गाचा तसेच विविध पत्रकार संघटनांचा देखील प्रतिकात्मक स्वरुपात यावेळी सत्कार करण्यात आला. या समारोहास महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी सपत्नीक उपस्थित होते. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे आई-वडील देखील हा सोहळा पाहण्यासाठी समक्ष उपस्थित होते. तसेच महापालिका क्षेत्रातील डॉक्टर्स आर्मीतील डॉक्टर्स, एनजीओज, अप्पर पोलिस आयुक्त दत्‍तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त गुंजाळ, महापालिकेचा अधिकारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता.

महापालिकेच्या कर्मचारी वर्गाने विशेषत: आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गाने बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण यावेळी केले. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, उपआयुक्त विनय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता प्रमोद मोरे यांनी स्वत:च्या आवाजात सुमधुर आवाजात गाणी गाऊन तसेच कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांनी आपल्या एकपात्री अभिनयाने कार्यक्रमात रंगत आणली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महापालिका सचिव तथा विभागप्रमुख, माहिती व जनसंपर्क -संजय जाधव , दत्तात्रय लदवा, महेश देशपांडे यांनी केले.

-कुणाल म्हात्रे

आरक्षित भूखंडावर खेळाची मैदाने साकारण्याचा मानस – आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

कल्याण डोंबिवली मनपाक्षेत्रातील ग्रामीण “अ” प्रभागक्षेत्रातील आंबिवली येथे आरक्षित भुखंडावर  आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते वुक्षारोपण करीत वुक्ष लागवड करण्यात आली.  याप्रसंगी आरक्षित भुखंडावर सद्य स्थितीत खेळाची मैदाने कशी साकारता येतील याबाबत मानस असल्याचे प्रतिपादन आयुक्तांनी केले.

महात्मा गांधी जयंती, लाल बहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधत आंबिवली येथील स्वराज्य नेपच्यून गुहप्रकल्प परिसरात मनपाच्या आरक्षित भुखंडावर शनिवारी सकाळी वुक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण समयी मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, सहा. आयुक्त अ प्रभाग राजेश सावंत,  उयान अधिक्षक अनिल तामोरे तसेच धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अनुयायी उपस्थित होते.

याप्रसंगी आयुक्त यांनी या आरक्षित भुखंडावर कबड्डीचे मैदान करण्यात यावे. तसेच  हा  ग्रामीण भाग तीन दशकापुर्वी कबड्डीपटु खेळाडूचा परिसर म्हणुन जो नावलौकिक होता. ते गतवैभव पुनःश्च प्राप्त व्हावे या दुष्टीकोनातुन “अ” प्रभागात आरक्षित भुखंडाच्या जागेत कबड्डी, खो ,खो, व्हाँली बाँल या खेळासाठी मैदाने करण्याबाबत प्रशासन पुढाकार घेणार  आहे. आंबिवली स्वराज्य गुहप्रकाल्प परिसर या आरक्षित भुखंडावर दसर्या पर्यंत कबड्डीचे क्रीडांगण साकारण्याचे आदेश दिले. तसेच कबड्डी साठी प्रशिक्षकांची गरज भासल्यास त्याबाबत प्रशासन मदत करेल असे प्रतिपादन केले. तसेच याठिकाणी नागरिकांना चालण्यासाठी पेव्हर ब्लॉक ऐवजी मातीचे जॉगिंग ट्रॅक तयार करण्याचे देखील आयुक्तांनी सुचवले.   

 यामुळे एकेकाळी या ग्रामीण पट्यातील नामंकित कबड्डी संघ ए व्ही कबड्डी संघ, नवरत्न  कबड्डी संघ, दिपक कबडी संघ, एनआरसी बाईज्, गर्ल्स कबड्डी संघ, बजरंग कबड्डी संघ, क्रांतीसंघ, नारायण कबड्डी संघ अशा संघातुन अनेक नामवंत कबड्डी पट्टू घडले त्यांनी कबड्डीची मैदाने आपल्या कबड्डी खेळाच्या प्रर्दशानात गाजवली. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आरक्षित भुखंडावर कबड्डी ची मैदाने साकारण्याच्या संकल्पनेमुळे “अ ” प्रभागातील ग्रामीण पट्यातील गावातील कबड्डीखेळातील गत वैभव प्राप्त होणार असे चित्र या निमित्ताने दिसत आहे.         

“अटाळी येथील स्थानिक रहिवाशी माजी महाराष्ट्र राज्य संघातील कबड्डी पट्टू प्रकाश  पाटीलयांनी  आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कबड्डी खेळाडू साठी कबड्डी ची हक्काची मैदाने साकरण्याच्य निर्यणाचे कौतुक करीत याबाबत आम्ही देखील नवीन कबड्डी पट्टू कसे तयार होतील याबाबत मदत करु असे सांगितले.”         

“प्रशासनाच्या खेळाच्या मैदानाबाबत असलेला सकारात्मक निर्याणाचे आम्ही स्वागत करतो. तसेच कबड्डीची मैदाने  साकरल्याने निश्चितच ग्रामीण पट्यात कबड्डी पट्टू तयार होतील. ग्रामीण पट्यातील कबड्डीचे गत वैभव प्राप्त होईल अशी प्रतिक्रिया स्थानिक कबड्डी पट्टू सुभाष पाटील यांनी दिली.”                                                           

“आजची मुले मैदानी खेळापासुन दूर जात मोबाईल गेमच्या खेळात रस दाखवित आहेत. आयुक्तांनी आरक्षित भुखंडावर खेळाची मैदाने साकरण्याबाबत मानस जाहीर केल्याने मैदानी खेळांसाठी मैदाने उपलब्ध झाल्यास याकडे तरूणाई आकर्षित होऊन कसरती मुळे आरोग्य उत्तम राहत व्यवसनाधितापासुन अल्पित राहण्यासाठी मदत होईल असे मोहने येथील रहिवासी प्रविणा कांबळे यांनी सांगितले.”

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये आठ वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; शिकवणी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी

डोंबिवली मधील भोपर भागातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाही तोच कल्याण मध्ये देखील आठ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर तिच्या शिकवणी शिक्षकाने (ट्युशन टीचर) मुदूर टेलवाला (४८) ने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीने आरोपीला कठोर कारवाई करण्याची मागणी बाजार पेठ पोलिसांना निवेदन देऊन केली आहे.

कल्याण पश्चिमेतील राहणारा आरोपी हा शिकवणी घेणाऱ्या शिक्षीकेचा नवरा आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत या नराधमला अटक करण्यात आली आहे. या नाराधाला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सदर पीडित मुलगी आरोपीकडे अनेक महिन्यांपासून ट्युशन साठी जात होती. दीड महिन्यापूर्वी त्याची पत्नी माहेरी गेली आणि या नराधमाने डाव साधला. घडलेल्या प्रकारानंतर घाबरलेल्या पिडीतीने हा प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर या नराधमाविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.

या प्रकरणी योग्य पद्धतीने कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष यांनी पत्राद्वारे केली आहे. कल्याण डोंबिवली सारख्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहरात लागोपाठ दुसरी संवेदनशील आणि संतापजनक घटना घडली असून या घटनांना आवर घालण्यासाठी आता कठोर पाऊल उचलण्याची वेळ आली असल्याचे दिसत आहे.

-रोशन उबाळे

तीन आठवड्यात ४२ हजार थकाबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित; आणखी २ लाख ग्राहक महावितरणच्या रडारवर

कल्याण परिमंडळात गेल्या तीन आठवड्यात वीजबिल थकबाकीपोटी जवळपास ४२  हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांकडून विजबिलाची वसुली अथवा त्यांच्या वीजपुरवठा खंडित करणे, हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ५०० रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे २ लाख १  हजार ३२  वीज ग्राहक रडारवर असून त्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो. चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून कठीण आर्थिक परिस्थितीत असलेल्या महावितरणला सहकार्य करावे व अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.

गेल्या तीन आठवड्यात कल्याण मंडल एक (कल्याण व डोंबिवली) अंतर्गत ५ हजार ४६५, कल्याण दोन मंडल दोन (उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग) अंतर्गत ७  हजार ९७२, वसई मंडल (वसई व विरार) अंतर्गत १३ हजार २१४  आणि पालघर मंडल (वसई व विरार वगळून उर्वरित पालघर जिल्हा) अंतर्गत १५  हजार २५०  ग्राहकांचा तसेच २५ पाणीपुरवठा योजना व १४९  पथदिवे जोडणीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यातील २० हजार २११ ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुनरजोडणी शुल्काचा भरणा करून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला आहे. तर सप्टेंबर महिन्यापूर्वी १ लाख ६५ हजार थकाबाकीदारांचा शिवाय ३११ पाणीपुरवठा योजना व ७८६ पथदिवे जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील ६ लाख ७२ हजार ग्राहकांकडे ६६९ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. या थकबाकीदार ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून महावितरणला संकटाच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर चालू वीजबिल व थकबाकी तसेच पुनरजोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या ग्राहकांनी शेजारून अथवा परस्पर जोडणी किंवा अन्य माध्यमातून विजेचा अनधिकृत वापर केल्याचे आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे. याची परिमंडलातील सर्व वीज ग्राहकांनी नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

‘ड’ प्रभाग कार्यालयाने केली ६५ अतिक्रमणावर धडक कारवाई; नव्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांचे निर्देश

‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत दुकान मालक आणि फेरीवाल्यांनी पथ रस्ते अडविल्याने नागरिक वाटसरू यांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रभाग क्षेत्र अधिकारी सविता हिले यांनी पदभार स्वीकारून काही दिवस झाले असतांना कुठल्याही दबावाला न जुमानता पूना लिंक रोड श्रीराम टॉकीज ते चक्की नाका मलंगगड रोड परिसरातील फेरीवाले आणि ६५ अतिक्रमणे हटवले आहेत.

जेसीबी आणि इतर साहित्य तसेच पालिका कर्मचारी यांचा लवाजमा घेऊन ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे कल्याण पूर्वेच्या मुख्य रस्त्याने तात्पुरता मोकळा श्वास घेतला आहे. अशी कारवाई नेहमी करण्यात यावी अशी स्थानिक नागरिक व वाहन धारक, प्रवासी यांनी मागणी केली आहे.

कल्याण पूर्वीतील पूना रोड परिसरातील श्रीराम टॉकीज ते चक्की नाका, चेतना शाळा, मलंगगड रोड भागात मुख्य रस्त्यावर दुकान मालक व फेरीवाले यांनी पथ रस्ते वर शेड कोणी वाढीव बांधकाम केल्याने वाटसरू आणि नागरिक याना रस्त्याने चालताना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे आता ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवाजमा घेऊन धडक कारवाई केली आहे.

नवनियुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी सविता हिले व पथक विभागातील जयेश काळण, उमेश जाधव, संजय पवार, सुमित गायकर, समीर ठाकूर, हरेश बुचाडे व इतर कर्मचाऱ्यांनी श्रीराम टॉकीज, खडेगोळवली, अपर्णा डेरी पूनालिंक रोड ते चक्कीनाका, व पुढे चेतना शाळा, मलंगगड रोड वरील ६५ अतिक्रमणे,वाढीव बांधकामे जेसीबी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आली आहेत. या धडक कारवाई ने कल्याण पूर्वेतील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

-रोशन उबाळे

माणेरे गावात गावठी दारू सह हजारो लिटर नवसागर मिश्रित रसायन केले नष्ट; राज्य उत्पादन शुल्क विभगाच्या भरारी पथकाची कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण आणि ठाणे भरारी विभागीय पथकाने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माणेरे गावात धडक कारवाई करत ६० लिटर गावठी दारू तर ६३ हजार ३०० लिटर नवसागर मिश्रित रसायन नष्ट केले आहे. एकाच दिवशी एकूण १४ लाख ६० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल नष्ठ केला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आवश्यक असे साहित्य नसल्याने कारवाई दरम्यान पथकांना मोठी अडचण निर्माण होत असे. मात्र आता कारवाई साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक इंजिन आणि ड्रोन उपलब्ध झाले असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांना कारवाई करणे आणि दारू निर्मितीचे तळ शोधण्यात यश हे जलदगतीने येत आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील स्मार्ट झालेले दिसून येत आहे.

गावठी दारू हि ग्रामीण भागातून शहराकडे घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला सापडताच ४० लिटर दारू सह दुचाकी पथकाला कल्याण मध्ये मिळाली आहे. मात्र या गाडीवरील चालक दारू माफिया  हा फरार झाला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे विभागीय दुय्यम निरीक्षक आर.एन.राणे हे करत आहेत.

-कुणाल म्हात्रे