कल्याण डोंबिवलीतील रस्त्यांचा कायापालट करण्याच्या तयारीत महापालिका; एका कंपनीशी झाला सामंजस्य करार

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महापालिका परिसरातील रस्त्यांचा आता कायापालट होणार असून महापालिका क्षेत्रातील 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजक व 7 वाहतुक बेटे यांचे सुशोभिकरण आणि निगा, देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने क्रेडाय एमसीएचआय, कल्याण यांच्या बरोबर नुकताच एक सामंजस्य करार केला आहे.

महापालिकेच्या विकास आराखडयातील वाहतूक बेटे, रस्ता दुभाजक इ. चे सुशोभिकरण, निगा, देखभाल करण्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी महापालिकेने हा करार केला आहे. यानुसार रस्ता दुभाजक, चौक यामध्ये हिरवळ, झाडे लावणे व त्यांची दैनंदिन निगा, देखभाल करणे त्याचप्रमाणे प्रत्येक रस्ता दुभाजकाला व गार्ड स्टोनला वर्षातून एकदा रंगरंगोटी करणे व वर्षातून दोन वेळा पाण्याने धुणे व किरकोळ दुरुस्ती सुद्धा करण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहणार आहे. त्याबदल्यात वाहतूक बेटे व रस्ता दुभाजकाच्या विदयुत खांबावर जाहिराती चे हक्क विकासकांना विना शुल्क स्वरुपात देण्यात आले आहे. व तसेच सामाजिक संदेश व महापालिकेने दिलेले संदेश लावणे संबंधित विकासकास बंधनकारक राहील.

   महापालिका क्षेत्रातील पुना लिंक रोड( सुचक नाका) ते विठ्ठलवाडी , चक्की नाका ते मलंग रोड, चेतना नाका ते साकेत कॉलेज, नेतीवली नाका ते चक्की नाका, मूरबाड डायव्हर्शन रोड( दुर्गाडी ते प्रेम ऑटो), गांधारी रोड ( लाल चौकी ते गांधारी पुल), संतोषी माता रोड ( सहजानंद चौक ते इंदिरा नगर), बेतुरकरपाडा ते खडकपाडा, बारावे रोड (खडकपाडा ते गोदरेज हिल), बिर्ला कॉलेज ते चिकणघर, निक्की नगर ते माधव संकल्प, निक्की नगर मधील भोईर चौक, विशाल भोईर चौक ते उंबर्डे रोड, एमएसआरडीए 45 मिटर ते साई सत्यम होम्स, कोलीवली रोड, विश्वनाथ भोईर बंगलो- 18 मिटर ते कडोमपा पाण्याची टाकी,काली मश्जिद ते चिकणघर, प्रेम ऑटो ते शहाड पूल, शहाड – मोहने रोड, वैष्णवी देवी मंदिर ते टिटवाळा स्टेशन, टिटवाळा स्टेशन ते गणेश मंदिर,रेल्वे समांतर (90 फुट रोड), ठाकुर्ली, सावित्रीबाई फुले नाटयगृह रोड, घारडा चौक ते मंजूनाथ शाळा या 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजकांचा समावेश आहे.

त्याचप्रमाणे चक्की नाका सर्कल कल्याण (पूर्व), म्हात्रे नाका सर्कल साकेत कॉलेज रोड  कल्याण (पूर्व),  कोळीवली रोड 18 मी. व 15 मी. जंक्शन रस्ता येथील सर्कल, सेंट लॉरेन्स शाळेजवळ आधारवाडी कल्याण (प) येथील सर्कल, कोलीवली सर्कल, प्रांत ऑफिस वायले नगर चौक, टिटवाळा मंदिर सर्कल अशी 7 वाहतूकबेटे/सर्कल यांचे सुशोभीकरण करण्याबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मान्यता दिली आहे. यानंतर याबाबतचा करारनामा नुकताच महापालिकेच्या वतीने शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली आणि क्रेडाय एमसीएचआयचे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केला असून यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, क्रेडाय एमसीएचआयचे सेक्रेटरी विकास जैन, खजिनदार साकेत तिवारी हे उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

भाजप कार्यालय वाचवण्यासाठी उभं राहिलेल्या आणि कार्यालय फोडणाऱ्या दोन्ही कार्यकर्त्यांचा पक्षाने केला गौरव

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याचे कल्याण मध्ये चांगलेच पडसाद उमटले आहेत. शिवसेनेने भाजपा कार्यालय फोडल्यानंतर कल्याण मधील राजकारण चांगलेच तापले आहे. एकीकडे भाजपा कार्यलय फोडणारया शिवसैनिक अमोल गायकवाड याचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. तर दुसरीकडे भाजपा कार्यकर्ता प्रताप टूमकर यांचा देखील भाजपा पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला आहे.

आज दुपारच्या वेळी शिवसैनिक कल्याण मधीलच भाजप कार्यालय फोडण्यासाठी आले होते. मात्र या ठिकाणी भाजपचा एक कार्यकर्ता त्यांना विरोध करीत होता. जेव्हा शिवसैनिकांनी भाजपा कार्यालयावर हल्ला केला तेव्हा मारहाण होऊन देखील प्रताप टूमकर यांनी तेथून न हलता ते तिथेच उभे राहिले. याबद्दल त्यांचा भाजपाच्या वतीने शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

एकीकडे ही सर्व झटापट होत असताना शिवसैनिक अमोल गायकवाड याने स्वतःची पर्वा न करता आपल्या हाताच्या बुक्कीनेच भाजपा कार्यालयाची काच फोडली. या धाडसी कृत्याबद्दल अमोल गायकवाड याचा देखील महानगरप्रमुख विजय साळवी आणि उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांनी गौरव केला.

-कुणाल म्हात्रे

‘यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर देणार’; कार्यालयावरील हल्ल्यानंतर भाजप शहर अध्यक्षांचा ईशारा

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याणात शिवसेनेकडून भाजपच्या शहर कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. त्याविरोधात संतप्त झालेल्या कल्याण शहर भाजपकडून शिवसेनेला यापुढे जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशारा भाजपा शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी  दिला आहे. तसेच या हल्ल्याप्रकरणी शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपने छत्रपती शिवाजी महाराज चौकात ठिय्या मांडला होता.

केंद्रीय मंत्री नारायण नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे आज संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले. तर कल्याणात मात्र शिवसेनेकडून निषेध करण्यासह भाजपच्या शहर कार्यालयावर हल्ला करत तोडफोड करण्यात आली. भाजप कार्यालयावर दगडफेक करण्यासह त्याला विरोध करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यालाही यावेळी मारहाण झाली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या कल्याण शहर भाजप पदाधिकाऱ्यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात धाव घेत या हल्ल्याप्रकरणी शिवसेनेच्या विजय साळवी यांच्या अटकेची मागणी केली.

 त्यानंतर बाजारपेठ पोलीस ठाणे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भाजप पदाधिकाऱ्यांनी मोर्चा काढला. याठिकाणी रस्त्यावरच ठिय्या मांडत झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला. तसेच शिवसेनेचे महानगरप्रमुख विजय साळवी यांना पोलिसांनी अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला. शिवसेनेमध्ये खरोखर हिंमत होती तर आम्हाला सांगून त्यांनी हा हल्ला करायला पाहीजे होता. यापूढे शिवसेनेला जशास तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे यांनी दिला.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये नारायण राणें विरोधात पेटून उठली शिवसेना; तीव्र आंदोलनात पुतळा, चपला आणि कोंबड्या

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्या मध्ये मागील काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी सुरू होत्या. मात्र आता हा वाद विकोपाला गेला असून टीकेची पातळी देखील खालावताना दिसतेय. राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलने केली जात आहेत. कल्याण मध्येही विविध ठिकाणी शिवसैनिकांनी तीव्र आंदोलने करीत राणेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

एकेकाळचे शिवसेनेचे मुख्यमंत्री नारायण राणे ते भाजपाचे केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास केलेले नारायण राणे हे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडे जन आशीर्वाद यात्रेवर असल्यापासून राणे आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू होत्या. शेवटी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल शिवसैनिकांनी राज्यभर आंदोलने केली आहेत. कल्याण मध्ये शिवसेनेचे मोठे वर्चस्व असल्याने या शहरात देखील या आंदोलनाचे तीव्र असे पडसाद उमटले आहेत. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून ही आंदोलने करण्यात आली.

कल्याण मध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. ज्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका कार्यालयाचे नुकसान केल्याचे समोर आले. डोंबिवलीत देखील शिवसेनेकडून राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमार आंदोलन केले. तर दुसरीकडे शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्वेत शिवसेना शाखेसमोर राणें विरोधात घोषणाबाजी करीत रोष व्यक्त करण्यात आला. तर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेरही शिवसैनिक एकवटले होते. यावेळी नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा झोड देण्यात आला. तसेच या आंदोलनात कोंबड्या दाखवून निषेध करण्यात आला.

एकीकडे इंधनाचे दर आणि महागाई प्रचंड वाढली आहे आणि हे जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. या जन आशीर्वाद यात्रा नसून जन शाप यात्रा आहेत. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी कल्याण मध्ये येऊन यात्रा काढून दाखवाव्यात असे खुले आव्हान महेश गायकवाड यांनी राणे यांच्यावरील रोष व्यक्त करताना दिले आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप राणेंच्या पाठीशी असल्याचे सांगितले. मात्र नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याला भाजपचे समर्थन नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर भाजप कार्यालयाची नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

नारायण राणें विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाले. याचदरम्यान राणे यांनी अटकपूर्व जामीन देखील केला होता. मात्र न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्या नंतर पोलिसांनी आता नारायण राणेंना अटक केली आहे.

-संतोष दिवाडकर

लसीकरणाच्या बाबतीत कल्याण पूर्वेशी दुजाभाव ? पालिका प्रशासनावर सामाजिक संघटनांचा रोष

कल्याण पुर्वेचा भाग हा महापालिका क्षेत्रातील इतर भागांच्या तुलनेत विकासापासून वंचित राहिला आहे अशी एक नेहमीची ओरड आहे. कल्याण पूर्वेला स्वतंत्र आमदार आहे. दोन महापौरही याच भागात होऊन गेले. कोटींच्या महागड्या गाड्या घेणारे तसेच अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिक कल्याण पूर्वेत राहतात. मात्र कोरोना काळात या कल्याण पूर्वेत लसीकरण केंद्रे जर पहायला गेलात तर कधी चार तर कधी कधी एकच केंद्र दिलं जातं. इतर परिसराच्या मानाने लोकसंख्या ही ४ लाखांच्या वर आहे त्यामुळे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी विरोधात सामाजिक संघटना रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. एकूण २४ केंद्र तर काही वेळेस १९ उभारली जातात. मात्र त्यात कल्याण पूर्वेला झुकते माप देऊन जेमतेम तीन ते चार केंद्रे दिली जातात. काही दिवशी तर १९ पैकी एकच लसीकरण केंद्र कल्याण पूर्वेत दिले जाते. त्यामुळे विकासाच्या बाता मारणारे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आणि बाकीचे राजकीय पक्ष आहे कुठे असा संतप्त सवाल सामाजिक संघटना उपस्थित करत आहेत.

१९ केंद्रावर लसीकरण होत असताना

कल्याण पूर्व – १
कल्याण पश्चिम – ६
डोंबिवली मधे – ११
टिटवाळा – १

अशी केंद्र कधी कधी पालिका प्रशासन देते. आणि त्यामुळे कल्याण पूर्वेतील नागरिकांना कल्याण पश्चिम किंवा डोंबिवली मध्ये जावे लागत आहे. त्यात लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पूर्वेकर मोबाईल लसीकरणाची वाट पाहूनही थकले आहेत.

लसीकरण सुरू झाल्यापासून असेच सुरू आहे. हे कल्याण पूर्वेला भिक दिल्या प्रमाणे लसीकरण केंद्र देत असतात हा अन्याय आहे. कल्याण पूर्वेचे लोक अतिशय शांत सुस्वभावी आहेत. आपल्या पक्षाला, माणसाला मतदान करणारे आहेत. याचा गैर फायदा प्रशासन घेत आहे की काय ? डोंबिवली चे विशेष कौतुक कारण ते मात्र बरोबर मिळवतात सर्व काही.

– उदय रसाळ (माजी नगरसेवक)

दरम्यान आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी पाटील यांना याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केले असता कल्याण पूर्व साठी फिरते लसीकरण केंद्रे उभारण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कल्याण डोंबिवली परिसरात केंद्रे उभारण्याचे काम उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या कडे आहेत असे स्पष्ट केले. भागवत यांना संपर्क केला असता त्यांना फोनचा स्वीकारच करता आला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

-रोशन उबाळे

कल्याण पुर्वेत रक्षाबंधना निमित्त धर्मवीर आनंद दिघे उद्यानात वृक्षारोपण; “रक्षा वृक्षांची” दिला संदेश

आरक्षित भुखंडावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आरक्षित भुखंडाच्या सीमेवर झाडे लावून  भुखंड सुरक्षित ठेवण्याबाबत निर्देश दिले असल्याने आरक्षित भुखंडावर झाडे लावण्यात येत आहेत. कल्याण पुर्वीतील “ड” प्रभाग क्षेत्रातील आमराई विजय नगर परिसरातील धर्मवीर आनंद दिघे उद्यान या आरक्षित भुखंडावर विदर्भ युवक मंडळ यांच्या आयोजना नुसार रक्षा बंधन व नारळीपोर्णिमेचे औचीत्त साधुन विभागीय उप आयुक्त अनंत कदम यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले. याप्रसंगी “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल, स्थानिक नगरसेविका माधुरी काळे, माजी नगरसेवक प्रशांत काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कल्याण पूर्व मध्ये रक्षाबंधन दिवशी वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षांची रक्षा करणे हे आजच्या निसर्गाच्या नियमांची गरज भासली आहे. वृक्षतोडीमुळे अनेक ठिकाणी निसर्गाचा नियम पायमल्ली झाल्यामुळे जीवित हानी पासून सृष्टीची हानी देखील सुरू आहे, माणसाने आपल्या सोयीनुसार अनेक बांधकामं, रस्ते तयार केलेत  आणि भरमसाठ वृक्षतोड झाली. ऑक्सिजनची कमतरता शहरांमध्ये भासत आहे. याकरिता सृष्टी रक्षा हेच “रक्षाबंधन व्हावं” या उद्देशाने कल्याण पूर्व मध्ये माधुरी प्रशांत काळे यांनी  सामाजिक संस्थेसोबत वृक्षारोपण घेवून मोलाचे कार्य केले आहे.

या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमात प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका माधुरी काळे यांनी स्वेच्छेने  वृक्षारोपणासाठी झाडे ,फुलझाडे देण्याच्या मागणीस चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांनी दिलेली ही झाडे त्यांच्या नावाने लावण्यात येणार आहेत. यावेळी ड प्रभाग अधीक्षक संजय कुमावत, विदर्भ युवक मंडळाचे संस्थापक पी. डी. चौधरी, अध्यक्ष उत्तम पाटील, सचिव सुरेश ढगे, विश्वस्थ विजय गैगावली, सुरेखा कपले, कासार, सिद्धिविनायक सामाजिक संस्थेच्या संचालिका सुरेखा गौरे, आशा चौधरी, विजय नगर हौसिंग फेडरेशनचे सचिव प्रदीप तांबे, खजिनदार, वासुदेव कदम, संचालक कानसे, संभाजी माने, नरेश कासार, किरण गौरे, विनय ठोकळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कुस्तीच्या खेळाडूंना उपलब्ध करून दिली आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट

कल्याण पूर्व भागातील नांदिवली परिसरातील जय बजरंग तालीम संघाला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कुस्ती खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट दिली आहे. कल्याण मधील नांदीवली गावात असलेल्या जय बजरंग तालीम संघाने आजवर अनेक कुस्ती खेळाडू घडवले आहेत. आधी कुस्ती मातीत खेळली जात होती. आता वेळ आणि काळ बदलला असून स्पर्धा  वाढली आहे. त्यासाठी मॅट उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे  नांदवली गावचे माजी सरपंच रामदास ढोणे, पंढरीनाथ ढोणे व खेळाडूंनी केली होती.

 या मॅटचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी मुलांनी मॅटवर कुस्तीची प्रात्याक्षिके दाखविली. या मॅटवर उत्तम सराव करुन उत्तम खेळाडू घडतील. केवळ महाराष्ट्रात नाही तर भारताच्या बाहेर नाव कमाविण्यासाठी त्यांना उर्जा व प्रशिक्षण मिळेल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच जय बजरंग तालीम संघाच्या व्यायाम शाळेच्या जागेत कुस्तीगीरांना आणि परिसरातील नागरिकांना नियमित व्यायामाकरिता लागणारे व्यायामशाळा साहित्य देखील उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या लोकर्पण कार्यक्रमाप्रसंगी कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंढरीनाथ ढोणे, उल्हासनगर महापालिका गटनेता धनंजय बोडारे, तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, कल्याण पंचायत समिती माजी सभापती सदाशिव गायकर, माजी नगरसेवक महेश गायकवाड, मारुती पाटील, विभागप्रमुख रामदास ढोणे, मदन चिकणकर, उपमहाराष्ट्र केसरी व आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर युवराज वाघ  तसेच कल्याण व ठाणे जिल्ह्यातील कुस्तीगीर व वस्ताद उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

आपल्याच पोलीस ठाण्यातील सहकाऱ्याला अटक करण्याची डोंबिवलीच्या पोलिसांवर आली वेळ; गंभीर दुष्कृत्य केल्याने हवालदार निलंबित

डोंबिवलीच्या राम नगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शेतच जर कुंपण खायला लागले तर सामान्य नागरिकांनी जायचे कोणाकडे असा प्रश्न पडला आहे. या अगोदर सचिन वझे आणि पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या गाजलेल्या प्रकरणा मुळे पोलीस खात्यावर विविध प्रश्न उपस्थित राहिले होते. त्यातच डोंबिवलीतील घटनेने पुन्हा पोलीस खाते वाईट गोष्टीसाठी चर्चेत आले आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारी नंतर राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. दुष्कृत्य करणाऱ्या पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. ज्या रामनगर पोलीस ठाण्यात तो कार्यरत होता त्याच पोलीस ठाण्याने त्याला अटक केली आहे. सतीश कारले असे या पोलीस हवालदाराचं नाव असून आता त्याच पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे.

या घटनेमुळे कल्याण डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी विविध कलमा अन्वये या पोलिस हवालदारावर गुन्हे दाखल केले आहेत. अश्या निकृष्ठ वृत्तीच्या पोलिसांमुळे समाजातील इतर चांगल्या व इमानदार पोलिसांना देखील नाईलाजास्तव खाली मान घालावी लागते. त्यामुळे संपूर्ण पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह उठण्या पूर्वी अशा वृत्तीच्या पोलिसांचा निकाल लावणे गरजेचे ठरू लागले आहे.

-रोशन उबाळे

अरेच्चा! एवढे मोठे केंद्रीय राज्यमंत्री आणि एवढीशा खुर्चीसमोर नतमस्तक ? कपिल पाटलांनी असं का केलं बरं ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय राज्यमंत्रीमंडळात निवड झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्रा काढण्यात आली होती. यातच संपूर्ण ठाणे जिल्ह्यात केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी पाच दिवस भेटी दिल्या. याचदरम्यान शेवटच्या दिवशी यात्रेची सांगता झाल्यानंतर त्यांनी एका खुर्चीला वंदन करून तिच्यासमोर ते नतमस्तक झाले. यानंतर त्यांनी असे का केले ? याबद्दल काही लोक अनभिज्ञ आहेत.

राजकारण असोत किंवा इतर कोणतेही क्षेत्र प्रत्येकाची सुरुवात ही तळा गाळातून आणि शून्यातूनच होत असते. आणि शून्यातुन सुरुवात करून केंद्रीय राज्यमंत्री पद मिळवणारे कपिल पाटील हे देखील त्यातीलच एक. कपिल पाटील यांनी ज्या खुर्चीला वंदन केले ती केंद्रीय खुर्ची नसून ज्या खुर्चीने त्यांना घडवलं ती ही खुर्ची होती. राजकारणात पहिलं मिळालेलं मोठं यश म्हणजे हीच खुर्ची जिला कपिल पाटील यांनी विनम्रपणे हात जोडले. ती खुर्ची होती सरपंच पदाची. म्हणूनच कपिल पाटील यांनी कुटुंबातील लोकांना घेऊन थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठले.

कपिल पाटील यांनी राजकारणात प्रवेश केला त्यावेळी म्हणजेच १९८८ मध्ये ते दिवे अंजूर गावासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवत होते. आणि याच गावचे ते सरपंच बनले होते. सरपंच पदाच्या लहान मात्र गावात प्रचंड मान असणाऱ्या खुर्चीवरून कपिल पाटील यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. या खुर्चीवरून पुढे एवढा मोठा प्रवास होईल असे त्यांनी स्वप्नात देखील पाहिले नव्हते. सरपंच कपिल पाटील ते केंद्रीय मंत्री कपिल पाटील हा प्रवास ज्या खुर्चीमुळे शक्य झाला त्या खुर्चीला मी कधीही विसरणार नाही अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली आणि त्यांना गहिवरून आले. आयुष्यात कितीही उंची गाठा पण पहिल्या पायरीला कधीही विसरू नका असा संदेश कपिल पाटलांनी यातून लोकांना दिला आहे. यातून कपिल पाटील हे किती भावनिक आहेत याचाच एक प्रत्यय लोकांना आला आहे.

-संतोष दिवाडकर

ईव्हीएम मशीन हॅकिंग प्रकरणाची चौकशी करा; शिवसेना नेत्यांनी केली मागणी

कल्याणमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीचा ईव्हीएम मशीन हॅक केल्याचा दावा करणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली होती. मात्र आता त्यापाठोपाठ शिवसेनेने देखील या वादात उडी घेतली आहे. शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांची भेट घेत हा गंभीर प्रकार असून सर्व यंत्रणेच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. त्यामुळे याप्रकरणी चौकशी करत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली . त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दै.बातमीदारने प्रसिद्ध केलेल्या या व्हडिओ मुळे उडाली खळबळ

व्हायरल होत असलेल्या व्हडिओमध्ये आशिष चौधरी नामक इसम आमदार गणपत गायकवाड हे ईव्हीएम हॅक करून निवडुन आल्याचा दावा करताना दिसत आहे. आणि हीच व्हिडियो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. हे स्टिंग असल्याचा दावा देखील करण्यात आलाय. या व्हायरल व्हिडियो स्टिंगमध्ये दिसणारा तरुण हा आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे कामाला होता. त्यांच्या मुलाची जवळपास ४० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. आशिष चौधरी याने १९ मे रोजी मुंबई उच्च न्यायालय, पोलीस महा संचालक आणि संबंधी सरकारी यंत्रणांना तक्रार केली आहे. त्याच मे महिन्यातील हा व्हिडियो असून २०१९ च्या कल्याण पूर्व विधान सभेत काही ठिकाणी ईव्हीएम हॅक केल्याचा दावा केला आहे आणि याबदल्यात ५० लाख रुपये मिळाले होते असे त्याने म्हटले आहे.

आमदार गणपत गायकवाड यांनी या सर्व आरोपांचे खंडन करत या व्हिडियोत दावा करणाऱ्या आशिष चौधरीने आपल्या मूलाची ४० लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करून तो अटकेत असल्याचे स्पष्ट केले. तसेच मला बदनाम करण्याचं हे षड्यंत्र असून या व्हिडियोची सत्यता तपासून दोषींवर कठोर कारवाई करा अशी मागणीही आमदार गायकवाड यांनी केली आहे. मात्र आता या प्रकरणात शिवसेनेने देखील उडी घेतली आहे. शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, आमदार गायकवाड यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार धनंजय बोडारे यांच्या समवेत पोलीस उपयुक्ताची भेट घेत त्यांना याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आमदार गणपत गायकवाड यांची बदनामी करत असल्या बाबत पोलिसात तक्रार

आतापर्यंत आमदारांनी मशीन मध्ये घोळ केल्याची शंका होती मात्र आता या क्लिप मुळे ते स्पष्ट झाल्याचा आरोप लांडगे यांनी केला आहे. सुरुवातीपासूनच ईव्हीएम मशीनमधून चुकीचे काम केले जात असल्याची सर्व पक्षीय राजकारण्यांची ओरड सुरू आहे. ईव्हीएम मशीन मधील गोंधळामुळे चुकीचा निर्णय लागला आहे. मतदार आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या डोळ्यात धूळफेक करत त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याचा कायदेशीर ब होणे गरजेचे आहे यासाठी शुक्रवारी पोलिस उपायुक्तांना निवेदन दिल्याचे त्यांनी सांगितलं.

ईव्हीएम मशीन हॅक करणे हा देशद्रोह आहे आणि चौधरी याने आपण पैशासाठी हे काम केल्याची कबुली दिली आहे. सर्व यंत्रणेच्या प्रतिष्ठेचा हा प्रश्न असल्याने यातील दोषींवर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी धनंजय बोडारे यांनी केली आहे. आतापर्यंत १३५ करोड लोकांच्या आणि राजकारण्यांच्या मनात असलेल्या संशयाला आणि चर्चेला हॅकरने सिद्ध करून दाखवले आहे. लोकशाही वर विश्वास असून आपण याप्रकरणी पोलीस, निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून संबंधित यंत्रणा चौकशी करून न्याय देतील असा विश्वास गोपाळ लांडगे ( कल्याण जिल्हा प्रमुख) यांनी व्यक्त केला आहे.

संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची प्रतिस्पर्धी धनंजय बोडारे यांची मागणी

-रोशन उबाळे