कल्याणमध्ये टवाळखोरांचा उच्छाद; एकीकडे मारहाण तर दुसरीकडे गाडीचे नुकसान

कल्याण पोलीस परिमंडळ -३ मधील दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या कारणाने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यात दोन्ही घटनांमध्ये टवाळखोरांनी आपली दहशत दाखविली असल्याचे दिसत आहे. या दोन्ही घटना सोमवारी ९ ऑगस्ट रोजी घडल्या आहेत.

कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार ओव्हटेक केल्याच्या कारणावरून अज्ञात कार चालकाने ओव्हरटेक का केली या कारणाने कार ची समोरची काच फोडली तर त्याच गाडीमागे असणाऱ्या दोन दुचाकी स्वारांना मारहाण करीत मोबाईल आणि पैश्याचे पॉकेट हिसकावून नेले. तर दुसरीकडे कल्याण पश्चिम स्टेशन परिसरामध्ये  महात्मा फुले पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तिघांवर पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी  चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिघे जन गंभीर जखमी झाले.

एकाच दिवशी घडलेल्या दोन्ही घटनांमुळे कायद्याचे भय कल्याण मध्ये राहिले की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. आनंद दिघे पूलाखाली कोळसेवाडी पोलिसांची हद्द संपते म्हणूंन  महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पीडित याना पाठवण्यात आले. एकाच दिवसात पाठोपाठ तीन घटना घडल्याने कोरोना काळात आधीच पिचलेल्या नागरिकांत या प्रकारामुळे दाहशतीचे वातावरण पसरलेले दिसत आहे. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात वारंवार घडणाऱ्या घटना कमी करण्यासाठी पोलिसांची अधिक गस्त वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

-रोशन उबाळे

उबेर चालकाची हत्या करून कार केली लंपास; महात्मा फुले पोलिसांकडून दोघांना अटक

ओला उबेर सारख्या खाजगी वाहनाने प्रवास सुरक्षित असल्याचा लोकांचा एक समज आहे. मात्र अशा प्रवासी वाहनावरील चालक देखील सुरक्षित नसल्याचे आता एका घटनेतून समोर आले आहे. काही वेळेस प्रवाश्याची हत्या होते तर कधी वाहन चालकाची हत्या होते. त्यामुळे सुकर प्रवास करावा कसा ? असा पेच निर्माण झाला आहे. खाजगी वाहनातून प्रवास करणे धोकादायक बनले असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.

कल्याण ते धुळे या प्रवासासाठी आरोपींनी उबेर कंपनीची गाडी बुक केली. या गाडीच्या प्रवासा दरम्यानच त्या आरोपी प्रवाशांनी चालकाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिला. नंतर त्याची कार चोरून तिथून पोबारा केला. मात्र या हत्येतील दोन आरोपीना महात्मा फुले पोलिसांनी मोठया शिताफीने तपास करीत ताब्यात घेतले आहे. राहुलकुमार गौतम आणि धर्मेंद्रकुमार गौतम या आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. अमृत गावडे असे या दुर्दैवी उबेर चालकाचे नाव असून तो नवी मुंबई मधील दिघा, ऐरोली मधील रहिवासी आहे.

पोलिसांनी या प्रकरणी राहुलकुमार गौतम, धर्मेद्र्कुमार उर्फ वकील गौतम, विशालकुमार गौतम, करणकुमार गौतम, बचई गौतम, अमन गौतम या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उबेर चालकाच्या हत्येच्या या घटनेने सध्या खळबळ माजली आहे. दरम्यान या घटनेने खासगी प्रवास करणे अधिकच धोकादायक बनले आहे याचा सारासार विचार करण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे का म्हणतात ? हे देखील तितकेच अधोरेखित झाले आहे.

-रोशन उबाळे

क.डों.म.पा.क्षेत्रात आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचे लसीकरण; मोबाईल लसीकरणाला प्रतिसाद

छायाचित्र :- संतोष दिवाडकर

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात लसीकरण मोहीम कधी वेगात सुरू असते तर काही वेळेस रखडत राहते. अशाही परिस्थितीत महापालिका क्षेत्रात आतापर्यंत एकूण ५ लाख ७८ हजार हुन अधिक नागरिकांचे लसीकरण पार पडल्याची माहिती पालिका प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे. पालिका क्षेत्रातील लोकसंख्या लक्षात घेता सर्वांचे लसीकरण होई पर्यंत आणखी किती कालावधी लागतोय हे देखील आता पहावे लागणार आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात आत्तापर्यंत हेल्थ वर्कर, फ्रंन्ट लाईन वर्कर तसेच १८ वर्ष वयावरील नागरिकांचे महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांमार्फत ३ लाख ९८ हजार इतके लसीकरण झाले आहे. महापालिकेने गत महिन्यात सुरु केलेल्या ‘निअर टू होम’ म्हणजेच मोबाईल व्हॅनद्वारे झोपड्पट्टी व चाळ परिसरात केल्या जाणा-या लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत ३८ हजार ४८२ इतके लसीकरण झालेले आहे. त्याचप्रमाणे खाजगी रुग्णालयामार्फत केल्या जाणा-या लसीकरण प्रक्रीयेमध्ये एकुण १ लाख ४१ हजार ४९० इतके लसीकरण झाले आहे.

शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणा-या लस साठयानुसार नियोजन करुन महापालिकेचा आरोग्य विभाग पूर्ण क्षमतेने गेले ६ महिने लसीकरण मोहिमेची अंमलबजावणी प्रभावीपणे करीत असल्यामुळे आत्तापर्यंत ५ लाख ७८ हजार हुन अधिक लोकांचे लसीकरण करण्यात पालिका प्रशासनाला आले आहे. २०११ च्या जनगणनेनुसार महानगरपालिका क्षेत्रातील लोकांची संख्या १३ लाखांच्या जवळपास होती. मात्र आता दहा वर्षे उलटल्याने ही लोकसंख्या २० लाखांपर्यंत देखील आली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजून जवळपास ७०% नागरिकांचे लसीकरण पालिका प्रशासनाला करावे लागणार आहे.

-कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा. देणार नागरिकांना रेल्वेपास; तिकीटघरा शेजारी महापालिकेचा कक्ष

कोविड-19 च्या लसीकरणाचे दोन्ही डोस घेऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्याच्या शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार महापालिका आयुक्त, महापालिका अधिकारी, पोलीस अधिकारी, एसआरपीएफ, सीआरपीएफ, रेल्वे अधिकारी यांच्या समवेत ऑनलाईन बैठक संपन्न झाली. या बैठकीत नागरिकांना 15 ऑगस्टपासून रेल्वे पास देण्याबाबत रेल्वे व्यतिरिक्त इतर विभागांनी करायच्या कामांबाबत नियोजन करण्यात आले.

कोविड लसीकरणाचे 2 डोस घेवून 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वेच्या तिकीट काऊंटरवर मासिक रेल्वे पास दिला जाणार आहे. हा पास देतेवेळी होणारी संभाव्य गर्दी टाळण्‍यासाठी व रेल्वे पास वितरण प्रक्रियेत गतिमानता आणण्यासाठी तिकीट काऊंटरजवळ सकाळी 7.00 ते दुपारी 3.00 व दुपारी 3.00 ते रात्री 11.00 या दोन शिफ्टमध्ये महापालिका कर्मचा-यांचे प्रत्येक रेल्वे टिकीट काऊंटर शेजारी स्वतंत्र मदत कक्ष(हेल्प डेस्क) उभारले जाणार आहे.

कोविड-19 लसीकरण प्रमाणपत्राची एक प्रत व फोटो असणारे मूळ शासकीय ओळखपत्र व त्याची छायांकित प्रत(प्राधान्याने आधारकार्ड) घेवून आलेल्या नागरिकांची सर्व प्रथम महानगरपालिकेच्या मदत कक्षांमध्ये सदर कागदपत्रांची पडताळणी होऊन मदत कक्षातील कर्मचारी त्यावर पडताळणी  केल्याचा शिक्का मारुन दिनांकासह स्वाक्षरी करतील. पडताळणी केलेले प्रमाणपत्र व ओळखपत्र (प्राधान्याने आधारकार्ड) रेल्वेच्या टिकीट काऊंटरवर दाखविल्यानंतर प्रवासासाठीचे विहीत शुल्क भरल्यावर संबंधित नागरिकांना मासिक रेल्वे पास प्राप्त होईल.

महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या टिटवाळा, ठाकुर्ली, डोंबिवली, कल्याण, आंबिवली व शहाड या रेल्वे स्थानकामधील रेल्वे टिकीट काऊंटरवर लसीकरण प्रमाणपत्राची व फोटो असणा-या शासकीय ओळखपत्राची (आधारकार्ड) पडताळणी करण्यासाठी महापालिका कर्मचारी वर्ग तैनात राहणार आहे. रेल्वे पाससाठी रेल्वे स्थानकावर येणा-या नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी रेल्वेच्या आगमन आणि बहिर्गमन मार्गावर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक पोलीस यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. त्याचप्रमाणे रेल्वे टिकीट काऊंटरवर रेल्वे पोलिसांचे सहकार्य घेतले जाणार आहे.

नागरिकांनी रेल्वे प्रवास करतांना रेल्वेचा मासिक पास, लसीकरण प्रमाणपत्र आणि ओळखपत्राची प्रत जवळ बाळगणे अनिवार्य राहील. राज्य शासनाची नागरिकांसाठी युनिव्हर्सल पासबाबत ऑनलाईन सेवा कार्यान्वित झाल्यानंतर सदर नागरिक स्वत:चा युनिव्हर्सल पास प्राप्त करुन घेवू शकतील, अशा नागरिकांना प्रवास करतेवेळी रेल्वे मासिक पास आणि युनिव्हर्सल ऑनलाईन पास जवळ बाळगणे अनिवार्य राहील.

-कुणाल म्हात्रे

लसीकरणासाठी कल्याण डोंबिवलीकरांनी लावल्या पहाटे पासून रांगा; ‘या’ एका कारणामुळे उडतेय नागरिकांची झुंबड

छायाचित्र :- संदेश दाभणे

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज दि.१० ऑगस्ट रोजी लसीकरणासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. यासाठी काही नागरिक पहाटे चार वाजल्या पासून रांगेत नंबर लावून बसले असल्याचे समजले आहे. आणि याला एकमेव कारण म्हणजे मुंबई लॉकल ट्रेनचा रेल्वेप्रवास.

कोरोनाच्या दुसऱ्या अनलॉकदरम्यान १५ ऑगस्ट पासून सर्वसामान्य नागरिकांना मुंबई लॉकल ट्रेनचा प्रवास करता येणार आहे. मात्र केवळ लसींचे दोन्ही डोस घेतलेले लोकच या प्रवासासाठी पात्र असतील अशी अट शासनाकडून घालून देण्यात आली आहे. रोजच्या धकाधकीच्या प्रवासाला वैतागलेले कल्याण डोंबिवलीकर आता रेल्वे प्रवासासाठी आसुसले आहेत. त्यामुळे शक्य तितक्या लवकर लसीकरण करून घेण्याच्या प्रयत्नात आता कल्याण डोंबिवलीतील चाकरमानी आहेत.

क.डों.म.पा. क्षेत्रात लसीकरणाचा वेग सतत मंदावताना दिसतो. काही खाजगी इस्पितळ तसेच राजकीय नेत्यांच्या शिबिरातुन काही लोक हे डोस घेतात. मात्र कोरोनाने कंबरडे मोडलेले असताना खिशाला न परवडणारे असल्याने काही लोक महानगरपालिकेच्या लसीकरणाची वाट पाहून आहेत. त्यात आज मंगळवारी कल्याण मधील आचार्य अत्रे रंग मंदिर व डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृह या दोनच ठिकाणी लसीकरण पार पडले. त्यामुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी पहाटे पासूनच रांग लावायला सुरुवात केल्याचे समजले आहे. यामुळे लसीकरणासाठी आता झुंबड उडताना दिसू लागली आहे. कोरोनाने पिचलेल्या लोकांसाठी शासन कितीही प्रयत्नशील असलं तरीही सेवा तोकडी पडताना दिसत आहे.

-संतोष दिवाडकर

कल्याण पूर्वेत तरुणीवर अत्याचार; आरोपीला न्यायालयीन कोठडी

कल्याण डोंबिवलीत महिलांवर अत्याचारांच्या घटना कोरोना महामारीत देखील थांबलेल्या नाहीत. कल्याण पूर्वेतील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कल्याण पूर्वेतील काटेमानिवली मध्ये राहणाऱ्या आकाश नावाच्या २२ वर्षीय तरुणाने परिसरात राहणाऱ्या तरुणीवर बलात्कार करून धमकावले आहे. तरुणीला आपल्या मोह जाळात अडकवून आपल्या सहकाऱ्याच्या घरात आणि इतर ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार केला आहे. त्यामुळे पीडित तरुणीने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात न्याय मिळण्यासाठी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीवर भा.द.वि. कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान पोलीस तपास अधिकारी एस एच बोचरे यांनी माहिती देताना सांगितले की आरोपीला अटक केली असून न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

-रोशन उबाळे

श्रेयवादाची लढाई : मनसे आमदारा नंतर भाजप आमदारावर शिवसेनेची टीका

कल्याण डोंबिवली शहरातील संबंधित विधानसभा क्षेत्रात एमएमआरडीए कडून ३६० कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन आलेला आहे. मात्र या निधीच्या श्रेयवादावरून शिवसेना, मनसे आणि आता भाजपा अश्या तिन्ही पक्षांत चांगलीच जुंपली असल्याचे दिसत आहे. यातून खासदार विरुद्ध आमदार असे एकप्रकारे संघर्ष चित्र पहायला मिळत आहे.

एमएमआरडीए कडून मंजूर झालेल्या ३६० कोटींच्या निधीमधील १२३ कोटी हे कल्याण पूर्वेतील रस्त्यांसाठी तर २७ कोटी हे मानपाडा भागा साठी मंजूर झाले आहेत. याचवरून मागील दोन दिवस कल्याण ग्रामीण मनसे आमदार राजू पाटील आणि शिवसेनेमध्ये जुंपली होती. राजू पाटील यांनी मानपाडा रस्त्याच्या निधीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यानंतर शिवसेनेने पत्रकार परिषद घेऊन श्रेय लाटू नका असे म्हटले होते. हा विषय संपतो ना संपतो तोच आता कल्याण पूर्व भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेनेत जुंपल्याचे समोर आले आहे. माझ्याच जुन्या कामांना नवीन नावे देऊन निधी मंजूर केल्याचे दाखवले आहे असा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी एका कार्यक्रमात केला होता. यावर बोलताना शिवसेना पदाधिकारी गोपाळ लांडगे यांनी सांगितले की, आमदारांनी काहीही कामे केली नाहीत. खासदार श्रीकांत शिंदे यांनी अथक प्रयत्न करून, अधिकाऱ्यां समवेत भेटी करून हा निधी मंजूर करून आणला आहे.

कल्याण डोंबिवली शहरातील प्रस्तावित रस्त्याला निधी नेमका कुणाच्या प्रयत्नाने मिळाला आहे ? यापेक्षा हे रस्ते लवकरात लवकर बनावे अशी अपेक्षा करदाते नागरिक करीत आहेत. लांबणीवर पडलेली क.डों.म.पा. निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने शहरातील सर्वच राजकीय पक्ष आपली ताकद दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करताना दिसत आहेत. महानगरपालिका क्षेत्राशी संबंधीत शिवसेना व भाजपचा प्रत्येकी एक खासदार आहे. तर भाजपचे दोन आणि शिवसेना मनसेचे प्रत्येकी एक एक आमदार या महानगरपालिका क्षेत्रात येतात. त्यामुळे सुरू झालेल्या राजकीय वातावरणावरून निवडणुकीचा आभास आतापासूनच निर्माण होऊ लागला की काय असे वाटू लागले आहे.

-संतोष दिवाडकर

आमदार गणपत गायकवाड यांची वचनपूर्ती; विधान सभा क्षेत्रातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात.

कल्याण पुर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोना काळात आपल्या मुलाच्या लग्नाचा अवास्तव खर्च टाळून त्या खर्चातून विधानसभा क्षेत्रातील नागरिकांसाठी लसीकरणाची मोहीम राबवली आहे. हि मोहीम तीन दिवसीय असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या लसीकरण मोहिमेला मिळत आहे.

कोरोना काळात सर्वत्र लसीकरण सुरु असतानाही कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य केंद्रावरील लसीकरणावर पुरेसा साठा होत नाही. तर दुसर्या बाजूस विविध खाजगी इस्पितळात आपल्या खिशातले सातशे ते आठशे रुपये खर्च करून लोकांचे लसीकरण होत आहे. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी कोरोना काळातील निर्बंधामुळे त्यांच्या मुलाचा अवास्तव खर्च टाळून स्व खर्चातील काही भाग म्हणून कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना मोफत लसीकरणाची सुविधा उपलब्ध करुण दिली. आणि याचप्रकारे आमदार गणपत गायकवाड यांनी वचनपूर्ती करुन सर्वसामन्य नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. सोमवारी या लसीकरणाचे उद्घाटन आमदार गणपत गायवाड यांनी केलं.

लसीकरण प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे कल्याण पूर्व मंडळचे अध्यक्ष संजय मोरे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, माजी नगरसेवक मनोज राय, यांच्यासह इतर भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. हि मोहीम 3 दिवसीय असून ही लस दिव्यांग व्यक्ती, पत्रकार, रिक्षा चालक, तृतीय पंथीय, नाभिक व्यवसायिक, विधवा महिला यांना देण्यात येणार आहे.या मोहिमेत नागरिकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. यानंतर मोहिमेत टप्पा टप्याने १००० असे नागरिकांचे लसीकरण राबिवण्यात येणार आहे व या पुढे देखील अश्या प्रकारे लसीकरण करण्यात येईल असे आश्वासन आमदार गणपत गायकवाड यांनी दिले.

-संतोष दिवाडकर

वालधुनी नदी स्वच्छता समितीच्या शिष्टमंडळाने घेतली सिटी पार्क प्रमुख आणि शहर अभियंत्याची भेट

वालधुनी नदी स्वच्छता समिती च्या शिष्टमंडळाने सिटी पार्क व वालधुनी नदी संबंधित चर्चा करण्यासाठी सिटी पार्क प्रमुख जुनेजा व  शहर अभियंता सपना कोळी यांची भेट घेतली व सिटी पार्क व वालधुनी नदी स्वच्छ करण्या विषयी चर्चा केली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी, कार्याध्यक्ष सुनील उतेकर, सचिव आर्किटेक्ट गणेश नाईक, खजिनदार विनोद शिरवाडकर, उपाध्यक्ष पंकज डोईफोडे, भरत गायकवाड, सतिश मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

१९९५ साली सिटी पार्क बॉटनिकल गार्डन मंजूर झाले. हा विषय सर्व तत्कालीन लोकप्रतिनिधी यांच्या संमतीने महासभेत मंजूर झाला. २०१७ साली यु पी एस मदान यांनी ज्या ठिकाणी सिटी पार्क बनवण्याचा निर्णय घेतला गेला त्या ठिकाणी  पाणी भरत असल्याकारणाने कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येणार नाही असे मत व्यक्त करत आपला विरोध दर्शविला.

२०१८ साली पुन्हा पाणी भरून पूर परिस्थिती निर्माण झाली म्हणून केडीएमसीतर्फे  सीडब्ल्यूबीआरएस या पुणे येथील संस्थेशी सीआरझेड संबंधित चर्चा करण्यात आली. त्यांनी परिस्थिती समजून घेऊन पाईपलाईन पर्यंत रोड लेव्हलच्या दोन ते अडीच मीटर खाली अशी रिटेनिंग वॉल बांधण्यात यावी जेणेकरून नदीचे पाणी आत शिरणार नाही व सिटी पार्क पाण्यात जाणार नाही यासाठी हे सुचवले असल्याचे वालधुनी नदी स्वच्छता समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन चर्चा केली असता  संबंधित अधिकाऱ्यांनी  सांगितले.

    वालधुनी नदिचा उगम स्त्रोत मलंगगड येथून अंबरनाथ, उल्हासनगर ,कल्याण पूर्व ,कल्याण पश्चिम येथून खाडीत असा प्रवास ही वालधुनी नदी करते. नदी स्वच्छतेचा विषय फक्त मर्यादित नसून तिच्या उगम स्त्रोता पासून ते खाडी पर्यंत संपूर्ण लांबी विचारात घेतली जाते. हा पाटबंधारे खात्याचा विषय असून अंबरनाथ नगरपरिषद, उल्हासनगर व मनपा या तीन महानगरपालिकांचा विषय असल्यामुळे अडचण निर्माण होते असल्याचे  शहर अभियंता व जल अभियंता सपना कोळी यांनी सांगितले. तसेच प्रत्यक्ष ठिकाणी येऊन पाहणी करण्याचे आश्वासन दिले.

      हा विषय सिटी पार्क कसे बनवावे एवढाच मर्यादित आहे. परंतु अतिशय महत्त्वाचा विषय असा की या सिटी पार्कच्या भरावामुळे नदीचे पात्र अरुंद झाले व रिटेनिंग वॉल मुळे पाणी अडवले जाऊन हे पाणी लगतच्या परिसरात पसरून पूर परिस्थिती निर्माण होते. कडोमनपाने बांधकामास परवानगी दिलेल्या बिल्डिंगी व दुकाने यांच्यामध्ये या वालधुनी नदीचे पाणी शिरते, लोकांचे लाखोचे नुकसान होते. जर तीन महानगरपालिकेचा विषय असल्यामुळे किंवा पाटबंधारे खात्याचा विषय असल्यामुळे अडचणी येत असतील तर यात नागरीकांचा काय दोष? पाठ बंधारे खाते व तिन्ही महानगरपालिकांनी मिळून निर्णय घेतला पाहिजे वालधुनी नदी स्वच्छ करण्यासाठी निधी कुठून उपलब्ध करून घ्यावा हा सुद्धा त्यांचाच प्रश्न आहे. फक्त जे लोक पालिका प्रशासनाच्या काही निर्णयामुळे कायमचे पूरग्रस्त ठरले आहेत शासन दरबारी त्यांचा विचार केला गेला पाहिजे अशी मागणी वालधुनी नदी स्वच्छता समितीच्या अध्यक्षा पुष्पा रत्नपारखी यांनी यावेळी केली.

-कुणाल म्हात्रे

जातनिहाय सर्वेक्षण रद्द करण्याची रेशनिंग कृती समितीची मागणी

अन्न सुरक्षा कायदा २०१३ अन्वये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची केंद्र शासनाच्या वतीने रेशन घेण्यासाठी फक्त एस.सी, एस.टी सर्वेक्षण करण्याचा आदेश काढला असून त्यानुसार शिधावाटप कार्यालयामार्फत व शिधावाटप दुकानांमध्ये जात सांगा व रेशन घ्या असा प्रकार आढळून आल्याने समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याबाबत रेशनिंग कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे यांनी शिधावाटप अधिकारी कल्याण यांना निवेदन देऊन जात निहाय सर्वेक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे.

रेशन दुकानांमध्ये धान्य घेण्यासाठी गेलेल्यांना जात विचारली जात असून अनुसूचित जाती जमाती मधील लाभार्थ्यांना या शासकीय आदेशाने त्यांच्यावर होणारा अन्याय असल्याचे राम बनसोडे यांनी निवेदनात म्हटले आहे. बहुतांशी एस.सी, एस.टी व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील समाज अन्नधान्याला मुकलेला असून तो आजही वंचित असताना तूंटपुंज्या समाजामधील लोकांचे सर्वेक्षण करून त्यांच्यावर अन्याय करणारा आहे.

 यामुळे समाजात जातनिहाय रोष व तेढ निर्माण होणार नाही व संविधानाने दिलेल्या अधिकाराची पायमल्ली होणार नाही याची शासनाने खबरदारी घ्यावी अशा स्वरूपाचे निवेदन कल्याणचे शिधावाटप अधिकारी यांना निवेदनात रेशनिंग कृती समितीचे संस्थापक अध्यक्ष राम बनसोडे यांनी केली आहे. यावेळी समितीचे जालंदर सूर्यवंशी, संजय काकडे, नीलिमा महाजन, सुलभा पांडे, गणेश ताटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे