भाऊ कदम आणि राणा दा ने ठोकला कल्याणमध्ये तळ; ‘गेम डाव स्टार्ट’ चित्रपटाचं शुटिंग झालं सुरू

मराठी सिनेसृष्टीत ‘गॅम डाव स्टार्ट’ हा नवा चित्रपट पुढील काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आता कल्याणमध्ये सुरुवात झाली आहे. या चित्रपटातुन कॉमेडी किंग भाऊ कदम आपल्याला खलनायक म्हणून दिसणार आहे. तर राणा दा म्हणजेच हार्दिक जोशी या चित्रपटाचा नायक आहे.

कल्याण मधील कशीश इंटरनेशनल हॉटेलमध्ये ‘गॅम डाव स्टार्ट’ या चित्रपटाचा मुहूर्त सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला होता. आता या चित्रपटाच्या चित्रीकरणाला याच हॉटेलमधून सुरुवात करण्यात आलेली आहे. ‘गॅम डाव स्टार्ट’ या नावानुसार हा चित्रपट म्हणजे जुगार आणि त्यातून निर्माण झालेली परिस्थिती यावर आधारित असणार आहे. बाकी यात कॉमेडी,एक्शन,ट्विस्ट अशा बऱ्याच गोष्टी असणार आहेत.

या चित्रपटात नायकाच्या भूमिकेत राना दा म्हणजेच हार्दिक जोशी असणार आहे. तर खलनायकाची भूमिका भाऊ कदम करीत आहेत. त्याचबरोबर कल्याण मधील काही नवोदित कलाकार देखील या चित्रपटात दिसणार आहेत. त्यातीलच नितीन रुपणवर हे देखील भाऊ कदम यांच्या समवेत सहखलनायक म्हणून भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या नायिकेबद्दल अजूनही सस्पेन्स ठेवण्यात आलेला आहे. नायिका कोण आहे ? हे अद्याप कुणालाही माहीत नाही. मात्र ही नायिका दाक्षिणात्य असेल अशी एक चर्चा सुरू आहे.

कल्याण मधील प्रसिद्ध कॉमेडी आर्टिस्ट, गायक बजरंग बादशाह यांच्या कथेवर आधारित हा चित्रपट असणार आहे. नाथ प्रोडक्शनच्या माध्यमातून हा चित्रपट बनवला जात आहे. वैशाली ठाकूर, सुजाता पवार, बजरंग बादशाह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित कोळी यांच्या नजरेतून होत आहे. चित्रपटाची संकल्पना महेश गायकवाड यांची आहे तर संजय गायकवाड यांचे देखील योगदान चित्रपटाला लाभले आहे. कल्याण शहरातील कशीष हॉटेल मधून चित्रीकरण सुरू झाले असून पुढील काही दिवस कल्याण शहरातील काही भागात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असणार आहे. व त्यामुळे भाऊ कदम आणि राणा दा कल्याणमध्ये तळ ठोकून असणार आहेत.

चित्रपटाचे शुटिंग तसेच भाऊ आणि राणाची मुलाखत पहा खालील लिंकवर :-

-संतोष दिवाडकर

अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोडचे चुकीचे अलाईन्मेंट ? तर मग १०० कुटुंब होतील बेघर

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे सुमारे १०० कुटुंब बेघर होण्याच्या उंबरठ्यावर असून कल्याण पूर्वेतील १०० फुटी रोडचे चुकीचे अलाईन्मेंट बनविल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. याबाबत येथील नागरिकांनी आयुक्तांना निवेदन देत रहिवाशांना न्याय देण्याची मागणी केली आहे.

डिसेंबर २०२० पासून मलंगगड रोड ते उल्हासनगरकडे जाणारा १०० फुट रोडचे चिंचपाडा हद्दीत रस्ता बनविण्यास सुरवात केली असून, हा रस्ता चुकीच्या रोड अलाईन्मेंट प्रमाणे बनविण्यास घेतल्याचे येथील नागरीकांच्या लक्षात आल्यानंतर नागरिकांनी त्याबाबत  पालिकेकडे वेळोवेळी लेखी पत्रव्यवहार केला. त्याचप्रमाणे दोन वेळा आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेवून या रस्त्याचे काम चुकीचे होत असल्याची माहिती त्यांना दिली.

 त्या अनुशंगाने आयुक्तांनी कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांना सुचना देवून प्रशांत भुजबळ यांना प्रत्यक्ष जागेवर जावून दोन्ही इमारती मधील मोकळया जागी असलेल्या २८ मीटर मध्ये पूर्णपणे रस्ता बनविण्याची सुचना केली. त्यावेळी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे देखील हजर होते. मात्र आयुक्तांनी केलेल्या सूचनाचे पालन व अंमलबजावणी न करता उलट मनमानी पद्धतीने चूकीचे काम करून १०० कुटूंबाना बेघर करण्याचा प्रयल होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकरणात आयुक्तांनी  लक्ष घालून करधारक नागरीकांना न्याय देण्याची मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली असून याबाबत फ्रेंड्स कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांनी पालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

-कुणाल म्हात्रे

सार्वजनिक शौचालयाची नियमित पाहणी करण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात लोकसंख्येची जास्त घनता चाळ परिसर व झोपडपट्टी परिसरात आहे. या परिसरात राहणारे नागरिक प्रामुख्याने सार्वजनिक शौचालयाचा वापर करतात आणि या सार्वजनिक शौचालयांमार्फत कुठल्याही संसर्गजन्य आजाराचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरीता चाळ/झोपडपट्टी परिसरातील नागरिकांचे शारीरिक स्वास्थ्य/आरोग्य सुरक्षित राहावे आणि त्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सार्वजनिक शौचालयाच्या स्वच्छतेवर भर दिला असून महापालिकेच्या सर्व विभागिय उपायुक्तांना सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची नियमित पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

महापालिकेच्या 10 प्रभागात एकुण 419 शौचालयात4292 सिटची सार्वजनिक शौचालय नागरिकांसाठी उपलब्ध आहेत. दलितवस्ती सुधारणे अंतर्गत अजून 38 शौचालय(एकुण 249 सिट) उभारण्याचे काम सुरु असून त्यापैकी 28 शौचालयांची कामे पूर्ण झाली असून उर्वरित 10 शौचालयांची कामे प्रगतीपथावर आहेत. सार्वजनिक शौचालयाच्या दैनंदिन साफसफाईसाठी मे. जनसेवा सुविधा संस्था यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यामार्फत साफसफाई केली जाते.

सदर संस्थेने प्रभागनिहाय शौचालयांची माहिती घेऊन शौचालयांच्या सदयस्थितीबाबतचा अहवाल महापालिकेकडे सादर केला आहे. त्‍या अनुषंगाने नादुरुस्त शौचालयांच्या दुरुस्ती संदर्भातील निविदा काढण्यात आली असून सदर निविदा कार्यवाहीत आहे. महापालिका परिसरात पे ॲण्ड युज ची एकुण 26 शौचालये(एकुण 235 सिट) असून सदर शौचालयांच्या साफसफाईसाठी नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत तेथील दैनंदिन साफसफाई करण्यात येते.

विभागीय उपआयुक्तांनी केलेल्या शौचालयांच्या पाहणीच्या वेळेस आढळून आलेल्या अस्वच्छ शौचालयांची साफसफाई प्रभागातील आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक यांच्या देखरेखीखाली करुन घेण्यात येत आहे.

-कुणाल म्हात्रे

उंबर्डे घनकचरा प्रकल्प बंद न झाल्यास तीव्र आंदोलनाचा भाजपाचा इशारा

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील घनकचरा प्रक्रिया केंद्र त्वरित बंद न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबत भाजपा जिल्हा सरचिटणीस चिंतामण लोखंडे यांनी केडीएमसीचे उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापक  रामदास कोकरे यांची भेट घेत निवेदन दिले आहे.

      आधारवाडी डम्पिंग ग्राउंड महापालिकेने बंद केल्यानंतर याठिकाणी टाकण्यात येणारा कचरा हा उंबर्डे येथील घनकचरा प्रकिया केंद्रावर टाकण्यात येत होता. याठिकाणी प्रमाणापेक्षा जास्त कचरा टाकण्यात येत असल्याने याठिकाणी मोठ्या प्रमाणात दुर्गंधी आणि माशांचे प्रमाण वाढले होते. या त्रासाला कंटाळून येथील ग्रामस्थांनी चिंतामण लोखंडे यांच्या नेत्तृत्वाखाली या घनकचरा प्रकल्पाबाहेर कचरागाड्या रोखून धरत आंदोलन केले होते.

उंबर्डे येथील ‘ब’ आणि ‘क’ प्रभाग क्षेत्र वगळता इतर अनेक ठिकाणाचा कचरा येत असून तो त्वरित बंद करावा. येथे खूप मोठया प्रमाणात कचरा डम्प करत असून रोगराईची समस्या निर्माण झाली आहे. महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या उंबर्डे गाव येथे मोठया प्रमाणाने दुर्गधीची मोठी समस्या झाली असून याकडे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे. त्यामुळे मोठया प्रमाणात आरोग्याला धोका निर्माण झाला असून सदर परिसरातील लहान मुले तसेच वरिष्ठ लोकांना व नागरिकांना कचऱ्याचा दुर्गधीचा, मच्छरांचा व माशांचा मोठया प्रमाणात त्रास होत आहे.

कल्याणात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असून उंबर्डे गावच्या लोकांना अशा त्रासाला सामोरे जावे लागत असून लोक मोठया प्रमाणात आजारी पडत आहेत. याबाबत भाजपा जिल्हा सरचिटणीस चिंतामण लोखंडे यांच्या शिष्टमंडळाने घनकचरा विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेत हा घनकचरा प्रकल्प त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे. येत्या चार दिवसात याची अमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यावेळी अनिल भंडारी, नरेश पाटील,  नवनाथ म्हात्रे, अनिल म्हात्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान पालिका उपायुक्त रामदास कोकरे यांना विचारले असता, उंबर्डे घनकचरा प्रकल्पाची क्षमता ३५० मेट्रिक टन असून या ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण कमी केले आहे. सध्या याठिकाणी २५० मेट्रिक टनच्या आसपास कचरा टाकला जात आहे. डोंबिवली आणि टिटवाळा येथील कचरा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर भविष्यात या प्रकल्पावर टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे प्रमाण आणखी कमी होणार असल्याची प्रतिक्रिया कोकरे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

धक्कादायक ! प्रेम प्रकरणात अडथळा ठरणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या आईची गळा दाबून हत्या

अल्पवयीन मुलीच्या प्रेमात पडलेल्या प्रियकराने लग्नास विरोध दर्शविणाऱ्या मुलीच्या आईचा   गळा दाबून जीवे ठार मारून तिचा मृतदेह गुरवली येथील जंगलात टाकून देणाऱ्या प्रियकरास टिटवाळा पोलिसांनी अटक केली आहे.

टिटवाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असणाऱ्या व बल्याणी येथे सोनी देवराज शेरवे (३९) आपल्या अल्पवयीन मुलीसोबत राहात होत्या. केडीएमसीच्या वडवली कार्यालयात हंगामी सफाई कर्मचारी म्हणून सोनी या काम करत होत्या. अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसाच्या दिवशी गुरवली येथे राहत असणारा समीर बबन दळवी (२४) हा शुभेच्छा देण्यासाठी आल्याने मुलीच्या आईने या प्रेम संबंधाला विरोध दर्शविला होता. प्रेमसंबंधाला व लग्नाला विरोध केल्याने समीर व मुलीच्या आईची बाचाबाची झाली होती. राग अनावर झाल्याने मुलीच्या आईचा गळा दाबून तिचा मृतदेह गुरवली जंगलातील झाडाझुडपात समीरने टाकला होता.

सडलेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने टिटवाळा पोलिसांनी ११ जुलै रोजी आकस्मिक गुन्ह्याची नोंद करून शवविच्छेदनासाठी मृतदेह गोवेली ग्रामीण रुग्णालयात नेला असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेचा गळा दाबून खून झाल्याची माहिती पोलिसांना दिली. शवविच्छेदनाच्या अहवालाने पोलीसही चक्रावले यासंदर्भात अल्पवयीन मुलीची कसून चौकशी केली असता आपला प्रियकर समीर बबन दळवी याला माझ्या आईने तुझी माझ्या मुली सोबत लग्न करण्याची लायकी नाही असे बोलल्याने वाद निर्माण झाल्याची माहिती पोलिसांना दिली.

टिटवाळा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी तपासाची चक्रे फिरवीत गुरवली येथे राहात असलेल्या मुलीचा प्रियकर समीर बबन दळवी याला चौकशी साठी ताब्यात घेताच आपण गळा आवळून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी आज न्यायालयात त्याला हजर केले असता १७ जुलैपर्यंत त्याला पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक विजय सुर्वे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्वेत बेवारस वाहनांवर पालिकेची जप्तीची कारवाई

कल्याण पूर्वेत रस्तावर उभ्या असणाऱ्या बेवारस, भंगार वाहनांवर जप्तीच्या कारवाईचा बडगा “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने उगारत १० बेवारस, भंगार वाहने जप्त केली आहेत.

 महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि लोकांना प्रवास करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार “ड” प्रभाग क्षेत्रातील  बेवारस, भंगार वाहने उचलण्याची कारवाई “ड” प्रभागक्षेत्र अधिकारी सुधिर मोकल यांनी केली.

या कारवाईमध्ये “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांनी महापालिका अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी व महापालिका पोलीस यांच्या मदतीने २ चारचाकी, १ तीन चाकी व ७ दुचाकी अशी एकुण १० बेवारस, भंगार वाहने उचलून खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली. तसेच ६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन १७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

-कुणाल म्हात्रे

नाटकांच्या प्रयोगांना परवानगी देण्याची नाट्यकलावंताची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवहार ठप्प असून यामुळे अनेक उद्योग धंद्यांना याचा फटका बसला आहे. लॉकडाऊनमुळे नाट्यगृह देखील बंद असल्याने नाटकामध्ये काम करणारे कलावंत आणि इतर कलाकार यांच्यावर काम नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नाटकांच्या प्रयोगांना परवानगी देण्याची मागणी कलावंतानी मुख्यमंत्र्यांकडे केली असून ५० लोकांसाठी छोटे प्रयोग राबविण्याची संकल्पना देखील त्यांनी मांडली आहे. या कलावंतांमध्ये अभिजित झुंजारराव (कल्याण), अतुल पेठे (पुणे),  शंभू पाटील (जळगाव), वामन पंडित (कणकवली), दत्ता पाटील (नाशिक),  अनिल कोष्टी (भुसावळ) आणि इतर अनेक गावांतील रंगकर्मी यांचा समावेश आहे.

सारे जग गेले दीड वर्ष अतिशय संकटातून जात आहे. विविध क्षेत्रांसमोर जीवघेणे प्रश्न कोविडने उभे केले आहेत. कोविडची स्थिती नक्की आणि पक्की कोणालाच वर्तवता येत नसल्याने सरकार आपल्या परीने जबाबदार पावले टाकत आहे. शिक्षण या अतिशय महत्वाच्या गोष्टीला अजून कुलूप आहे. हे सर्व सुरळीत सुरू झाल्यावर मग करमणूक या नावाखाली जे काही क्षेत्र येते ते सुरू होणार याबाबत कलावंत  सहमत आहेत. आधीपेक्षा आता परीस्थितीमध्ये थोडीफार सुधारणा होत असून लसीकरण त्यात मोलाची भर घालत आहे.

कोविडच्या संकटाने आर्थिक प्रश्न जसे निर्माण केले तसे मानसिक प्रश्न गंभीर केलेले आहेत. त्याकरता समुपदेशन आणि मार्गदर्शन काही डॉक्टर्स करत आहेत. आपल्यावरील हे असह्य ताण दूर होण्याचा एक मार्ग नाटक ही जिवंत कला पाहाणे हाही आहे. पहिली लाट ओसरल्यावर मराठी रंगभूमीवर काही लोकांनी सर्व काळजी घेऊन नाट्यप्रयोग केले. प्रायोगिक रंगभूमीवर केवळ २५/३० लोकांसमोर काही कलावंतानी अतिशय सुरक्षित आणि यशस्वीरीत्या प्रयोग केले. सभा, समारंभ, मंडई, हॉटेल अशा जागांपेक्षा ‘थिएटर’ ही अधिक सुरक्षित जागा आहे. याचा कलावंतानी अनुभव घेतला आहे.

त्यामुळे निदान ५० लोकांकरता छोट्या स्वरूपातील प्रयोग करायला सरकारने परवानगी देण्यात यावी जेणे करून यामुळे समाजात मनस्वास्थ्य टिकायला मदत होईल अशी मागणी नाटक कलावंतांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. करोनाविरुद्धच्या या संकटात कलावंतांची साथ होतीच आणि पुढेही असेल अशी हमी देखील या कलावंतानी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमधील आकाशपरी संजल गावंडेची अमेरिकेतील न्यू शेपर्ड यानासाठी निवड

कल्याण पूर्व कोळसेवाडीतील संजल अशोक गावंडे या तरुणीची अमेरिकेतून लाँच होणाऱ्या यानातील टीममध्ये निवड झाली आहे.  संजल गावंडे हिने कोळसेवाडी, कल्याण-पूर्व ते सातासमुद्रापलिकडे अमेरिकेत मिशिगन, शिकागो, कॕलिफोर्निया आणि आता सियाटेल असा प्रवास करणारी ही तरुणी आकाशपरी नावाने ओळखू लागली आहे.

अमेरिकेत सियाटेल येथील ब्ल्यु ओरिजीन जी एक एरो स्पेस नामंकित कंपनी म्हणून ओळखली जाते. या कंपनीतर्फे २० जुलै २०२१ ला न्यू शेपर्ड हे यान लाँच होत आहे. या मिशनसाठीच्या टीम मध्ये संजलची निवड झाली आहे. लहानपणापासून तिचे जे स्वप्न होते गगनाला गवसणी घालण्याचे, जे ध्येय होते, ते स्वप्न ते ध्येय आता खऱ्या अर्थाने पूर्ण होत असल्याची भावना तिच्या आईने व्यक्त केली आहे.

           कल्याण मध्ये जन्मलेली संजल कोळसेवाडीतील माॕडेल इंग्लिश हायस्कूल मध्ये दहावी पर्यत शिकली. त्या नंतर तिचे बारावी पर्यंतचे शिक्षण बिर्ला कॉलेज तर १२ वी नंतर वाशी येथील फादर अॕग्नेल काॕलेज येथे शिक्षण घेत २०११ ला संजलने मुंबई युनिव्हरसिटी मधून प्रथम श्रेणीत पास होवून मॕकेनिकल इंजिनियरची पदवी प्राप्त केली. हा अभ्यासक्रम पार पाडतानाच तिने जीआरई, टोफेलसारख्या कठीण परिक्षा दिल्या त्यातही ती चांगल्या मार्काने उत्तीर्ण झाली. या सर्व परिक्षांच्या गुणांवर तिने अमेरिकेतील मिशिगन टेक युनिव्हरसिटी येथे एमएस साठी अर्ज केला.

         मिशिगन टेक युनिव्हरसिटी येथे संजलचे पुढील शिक्षण सुरू झाले. २०१३ ला प्रथम श्रेणीत पास होवून संजलने मॕकेनिकल मध्ये मास्टर आॕफ सायन्सचा पदवी प्राप्त केली. २०१३ ला संजलला विस्काॕनसिन मधील फॉन्ड्युलेक येथीलमर्क्युरी मरीन या नामंकित कंपनीत जाॕब लागला. तिच्या मनासारखा तिला जॉब मिळाला पंरतु तिचे लक्ष मात्र अवकाशाकडे होते तेव्हा ती जमिनीवर शांत बसणारी मुलगी नव्हती. जॉब करता-करता शनिवार-रविवार सुट्टी मध्ये आराम न करता तिने विमान चालवण्याचे प्रशिक्षण चालू केले. विमान शिकण्यासाठी तिला तिचा मॕकेनिकल अभ्यासक्रम कामी आला. अखेर तिची मेहनत कामी आली. १८ जून २०१६ ला तिला वैमानिक म्हणून लायसन मिळाले आणि ती विमानाने उंच भरारी मारु लागली.

तिचे कॕलिफोर्नियाला जाण्याचे स्वप्न होते. तशी संधी ही चालून आली. कॕलिफोर्निया मधील आँरेज सिटी येथील टोयोटा रेसिंग डेव्हलपमेंट या नामंकित कंपनीतून तिला कॉल आला. याठिकाणी मॕकेनिकल डिझाईन इंजिनियर म्हणून कामाला सुरूवात झाली. रेसिंगच्या गाड्यांचे इंजिन ती डिझाईन करत होती. अत्यंत कठोर मेहनतीने अखेर संजलला २०१८ ला कमर्शिअल पायलट चे लायसन्स मिळाले. इतकेच नव्हे तर नायंटी नायंटी इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ वूमन्स पायलट या संस्थेची ती चेअरमन झाली.

       सॉफ्टवेअर हार्डवेअर कौशल्यामध्ये पारंगत असलेल्या संजलला ब्ल्यू ओरिजिन या कंपनीने न्यू शेपर्ड या मिशनसाठी तिला सिलेक्ट केले असून २० जुलै २०२१ या दिवशी लाँच होत असलेल्या न्यू शेपर्ड या यानातील टीममध्ये निवड झाल्याने संजलचे तिचे लहानपणापासूनचे जे स्वप्न होते ते खऱ्या अर्थाने पूर्ण झाले असल्याची प्रतिक्रिया तिची आई सुरेखा गावंडे यांनी दिली आहे. कल्याणच्या या आकाशपरीला २० जुलैच्या गगणभरारीसाठी MH मराठी कडून खूप साऱ्या शुभेच्छा.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीच्या रिक्षा चालकांना लसीकरणासाठी नाव नोंदवण्याचे आवाहन

रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन व आरोग्य विभाग कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने रिक्षा चालकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार असून यासाठी संघटनेच्या कार्यालयात नाव नोंदविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

रिक्षाचालक राञं दिवस शहरात व इतर ठिकाणी प्रवासी वाहतुक सेवा बजावत असतात अनेक प्रकारे विविध प्रवाशी नागंरीकाशी नित्य रोज संर्पक येतो. कोरोना काळात खबरदारी सुरक्षितता याकरीता प्राधन्याने रिक्षा चालकांचे लसिकरण करावे अशी मागणी संघटनेच्या वतीने केडीएमसी आयुक्त डाँ. विजय सुर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली होती. याबाबत रिक्षा चालकांच्या लसीकरणासाठी महापालिकेने सकारात्मकता दर्शवली आहे. संघटनेच्या वतीने प्रणव पेणकर, संतोष नवले, जितेंद्र पवार, हेमंत सांगळे आदींनी यावेळी आरोग्य आधिकारी डाँ. अश्विनी पाटील यांची भेट घेत लसीकरणाच्या नियोजनाबाबत चर्चा केली.

ज्या रिक्षा चालकांचे लसिकरण बाकी असेल व ज्यांचे आधारकार्ड पत्ता नोदं कल्याण शहराचा असेल त्यांनीच फक्त संघटनेच्या जनसंर्पक कार्यालय व विभागवार नियुक्त पदाधिकारी यांच्याकडे नावं  नोंदविण्याचे आवाहन संघटनेने केले असून लसिकरणाचे ठिकाण, वेळ, तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

-कुणाल म्हात्रे

मावळ : वाघेश्वर शिवमंदिर परिसरातील धरणात बुडून युवकाचा मृत्यू

मावळ तालुक्यातील वाघेश्वर येथील प्राचीन शिवमंदिर प्रसिद्धीच्या झोतात आल्या नंतर येथे पर्यटकांची सध्या मोठी रीघ लागली आहे. मात्र त्याचबरोबर या मंदिरात भेट देण्यासाठी आलेल्या एका युवकाचा परिसरातील धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात वाघेश्वर येथे एक प्राचीन शिवमंदिर आहे. स्थानिक तरुणांनी समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल केल्याने आता बाहेरील लोक देखील मंदिराला भेट देण्यासाठी गर्दी करीत आहेत. यासंबंधीत लेख MH मराठीने मागील महिन्यात प्रसिद्ध केला होता. शनिवार,रविवार आणि सोमवार हे तीन दिवस या मंदिरात प्रचंड गर्दी होत असते. मुळातच हे मंदिर पवना धरण क्षेत्रात असल्याने वर्षातून निम्मा काळ हे मंदिर पाण्याखाली असते. आणि जवळच असलेल्या पवना धरणाच्या जलाशयात बुडून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची पहिली घटना समोर आली आहे.

रविवारी पुण्यातील खडकी येथील राहणारा शुभम दुधाळ हा २१ वर्षीय तरुण आपल्या सहा मित्रांसोबत या मंदिराला भेट देण्यासाठी आला होता. मंदिर पाहून त्याने दर्शन केले आणि या मित्रांनी आपल्या मोबाईलमध्ये काही फोटो देखील घेतले. मात्र मंदिरा जवळ असलेल्या पवना धरणाच्या विहंगम दृश्याने त्यांना मोहित केले. आणि येथूनच पाण्यात पोहण्याची इच्छा झाली. दुपारच्या सुमारास शुभम पाण्यात उतरला. मंदिरा जवळील धरण क्षेत्रात ओढ्यातून वाहून आलेला गाळ अधिक प्रमाणात असतो हे स्थानिकांना माहीत आहे. शिवाय येथील पाण्याचा अंदाज न आल्याने शुभम पाण्यात बुडाला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंदिरा समोरून वाहणाऱ्या ओढ्याच्या पलीकडल्या बाजूस साधारणपणे एक किमी पासून दूरवर असलेल्या भागात ही घटना घडली असल्याची माहिती स्थानिक व्यापाऱ्याकडून देण्यात आली.

तरुण पाण्यात बुडाल्याची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याचप्रमाणे पोलिसांना पाचारण करण्यात आले. स्थानिक तरुणांनी बोटीच्या सहाय्याने पाण्यात उतरून शोध घेत मृतदेह शोधून काढला. घटनेचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत. दर्शनासाठी आलेल्या एखाद्या युवकाचा बुडून मृत्यू होण्याची ही पहिली घटना आहे. मात्र असे असले तरी भविष्यात आणखी घटना घडतील याची शक्यता नाकारता येत नाही.

पर्यटनाला गेल्या नंतर निष्काळजीपणामुळे जीव गेल्याच्या अनेक घटना अनेक ठिकाणी घडत असतात. मग पाण्यात बुडुन मृत्यू असो की पाय घसरून खोल दरीत झालेला अपघात. या घटना वारंवार घडत असतात तरीही पर्यटक जीव धोक्यात घालणे काही कमी करीत नाहीत. वाघेश्वर शीव मंदिराला भेट दिल्यानंतर पवनेचा जलाशय जवळपासच असल्याने पाण्यात उतरण्याचा मोह जीवावर बेतू नये यासाठी पुढील वर्षी (मंदिर पाण्यातून बाहेर पडल्यानंतर) स्थानिकांच्या मदतीने ठोस उपाययोजना राबवणे प्रशासनाला जास्त गरजेचे असणार आहे हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

-संतोष दिवाडकर