कल्याणच्या लोकवस्तीत आढळले अजगर आणि घुबड

नैसर्गिक अधिवासात घुसखोरी केलेल्या काँक्रीटच्या जंगलांमुळे वन्य जीवांची घालमेल होऊ लागली आहे. पशु आणि पक्षांचा अशा काँक्रीटच्या जंगलात स्वैरसंचार होऊ लागला असून अशाच भरकटलेल्या अजगरासह कावळ्यांच्या तडाख्यातून एका शृंगी घुबडाची प्राणी-सर्पमित्रांनी सुखरूप सुटका करण्यात यश मिळविले आहे.

 रविवारी दुपारच्या सुमारास कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या भाल गावातल्या गावदेवी मंदिराजवळ तेथिल तरूण ओमकार घुले याला साप आढळून आला. ओमकार याने मदतीसाठी कळविल्यानंतर मुंबई पोलिस दल व मुंबई हायकोर्ट येथे मानद पशु कल्याण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले पोलिस शिपाई मुरलीधर जाधव हे त्यांचे सहकारी सर्पमित्र कुलदीप चिखलकर यांच्यासह भाल गावात गेले. सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरलीधर जाधव आणि कुलदीप चिखलकर यांनी तेथे असलेल्या दोन फूट लांबीच्या अजगराला पकडण्यात आले. इंडियन रॉक पायथोन जातीच्या या अजगराला पुढील कार्यवाहीसाठी कल्याण वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या अजगराला निसर्गाच्या सान्निध्यात सोडून दिले.

तर माणेरे गाव रोडला असलेल्या साईकृपा नगरात एका घुबडाच्या मागे कावळ्यांचा थवा लागला होता. हा प्रकार पाहून निसर्गप्रेमी निखिल गवई या तरुणाने कावळ्यांच्या तडाख्यातून या घुबडाला वाचविले. त्या निमित्ताने परिसरातील रहिवाश्यांना प्रथमच सर्वात मोठे घुबड पहायला मिळाले. डोळ्यावर असलेल्या शिंगासारख्या पिसांमुळे शृंगी घुबड म्हणतात. हे घुबड दिवसा किंवा रात्री कधीही उडू शकते. त्यामुळे इंग्रजी भाषेत त्याला ईगल आऊल असेही म्हणतात. याच्या आहारात उंदीर, साप, छोटे प्राणी यांचा समावेश असतो. या घुबडाला सर्पमित्र दत्ता बोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर वन विभागाने त्याची निसर्गाच्या सान्निध्यात मुक्तता केली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण ग्रामीणमधील भाजपा कार्यकर्त्यांचा पक्षाला रामराम ; शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संयमी नेतृत्वाने प्रभावित होऊन तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाप्रमुख वसंत लोणे यांच्या नेतृत्वाखाली कोसले गावचे भाजपा कार्यकर्ते व पळसोली सेवा सोसायटीचे उप चेअरमान लक्ष्मण भोईर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यां सह शिवसेनेत प्रवेश केला.

 यावेळी लता लक्ष्मण भोईर यांची पळसोली महिला उपविभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. या प्रवेश प्रसंगी भिवंडी ग्रामीण आमदार शांताराम मोरे, भिवंडी तालुकाप्रमुख विश्वास थळे, ठाणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती कुंदन पाटील, भिवंडी पंचायत समिती माजी उपसभापती प्रकाश भोईर, विष्णु चंदे, तालुका कार्यकारिणी सदस्य तुकाराम कडव, युवासेना जिल्हा सचिव अल्पेश भोईर, संपर्क प्रमुख कल्याण ग्रामीण रमेश बांगर,  तालुका सहकार अध्यक्ष अनिल चौधरी, युवासेना समन्वयक संतोष सुरोशी, तालुका सचिव नामदेव बुटरे तसेच  विभागातील  शिवसैनिक व युवासेना पदाधिकारी  युवा सेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 तालुकाप्रमुख वसंत लोणे यांनी आपल्या मनोगतातून सर्व शिवसैनिक पदाधिकारी यांनी एकमताने काम करावे याबाबत सूचना केल्या तसेच येत्या काही दिवसांत कल्याण ग्रामीण ची नवीन कार्यकारिणी निर्माण करण्याबाबत माहिती दिली. जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील यांनी आपल्या मनोगतातून कार्यकर्त्यांना सहकार्याच्या भावनेतून काम करावे असे सूचित केले.

-कुणाल म्हात्रे

‘अंघोळीची गोळी’ संस्थेने काढले वडाभोवती गुंडाळलेले धागे

नुकतीच वटपौर्णिमा साजरी झाली असून वटपौर्णिमेला वडाच्या झाडाला धागेदोरे बांधण्यात येतात तसेच इतर साहित्य देखील ठेवण्यात येते.  यामुळे वडाच्या झाडांचा परिसर स्वच्छ करण्यासाठी ‘अंघोळीची गोळी’ संस्था पुढे सरसावली असून त्यांनी वडाची झाडे धागेदोरे मुक्त करत वडाच्या झाडांचा परिसर स्वच्छ केला आहे.  

अंघोळीची गोळी संस्थेच्या वतीने नुकतेच कल्याण पश्चिम परिसरात असलेल्या वडाच्या झाडांच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आला तसेच वडाच्या झाडांना धागेदोरे मुक्त करण्यात आले. भारतीय वैज्ञानिक डॉ. जगदीशचंद्र बोस यांनी आपल्या संशोधनात झाडांना देखील संवेदना असतात हे स्पष्ट करून दाखवले आहे. त्यामुळे नागरिकांची कळत नकळत होणारी कृती झाडांना हानीकारक ठरत असल्याचे संस्थेचे कार्यकर्ते स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.

आपल्या परिसरातील वडाचे प्रत्येक वृक्ष कसे सुरक्षित राहील यांची खबरदारी घेण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असेही ते म्हणाले. पुजेसाठी वडाच्या फांद्या अनधिकृतपणे तोडणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई  व्हावी तसेच वडाच्या झाडांना कचरा टाकण्याचे ठिकाण बनवले जावु नये यांसाठी आमचा प्रयत्न चालु असल्याचे अविनाश पाटील यांनी यावेळी सांगितले. गेल्या पाच वर्षात भारतातील सव्वा लाख हेक्टर जंगल नष्ट झाले आहे, त्यातंच वडाचे महत्व सजीवसृष्टीसाठी अत्यंत महत्वाचे आहे.

वडाच्या झाडाच्या संरक्षणासाठी वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक वडाच्या झाडावर करडी नजर ठेवावी जेणेकरून कोणत्याही प्रकारची हानी झाडांना होणार नाही यांसाठी संबंधित विभागाने पोलीस विभागाची मदत घ्यावी त्याचबरोबर शक्य असल्यास महानगरपालिकेच्या माध्यमाने पुजेसाठी महिलांना मोफत वडाच्या रोपट्यांचे वाटप देखील संबंधित विभागाला करता येवु शकते ही अभिनव संकल्पना देखील संस्थेने सुचवली आहे. यावेळी दत्ता बोंबे, भुषण राजेशिर्के, अक्षदा वाऊळ, धनश्री वाळंज उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत सोमवारपासून नवे नियम ; आठवड्याभरानंतर पुन्हा आवळला निर्बंधांचा फास

कोवीडच्या नव्या डेल्टा प्लस विषाणूचा धोका पाहता राज्य शासनाने सोमवारपासून नविन निर्बंध लागू केले आहेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांचा आता लेव्हल 3 मध्ये समावेश करण्यात आला असून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही त्यानुसार निर्बंध लागू होत आहेत. केडीएमसीचा या आठवड्यात लेव्हल 2 मध्ये समावेश झाल्याने निर्बंध बऱ्यापैकी शिथिल झाले होते.  मात्र राज्य शासनाच्या नव्या निर्णयामुळे केडीएमसीलाही लेव्हल 3 मध्ये समाविष्ट करण्यात आले असून प्रशासनाने यासंदर्भातील नविन आदेश नुकतेच जारी केले आहेत.  

या नव्या निर्बंधांनुसार अत्यावश्यक वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत खुली राहतील. हॉटेल आणि रेस्टॉरंटही दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. त्यानंतर पार्सल किंवा टेक अवे पद्धतीने सुरू ठेवता येतील. मॉल आणि मल्टिप्लेक्स  यांना मात्र कोणत्याही प्रकारे सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आलेली नाहीये. 

कल्याण डोंबिवलीत सर्व व्यवहार सायंकाळी वाजेपर्यंतच सुरू राहतील तर दुकाने सायं 4 वाजेपर्यंतच सुरू ठेवता येतील.त्यामुळे संध्याकाळी 5 नंतर बाहेर फिरण्यावर बंधने आली असून बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.मॉल, चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद असतील.उपहारगृहे पूर्वीप्रमाणे मात्र क्षमतेच्या 50 टक्के सायंकाली 4 वाजेपर्यंतच खुली ठेवता येतील.सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सकाळी फिरता येईल. मैदाने खुली राहतील, सायकलिंग करता येईल. 

खाजगी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली ठेवता येतील. सरकारी कार्यालयंही 50 टक्के क्षमतेसह 4 वाजेपर्यंत खुली राहतील. लग्न समारंभ आयोजित करताना हॉलच्या क्षमतेनुसार 50 टक्के क्षमता वापरता येईल. असे 4 जून रोजी काढलेले स्तर 3 चे निर्बंध सर्वत्र लागू राहणार आहेत.  सोमवार 28 जून ते 5 जुलैपर्यंत त्यांची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कल्याण शाखेच्यावतीने वृक्षारोपण

वटसावित्री पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर आणि छ. शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, कल्याण शाखेतर्फे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण कार्यक्रम शनिवारी कल्याण पूर्वेकडील, पत्री-पूलाजवळील नेतवली टेकडीवरील मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आला.

संघटनेचे कार्यकर्ते हनुमंत देडगे यांच्या निवासस्थानी छ. शाहू महाराजांना अभिवादन करून नेतिवली टेकडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी  पळस, महोगनी, जांभूळ, सीताफळ, साग, बांबू, पळस, बकुळ आदी प्रकारची ३० रोपे लावण्यात आली.

महा. अंनिस द्वारा आयोजित या वृक्षारोपणास ‘समता संघर्ष’ संघटनेचे प्रमुख शैलेश दोंदे, ‘पुरोगामी विचार मंच’चे महाराष्ट्र राज्य प्रमुख बंडू घोडे, व्यावसायिक जगदीश ठाकूर, ‘अंघोळीची गोळी’ मोहिमेचे  तसेच महा अंनिसचे कार्यकर्ते अविनाश पाटील, महा. अंनिस कल्याण, डोंबिवली शाखेचे पदाधिकारी, जिल्हा राज्य पदाधिकारी आणि अनेक जुने-नवे कार्यकर्ते तसेच स्थानिक तरुण मुले आणि समाजसेवक हजर होते. सर्वांनी या वृक्षारोपण कार्यक्रमात उत्साहाने भाग घेतला.

वृक्षारोपणासाठी जागा निवडणे, खड्डे खोदणे, कार्यकर्त्यांना अल्पोपहार यासाठी हनुमंत देडगे यांनी, नियोजनासाठी शरद लोखंडे, दत्ता बोंबे, तानाजी सत्वधीर, शुशील माळी यांनी मेहनत घेतली. तसेच शाखा कार्याध्यक्ष राजेश देवरुखकर यांनी नियोजनासोबतच कृषि पर्यवेक्षक डी वाय कोळी यांच्या मदतीने रोपे उपलब्ध करून दिली.वृक्षारोपण झाल्यावर शरद लोखंडे यांनी या कार्यक्रमामागील संकल्पना समजाऊन सांगितली तसेच केवळ वृक्षारोपण करूनच थांबायचे नाही तर ही रोपे जगविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मधून मधून वृक्षारोपण ठिकाणी येऊन रोपांना पाणी घालणे, त्यांची निगा राखणे ही कामे सुद्धा करण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले. अविनाश पाटील यांनी अंघोळीची गोळी, खिळेमुक्त झाड या उपक्रमांची माहिती दिली.

-कुणाल म्हात्रे

कोविड-19 इन्होवेशन पुरस्काराबद्दल केडीएमसी आयुक्तांवर कौतुकांचा वर्षाव ; मुख्यमंत्र्यांनीही फोनद्वारे केले अभिनंदन

भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत,  भारत सरकारतर्फे “वाराणसी आणि कल्याण डोंबिवली” या शहरांना संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

      कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेला हा पुरस्कार म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोविला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह इतर अनेक मंत्री, खासदार, आमदार यांनी देखील आयुक्तांना फोन करून त्यांचे अभिनंदन केले आहे. समाजातील सर्वच स्तरातून मनपा आयुक्तचे कौतुक होत असुन कल्याण डोंबिवली ठेकेदार वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी देखील शनिवारी आयुक्तांची भेट घेत पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी कल्याण डोंबिवली ठेकेदार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष गणेश पाटील, सचिव रामचंद्र औटी, माजी अध्यक्ष कालीदास कदम, उपाध्यक्ष सिद्धार्थ माने हे पदाधिकारी उपस्थित होते. असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांच्या कामाचे कौतुक करीत कल्याण डोंबिवली शहराची विकास कामांची प्रगती होत नावलैविक वाढेल अशा शुभेच्छा दिल्या.

कल्याण डोबिवली ठेकेदार आसोशियनचे पदाधिकारी सिद्धार्थ माने यांनी सामाजिक बांधलिकितुन तळागाळातील एका कामगाराचा वर्षभरासाठी विमा काढण्याची इच्छा व्यक्त केली. सामाजिक बांधलिकितुन समाजातुन असे नागरिक पुढे येणे हे सकारात्मक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तर कल्याण डोंबिवलीच्या या यशामुळे येथे राबविलेले प्रकल्प पाहणी करण्यासाठी  इतर महानगरपालिकांचे आयुक्त देखील येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

ओबीसी आरक्षणासाठी कल्याण पूर्वेत आमदार गणपत गायकवाड यांनी केला रास्ता रोको

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे नुकसान झाल्याची टीका कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी केली आहे. कल्याण पूर्वेतील सूचकनाका येथे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी आरक्षणासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप कल्याण पूर्व अध्यक्ष संजय मोरे, महिला जिल्हाध्यक्षा रेखा राजन चौधरी, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, गणेश भाने, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, नरेद्र सूर्यवंशी, पांडुरंग भोसले, यांच्यासह अन्य कार्यकर्ते मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते.  

            ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ आज कल्याणध्ये तीन ठिकाणी भाजपच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलन करणा:या काही कार्यकर्त्यांनी पोलिसांनी अटक करुन नंतर सोडून देण्यात आले.

महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षणरुपी हक्क हिरावून घेतला, त्याविरोधात ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढा द्यायला आज श्रीराम चौक, सूचक नाका,  कल्याण पूर्व येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. ओबीसी समाजाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या हक्कासाठी आम्ही अशाच प्रकारे यापुढे देखील संघर्ष करीत राहू अशी प्रतिक्रिया आमदार गणपत गायकवाड यांनी दिली. 

-कुणाल म्हात्रे

वीजबिल वसुलीला गती द्या ; अन्यथा कारवाई – महावितरणच्या वाणिज्य संचालकांचा ईशारा

महावितरणची कठीण आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन चालू व थकीत वीजबिल वसुलीला गती द्या. येत्या ३० जूनपर्यंत वीजबिल वसुलीचे निर्धारित उद्दिष्ट पूर्ण करा. वसुलीच्या कामात कमी पडणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महावितरणचे संचालक (वाणिज्य) सतीश चव्हाण यांनी कल्याण परिमंडलातील अधिकाऱ्यांना दिला.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या निर्देशानुसार कल्याण परिमंडलातील चालू व थकीत वीजबिलाच्या वसुलीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते. मुख्य अभियंता दिनेश अग्रवाल, अधीक्षक अभियंते सुनील काकडे, सिद्धार्थ तावाडे, राजेशसिंग चव्हाण, किरण नागावकर, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड, वरिष्ठ व्यवस्थापक विश्वनाथ कट्टा यावेळी उपस्थित होते. जून महिन्यातील चालू वीजबिल आणि थकबाकी असे एकूण ११२० कोटी रुपये वसूल करण्याचे उद्दिष्ट कल्याण परिमंडलाला देण्यात आले होते. मात्र जून महिना संपण्यास पाच दिवस शिल्लक असताना ४७४ कोटी रुपये वसूल होणे बाकी आहेत. जून अखेरपर्यंत वसुलीचे निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्याचे निर्देश संचालक (वाणिज्य) चव्हाण यांनी दिले.

कल्याण परिमंडलात कल्याण एक व दोन, वसई, पालघर मंडळातील सर्व वर्गवारीतील १४ लाख ४८ हजार ग्राहकांकडे चालू व थकीत वीजबिलाचे ७३९ रुपये थकीत आहेत. यात नोव्हेंबर- २०२० पासून एकदाही वीजबिल न भरणाऱ्या ५५ हजार ४७० ग्राहकांकडे ३४ कोटी रुपये थकीत आहेत. तर पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचे थकीत वीजबिल १५ व्या वित्त आयोगाच्या अनुदानातून प्राधान्याने भरण्याबाबत शासनाने नुकतेच परिपत्रक काढले आहे. संबंधित ग्रामपंचायतींकडे पाठपुरावा करून पथदिव्यांची १२७ कोटी व पाणीपुरवठा योजनांची ४ कोटी ८१ लाखांची थकबाकी वसूल करण्याचे निर्देश संचालक (वाणिज्य) चव्हाण यांनी दिले.

कल्याण एक आणि दोन, वसई मंडलातील सर्व कार्यकारी, अतिरिक्त व उपकार्यकरी अभियंते या बैठकीला उपस्थित होते. तर पालघर मंडलातल अभियंते व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकीत सहभागी झाले.

-कुणाल म्हात्रे

‘क.डों.म.पा.’ला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार ; वाराणसी आणि कल्याण डोंबिवली संयुक्त विजेते

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19  इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत,  भारत सरकारतर्फे “वाराणसी आणि कल्याण डोंबिवली” या शहरांना  संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे.

भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत   25 ऑगस्ट 2020 रोजी भारतातील 100 स्मार्ट सिटींसाठी विविध प्रकारांमध्ये  स्मार्ट सिटी ॲवार्ड स्पर्धा घेण्यात आली होती. यातील निवडीचे निकष हे मुख्यत: केलेल्या कामाच्या गुणवत्तेशी निगडीत होते.

स्मार्ट सिटी कार्यक्रमाअंतर्गत सन 2016 पासून विविध टप्‍प्यांमध्ये एकुण 100 शहरांची निवड केली होती. यातील पहिल्या टप्प्यात 20, दुस-या टप्प्यात 40, तिस-या टप्प्यात 30 आणि अखेरच्या टप्प्यात 10 शहरांचा अंतर्भाव होता. या स्पर्धेसाठी टप्पेनिहाय पारितोषिकांसाठी वेगवेगळी संवर्गात निवड प्रक्रिया जाहिर करण्यात आली होती. स्मार्ट कल्याण डोंबिवली डेव्हलपमेंन्ट कार्पोरेशन लिमिटेडने या स्पर्धेत महापालिकेच्या वतीने “कोविड इन्होवेशन अवॉर्ड” या गटासाठी नामांकन सादर केले होते. एकुण निवड प्रक्रियेतील पहिल्या टप्प्यात सर्व शहरातील स्मार्ट सिटी कंपन्यांच्या एकंदरीत कामगिरीसाठी बाद फेरी तत्वाप्रमाणे काही निकष ठरविण्यात आले होते. 

दुस-या टप्प्यातील एकुण 40 शहरांमधून कोविड इन्होवेशन अवॉर्डसाठी फक्त वाराणसी, कल्याण डोंबिवली , वडोदरा, आग्रा या 4 शहरांची निवड केली गेली होती. भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाच्या राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज वाराणसी आणि कल्याण डोंबिवली यांना संयुक्तपणे विजेते घोषित केले. 

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला मिळालेले हे ॲर्वाड म्हणजेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचा सन्मान आहे,  कोविड कालावधीत महापालिकेल्या मदत करणा-या असंख्य डॉक्टर्स, पॅरामेडिकल स्टाफ, महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी तसेच अन्य विभागातील अधिकारी / कर्मचारी , अनेक सेवाभावी संस्था, सर्व लोकप्रतिनिधी यांच्या हा सन्मान आहे. कमी संसाधनामध्ये महापालिकेने या सगळयांच्या सहकार्याने चांगला लढा दिला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी दिली.

सांघिक भावनेने संकटाचा मुकाबला करण्याची या शहराने जोपासलेल्या संस्कृतीची केंद्र शासनाने दखल घेतली असून अशीच कार्यपध्दती यापुढीही सुरु राहिल्यास आपण सर्व मिळून खूप प्रगती करु असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

-संतोष दिवाडकर

अवघ्या काही तासांत पोलिसांनी शोधला चार वर्षांचा हरवलेला मुलगा

आज दि.२४ जून रोजी सायंकाळच्या सुमारास खडेगोळवली कल्याण पूर्व येथून एक चार वर्षांचा मुलगा हरवला होता. पोलिसांना खबर दिल्या नंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत या मुलाचा शोध लावला आणि त्याला पालकांच्या हवाली केले.

वेदांत अनिल सिंग हा ३ वर्षे ११ महिन्यांचा मुलगा सायंकाळी पाऊने सहाच्या दरम्यान खडेगोळवली परिसरातून बेपत्ता झाला. त्याच्या पालकांनी सर्वत्र शोध घेतला, विचारपूस केली मात्र तो कुठेही सापडला नाही. वेदांतला कुणी तरी पळवून नेले असावे असा संशय त्यांना बळावला आणि भेदरलेल्या पालकांनी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराजे साळवे, क्राईम पोलीस सर्जेराव कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक भिसे आणि सर्व टीमने आपले संपर्क वापरून नागरिकांना याबाबत अवगत केले आणि संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लावली. आणि काही तासानंतर शोध घेताना हा हरवलेला बालक सापडला. त्यानंतर या बालकाला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. कोळसेवाडी पोलिसांनी कमी वेळात घेतलेल्या या शोधाचे निश्चितच कौतुक होणे साहजिक आहे.

-संतोष दिवाडकर