डोंबिवलीत पोलीस चौकी समोरील मेडिकल चोरट्यांनी फोडलं

डोंबिवलीतील मानपाडा मुख्य रस्त्यावरील ऑप्टिलाईफ हॉस्पिटल शेजारील शिवाजी उद्योग नगर पोलीस चौकी समोरील शिवम मेडिकल दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोकड आणि सामानाची चोरी केली. भर रस्त्यावर चोरी झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

डोबिवली शहरातील दुधनाथ यादव यांच्या शिवम मेडिकलचे शटर उचकवून चोरट्यांनी सकाळी ५  च्या दरम्यान दुकानात प्रवेश केला. दुकानातील १५ हजाराची रोकड आणि कॉस्मेटिक सामान चोरले. शहराच्या सदैव वर्दळ असणाऱ्या भागात हि घटना घडल्याने चोरांची हिम्मत वाढविल्याचे दिसून येत आहे. दुकानाच्या बाजूला २४ तास चालणारे ऑप्टिलाईफ हॉस्पिटल आहे. या भागात सदैव पेशंटची येजा असते असे असतांना देखील चोरांनी केलेली हिम्मत चिंताजनक आहे.

दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये चोराचा चेहरा दिसून येत असून रोकड आणि सामान पिशवी मध्ये भरतांनाचे फुटेज मिळाले आहे. याबाबत दुकानदाराने पोलिसांकडे प्राथमिक तक्रार दिली असून फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.

-कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा. क्षेत्रात आज कोरोनाचा एकही मृत्यू नाही ; दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच अशी नोंद

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मागील आठवड्यात हाच मृत्युदर दिवसाला २० च्या वर गेला होता. मात्र आता हाच दर शुन्या पर्यन्त आला आहे. दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच असे घडले आहे.

मागील दिड वर्षांपासून क.डों.म.पा. हद्दीत कोरोनाचा उद्रेक सुरू होता. रणरणत्या उन्हाळ्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि लोकांना हॉस्पिटल मध्ये बेड मिळणे कठीण होऊन बसले. बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन या सर्वांचाच तुटवडा आणि त्यात लॉकडाऊनने सामान्य नागरिकांचे कंबरडे कोरोनाने पार मोडून टाकले. अलीकडे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काहीशी शिथिलता आली असून कोरोना रुग्ण संख्या देखील आटोक्यात येताना दिसत आहे. यातच इतक्या महिन्यानंतर प्रथमच क.डों.म.पा. क्षेत्रात शून्य कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत.

आज महानगरपालिका क्षेत्रात १२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचबरोबर ७९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या बेरीज वजाबाकीच्या आकडेवारीसह आता महापालिका क्षेत्रात १३९९ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २२०० हुन अधिक लोकांनी कोरोनाने जीव गमावला असून १ लाख ३१ हजार ३४३ रुग्ण बरे झाले आहेत.

-संतोष दिवाडकर

कोरोनाने मृत पावलेल्या मुलाच्या समरणार्थ कुटुंबियांनी लावली झाडं

दुःखातून सावरुन आपल्या लाडक्या मुलांच्या स्मृती प्रित्यर्थ परिजातकांची २६ झाडांची लागवड करीत भविष्यात त्या झाडांच्या फुलांचा सुगंध परिसरात दरवळवा. क्राँक्रीटच्या जगंलात नैसर्गिक समतोल साधवा या सामाजिक जाणिवेतून कल्याण मधील जामदार कुटुबीयांनी वृक्षारोपण केले आहे.

कल्याण येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते उल्हास जामदार यांचा २६ वर्षीय मुलगा योगेश याला गेल्या वर्षी कोरोणाची लागण झाली होती. त्याला इतर व्याधी असल्याने त्याची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. मंगळवारी त्याचा २६ वा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त त्याच्या स्मरणार्थ जामदार कुटुंबीयांनी कल्याणात वृक्षारोपण केलें. केडीएमसीच्या बारावे येथील एसटीपी प्लांट परिसरात २६ वृक्षांची जामदार कुटुंबियांनी लागवड करून नैसर्गिक वातावरण जतन होण्यासाठी खारीचा वाटा उचलत एक अगळा संदेश समाजात रूजविला आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये भर चौकात शेकडो बुलेटच्या सायलेन्सरवरून वाहतूक पोलिसांनी फिरवला रॉलर

कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांनी मॉडीफायकेलेल्या बुलेट सायलेन्सरवर रोलर फिरवला असून गेल्या तीन दिवसांपासून कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवर कारवाई सुरू होती. जवळपास १०४  बुलेटवर कारवाई करून मॉडीफाय सायलेन्सर काढून घेण्यात आले होते. त्या सायलेन्सरवर दुर्गाडी चौकात रोलर फिरवून कायमस्वरूपी निकामी करण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील आदीजण उपस्थित होते.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी बुलेट मोटार सायकल वाहनांचे यांत्रीक भाग व तांत्रिक रचनेत बदल  केलेल्या तसेच काळया काच लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सोमवारपासून शहर वाहतुक उपशाखा, कल्याण मार्फत कल्याण परिसरातील दुर्गाडी, सुभाष चौक, शहाडनाका, व पत्रीपुल या भागात वेगवेगळी पथके तयार करुन बुलेट मोटार सायकल वाहनांचे यांत्रीक भाग व तांत्रिक रचनेत बदल केलेल्या एकुण ११६ वाहनांवर कारवाई करुन १०४ सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्यावर प्रचलीत मोटार वाहन कायदयानुसार कारवाई करुन एकुण १ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच काळी फिल्म लावणाऱ्या एकुण ६४ वाहन चालकांवर कारवाई करुन वाहनांच्या काचेवर लावलेले काळी फिल्म काढुन घेवुन त्यांच्यावर कारवाई करुन एकुण १२ हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. हि कारवाई कल्याणचे वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील,  मसपोनि सुनिता राजपुत, पोउपनि तुकाराम सकुंडे व पोलीस अंमलदार यांनी केलेली असुन यापुढे देखील कारवाई सुरु राहणार आहे.

 बुलेट मोटार सायकलच्या यांत्रीक भाग व तांत्रिक रचनेत बदल केल्यामुळे होणाऱ्या कर्कश आवाजामुळे वायु व ध्वनी प्रदुषण तसेच वाहने रस्त्यावरुन कर्णकर्कश आवाज करीत अनियत्रीत वेगाने चालविल्याने पादचारी, जेष्ठ नागरीक व लहान मुलाच्या आरोग्यास तसेच सुरक्षितेतेस निर्माण होणारा धोका तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होणारा नाही. याबाबत कल्याण परिसरात पी.ए सिस्टीमव्दारे नागरीकांना आव्हान करुन जनजागृती करण्यात आली आहे.

-कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा. ‘ब’ आणि ‘ई’ प्रभागात अनाधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या  निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम येथील ब प्रभाग क्षेत्रातील कल्याण स्पोर्टस क्लबच्या मागील बाजूस चालू असलेल्या १० चाळीच्या रुमचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई ब प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी महापालिकेचे पोलिस कर्मचारी व महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे १० कामगार यांच्या मदतीने आज केली.

ई प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व येथील देसलेपाडा, नांदीवली येथे चालू असलेले जी+ 3 या इमारतीचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई आज केली. सदर कारवाई ई प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन विभागातील २०  कर्मचारी व १०  पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने तसेच १  जेसीबी, ४ कॉम्प्रेसर, गॅस कटर यांचे सहाय्याने करण्यात आली.

-कुणाल म्हात्रे

“ड” प्रभागातील अती धोकादायक इमारतीवर निष्कसनाची कारवाई

अतीधोकादायक इमारतीमुळे  संभाव्य दुर्घटना घडु नये म्हणून मनपा प्रशासनाने अतिधोकादायक इमारतीवर निष्कसनाच्या कारवाई चा बडगा उचला असुन “ड” प्रभाग क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतीचे पाडकामास प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने गुरुवारी सुरुवात केली. धोकादायक इमारती मधील रहिवाशांचे स्थलांतरित करण्याचे आदेश  कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत.

उप आयुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ड’ प्रभागाच्या वतीने कल्याण पुर्वेतील हनुमान नगर परिसरातील विश्वास विघालय या अतिधोकादायक तळ +दोन मजले इमारतीचे पाडकामास “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने गुरुवारी सुरुवात केली.  या अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम कर्मचारी वर्ग, हातोडा, ईलेक्टीकल ब्रेकर यांच्या मदतीने करण्यात येत आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमधील भटाळे तलावाच्या अतिक्रमणा विरोधात आमरण उपोषण

कल्याण हे ऐतिहासिक शहर असून यामध्ये अनेक ऐतिहासिक तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. यापैकीच एक असलेला तलाव म्हणजे भटाळे तलाव. ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याच्या समोर असलेल्या या तलावात देखील भूमाफियांनी अतिक्रमण केले असून याविरोधात निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयपाल कांबळे आणि ठाणे जिल्हा अध्यक्षा आसीया रिझवी हे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उपोषणाला बसले आहेत.

      कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी किल्ल्या समोर ऐतिहासिक शिवकालीन भटाळे तलाव होता. केडीएमसीच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी भूमाफियांशी संगनमत करून तो तलाव अतिक्रमणाच्या रूपाने भूमाफियांच्या घशात घातला असल्याचा आरोप निर्भय सामाजिक सेवाभावी संस्थेने केला आहे. अशा भ्रष्ट अधिकारी आणि भूमाफियांवर गुन्हा नोंद करून भटाळे तलाव पूर्ववत बांधून त्याचे सुशोभिकरण करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयात सुवर्ण जयंती महोत्सवास सुरवात

देशाच्या प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये समाविष्ट असलेले कल्याण मधील बी. के. बिर्ला महाविद्यालय हे आपल्या स्थापनेच्या ५० व्या वर्षात प्रवेश करत आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीने हे वर्ष सुवर्ण जयंती वर्षाच्या रूपात साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचे उद्घाटन आज महाविद्यालयाच्या मुख्य संरक्षक पद्मभूषण राजश्री बिर्ला यांच्याहस्ते ऑनलाईन झाले.

याप्रसंगी त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले व महाविद्यालयाच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाविद्यालयाचे संस्थापक बसंत कुमार बिर्ला यांचे हे जन्मशताब्दी वर्ष देखील आहे. या सोहळ्यात महाविद्यालयातर्फे या शैक्षणिक वर्षात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातील.

या आयोजनामध्ये शिक्षण, संस्कृती आणि खेळ जगतातील गणमान्य व्यक्तींना निमंत्रित करण्याची योजना केली गेली आहे. महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्ष जयंती निमित्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांमध्ये विशेष उत्साह आहे.

-कुणाल म्हात्रे

सर्पमित्राने दोन नागांसह धामणीला दिले जीवदान

कल्याण पश्चिमेतील ऊंर्बेड गावातील अमर भंडारी यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सहा फुटी लांब नाग आढळल्याने उपस्थितीताची भितीने धांदल उडाली. तातडीने घटनास्थळी सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी पोहचत सहा फुटी पुर्ण वाढ झालेल्या विषारी नागास पकडल्याने उपस्थितीतांचा जीव भांड्यात पडला.

   कल्याण पश्चिमेतील महाराष्ट्र नगर परिसरातील चायनीजच्या गाडीच्या खोक्यात साडे सहा फुटी नाग जाऊन बसल्याचे रहिवाशी अजित यांना आढळल्याने दुकानदारासह बघ्यांची पाचावर धारण झाली. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी चार वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी तातडीने पोहचत विषारी नागाला पकडल्याचे पाहुन उपस्थितानी सुटकेचा निश्वास टाकला.                                               

तर  कल्याण पश्चिमेतील हिना गार्डन परिसरातील मंगेशी सुष्टी सोसयटीच्या आवारात पाच वाजण्याच्या सुमारास नऊ  फुटी साप दिसल्याने सोसयटीच्या रहिवाशामध्ये पळता भुई उडाली. सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी घटनास्थळी पोहचत नऊ फुटी धामण या बीन विषारी सापास पकडुन धामण सापा बाबतीत उपस्थित रहिवाशांमध्ये जनजागृती केली.  दोन दिवस कोसळलेल्या पावासामुळे सापाची बीळे पाण्याने भरल्यामुळे साप हे सुरक्षित आडोसासाठी सापांनी आसारा घेतला आसावा,     “पकडलेल्या दोन नाग, एक धामण यांना वन विभागाच्या ताब्यात देऊन ते जंगलात  नैसर्गिक अधिवासात सोडणार असल्याचे सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

“ड” प्रभागक्षेत्रात अनाधिकृत बांधकामावर पालिकेचा हातोडा

“ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या अनाधिकृत बांधकाम पथकाने अनाधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उचलित पुनालिंक परिसरातील दोन गाळे दोन रूमवर हातोडा चालवित तोडक कारवाई केली.

  कल्याण पूर्वेतील पुनालिंक रोड जवळील अर्पणा डेअरी परिसरात अनाधिकृतपणे बांधलेल्या दोन गाळे, दोन रूमवर कारवाईचा बडगा उचलित “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल अनाधिकृत बांधकाम नियंत्रण पथकाने हातोडा चालवित अनाधिकृत बांधकाम निष्कसित  केल्याने अनाधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानानुसार अनाधिकृत बांधकामवर कारवाई मोहिम सुरू असुन अनाधिकृत बांधकाम उप आयुक्त अनंत कदम  यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत बांधकाम वर तोडक कारवाईचा बडगा सुरू राहणार असल्याचे ड प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे