एकाच वर्षात कल्याण डोंबिवली मनपाला मिळाला दुसरा पुरस्कार

कल्याण :- महाराष्ट्र ऊर्जा अभिकरण या संस्थेकडे क.डो.मनपाने ऊर्जा बचतीबाबत केलेल्या उपक्रमांच्या सादरीकरणाला दोन पुरस्कार मिळाले असून, कोविड इनोव्हेशन अवॉर्ड नंतर या पुरस्कारामुळे महापालिकेच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यामुळे राज्यपातळीवर महापालिकेस मोठा बहुमान प्राप्त झाला आहे.

मेडा या महाराष्ट्र शासनाच्या नोडल एजन्सीमार्फत म्युन्सिपल सेक्टर, बिल्डींग सेक्टर, हॉस्पिटल सेक्टर यामध्ये उर्जा बचतीबाबत केलेल्या उपाययोजनांची, राबविलेल्या उपक्रमांची माहिती यावर्षीच्या सोळाव्या उर्जा संवर्धन पुरस्कारासाठी सर्व महापालिका स्तरावर मागविण्यात आली होती. महापालिकेच्या विदयुत विभागाने, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली व शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या फॉरमॅटमध्ये उर्जा संवर्धन व वीज बचतीसाठी स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा, जल/मल नि:सारण या विभागामध्ये जे काम केले त्या संदर्भातील माहिती सप्टेंबरमध्ये पाठविली होती.

या सादरीकरणाच्या आधारे महाराष्ट्र ऊर्जा अभिकरणाच्या निवड समितीने विदयुत विभागास प्रकल्प सादरीकरणासाठी वेळ दिली होती, त्यानुसार महापालिकेच्या विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत व त्यांच्या सहका-यांनी निवड समितीसमोर केलेल्या प्रकल्प सादरीकरणाच्या आधारे मंगळवारी दोन क्षेत्रांमध्ये मनपास पुरस्कार जाहिर करण्यात आले, यामध्ये म्युन्सिपल सेक्टरमध्ये सर्टिफिकेट ऑफ मेरीट हा प्रथम पुरस्काराचा बहुमान महापालिकेस जाहिर करण्यात आला. त्याचप्रमाणे हॉस्पिटल सेक्टरमध्ये शास्त्रीनगर हॉस्पिटलसाठी दुस-या क्रमांकाचा पुरस्कार महापालिकेस जाहिर करण्यात आला.

मनपा परिसरात परंपरागत जुने सोडियम दिवे काढून उर्जा बचतीसाठी स्मार्ट एलईडी दिवे बसविण्यात आले, महापालिकेने नविन इमारतींना सौर उर्जा यंत्र बसविणे बंधनकारक केले आहे, त्याअनुषंगाने आतापर्यंत सुमारे १९१० इमारतींवर सौर उर्जा यंत्रणा बसविल्यामुळे वर्षाला जवळ जवळ १२ कोटी युनिट विजेची बचत होत आहे, पाणी पुरवठा करणारे जुने पंप बदलून महापालिकेने नविन प्रकारचे उर्जा बचतीचे पंप बसविले, त्याचप्रमाणे शास्त्रीनगर रुग्णालयातही उर्जा बचतीसाठी जुने परंपरागत दिवे काढून एलईडी दिवे तसेच उर्जा कार्यक्षम वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली.

भविष्यात महापालिकेमार्फत इलेक्ट्रीक बसेस चालविण्याचा महापालिकेचा मानस आहे, त्याचप्रमाणे आयरे, कचोरे, बारावे, उंबर्डे या परिसरात घनकच-यापासून जैविक इंधन तयार करण्याचे ५ प्रकल्प उभारण्यात आले. या सर्व माहितीच्या सादरीकरणाअंती राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून महापालिकेस हे पुरस्कार जाहिर करण्यात आले आहेत.

-कुणाल म्हात्रे

अनधिकृत बांधकामांवर पालिकेची टांगती तलवार; डोंबिवलीत पाच मजली इमारतीवर कारवाई

डोंबिवली :- कल्याण-डोंबिवली महानगर पालिका प्रशासनाने शहर आणि ग्रामीण विभागातील बेकायदेशीर असलेल्या अनधिकृत बांधकामावर हातोडा सुरूच ठेवला असून, बिनधास्तपणे धडक कारवाया केल्या जात आहेत. गेल्या वर्षभरातून अनेक अनधिकृत इमारतींवर अशी धडक कारवाई सतत होत असल्याने स्थानिक भुमाफिया हद्दपार होवू लागले आहेत. विकासक आणि जमीन मालकांचा बेकायदेशीर बाजार मनपाने उठवून लावला आहे. अशा कारवाया सुरू राहिल्यास बांधकामांच्या परवानग्या घेऊन पालिकेच्या महसुलीत वाढ होईल तसेच ठेकेदार आणि भूमाफियाना जरब बसेल यात दुमत नाही.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी भूमाफियांचा बेकायदेशीर इमारतीचा धंदा बंद केल्याने भूमाफियांनी हळूहळू पळ काढला आहे. मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार १०/ई प्रभागातील सहाय्यक आयुक्त भारत पवार यांनी आपले कर्तव्य निभावून आयुक्तांच्या आदेशाचे पालन करीत बेधडक कारवाई करत डोंबिवली पूर्व, सोनारपाडा येथील विकासक रुपेश म्हात्रे व विजय जाधव यांच्या चालू असलेल्या तळ+५ मजल्याच्या इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई मंगळवार १४ डिसेंबर रोजी केली आहे.

सदर बांधकामधारकास यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली होती. सदर निष्कासनाची कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलिस कर्मचारी आणि मानपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस यांच्या मदतीने आणि १ जेसीबी व ४ गॅस कटर यांचे सहाय्याने करण्यात आली.

-रोशन उबाळे

कल्याणमध्ये मुलाने केला बापाचा खूण; आईवरही केला प्राणघातक हल्ला

कल्याण :- शहरातील चिकनघर परिसरात हत्ये प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. मुलानेच वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघड झाला आहे. या हल्ल्यात मध्ये येणाऱ्या आईवरही प्राणघातक हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी जखमी मुलगा लोकेश आणि जखमी आई या दोघांवर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी लोकेशच्या विरोधात हत्या आणि हत्येचा प्रयत्न या आरोपाखाली गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात राहणाऱ्या प्रमोद बनोरिया यांचा २७ वर्षीय मुलगा लोकेश हा विद्यार्थीदशेत आहे. या पिता पुत्रांमध्ये सतत वाद होत होते. शनिवारी रात्री देखील दोघांमध्ये वाद झाले होते. हा वाद इतका विकोपाला गेला की लोकेशने वडील प्रमोद यांच्यावर धारदार चाकूने सपासप वार करत वडिलांची हत्या केली. याच दरम्यान प्रमोद यांना वाचविण्यासाठी मध्ये पडलेल्या प्रमोद यांची पत्नी व लोकेश ची आई कुसुम वर देखील लोकेशने ८ते १० वार करून तिला देखील जखमी केले. यानंतर कट रचून स्वतःच्या बचावासाठी त्याने स्वतःच्या पोटावर वार करून घेतले. यानंतर रात्रभर त्याने जखमी आईसह वडिलांचा मृतदेह घरातच ठेवला. संपूर्ण घरात रक्ताचा सडा पडला होता.

पहाटे च्या सुमारास सुरक्षा रक्षकाला फोन करून रुग्णवाहिका बोलवण्यास सांगितले. मात्र रात्री उशिरा त्यांच्या घरातून भांडणाचे आवाज येत असल्याने सुरक्षा रक्षकाचा काहीतरी अनुचित घडले असल्याचा संशय बळावला. त्याने सोसायटीच्या सदस्यांना याबाबत माहिती दिली. सोसायटी मधील लोकांनी घरात येऊन पाहिले असता त्यांना घरात सर्वजण रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असल्याचे दिसले. आणि त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पुढे पोलीस आल्यानंतर मात्र लोकेश याने वडिलांनी आपल्यावर प्राणघातक हल्ला करत आईला जखमी करत स्वतः आत्महत्या केल्याचा कांगावा केला. तसेच आईने आपल्या विरोधात पोलिसांना माहिती दिल्यास तिला मारण्याची धमकी दिली होती. मात्र पोलिसांनी लोकेशवर संशय व्यक्त करीत तपास सुरू केला.

डॉक्टर आणि पोलिसांनी लोकेशच्या आईला विश्वासात घेत विचारणा केल्यानंतर तिने मुलाच्या कृत्याचा पाढा वाचला. यानंतर दोघांवरही मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी मुलगा लोकेश विरोधात गुन्हा दाखल करत पूढील तपास सुरू केला आहे. या हत्या मागे नक्की कोणते कारण आहे की इतक्या टोकाचे पाऊल उचलून जन्मदात्या बापाला आयुष्यातुन संपवले ही बाब मात्र अद्यापही गुलदस्त्याबाहेर येऊ शकलेली नाही. मात्र लोकेशच्या चौकशी नंतर हत्येमागचे नेमके कारण पोलिसांच्या हाती लागणार आहे.

-रोशन उबाळे

बॉक्सिंग स्पर्धेत कल्याणच्या खेळाडुंची चमकदार कामगिरी

कल्याण : मुंबई आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा ही आशिया खंडातील सर्वात जुनी व मानाची समजली जाणारी स्पर्धा आहे.  मुंबई विभागातील सर्व बॉक्सर्स आपण सुद्धा या स्पर्धेत चॅम्पियन बनावे अशी स्वप्ने पाहत असतात. गत वर्षी ही स्पर्धा कोरोना प्रादुर्भावाने घेण्यात आली नव्हती व या वर्षी निवड चाचणी स्वरूपात ही स्पर्धा घेण्यात आली. मुंबई येथील ठाकूर  कॉलेज येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये कल्याण येथील बिर्ला कॉलेजच्या यश पाटील आणि शुभम सिंग या दोन बॉक्सर्सनी फायनल सामना जिंकून मुंबईच्या संघात आपले स्थान निश्चित केले.

यश पाटील याने 63.5 या वजनी गटात तर शुभम सिंग याने 63.5 ते 67 या वाजनी गटात हे यश मिळवले. यश पाटील ला फायनल मध्ये प्रकाश  कॉलेजच्या सोहन कांचन यांचे कडवे आव्हान होते पण त्याने चोख प्रत्युत्तर देत  सामना एकहाती जिंकला. तर शुभम सिंग याला सुद्धा ठाकूर कॉलेजच्या अभिषेक यादव याचे आव्हान होते  पण शुभम च्या डिफेन्सीव्ह खेळापुढे त्याला गुण मिळवणे कठीण झाले व शुभम याने अचूक प्रहाराने गुण मिळवत सामना आपल्या बाजूने फिरवला.

अखिल भरतीय आंतरमहाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा या 24 डिसेंबर पासून लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी पंजाब येथे सुरू होणार आहे. दोघे बॉक्सर्स कल्याण येथील बॉक्स2 फिट बॉक्सिंग अकॅडमी येथे प्रशिक्षक विकास गायकवाड यांच्या कडे प्रशिक्षण घेत आहेत .दोन्ही बॉक्सर्स अतिशय उत्तम रीतीने सराव करत असून नक्कीच अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय स्पर्धेत पदक प्राप्त करतील अशी खात्री प्रशिक्षक विकास गायकवाड यांना आहे.

-कुणाल म्हात्रे

ऐतिहासिक कल्याण नगरीत शिवप्रताप दिन साजरा; कालीचरण महाराजांची विशेष उपस्थिती

कल्याण :- ऐतिहासिक कल्याण नगरीत श्री शिवप्रताप फाउंडेशन तर्फे भव्यदिव्य शिवप्रताप दिन तिथीनुसार साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी या दिवशी अफझल खानाचा वध केला होता. या समरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.

कल्याण पूर्वेतील साकेत कॉलेज जवळ या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मयुरेश धुमाळ यांच्या अध्यक्षतेखाली असंख्य मान्यवर व शिवप्रेमींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम राबविण्यात आला होता. कार्यक्रमातील पोवाड्यांच्या गजराने संपूर्ण ऐतिहासिक नगरी दुमदुमली होती. महाराजांचा इतिहास जगभरात पोहोचवणारे शिवशाहीर देवानंद माळी यांच्यासह त्यांचे सहकारी देखील उपस्थित होते ज्यांनी पोवाडा सादर केला.

नरवीर शिवा काशीद यांचे वंशज आनंदराव काशीद (किल्ले पन्हाळा), सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज युवराज जेधे व प्रमुख उपस्थिती म्हणून श्री स्वामी समर्थ सेवा ट्रस्टचे मठाधिपती मोडक महाराज, वीर जिवाजी महाले पुरस्कृत शंकरजी गायकर, कल्याण पूर्वेचे आमदार गणपत गायकवाड, पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

श्री शिवप्रताप फाउंडेशन आयोजित शिवप्रताप दिन सोहळ्यात विशेष आकर्षण म्हणून कालीपुत्र कालीचरण महाराज उपस्थित राहिले होते. समस्त कल्याण करांच्या वतीने त्यांचे पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. दरम्यान कालीचरण महाराजांनी या विशेष दिनाचे औचित्य साधत तमाम शिवप्रेमींना आपल्या भाष्या द्वारे संबोधित केले. यानंतर कालीचरण महाराजांनी प्रेरित शिवभक्तांना शुभाशीर्वाद तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कल्याण पूर्वेतील समाजसेवक संजय बाबुराव मोरे यांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन देखील कालीचरण महाराजांच्या हस्ते करण्यात आले.

-संतोष दिवाडकर

कल्याण डोंबिवलीत सापडलेला ओमीक्रोन रुग्ण झाला बरा; केडीएमसी आयुक्तांनी दिली माहिती

कल्याण :- कल्याण डोंबिवली महापालिका मध्ये ओमीक्रोनचा रुग्ण सापडला होता. मात्र त्या रुग्णाची आर.टी.पी.सी.आर. टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्याला विलगिकरण कक्षेत ७ दिवसांसाठी ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पहिल्या ओमीक्रोन रुग्णाला डिस्चार्ज दिला असल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी दिली आहे.

डोंबिवली मध्ये दक्षिण आफ्रिकाच्या कॅपटाऊनहुन आलेला रुग्ण नवीन व्हेरियांट ओमिक्रोन संक्रमित झाला होता. त्यामुळे कल्याण डोंबिवली मध्ये चिंताजनक आणि भीतीचे वातावरण पसरले होते. त्याचबरोबर पालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागावरही ताण आला होता. मात्र आरोग्य विभागाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी रुग्णाला चांगल्या प्रकारे उपचार केल्याने रुग्णाची आर.टी.पी.सी.आर. टेस्ट निगेटिव्ह आली आहे.

या रुग्णाला ७ दिवस घरी विलगिकरण कक्षेत राहण्याचे आदेश दिले आहेत. पालिकेच्या कोरोना सेंटर मधून त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांनी पत्रकारांना दिली आहे. त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

-रोशन उबाळे

परदेशातून आलेल्या १०९ लोकांचा पालिका घेतेय शोध; पालिकेला माहिती देण्याचे आयुक्तांकडून आवाहन

कल्याण :- कोरोनाचा नवा व्हेरीयंट ओमीक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी यंत्रणेने खबरदारी आणि उपाययोजनांसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. परदेशातून गेल्या काही दिवसांत कल्याण डोंबिवलीत २९५ नागरिक आले असून त्यापैकी  १०९ जणांचा शोध घेतला जात आहे. या प्रवाश्यानी पालिका प्रशासनाला आपली माहिती देण्याचे आवाहन क.डों.म.पा. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

परदेशातून कल्याण डोंबिवलीत आलेल्या २९५ नागरिकांपैकी ८८ जणांची कोवीड चाचणी करण्यात आली. त्यापैकी ३४ लोकांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून उर्वरित ४८ जणांचे रिपोर्ट आद्यप येणे बाकी आहेत. यातील ३४ लोकं ही केडीएमसी बाहेरचे रहिवासी असून उर्वरित१०९ जणांशी संपर्क साधण्यासाठी केडीएमसी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र अनेकांचे फोन बंद येत आहेत तर अनेकांच्या घराला कुलूप असल्याने संपर्कात अडथळा येत असल्याचे डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

परदेशातून कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या व्यक्तींसाठी एसओपी तयार करण्यात आली आहे. ऍट रिस्क (कमी धोक्याचे देश) आणि हाय रिस्क (अति धोक्याचे देश) देशातून येणाऱ्या व्यक्तींना ७ दिवसाचे होम कॉरंटाईन बंधनकारक आहे. या ७ दिवसांत नियंत्रण ठेवण्यासाठी कॉल सेंटरमधून फोनद्वारे संपर्क साधण्यासह केडीएमसीचे मेडिकल ऑफिसरही त्याठिकाणी सरप्राईज व्हिजिट करणार असल्याचे डॉ. सूर्यवंशी म्हणाले. तसेच ८  व्या दिवशी त्यांची कोवीड टेस्ट होणार असून त्यात निगेटिव्ह आले तर पुन्हा ७ दिवसांचे होम कॉरंटाईन आणि पॉझिटिव्ह आल्यास केडीएमसीच्या संस्थात्मक कॉरंटाईन केले जाईल.

ज्या सोसायटीमध्ये अशा व्यक्ती राहत असतील त्या नियमानुसार होम कॉरंटाईन करतात की नाही याची खबरदारी सोसायटीने घेण्याचे निर्देश देत उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर साथरोग नियंत्रण कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाईचा इशाराही डॉ. सूर्यवंशी यांनी दिला आहे. नागरिकांनी ही आपल्या आरोग्य बरोबर इतरांचे प्रकृती आणि आरोग्य सुदृढता कशी राहिल याकडे सामाजिक बांधिलकी तुन पाहिले पाहिजे.

मास्क न घालणाऱ्यांविरोधात उद्यापासून पुन्हा कडक कारवाई केली जाणार. गेल्या काही दिवसांपासून मास्क न घालता वावरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. अशा व्यक्तींविरोधात उद्यापासून पोलीस आणि महापालिकेची संयुक्त कारवाई पुन्हा सुरू होणार असल्याची माहिती डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. याशिवाय लग्न समारंभ , मोठे कार्यक्रमांमध्ये शासनाने दिलेल्या नियमांचे पालन होतेय की नाही यावरही करडी नजर असेल असे डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

दरम्यान लस न घेतलेल्यानी लगेचच कोवीड लस घेण्याचे आवाहन केले गेले. कोरोनाला अटकाव घालण्यात कोवीड लस ही महत्वाचा घटक असून ज्या लोकांनी अद्याप लस घेतलेली नसेल त्यांनी तातडीने लस घेण्याचे आवाहनही केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी केले. तर कल्याण डोंबिवलीमध्ये आता पर्यंत ७२ टक्के नागरिकांचा पहिला आणि ५२  टक्के नागरिकांचा दुसरा डोस झाला झाला असल्याची माहिती आयुक्तां कडून देण्यात आली आहे.

-रोशन उबाळे

कल्याण पुर्वेतील भाजपच्या रोजगार मेळाव्यातुन शेकडोंच्या हाताला काम; विविध औद्योगिक कंपन्यांचा सहभाग

कल्याण :- पूर्वेतील भारतीय जनता पार्टी व श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थान यांच्या संयुक्त विध्यमाने भव्य अशा रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात जवळपास दिड हजार लोकांनी उपस्थिती दर्शवली होती. यातील मुलाखतीद्वारे शेकडो लोकांच्या हाताला नवे काम लागले आहे. या उपक्रमासाठी कल्याण पूर्व भाजप अध्यक्ष संजय बा. मोरे यांनी विशेष पुढाकार घेतला होता.

कोरोनाच्या दोन लाटांमुळे अनेक लोकांच्या हातचे काम सुटले. बेरोजगारी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. नवतरुण तसेच गरजूंच्या हाताला पुन्हा काम लागावे यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देता यावा यासाठी हा मेळावा आयोजित करीत असल्याचे कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी सांगितले. बँकिंग, कॉल सेंटर, सेक्युरिटी, बॅक ऑफिस, शैक्षणिक, वैदयकीय, रिअल इस्टेट, मॅकेनिक अशा विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधी या मेळाव्यात उपलब्ध होत्या. असंख्य नव तरुण व तरुणी यांनी फॉर्म भरून मुलाखती दिल्या. विविध क्षेत्रातील संस्थांना या मेळाव्यामार्फत आपल्यासाठी उपयुक्त असे एम्प्लॉय या मेळाव्यात मिळाले. शेकडो लोकांना लागलीच कॉल लेटर देण्यात आले.

कल्याण पुर्वेत आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या मेळाव्यात रोजगारासाठी हजारोंच्या संख्येने तरुण उपस्थित होते. या समवेत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे निकटवर्तीय नितीन चौगुले, श्री शिवप्रतिष्ठाण युवा हिंदुस्थानचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड हे देखील उपस्थित होते.

“आजच्या तरुणाईच्या हातात ताकद आहे, बुद्धी आहे. परंतु रोजगार नसल्याने अनेक प्रश्न उद्भवतात. याकरिता रोजगार मेळावा आयोजित करून केलेला हा एक छोटासा प्रयत्न. कोरोनामुळे निर्माण झालेली बेरोजगारी व अन्य बाबी पाहता भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन भाजपा कल्याण पूर्व मंडळाच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये उच्चशिक्षित विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व त्यांना त्याचा लाभही झाला. भाजपा सदैव युवकांसोबत आहे अशी ग्वाही देतो.”

संजय मोरे (अध्यक्ष, भाजपा कल्याण पूर्व)

-संतोष दिवाडकर

महाराष्ट्रात ओमीक्रोनने उघडलं खात; डोंबिवलीत आढळला पहिला रुग्ण

डोंबिवली :- कल्याण डोंबिवलीकरांसाठी चिंताजनक अशी माहिती समोर आली आहे. दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेला तरुण आता ओमीक्रोन पोजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्रातील हा पहिला ओमीक्रोन संक्रमित रुग्ण असून राज्यात ओमीक्रोनचा आता शिरकाव झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

२४ नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिकेतून हा ३३ वर्षीय युवक दुबई-दिल्ली मार्गे मुंबई विमानतळावर उतरला होता. तिथुन टेक्सीने तो डोंबिवलीत आला. मात्र तो आला तेव्हाच त्याला हलका ताप होता. पुढे टेस्ट दरम्यान त्याचा रिपोर्ट कोरोना पोजिटिव्ह आला होता. मात्र त्याचे सेंपल्स मुंबईत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला ज्यात तो ओमीक्रोन संक्रमित असल्याचे निष्पन्न झाले आहे. या रुग्णावर आता पालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना जवळपास आटोक्यात आलेला आहे. असे असताना आता ओमीक्रोनने शिरकाव केल्याने महानगरपालिका प्रशासनाची तारांबळ उडालेली आहे. महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यावर काय उपाययोजना करणार हे आता लवकरच स्पष्ट होईल. सध्या तरी घाबरून न जाता मास्कचा वापर, हात व तोंड स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्स पाळणे हे सर्व नियम पाळण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे. लॉकडाऊनमुळे कंबरडे मोडलेला व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य नागरिक मात्र या नव्या प्रकरणामुळे अधिक हवालदिल झाले आहेत.

ओमीक्रोन हा कोरोनाचा नवीन व्हेरीयंट आहे. भारतात आतापर्यंत चार रुग्ण आढळले आहेत. कर्नाटकातुन ओमीक्रोनने भारतात आपले खाते उघडले. पहिले दोन रुग्ण या राज्यात आढळले. त्यानंतर तिसरा रुग्ण गुजरात मध्ये आढळला. आणि आता महाराष्ट्रात डोंबिवलीत चौथा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे.

-संतोष दिवाडकर

मोहने येथे बांधकाम व्यावसायिकांकडून बुकिंग धारकांना तीन कोटीचा चुना; सदनिकेचा अद्यापही ताबा नाही.

मोहने :- भागीदार असणाऱ्या तीन बांधकाम व्यावसायिकांनी फ्लॅट बुकिंग करणाऱ्या किमान ३८ लोकांचे तीन कोटी रुपये घेतल्याची बाब समोर आली आहे. पैसे घेऊन घरांचा ताबा अद्यापही दिला नसल्याने ग्राउंड प्लस सात मजली इमारत कामाविना जैसे थे अवस्थेत असल्याने या विरोधात बुकिंग करणाऱ्यांनी पोलिस तसेच रेराकडे न्यायाची मागणी केली आहे. त्यामुळे बांधकाम व्यवसायाला कोरोनाची झळ लागल्याचे दिसून येत आहे. मात्र इमारत बांधण्या अगोदर फ्लॅट बुंकिंग पैसे घेणे किती अंगलट येणार हे आता शासकीय यंत्रणा आणि पोलीस प्रशासन यांच्या कारवाईवर अवलंबून आहे.

मोहने येथील शांताराम पाटील नगर येथे बांधकाम व्यावसायिक असलेले आनंद दुबे, भरत मलिक व विजय उपाध्याय या तिघांनी बालाजी डेव्हलपर्सच्या नावाने गार्डन इस्टेट संकुलनाचे २०१६ रोजी बांधकाम सुरू केले होते. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या नगररचना विभागाने या कामाला मंजुरी दिल्याने परिसरात असणाऱ्या नागरिकांनी लाखो रुपये देऊन खरेदी केलेल्या सदनिकेचा नोंदणीकृत खरेदी करारनामा केला होता. एकूण ५६ फ्लॅट अस्तित्वात असून ३८ नागरिकांनी बुकिंग करतावेळेस लाखो रुपये बांधकाम व्यावसायिकाला त्यावेळेस देण्यात आले होते. बुकींग करता वेळेस इच्छुकांनी खासगी तसेच पतपेढी व विविध वित्तीय बँकांकडून कर्ज काढुन विकासकांना दर महिन्याला लोनचा हप्ता देण्यात येत होता. ३८ नागरिकांचे लोनचे हप्ते पूर्ण फिटूनही अद्यापही त्यांना फ्लॅटचा ताबा देण्यात आलेला नाही.

बांधकाम व्यावसायिकांकडून फ्लॅट धारकांना २०१९ ते २०२० पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्याचे सांगण्यात आले होते. २०२१ हे वर्षही उलटून चालले असताना बांधकाम व्यावसायिक बांधकाम करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. रेराकडून देखील २८ नोव्हेंबर २०२१ रोजी सदनिकेचा ताबा देण्याबाबतची शेवटची तारीख देण्यात आली होती.
सदर इमारतीतील घरे विकासकाने बुकिंग रक्कम घेऊन नोंदणीकृत करारनामा केला असतानाही काम अपूर्ण ठेवले असून कामाकडे विकासक संपूर्ण दुर्लक्ष करीत असून सदनिकाधारकांना कोणताही प्रतिसाद देत नसल्याचा आरोप बुकींग धारकांनी केला आहे. विकासकांच्या अशा वर्तनामुळे सदनिकाधारकांच्या कर्जाचे हप्ते व घरांचे भाडे यामुळे सदनिकाधारकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

सदनिकाधारकांचे फोन न उचलणे आणि उचलल्यास शिव्या व धमकी देणे आदी प्रकार होत असल्याने याबाबत सदनिकाधारकांनी खडकपाडा पोलीस स्टेशन तसेच रेराकडे याबाबत तक्रार केली आहे. विकासकांनी मोठ्या प्रमाणात आमची किमान तीन कोटी रुपयांची आर्थिक लूट करून अपहार करून फसवणूक केल्याचा आरोप ३८ सदनिका बुकिंग केलेल्या नागरिकांनी केला आहे. त्यामुळे या अनागोंदी कारभाराची चौकशी होऊन पीडितांना दिलासा देणारी कारवाई झाली पाहिजे अशी मागणी होत आहे.

यासंदर्भात विकासक भरत मलिक यांच्याशी संपर्क साधला असता कोविडमध्ये काम बंद होते. मात्र आता ते सुरू करण्यात आले असून इमारतीचे फिनिशिंगचे काम सुरू करणार असून लवकरच त्यांना सदनिकेचा ताबा देण्यात येणार असल्याचे सांगितले गेले.

-रोशन उबाळे