कल्याण पूर्वेतील तीन-चार माजी नगरसेवक शिवसेनेत येण्यास इच्छुक; माजी नगरसेवक महेश गायकवाड यांचा गौप्यस्फोट

कल्याण :- डोंबिवली पूर्वेतील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेतील तीन ते चार माजी नगरसेवक हे शिवसेनेत येण्यास इच्छुक असल्याचा दावा शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केला आहे. हे नगरसेवक कोण आहेत ? व कोणत्या पक्षातील आहेत ? अशा चर्चा कल्याण पूर्वेतील राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

महेश पाटील, सुनीता पाटील आणि सायली विचारे या भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला. तर कल्याण पूर्वेत देखील असे पक्षप्रवेश होउ शकतो असा दावा शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड हे करीत आहेत. याबाबत महेश गायकवाड यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे तसेच श्रीकांत शिंदे यांच्याशी देखील याबाबत चर्चा केली असल्याचे सांगितले गेले. मात्र त्या माजी नगरसेवकाचे सामाजिक,राजकीय कार्य आणि निवडून येण्याचं गणित समजल्या नंतरच त्यांना शिवसेनेत प्रवेश देणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितले.

क.डों.म.पा. मध्ये २०१५ च्या निवडणुकी नुसार कल्याण पुर्व भागात २५ प्रभाग होते. यातील १५ ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. तर ९ ठिकाणी भाजपचे नगरसेवक निवडून आले होते. तर १ जागा काँग्रेसने जिंकली होती. त्यामुळे या आकडेवारी नुसार महेश गायकवाड यांनी दावा केलेले संभावित नगरसेवक हे कोणत्या पक्षाचे असू शकतात याबाबत फारसा विचार करावा लागू शकत नाही.

कल्याण पूर्वेतील माजी नगरसेवक (२०१५-२०२०) :-

शिवसेना (१५)

१. मल्लेश शेट्टी (४२-लोकग्राम)
२. नवीन गवळी (४३-गावदेवी,नेतीवली,मेट्रो मॉल)
३. राजवंती मढवी (८७-शास्त्रीनगर तिसगांव)
४. महेश गायकवाड (८८-संतोष नगर)
५. सुशीला माळी (८९-मंगल राघो नगर)
६. संगीता गायकवाड (९०-चिकणीपाडा)
७. निलेश शिंदे (९१-जरीमरी नगर)
८. स्नेहल पिंगळे (९४-आनंदवाडी)
९. रमेश जाधव (९६-जाईबाई विद्या मंदिर/साई नगर)
१०. राजाराम पावशे (९७-शनी नगर)
११. शीतल मंढारी (९८-विजय नगर)
१२. माधुरी काळे (९९-आमराई)
१३. देवानंद गायकवाड (१००-तिसगाव गावठाण)
१४. सारिका जाधव (१०२-भगवान नगर)
१५. उर्मिला गोसावी (१०६-चिंचपाडा,नांदिवली तर्फ अंबरनाथ)

भारतीय जनता पार्टी (९)

१. रेखा चौधरी (४५-कचोरे)
२. सुनीता खंडागळे (८६-गोळीवली पिसवली)
३. सुमन निकम (९२-गणेशवाडी)
४. विशाल पावशे (९३-लक्ष्मीबाग)
५. विक्रम तरे (९५-नेहरू नगर)
६. हेमलता पावशे (१०१-हनुमान नगर)
७. मनोज राय (१०३-कैलास नगर)
८. मोनाली तरे (१०४-खडेगोळवली)
९. मोरेश्वर भोईर (१०७-पिसवली)

काँग्रेस (१)

१. जान्हवी पोटे (४१-कोळशेवाडी)

महेश गायकवाड यांची प्रतिक्रिया

-संतोष दिवाडकर

नागरिकांना सेवाभावाने आणि तत्परतेने सेवा दिल्यास संविधानाची मुल्य ख-या अर्थाने जोपासली जातील; महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

कल्याण :- नागरिकांना सेवाभावाने आणि तत्परतेने सेवा दिल्यास संविधानाचे मूल्य खऱ्या अर्थाने जोपासले जाईल असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज काढले. शुक्रवारी या संविधान दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे उद्गार काढले.

संविधान दिनानिमित्त आज महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी, माजी महापौर रमेश जाधव शासनाचे निवृत्त उपसचिव आय.एम.मोरे व उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. त्याच प्रमाणे, या समयी संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिकरीत्या वाचन करण्यात आले.

दि. २६/११/२००८ रोजी मुंबई शहरावर झालेल्या दाहशवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आणि दहशदवाद्यांशी लढा देताना शहिद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहून मौन पाळण्यात आले. तद्नंतर बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था (रजि.) यांच्यामार्फत अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून भारतीय संविधान गौरव सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते.

सदर कार्यक्रमात जेष्ठ संविधान अभ्यासक व ॲड. विजय निरभवने यांनी उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधान विषयक मार्गदर्शन केले. यावेळी संबोधी सप्तसूर या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय सरकटे आणि समाधान मोरे यांनी केले.यावेळी सार्वजनिक जीवनात वागताना ,वावरताना ,हक्कसाठी आणि प्रगती साठी संविधान किती आवश्यक आहे याची ‘महत्व ” यावेळी सांगण्यात आले.

-रोशन उबाळे

आता प्रभाग कार्यालयात होणार जनता दरबार; क.डों.म.पा. चा नवा उपक्रम

कल्याण : नागरिकांना  त्यांच्या विविध कामासाठी  महापालिका मुख्यालयात वारंवार यावे लागू नये म्हणून नागरिकांच्या  सोयीसाठी,  त्यांच्या तक्रारींचे निवारण त्वरित करण्यासाठी तसेच त्यांच्या निवेदनांवर कार्यवाही करण्यासाठी  आता आठवडयातील एक दिवस नागरिकांच्या भेटीसाठी निश्चित करण्यात आला असून विभागीय उपआयुक्तांनी या दिवशी  त्यांच्या अखत्यारीतील प्रभाग कार्यालयात थांबुन नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्याचे निर्देश कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत.

 या जनता दरबाराची  रुपरेषा खालीलप्रमाणे आहे :-

 1/अ प्रभाग–बुधवार–दुपारी 3.00 ते 4. 00 – 1/अ प्रभाग कार्यालय

2/ब प्रभाग– गुरुवार–दुपारी 4.00 ते 5.00  –  2/ब प्रभाग कार्यालय

 3/क प्रभाग– मंगळवार दुपारी 3.00 ते 4.00 – 3/क प्रभाग कार्यालय

 4/जे प्रभाग- बुधवार–दुपारी 4.00 ते  5.00 – 4/जे प्रभाग कार्यालय

 5/ड प्रभाग– बुधवार–दुपारी  3.00 ते 4.00 – 5/ड प्रभाग कार्यालय

6/फ प्रभाग–बुधवार –दुपारी  3.00 ते 4.00 – 6/फ प्रभाग कार्यालय

7/ह प्रभाग- गुरुवार-दुपारी  3.00 ते 4.00 – 7/ह प्रभाग कार्यालय

8/ग प्रभाग– गुरुवार – दुपारी  4.00 ते 5. 00 – 8/ग प्रभाग कार्यालय

9/आय प्रभाग–गुरुवार –दुपारी 4.00 ते 5. 00 – 9/आय प्रभाग कार्यालय

10/ई प्रभाग– शुक्रवार – दुपारी 4.00 ते 5. 00 –10/ई प्रभाग कार्यालय

या जनता दरबाराचा प्रारंभ पुढील आठवडयापासून होणार आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीकरांनो पाणी उकळून प्या; उल्हासनदीत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण

कल्याण :- कल्याण मुरबाड रोड उल्हास नदीत रायते पुल ते मोहना धरणापर्यंत नदीत फेसयुक्त केमिकल दोन दिवसांपूर्वी दिसून आला होता. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे यासाठी उल्हास नदी बचाव कृती समितीने प्रदूषण नियंत्रण मंडळाला कारवाईची विनंती केली होती. यानंतर एमपीसीबीच्या अधिकाऱ्यांनी नदीतील पाण्याचे नमुने घेतले आहेत.

पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण होत असलं तरी अति प्रदूषित पाणी व केमिकल्स थेट उल्हास नदीत सोडल्याने नागरिकांना पोटाचे विकार व इतर परिणाम होताना दिसत आहेत. त्यामुळे सध्यातरी पाणी गाळून आणि उकळून पिण्यापेक्षा दुसरा पर्यायच दिसत नाही. मंडळाने नदीतील तीन ठिकाणचे नमुने घेतले असून पंचनामा केला आहे. परंतु प्रदूषण मंडळाने कारखान्यांवर धाडी टाकून पाहणी करण्याचे आवाहन समितीकडून करण्यात येत आहे.

उल्हासनदीचं पाणी कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राच्या बाहेर देखील पोहोचवले जाते. जवळपास करोडो लोकांची तहान ही नदी भागवत असल्याचे सांगितले जाते. या नदीपात्रात कधी जलपर्णीचे साम्राज्य वाढते तर कधी केमिकल्सचा थर जमा होतो. विविध सामाजिक राजकीय संघटना वारंवार आंदोलनाचा पवित्रा घेतात मात्र प्रदूषणाला आळा घालण्यासाठी कारवाई का केली जात नाही ? असा सवाल आता पडू लागला आहे.

-संतोष दिवाडकर

“भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे”; शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माजी नगरसेवकाची भाषणात भूल

डोंबिवली :- डोंबिवलीतील भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशा नंतर मंचावर भाषण करण्यासाठी माजी नगरसेवक महेश पाटील यांना संधी दिली गेली. मात्र भाषणा दरम्यान महेश पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्याने संपूर्ण मंचावर हश्या पसरला होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे देखील यावेळी स्वतःला हसण्यापासून रोखू शकले नव्हते.

सोमवारी २२ नोव्हेंबर रोजी सायली विचारे, सुनीता पाटील आणि महेश पाटील या भाजपच्या तीन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. या दरम्यान महेश पाटील हे भाषण करीत होते. खासदार श्रीकांत शिंदे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीने भारावून मी आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे असे अनवधानाने ते बोलून गेले. मात्र उजव्या बाजूला बसलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी चटकन चूक लक्षात आणून दिली. यानंतर उपस्थित शिवसैनिकांनी देखील चुकीचा शब्द पकडला. महेश पाटील यांच्या डाव्या बाजूला पालकमंत्री एकनाथ शिंदे मोबाईल पाहत असताना त्यांचेही लक्ष चुकीच्या वाक्याने वेधले गेले. आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांना हसू आवरता आले नाही. सर्वत्र हास्याची लाट उसळली. यानंतर महेश पाटील यांनी वाक्याची दुरूस्ती करीत मला ते सवयीचे आहे असे म्हणत आणखीन एक विनोद केला. सध्या ही व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.

क.डों.म.पा. ची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने पक्षप्रवेश आणि राजकीय उलथापालथ शहरात सुरू झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे तुमचा नगरसेवक कोणत्या पक्षातून येणारी निवडणूक लढवणार आहे हे कदाचित तुम्ही देखील सांगू शकणार नाही.

व्हडीओ पहा

-संतोष दिवाडकर

उंबर्डे रिक्षाचालक हत्येचा लागला शोध; हत्येप्रकरणी एकाला अटक

कल्याण :- दोन दिवसापूर्वी पहाटेच्या सुमारास एका रिक्षाचालकाचा हत्येमुळे कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. अवघ्या २४ तासांत पोलिसांनी रिक्षाचालक अभिमान भंडारी याची हत्या करणाऱ्या सोपान पंजे या आरोपीला अटक केली आहे. ‘विकृतीने केला घात, दुसऱ्यांच्या घरात डोकावणे पडले महागात’ अशी माहिती पोलिसांनी देऊन याच कारणाने आरोपीने हत्या केल्याचे कबुली दिली आहे.

कल्याण पश्चिमेत उंबर्डे गावात रिक्षा चालक अभिमान भंडारी याची पहाटेच्या सुमारास धारदार शस्त्रने हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली होती. या हत्येमुळे या परिसरात एकच खळबळ उडाली होती. खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत हत्या का व कोणी केली याचा तपास सुरू केला. अवघ्या चोवीस तासात पोलिसांनी या हत्येचा छडा लावला. अभिमान याची हत्या करणाऱ्या सोपान पंजे या आरोपीला पोलिसांनी अटक केली. दरम्यान मयत अभिमान हा रात्री अपरात्री पंजे याच्या वहिनीच्या बेडरुमच्या खिडकीत डोकवायचा. त्याने अनेकदा अभिमानला समज दिली मात्र तो ऐकत नसल्याने सोपान याने अभिमान भंडारी याची हत्या केली असल्याची कबुली दिली आहे.

दरम्यान उमेश माने पाटील (कल्याण एसीपी) यांनी हत्याचे कारण सांगत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार आणि तपास पथकाने यावेळी आरोपी सोबत पत्रकार परिषदेत घेतली.

-रोशन उबाळे

प्रलंबित मागण्यांसाठी वीज कामगार, अभियंते व अधिकाऱ्यांचे कल्याणात बेमुदत उपोषण सूरु

कल्याण : महावितरणच्या कल्याण परिमंडळ तेजश्री बिल्डिंग समोर आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी वीज कामगार, अभियंते व अधिकाऱ्यांनी बेमुदत उपोषण सूरु केले आहे.

      महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन संघटनेचे केंद्रीय, झोन व सर्कल सचिव पर्यंतचे पदाधिकारी यांची ऑनलाईन बैठक संघटनेचे कार्याध्यक्ष कॉमेड सि.एन.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. केंद्रीय पदाधिकारी बैठकीमध्ये विस्तृत चर्चा झाल्यानंतर  महाराष्ट्रामध्ये सर्व सर्कल कार्यालय व झोन कार्यालया समोर साखळी उपोषण संघटनेच्या आदेशानुसार करण्याचा निर्णय झाला होता. त्याची अंमलबजावणी कल्याण परिमंडल कार्यलयात देखील करण्यात येत आहे. याद्वारे एक जबरदस्त आंदोलन महाराष्ट्रात उभे करण्या बाबत सर्व पदाधिकारी यांनी तयारी दर्शविली.

तिन्ही कंपन्यातील प्रशासनाचे कामगार विरोधी धोरण दिवसें दिवस वाढत चालले असून त्या धोरणाला विरोध करण्याकरीता सुरुवातीला उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. वितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) यांच्या समवेत १५ नोव्हेंबर रोजी झालेल्या चर्चेमध्ये मान्य झालेल्या मुद्द्यावर सुद्धा आजपर्यंत कोणतेही परिपत्रक निघाले नाही. याबद्दल महावितरण कंपनी प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन प्रशासनाची ही दादागिरी खपवून घेणार नाही अशी ही भूमिका संघटनेच्या नेतृत्वाने घेतली असल्याने केंद्रीय नेतृत्वाच्या निर्देशानुसार संयुक्त सचिव कॉम्रेड औदुंबर कोकरे व झोनल सचिव कॉम्रेड संतोष चचाने यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण परिमंडळ तेजश्री बिल्डिंग समोर  सोमवार पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

आज साखळी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी कल्याण परीमंडळा अंतर्गत सर्व कॉम्रेड सतीश म्हात्रे, जे आर पाटील, नारायण पाटील, बाळासाहेब महाले, नरेश थोरात, किशोर जयकर, सुरेश पाटणकर, पी आर बोटे, जगदीश धमके, प्रदीप म्हात्रे, नंदकुमार नाईक, साईनाथ म्हात्रे आदी पदाधिकारी साखळी उपोषणाला बसले असल्याची माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन कल्याण झोन सचिव संतोष चचाणे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत आता ‘इतके’ सक्रिय कोरोना रुग्ण

कल्याण :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्व आकड्यांचे रेकॉर्ड्स मोडले होते. यात मृत्युदर देखील मोठ्या प्रमाणावर होता. मात्र आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना पूर्णतः आटोक्यात आलेला असून तुरळक रुग्ण आढळत आहेत.

क.डों.म.पा. च्या २२ नोव्हेंबर रोजीच्या आकडेवारीनुसार सोमवारी १५ नवे रुग्ण एका दिवसात नोंदवले गेले आहेत. यातील ५ रुग्ण कल्याण पश्चिम, ३ रुग्ण डोंबिवली पूर्व, ३ रुग्ण मोहने, तर प्रत्येकी २ रुग्ण डोंबिवली पश्चिम आणि कल्याण पूर्वेतील आहेत. तर या दिवशी २३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर एकही मृत्यूची नोंद नसणे ही समाधानाची बाब म्हणावी लागेल. शेवटच्या आलेल्या अपडेटनुसार सध्या महापालिका क्षेत्रात फक्त २५१ रुग्ण हे पोजिटिव्ह असून ते उपचार घेत आहेत.

महापालिका क्षेत्रात लसीकरण देखील वेगाने सुरू आहे. दररोज हजारो लोकांचे लसीकरण महापालिका प्रशासनाकडून केले जात आहे. कोरोना कमी झाल्याने सॅनिटायझरचा वापर कमी झाला आहे. याचबरोबर रस्त्यावर फिरताना अथवा गर्दीतून जाताना मास्क घालणे बंधनकारक असतानाही बरेच लोक मास्कचा वापर करीत नसल्याचे दिसत आहे. कोरोना कमी झाला असून तो अजून संपलेला नसून स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी. तसेच लसीकरण करून घेण्याचेही आवाहन वारंवार पालिका प्रशासनाकडून केले जात आहे.

-संतोष दिवाडकर

कल्याणात भाजपचा महाविकासआघाडी सरकार विरोधात निषेध मोर्चा

कल्याण :  महाविकास आघाडी सरकारच्या काळात वाढलेली राजकीय गुन्हेगारी, महिला अत्याचार, शेतकऱ्यांवर, कामगारांवर होणारा अन्याय, भ्रष्टाचार, अमरावती  दंगलीचा निषेध करण्यासाठी आज भाजपा तर्फे कल्याण तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात भाजप आमदार रवींद्र चव्हाण, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर, नगरसेवक मनोज राय, कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या मोर्चा दरम्यान भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तहसील कार्यलयाबाहेर महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी करत तहसीलदार विजय पाटील यांना निवेदन सादर केले.

महाविकास आघाडी सरकार हे वसुली सरकार आहे. सरकारने  नेहमीच मायबापच्या भूमिकेत असले पाहिजे. मात्र हे सरकार विचित्र पध्दतीने वागत असल्याची टिका भाजप नेते आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी केली. तसेच अमरावती दंगल ही स्पॉन्सर्ड दंगल असल्यासारखे चित्र समोर यायला सुरुवात झाली असून लोकांना त्रास देणे, सर्वसामान्य माणसाना वेठीस धरणे, हे सातत्याने सरकारच्या माध्यमातून होत असल्याचा आरोपही यावेळीं त्यांनी केला.

तर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी महिला अत्याचार मोठ्या प्रमाणात होत आहेत. ते कसे थांबवावे ? काय उपाययोजना करावी यासह एसटी कर्मचारी आंदोलनाचा प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कोणतीही ठोस भूमिका घेताना राज्य सरकार दिसत नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात भाजप कार्यकर्ते आणि नागरिकांकडून सरकारचा निषेध करण्यासाठी हे ‘जन आक्रोश’ आंदोलन करण्यात आल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत भाजपच्या तीन माजी नगरसेवकांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हादरे

डोंबिवली :- कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकिय उलथापालथ मागील वर्षभरापासूनच होताना दिसू लागली आहे. डोंबिवलीतुन भाजपाचे तीन माजी नगरसेवकांनी आता शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेला आहे. महेश पाटील, सुनीता पाटील आणि सायली विचारे अशी त्या तिघांची नावे असून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

कल्याण डोंबिवली या दोन मोठ्या शहरांची मिळून महानगरपालिका तयार होते. यातील कल्याण शहर म्हणजे शिवसेना तर डोंबिवली हा भाजपचा गड मानला जातो. २०१५ साली झालेल्या निवडणुकित शिवसेनेचे ५२ तर भाजपचे ४२ नगरसेवक निवडून आले होते. ही निवडणूक शिवसेना विरुद्ध भाजप अशी रंगली होती. यानंतर २०२० साली कार्यकाळ उलटून गेल्याने सर्व नगरसेवक आता माजी झाले असून महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे.

नव्या वर्षात २०२२ मध्ये कल्याण डोंबिवली सह राज्यातील अनेक महानगरपालिका निवडणुका रंगणार आहेत. २०१९ मध्ये राज्यातील शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर शिवसेना-कोंग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडी सुरू झाली. राज्यातील बदलले समीकरण पाहता महानगरपालिका निवडणुकांवर देखील त्याचे परिणाम दिसणार याचा अंदाज आता नगरसेवकांना लागलेला आहे. म्हणूनच आता राजकीय उलथापालथ होताना दिसत आहेत.

साल २०१५ ते २०२० च्या काळात भाजपचे माजी नगरसेवक महेश पाटील हे प्र.क्र. ८२, अंबिका नगर चे नगरसेवक होते. तर अनुक्रमे सायली विचारे या प्र.क्र. ८३, गोग्रासवाडीच्या नगरसेविका होत्या. तर सुनीता पाटील यांनी प्र.क्र. १११ सागाव सोनारपाडाचे नगरसेवक पद भूषवले आहे. डोंबिवलीतील भाजपचे हे तिन्ही नगरसेवक आता शिवसेनेत दाखल झाले आहेत. आम्ही कुठे तरी कमी पडलो. नगरसेवक का जात आहेत याचे कारण त्यांचे त्यांनाच माहीत असल्याची खंत डोंबिवलीचे भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केली. तर मनसेच्या काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील यावेळी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

-संतोष दिवाडकर