इंधनदरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून मोदींना महागाईचा चषक भेट

कल्याण : इंधनदरवाढीबाबत वारंवार निवेदने देऊन देखील केंद्र सरकारला कोणताही फरक पडत नसल्याने अखेर आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने इंधनदरवाढीच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदींना महागाईचा चषक भेट दिला आहे. महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी आक्रमक झाली असून कल्याण मध्ये राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढत आपला निषेध व्यक्त केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष वंडार पाटील, महिला जिल्हाध्यक्षा सारिका गायकवाड, प्रकाश तरे, संदीप देसाई, योगेश माळी, श्याम आवारे, प्रशांत नगरकर आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते.    

       वाढती महागाई कमी करण्याचे आश्वासन देऊन केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले. मात्र मोदी सरकार सत्तेत आल्यापासून महागाई कमी होण्याऐवजी पेट्रोल, डीझेल, गॅस सिलेंडर यांचे भाव दिवसेंदिवस वाढत आहेत. पेट्रोल आणि डीझेलच्या दरांनी शंभरी पार केली असून घरगुती गॅस सिलेंडर देखील एक हजारच्या घरात पोहोचले आहे. या सर्वामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे चांगलेच मोडले असून वाढत्या महागाईत घर कसे चालवावे हा प्रश्न गृहिणींना पडला आहे. त्यातच गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार बंद असून कोरोना आणि महागाई यामुळे जनता त्रस्त झाली आहे.

       या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून कल्याणमध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांच्या नेत्तृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.  कल्याण पश्चिमेतील राष्ट्रवादी जिल्हा मध्यवर्ती कार्यालय येथून निघालेला हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्टेशन रोड येथून तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदार कार्यालया बाहेर ठिय्या मांडत केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट देण्यासाठी तहसीलदारांना महागाईचा चषक देण्यात आला.    

दररोज वाढणाऱ्या इंधनाच्या किमतींबाबत केंद्र सरकारला वारंवार निवेदने देऊन देखील फरक पडत नसल्याने आणि याची दखल घेतली जात नसल्याने तहसीलदारांमार्फत मोदींना महागाईचा चषक भेट म्हणून देण्यात आला आहे. हे सरकार लोकशाही सरकार नसून हुकुमशाह सरकार असल्याने इंधन दरवाढ केली जात आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकरी आंदोलनाला बसले आहेत त्यांना चिरडण्याचं काम सरकार करत आहे. जोपर्यंत महागाई कमी होऊन जनतेला दिलासा मिळत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील यांनी दिला आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणच्या काळा तलावात तरंगला वृद्ध महिलेचा मृतदेह

कल्याण : पश्चिमेकडील काळा तलाव येथे आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास एका वृद्ध महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी तत्काळ घटना स्थळी धाव घेत याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाच्या मदतीने महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. या महिलेचे वय अंदाचे ६५  वर्ष असल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

कल्याणच्या काळा तलावा आसपास तशी बऱ्यापैकी वर्दळ असते. मात्र रात्रीच्या सुमारास काही वेळेस या ठिकाणी शुकशुकाट असतो. आता तलावात वृद्ध महिलेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ मजली आहे. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी केडीएमसी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या महिलेची अद्याप ओळख पटली नसून ही महिला कोण आहे? ती काळा तलाव परिसरात कशी आली? याचा तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे हा अपघात आहे की घातपात हे लवकरच उघड होणार आहे.

-कुणाल म्हात्रे

शहापूर येथे आधार फाउंडेशन सामाजिक सेवा संस्थे मार्फत सभासद कौटुंबिक मेळावा संपन्न

शहापूर :- आधार फाउंडेशन हे बेरोजगार, बचतगट, शेतकरी, कलाकार, सेवानिवृत्त, विध्यार्थी, पारमार्थिक या सर्वांसाठी कार्यरत असलेली एक सामाजिक सेवाभावी संस्था आहे. आता पर्यंत गोर गरिबांच्या मदतीसाठी नेहमी तत्परतेने कार्य करत आहे.

मंगळवारी श्री संगम येथे पार पडलेल्या मेळाव्यात श्रमदान कर्मसिद्ध व्याख्यान परस्परसंवादाने कार्यक्रमाची सुरवात झाली. संगमेश्वर चे मठाधीपती गोपीनाथ महाराज, प्रति पंढरपूर धणीवली येथील कमळनाथ महाराज, मुरबाड पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ तसेच धनाजी गायकर, नाथाजी शिंदे, आधार फाऊंडेशन चे अध्यक्ष कैलास कोर, राणे सर, संजय घुडे, पद्माकर कोर आदी मान्यवर उपस्तीत होते.

-संदेश दाभणे

कल्याणच्या छम छम मध्ये पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांचा धिंगाणा; महात्मा फुले पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कल्याण :- पश्चिमेतील ताल बार मध्ये रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत ऑर्केस्ट्राबार मध्ये एका पोलिस कर्मचाऱ्यांसह कल्याण डोंबिवली मनपाचे भाजपा माजी उपमहापौर यांच्या भावासह सहा जणांनी गोंधळ घातला. यावेळी त्यांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून बार उशिरापर्यंत सुरू ठेवा अशी धमकी बार मॅनेजरला दिली. याप्रकरणी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात या पोलीस कर्मचाऱ्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण सत्र न्यायालयाने आरोपीना एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे. मंगलसिंह भंवरसिंह चौहान, हरीश्याम सिंह, रिकिन गज्जर, पोलीस कर्मचारी उत्तम घोड़े, विक्रांत बेलेकर आणि  शेखर सरनोबत आरोपींची अशी नावे आहेत .सर्व आरोपी आंबिवली, मोहने, यादवनगर, टिटवाला और हीराबाग-शनिवार पाटीलनगर  मधील रहिवाशी आहेत 

दरम्यान या सहा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. उत्तम घोडे असं या पोलीस कर्मचार्‍याचे नाव असून तो टिटवाळा पोलिस ठाण्यात कार्यरत असून चाळ माफियाकडून हफ्ते वसुली करत आल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि याच चाळ माफिया सोबत हा पोलिस कर्मचारी पार्टी करायला आला होता. हॉटेल मालकाला शेरकी मिरवण्याच्या नादात सर्वत्र स्वतःची बदनामी करून घेतली आहे.

-रोशन उबाळे

कल्याणमध्ये एअरटेल मोबाईल टॉवरसाठी लाखो रुपयांची वीजचोरी; सुयोग टेलेमॅटिक्स विरोधात गुन्हा दाखल

कल्याण : कल्याण पश्चिमेतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी मार्केट) इमारतीच्या छतावर असलेल्या एअरटेल मोबाईल टॉवरसाठी फिडर पिलरमधून थेट वीजचोरी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे. गेल्या सहा महिन्यात टॉवरसाठी ८ लाख १९ हजार रुपये किंमतीची ५६ हजार १५० युनिट वीज चोरून वापरल्याबद्दल मे. सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

वीजचोरी शोध मोहिमेत शिवाजी चौक शाखा एकचे सहायक अभियंता मोहम्मद आरिफ शब्बीर खान, कर्मचारी विलास गायकवाड यांच्या पथकाने ८ ऑक्टोबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सी टाइप इमारतीच्या छतावरील मोबाईल टॉवरच्या वीज पुरवठ्याची तपासणी केली. याठिकणी अधिकृत वीजजोडणी न घेता विनामीटर थेट वीजवापर होत असल्याचे आढळले. सुयोग टेलेमॅटिक्सने एअरटेल मोबाईल टॉवरसाठी काळ्या रंगाची ४० मीटर केबल वापरून फिडर पिलरमधून थेट व अनधिकृतपणे वीजचोरी केल्याचे तपासणीतून उघड झाले.

१८ मे पासून वीज चोरीचा हा प्रकार सुरू असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार वीज चोरीचे देयक व दंड भरण्याबाबत सुयोग टेलेमॅटिक्सला नोटीस बजावण्यात आली. परंतु संबंधित रकमेचा भरणा न झाल्याने सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध सहायक अभियंता खान यांनी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार सुयोग टेलेमॅटिक्स विरुद्ध वीजचोरी गुन्हा दाखल केला आहे.

-कुणाल म्हात्रे

सहजानंद चौकात वृद्धाला चिरडलं; अपघात सीसीटीव्हीत कैद

कल्याण :- कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौंकात कामावर जात असताना एका वृद्धाला भरधाव जाणाऱ्या वाहनाने चिरडले आहे. रविवारी सकाळी वाहनांची रहदारी कमी असल्याने वाहनाने पळ काढला आहे. मात्र चिरडण्याचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याबाबत लवकरच वाहनधारक महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात असणार आहे. या घटने प्रकरणी अज्ञात वाहनधारकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

पश्चिमेतील सहजानंद चौकात रविवारी सकाळी खडक पाडा भागातील सर्वोदय नगर मध्ये राहणारे अनिल महादेव मांडुळकर(६४) हे कामासाठी निघाले असता चौकात भरधाव वाहनाने त्यांना चिरडले. सकाळी रहद्दारी कमी असल्याने याचा फायदा घेत वाहनधारक पळ काढण्यात यशस्वी झाला. मात्र सभोवताली लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात वाहनाचे नंबर फलक आणि किती निर्दयी पणे चिरडले याचे भयावाहक चित्रीकरण झाले आहे. दरम्यान या घटनेचा तपास महात्मा फुले चौक पोलिसांनी सुरू केला असून लवकरच निर्दयीं वाहनचालक ताब्यात असणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने सहजानंद चौक परिसर हादरून गेले होते.

-रोशन उबाळे

पत्रकार कुणाल म्हात्रे गोल्डन प्रेस्टीज पुरस्काराने सन्मानित

कल्याण : नवी मुंबई परिसरात सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या होप मिरर फाउंडेशनच्या वतीने पत्रकारितेतील कार्याबद्दल युवा पत्रकार कुणाल म्हात्रे यांना गोल्डन प्रेस्टीज अवॉर्ड 2021 या पुरस्काराने अंधेरी येथील दिमाखदार कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. यावेळी सिनेअभिनेते अरुण बक्षी, सिनेअभिनेत्री आरती नागपाल, होप मिरर फाउंडेशनचे अध्यक्ष रमजान शेख यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

होप मिरर फाउंडेशनने गुरुवारी पहिला गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार आणि पहिला गोल्डन प्रेस्टीज पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील, एसीपी सुनील बोंडे आणि चंद्रकांत मते हे पुरस्कार सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमाला एकता मंचने पाठिंबा दिला. वर्सोवा, अंधेरी येथे झालेल्या कार्यक्रमात संपुर्ण भारतातील  पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

 सामाजिक कार्यकर्ते सागर उत्वल, शाहनवाज शेख, डॉ नूरी परी, मनीष गुप्ता, सुमन ऑस्कर, अरुणा नाभ, सदफ शेख, सिंधू नायर, स्वामी अभिनंदगिरी महाराज, स्वप्नील शिरसाठ आणि सुंदरी ठाकूर यांना चांगल्या कार्यासाठी कौतुकाचे प्रतिक म्हणून गोल्डन ह्यूमैनिटी पुरस्कार देण्यात आला.  तर समाजकल्याण क्षेत्र सुप्रसिद्ध कलाकार, गायक आणि विनोदी कलाकारांना त्यांच्या उद्योगातील उत्कृष्टतेसाठी गोल्डन प्रेस्टीज पुरस्कार प्राप्त झाला. मीनाक्षी दीक्षित, केट शर्मा, निकिता रावल, व्हीआयपी, गायक दिलीप सेन, संदिप सोपरकर, आरती नागपाल, पंकज बेरी, शर्लिन चोप्रा, शिव्या पठाणिया, पायल घोष, नायरा बॅनर्जी, वेरोनिका वनीज आणि अरुण बक्षी, पत्रकार कुणाल म्हात्रे, मिलिंद जाधव यांना गोल्डन  प्रेस्टीजियस पुरस्कार २०२१ देऊन सन्मानित करण्यात आले.

होप मिरर फाउंडेशन ही नवी मुंबई स्थित सामाजिक संस्था आहे. जी लॉकडाऊन, मार्च २०२० पासून वंचितांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक आणि संचालक रमजान शेख यांनी कृतज्ञता व्यक्त करताना “सामाजिक कार्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या कौतुकास्पद प्रयत्नांचे कौतुक करणे हा हेतू होता. त्यांचे कल्याण करा आणि त्यांचा सन्मान करा या उद्देशाने हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केल्याचे रमजान शेख यांनी सांगितले.

-संतोष दिवाडकर

डोंबिवलीत आघाडीमध्ये बिघाडी? रस्त्याच्या कामातील दर्जा वरून शिवसेना राष्ट्रवादीत तुंबळ हाणामारी

डोंबिवली :- कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुका जस जश्या जवळा येऊ लागल्या तश्या राजकीय पक्षां मध्ये राजकीय वादाचा भडका उडू लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. जनमानसात आपला ठसा उमवटवण्यासाठी राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत. त्याचा एक भाग म्हणून राजकीय पक्षां पक्षांतील कलगीतुरा आणि धुमश्चक्री निर्माण होउ लागल्या आहेत.

डोंबिवली एमआयडीसी भागातील खड्डेमय रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू असल्याने रस्ता दुरुस्ती कामाच्या दर्जा वरून राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष व शिवसेना दोन्हीच्या कार्यकर्त्याची चांगलीच जुंपली व त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले. डोंबिवली शहरातील खड्डेमय रस्त्याचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे. पालिका प्रशासनाकडून खड्डेमय रस्त्याची दुरूस्ती थातूर मातूर पणे केली जात असल्याने अल्पवधीतच रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले दिसून येत आल्याने या रस्त्याच्या कामा बाबत साशंकता व्यक्त केली जात आहे .

डोंबिवली पूर्वेकडील एमआयडीसी निवासी विभागातील कावेरी परिसरात रस्त्याचे काम सुरू असताना एका नागरिकाने रस्त्याच्या कामाच्या दर्जा बाबत विचारणा केली होती. यामुळे सामान्य नागरिकाशी शिवसेनेचे कार्यकर्ते वाद घालत असताना नजीकच असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस डोंबिवली जिल्हा सरचिटणीस तेजस पाटील यांचे कार्यालय असल्याने त्यांच्या कार्यालयात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्यांनी सुरू असलेला वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरू झालेला हा वाद सामान्य नागरिकानंतर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकत्या मध्ये झाला. शाब्दीक बाचाबाची तुन दोन्ही कडुन तुफान हाणामारी झाली. दरम्यान मानपाडा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.

-रोशन उबाळे

कल्याण पश्चिमेत चाळीवर कोसळला अंडर कन्स्ट्रक्शन इमारतीचा लोखंडी रॅम्प

कल्याण :- पश्चिमेतील बिर्ला कॉलेज नजीक कोकण वसाहतीच्या चाळीच्या घरांवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रँम्प ९ रुमवर पडल्याने या रूमचे पत्रे फुटले आहेत. तसेच दोन रुमवर आंब्याचे झाड कोसळल्याने या रूमचे देखील पत्रे फुटल्याची घटना घडली. सुदैवाने दैवबलव्तर असल्याने जिवितहानी टळली. घराचे पत्रे फुटल्याने ११ कुटुबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे या घटनेला जबाबदार कोण? निसर्ग की बिल्डर ? अशी चर्चा सुरू झाली असून कोण भरपाई देणार? असा सवाल निर्माण झाला आहे.


      कल्याण डोंबिवली मध्ये मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कल्याण मधील बिर्ला कॉलेज नजीक कोकण वसाहत चाळ नं ३३ च्या ९ खोल्यांवर १६ मजली  निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रँम्प् (परांची)  संध्याकाळी ८ च्या दरम्यान कोसळला. या घटनेत सुमारे ९ खोल्यांच्या छप्पराचे पत्रे फुटले मात्र सुदैवाने जिवित हानी झाली नाही. वंदना शिर्के, दिपक सुर्वे, वसंती कदम, दिंगबर चिंदरकर, संतोष सुर्वे , दिलिपकुमार चव्हाण, रजंना खरात, जयनंद व्ही कुदंर, राजु उपाध्याय, यांच्या घराचे पत्रे तुटल्याने ऐन दसारा सणाच्या तोंडावर संसार उघाड्यावर पडले  आहेत. तर त्याच परिसरात आंब्याचे झाड पडल्याने अभय धनावडे, श्रीपाद कुलकर्णी यांच्या खोल्याचे पत्रे फुटले.

या दोन्ही घटनेत सुदैवाने जिवितहानी झाली नाही.दरम्यान या नुकसानीला जबाबदार कोण असा सवाल निर्माण झाला आहे याची नक्की कोण भरपाई देणार यासाठी घटनाग्रस्त नागरिक बोलत आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून  आपत्कालीन निधीतून खर्च करावा असा सूर आवळला जात आहे.

-रोशन उबाळे

दूध विक्रेत्या महिलेला लुटून पळाले; उल्हासनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकले

उल्हासनगर :- एका दूध विक्रेत्या महिलेचा पाठलाग करून तिच्याकडील रोख रक्कम जबरीने चोरून पळून जाणाऱ्या चोरट्यांना सापळा रचून उल्हासनगर पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी चोरट्यांकडून ५४ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

उल्हासननगर कॅम्प-३ येथील फॉरवर लाइन चौक येथे एका महिलेचा दुधाचा व्यवसाय आहे. दूध विक्री केल्यानंतर आलेले पैसे घरी घेऊन जात असतांना तीन इसमानी तिच्या हालचालीवर पाळत ठेऊन तिचा पाठलाग केला. आणि मोका साधत रोख रक्कम ५४ हजार रुपये जबरीने चोरून पलयन केले. गुन्ह्याची माहिती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांना मिळताच घटनास्थळी धाव घेऊन संशयीत व्यक्तिंना ताब्यात घेऊन चौकशी केली. यात आरोपी सागर चव्हाण, बॉबी लभाना आणि साथीदार आनंद कांबळे यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून जबरीने चोरी केलेली रोख रक्कम हस्तगत केली आहे. आरोपींना २ दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर सुरडकर यांनी दिली.

-संतोष दिवाडकर