तीन आठवड्यात ४२ हजार थकाबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित; आणखी २ लाख ग्राहक महावितरणच्या रडारवर

कल्याण परिमंडळात गेल्या तीन आठवड्यात वीजबिल थकबाकीपोटी जवळपास ४२  हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. थकबाकीदारांकडून विजबिलाची वसुली अथवा त्यांच्या वीजपुरवठा खंडित करणे, हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील ५०० रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे २ लाख १  हजार ३२  वीज ग्राहक रडारवर असून त्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो. चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून कठीण आर्थिक परिस्थितीत असलेल्या महावितरणला सहकार्य करावे व अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.

गेल्या तीन आठवड्यात कल्याण मंडल एक (कल्याण व डोंबिवली) अंतर्गत ५ हजार ४६५, कल्याण दोन मंडल दोन (उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग) अंतर्गत ७  हजार ९७२, वसई मंडल (वसई व विरार) अंतर्गत १३ हजार २१४  आणि पालघर मंडल (वसई व विरार वगळून उर्वरित पालघर जिल्हा) अंतर्गत १५  हजार २५०  ग्राहकांचा तसेच २५ पाणीपुरवठा योजना व १४९  पथदिवे जोडणीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यातील २० हजार २११ ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुनरजोडणी शुल्काचा भरणा करून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला आहे. तर सप्टेंबर महिन्यापूर्वी १ लाख ६५ हजार थकाबाकीदारांचा शिवाय ३११ पाणीपुरवठा योजना व ७८६ पथदिवे जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

कल्याण परिमंडलात सर्व वर्गवारीतील ६ लाख ७२ हजार ग्राहकांकडे ६६९ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. या थकबाकीदार ग्राहकांनी तातडीने वीजबिल भरून महावितरणला संकटाच्या काळात सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले आहे. वीजपुरवठा खंडित केल्यानंतर चालू वीजबिल व थकबाकी तसेच पुनरजोडणी शुल्क भरल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत केला जाणार नाही. थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. या ग्राहकांनी शेजारून अथवा परस्पर जोडणी किंवा अन्य माध्यमातून विजेचा अनधिकृत वापर केल्याचे आढळल्यास थेट कारवाई करण्यात येणार आहे. याची परिमंडलातील सर्व वीज ग्राहकांनी नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

‘ड’ प्रभाग कार्यालयाने केली ६५ अतिक्रमणावर धडक कारवाई; नव्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांचे निर्देश

‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या हद्दीत दुकान मालक आणि फेरीवाल्यांनी पथ रस्ते अडविल्याने नागरिक वाटसरू यांना वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे प्रभाग क्षेत्र अधिकारी सविता हिले यांनी पदभार स्वीकारून काही दिवस झाले असतांना कुठल्याही दबावाला न जुमानता पूना लिंक रोड श्रीराम टॉकीज ते चक्की नाका मलंगगड रोड परिसरातील फेरीवाले आणि ६५ अतिक्रमणे हटवले आहेत.

जेसीबी आणि इतर साहित्य तसेच पालिका कर्मचारी यांचा लवाजमा घेऊन ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे कल्याण पूर्वेच्या मुख्य रस्त्याने तात्पुरता मोकळा श्वास घेतला आहे. अशी कारवाई नेहमी करण्यात यावी अशी स्थानिक नागरिक व वाहन धारक, प्रवासी यांनी मागणी केली आहे.

कल्याण पूर्वीतील पूना रोड परिसरातील श्रीराम टॉकीज ते चक्की नाका, चेतना शाळा, मलंगगड रोड भागात मुख्य रस्त्यावर दुकान मालक व फेरीवाले यांनी पथ रस्ते वर शेड कोणी वाढीव बांधकाम केल्याने वाटसरू आणि नागरिक याना रस्त्याने चालताना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे आता ‘ड’ प्रभाग कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लवाजमा घेऊन धडक कारवाई केली आहे.

नवनियुक्त प्रभाग क्षेत्र अधिकारी सविता हिले व पथक विभागातील जयेश काळण, उमेश जाधव, संजय पवार, सुमित गायकर, समीर ठाकूर, हरेश बुचाडे व इतर कर्मचाऱ्यांनी श्रीराम टॉकीज, खडेगोळवली, अपर्णा डेरी पूनालिंक रोड ते चक्कीनाका, व पुढे चेतना शाळा, मलंगगड रोड वरील ६५ अतिक्रमणे,वाढीव बांधकामे जेसीबी आणि मनुष्यबळाच्या साहाय्याने निष्कासित करण्यात आली आहेत. या धडक कारवाई ने कल्याण पूर्वेतील मुख्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.

-रोशन उबाळे

माणेरे गावात गावठी दारू सह हजारो लिटर नवसागर मिश्रित रसायन केले नष्ट; राज्य उत्पादन शुल्क विभगाच्या भरारी पथकाची कारवाई

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कोकण आणि ठाणे भरारी विभागीय पथकाने कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील माणेरे गावात धडक कारवाई करत ६० लिटर गावठी दारू तर ६३ हजार ३०० लिटर नवसागर मिश्रित रसायन नष्ट केले आहे. एकाच दिवशी एकूण १४ लाख ६० हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल नष्ठ केला आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले असून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आवश्यक असे साहित्य नसल्याने कारवाई दरम्यान पथकांना मोठी अडचण निर्माण होत असे. मात्र आता कारवाई साठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ताफ्यात अत्याधुनिक इंजिन आणि ड्रोन उपलब्ध झाले असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांना कारवाई करणे आणि दारू निर्मितीचे तळ शोधण्यात यश हे जलदगतीने येत आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग देखील स्मार्ट झालेले दिसून येत आहे.

गावठी दारू हि ग्रामीण भागातून शहराकडे घेऊन जात असताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला सापडताच ४० लिटर दारू सह दुचाकी पथकाला कल्याण मध्ये मिळाली आहे. मात्र या गाडीवरील चालक दारू माफिया  हा फरार झाला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे विभागीय दुय्यम निरीक्षक आर.एन.राणे हे करत आहेत.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; ३० जनांचा समावेश

डोंबिवली शहरात धक्कादायक अशी घटना घडली आहे. भोपर परिसरातील एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तब्बल ३० जणांनी या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने देशभरात घटनेसह खळबळ माजली आहे.

पीडित अल्पवयीन तरुणी हिचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. मात्र या तरुणाने प्रेमाचे अमिश दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध बनवले. यादरम्यान त्याने शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ चित्रित केला. यानंतर याच व्हडीओच्या माध्यमातून या नराधमाने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत त्याने त्याच्या मित्रांकडून लैंगिक अत्याचार सहन करण्यास भाग पाडले. २९ जानेवारी पासून आजतागायत ९ महिने तिच्यावर डोंबिवली,बदलापूर, मुरबाड,रबाळे अशा विविध ठिकाणी नेऊन लैंगिक अत्याचार सुरू होते. तब्बल ३० जणांकडून या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले.

गुन्हा नोंद झालेल्या आरोपींपैकी २३ जनांना डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील २ आरोपी हे नाबालिग आहेत. पीडित तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. दरम्यान पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होऊ नये म्हणून राजकीय पक्ष्याच्या नगरसेवकांचा दबाव होत असल्याचे देखील बोलले जात आहे. या गंभीर प्रकरणात कोणत्या राजकीय व्यक्ती दडपशाही करीत होत्या ही बाब देखील तपासा नंतर उघडकीस येणार आहे. दरम्यान भाजप महिला नेत्या चित्रा वाघ या तात्काळ डोंबिवली कडे निघाल्या असून या प्रकरणाला राजकिय वलय प्राप्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

या गुन्हयाचे गांभीर्य पाहता अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण दत्तात्रय कराळे यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त परीमंडळ ३, कल्याण सचिन गुंजाळ यांनी लागलीच तपास चालु केला. परीमंडळ ३, कल्याण मधील इतर पोलीस ठाण्याचे तसेच मानपाडा पोलीस ठाण्याची एकंदर ०४ पोलीस पथके स्थापन करुन या गुन्हयातील आरोपींची पुर्ण नांवे व पत्ते माहिती नसतानाही गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणाचे आधारे नमुद गुन्हयात २३ आरोपीत यांना गुन्हा दाखल होताच ४ तासात ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी करुन त्यांना गुन्हयात अटक केली आहे. या प्रकरणात जे जे समाविष्ट आहेत व ते कोणत्याही मोठ्या पदावर असले तरी त्यांची गय केली जाणार नाही असे अप्पर पोलीस आयुक्तांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

-संतोष दिवाडकर

डोंबिवलीत अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई !

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यापूर्वीच दिलेल्या निर्देशानुसार ई प्रभाग सहा. आयुक्त भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व, देसलेपाडा येथील विकासक विकास राठोड, जागा मालक अशोक म्हात्रे यांचे तळ अधिक ३ मजली चालू असलेल्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. या बांधकाम धारकास यापूर्वी ते बांधकाम निष्कासित करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती. ही कारवाई अतिक्रमण निर्मुलन विभागाचे कर्मचारी, महापालिकेचे पोलीस कर्मचारी आणि १ पोकलेन, ४ कॉम्प्रेसर व २ ब्रेकर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

त्याचप्रमाणे ग प्रभागातही सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी डोंबिवली पूर्व येथील टावरेपाडा, नांदीवली येथे चालू असलेले अक्षय सोलकर यांच्या तळ अधिक ७ मजली इमारतीचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई आज सुरु केली. हि कारवाई सहा.आयुक्त भरत पाटील यांच्यासह संयुक्त रित्या अतिक्रमण निर्मूलन विभागातील कर्मचारी व पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने तसेच ४ कॉम्प्रेसर यांच्या सहाय्याने करण्यात आली.

आय प्रभागातही विभागीय उप आयुक्त बाळासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे आडीवली-ढोकळी गावठाण येथील विकासक जगदंब सिंग राणा यांच्या तळ अधिक ४ मजली अनधिकृत इमारतीवर, सहा. आयुक्त, आय प्रभाग राजेश सावंत यांनी निष्कासनाची कारवाई केली. हि कारवाई ४ ब्रेकर, १ जेसीबी, 1 गॅस कटर यांच्या सहाय्याने करण्यात आली. यासमयी आय प्रभाग अधिक्षक किशोर खुताडे, ड प्रभाग सहा आयुक्त सविता हिले, क प्रभाग सहा आयुक्त संजय साबळे, अधिक्षक सुखदेव धापोडकर, मानपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

कल्याण फाटा – महापे उड्डाण पूल ४ लेन करण्याचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर व अंबरनाथकरांचा प्रवास अधिक वेगवान होणार असून कल्याणफाटा-महापे उड्डाण पूल ४ लेन करण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. ऐरोली काटई एलिव्हेटेड प्रकल्पातल्या अडचणी दूर झाल्या असून   शिळफाटा येथे लवकरच उड्डाणपुलाचे तर  कल्याणफाटा येथे अंडरपास व उड्डाणपुलाच्या कामास ऑक्टोबर पासून सुरवात होणार आहे.

नगरविकासमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, एम.एम.आर.डी.ए. आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत कल्याण लोकसभा मतदारसंघात  एम.एम.आर.डी.ए.च्या अंतर्गत सुरु असलेल्या कामांबाबत बैठक घेण्यात आली. ऐरोली काटई मार्गातल्या दुसऱ्या बोगद्याचे काम वेगात सुरु असून ऐरोली बाजूस असलेल्या बोगदातल्या मार्गात “विजेच्या टॉवर” (ट्रान्समिशन टॉवरमुळे) कामांमध्ये अनेक अडचणी सामोरे जावे लागत होते. आज बैठकीत सदर टॉवर दुसऱ्या जागी हलवण्यासाठी वनविभागाने मंजुरी दर्शवली असून टॉवरची पर्यायी जागा वनविभागातर्फे उपलब्ध करून दिली जाणार आहे.

 ह्या एलिव्हेटेड प्रकल्पामुळे नवीमुंबई आणि कल्याण-डोंबिवली हि शहरे एकमेकांना जोडली जाणार आहेत. ह्या नवीन मार्गामुळे शिळफाटा येथील वाहतूक कोंडी टळणार असून ऐरोली ते काटई हे अंतर अवघ्या १५ मी. मध्ये पार करणे शक्य होणार आहे. “ऐरोली ते मुंब्रा येथील व्हायजंक्शन पर्यंतचा टप्पा पुढील वर्षात वापरासाठी खुला होईल” असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

कल्याण फाटा व शिळफाटा येथे अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीपासून सुटका व्हावी ह्यासाठी कल्याण शिळफाटा येथे उड्डाणपूल व कल्याणफाटा येथे अंडरपास आणि ओव्हरब्रिजचे काम ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरु करण्यात येईल. कल्याण फाटा येथे ग्रेड सेपरेशन  ह्या प्रणाली द्वारे मुंब्रा बायपास  येथून येणारी वाहतूक अंडरपास द्वारे तळोजा-पनवेल मार्गाकडे जाण्यास मदत होईल व डोंबिवली-नवीमुंबई वाहतुकीसाठी कल्याणफाटा येथेच उड्डाणपुलाच्या उभारणी करण्यात येणार आहे.

 कल्याणफाटा येथील उड्डाणपुलासाठी शिळफाटा-महापे मार्गातल्या एम. आय. डी. सी. च्या पाईपलाईन पर्यायी जागी स्थलांतरित करणे गरजेचे होते परंतु पाईपलाईन स्थलांतरित करणे अतिशय खर्चिक असल्या कारणाने कल्याण फाटा येथील उड्डाणपुलाचे अलाईंगमेंट बदलण्यात येणार आहे व हा उड्डाणपूल महापे येथील एम.आय.डी.सी. ची पाईपलाईन ओलांडून महापे-शिळफाटा  मार्गावरच उतरवण्यात येईल. सुमारे ९० कोटीचा हा उड्डाण पूल फक्त ३ लेनचा न करता तो ४ लेन करावा अश्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या व ४ लेन साठी अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यास एम.एम.आर.डी.ए. च्या आयुक्तांनी संमती दर्शवली आहे.

४ लेन उड्डाणपुलाच्या कल्याणफाटा येथील वाढीव जमीन अधिग्रहणाबाबत ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत लवकरच एक बैठक घेण्यात येईल असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे ह्यांनी बैठकीत सांगितले. पत्रीपूल व दुर्घडी किल्ल्याजवळील खाडीपुलाच्या उभारणी नंतर निळजे येथील उड्डाणपुलाचे कामसुद्धा प्रगतीपथावर आहे.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत सुरू होणार पासपोर्ट सेवा केंद्र; जवळच्या शहरातील नागरिकांना दिलासा

कल्याण लोकसभेचे प्रतिनिधित्व करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सन २०१७ पासूनच्या पाठपुरव्यानंतर डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी मंजुरी मिळाली व लवकरात लवकर हे केंद्र सुरू व्हावे, यासाठी खासदार डॉ. शिंदे नेहमीच तत्पर होते. परंतु जागेअभावी सदर पासपोर्ट सेवा केंद्रास विलंब होत होता, त्यानंतर डोंबिवली एम.आय.डी.सी येथील पोस्ट ऑफिसची निवड करण्यात आली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सतत पाठपुरावा केला असून त्यांच्या पाठपुराव्याला अखेरीस यश प्राप्त झाले, परंतु त्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी विलंब झाला. त्यासाठी खा. शिंदे यांनी लोकसभा अधिवेशनदरम्यान संचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांची भेट घेतली असता डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करण्यासाठी दिरंगाई न करता लवकरच लवकरच पासपोर्ट सेवाकेंद्र सुरु करण्याचे आश्वासित केले. आणि ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डोंबिवली पासपोर्ट सेवा केंद्र सुरु करणार असल्याचे संचार राज्य मंत्रालयाकडून खा. डॉ. शिंदे यांना सूचित करण्यात आले असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले आहे.

केंद्र सरकारच्या गेल्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिवंगत परराष्ट्रमंत्री मंत्री स्वराज यांचेकडे सातत्याने पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली एम आय डी सी येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळवली. यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी परराष्ट्र मंत्रालय व टपाल खात्यांचे मनपूर्वक आभार मानले आहे.

       ठण्यामधील पासपोर्ट सेवा केंद्र हे संपूर्ण एम एम आर प्रदेशातील एकमेव सेवा केंद्र असल्यामुळे या सेवा केंद्रावर मोठा ताण पडत होता. तसेच नागरिकांनाही लांब अंतरावरून यावे लागत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होते. त्यामुळे आता डोंबिवली एम.आय.डी.सी. येथील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यास ठाणे जिल्ह्यातील उपनगर शहरांना खासकरून कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर व इतर उपशहरांना त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

-कुणाल म्हात्रे

नाका बंदी दरम्यान दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत; विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी

कल्याण पूर्व तिसगाव नाका परिसरात नाका-बंदी दरम्यान दुचाकीवर जाणाऱ्या एका तरुणाच्या डोक्यावर वाव पोलीस कर्मचाऱ्याने काठी घातल्याचा आरोप केला जात आहे. बाईकस्वराच्या डोक्यावर काठी लागल्याने या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तरुणावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. विनाकारण मारहाण केल्याचा आरोप तरुणाने केला असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.

कल्याण पूर्व चक्की नाका परिसरात राहणारे
निलेश कदम, भुपेंद्र झुगरे हे दोघे सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दुचाकीने कल्याण पूर्व येथून उल्हासनगर च्या दिशेने जात होते. याच दरम्यान तिसगाव नाका येथे कोळशेवाडी पोलिसांची चेकिंग सुरू होती. निलेश व भुपेंद्र जात असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने काठीने निलेश याच्या डोक्यात मारले असल्याचे तरुणाकडून सांगण्यात आले. दरम्यान निलेश च्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला दहा टाके पडले आहेत. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यास गेलेल्या तरुणांचा पोलिसांनी गुन्हा नोंद केला नसल्याचे सोमवारी रात्री माध्यमांशी बोलताना त्याने सांगितले आहे.

-रोशन उबाळे

गणेश मंडपात शॉक लागून तरुणाचा मृत्यू; कल्याण बेतूरकरपाडा परिसरातील दुर्घटना

विसर्जनासाठी गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढत असताना विजेचा जोरदार झटका लागल्याने गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना कल्याण पश्चिमेतील बेतूरकर पाडा येथील एव्हरेस्ट नगर येथे घडली. प्रशांत चव्हाण (28) असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

कल्याण पश्चिमेच्या बेतूरकर पाडा, एव्हरेस्ट नगर परिसरात गेल्या ३८  वर्षांपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदाही या मंडळाकडून भक्तीभावपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. रविवारी संध्याकाळी या मंडळात विसर्जनाची तयारी सुरू होती. त्याचवेळी जोरदार आलेल्या पावसामुळे मंडपातील लाईट चालू बंद होऊ लागले. ते पाहण्यासाठी मंडळाचा कार्यकर्ता प्रशांत चव्हाण पुन्हा मंडपात गेला आणि तिकडे तपासणी सुरू असताना त्याला विजेचा जोरदार शॉक लागला. त्याचा ओरडण्याचा आवाज ऐकून इतर कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली असता प्रशांत खाली पडल्याचे त्यांना दिसून आले. क्षणाचाही विलंब न दवडता कार्यकर्त्यांनी त्याला  रुग्णालयात नेले. मात्र उपचारादरम्यान प्रशांत मृत्यू झाला. या घटनेमुळे एव्हरेस्ट नगर परिसरात शोककळा पसरली आहे.

-कुणाल म्हात्रे

घरगुती गणपतीला शैक्षणिक साहित्याची आरास; विसर्जनानंतर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना वाटप

गणेशोत्सव म्हटलं की सर्वांचा आनंदाचा उत्साहाचा सण. गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी समाजप्रबोधन आणि जनजागृतीसाठी गणेशोत्सवाची सुरूवात केली. हा उत्सव आणखी द्वीगुणीत व्हावा यासाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन जयवंत पाटील यांच्या घरगुती गणपती उत्सवादरम्यान शैक्षणिक साहित्यांची आरास केली जाते. गणेशमूर्ती विसर्जनानंतर मखरातील सजावटीचे शैक्षणिक साहित्य आणि काही गणेश भक्तांकडून प्राप्त झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाते.

दरवर्षी प्रमाणे यंदादेखील अशाच दुर्गम भागातील तुंगारेश्वर पर्वतरांगेतील,तालुका भिवंडी येथील जि.प.शाळा पालिवली येथील आदिवाशी पाड्यातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना सदरील शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे शैक्षणिक साहित्याची मखर सजावट आणि याच शैक्षणिक साहित्य वाटपाची संकल्पना येथील काही शिक्षकांनाही आवडली असून तेही आपल्या घरगुती गणेशोत्सव काळात राबवत आहेत. यावेळी सर्व पक्षिय युवा संघटनेचे प्रमुख संघटक तथा शिक्षणप्रेमी गणेश पाटील, गजानन पाटील, मधुकर माळी, शिवाजी माळी, मंगेश खुटारकर, युवराज पाटील आदी जण उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे