मंदिरे उघडण्यासाठी कल्याण पूर्वेतील तिसाई मंदिरात भाजपाचे शंखनाद आंदोलन

कोरोना निर्बंधांमुळे राज्यात बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी कल्याण पूर्वेतील तिसाई जरी मरी मंदिर येथे भाजपाच्या वतीने शंखनाद आंदोलन करण्यात आले. मंदिर हम खुलवायेंगे धर्म को न्याय दिलायेंगे अशा घोषणा देत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येथील मंदिराचे दार उघडत आत जाऊन पूजा अर्चा केली.

संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रात ठाकरे सरकारने बार सुरू आणि मंदिर -धार्मिक स्थळे बंद असे काळे चित्र उभे केले आहे. या काळ्या निर्णयाविरेधात आणि मंदिरे-धार्मिक स्थळे तातडीने उघडावीत या मागणीकरिता महाराष्ट्रातील प्रमुख धर्मांचार्य, साधु-संत, अनेक धार्मिक संघटना यांसह पुरोहित, फुल-प्रसाद विक्रेते एकत्र येत अध्यात्मिक समन्वयक आघाडी च्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे व आमदार गणपत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली भाजप कल्याण पूर्व मंडळाअंतर्गत जागृत देवस्थान तिसाई मंदिर, तिंसगांव, कल्याण पूर्व येथे टाळ, घंटा, शंख वाजवत ‘मंदिर हम खुलवायेंगे। धर्म को न्याय दिलायेंगे।। हा नारा देत मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

यावेळी कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरे, नगरसेवक अभिमन्यू गायकवाड, परिवहन समिती माजी सभापती सुभाष म्हस्के, ह.भ.प चंद्रकांत सांगळे महाराज, कल्याण पूर्व मंडल सरचिटणीस नितेश म्हात्रे, अरुण दिघे, संदीप तांबे, पांडुरंग भोसले, गुड्डू खान, नगरसेविका हेमलता पावशे, अॅड. राखी बारोद आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

-कुणाल म्हात्रे

वाहनं चोरणारा अल्पवयीन चोर अडकला कल्याण क्राईम ब्रांचच्या पिंजऱ्यात

शनिवार दि.२८ ऑगस्ट रोजी एक इसम डोंबिवली परिसरात एक चोरीची ऑटो रिक्षा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांचला त्यांच्या गुप्त माहितगाराच्या मदतीने प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे क्लासिक हॉटेलच्या समोर मानपाडा रोड येथे सापळा रचला. आणि या सापळ्यात पिंजऱ्यात उंदीर फसावा तसा हा चोर अडकला.

या इसमास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने विक्रीसाठी आणलेली रिक्षा ही चोरीची असल्याची माहिती दिली. या दरम्यान त्याचे वय १७ वर्षे असून तो अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्याचबरोबर तो मुंब्रा येथे राहणारा असल्याची माहिती देखील त्याने पोलिसांना दिली. संशयित विधिसंघर्षीत आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याच्याकडुन तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केलेल्या ऑटोरिक्षा ताब्यात घेण्यात आल्या. एकुण २,३०,०००/- किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला. याबरोबरच त्याच्यावर दाखल असल्याच्या गुन्ह्याची तपासणी केली असता एकूण सात गुन्हे ह्या आरोपीवर दाखल असून तीन गुन्हांची उकल कल्याण क्राइम ब्रांचने करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

विधिसंघर्षीत बालकास कासावडवली पोलीस ठाणे येथे मुददेमालासह पुढील कायदेशीर कारवाई करिता ताब्यात देण्यात आले. या यशस्वी कामगिरीत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा घटक ३ कल्याणचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, पोलीस उप निरीक्षक मोहन कळमकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन साळवी, राजेंद्र खिलारे, दत्ताराम भोसले, मंगेश शिर्के, प्रकाश पाटील, पोलीस शिपाई अजितसिंग राजपूत, सचिन वानखेडे, मिथुन राठोड, गुरुनाथ जरग, गोरक्ष शेकडे, राहुल ईशी आदींचे महत्त्वाचे योगदान आहे.

-संतोष दिवाडकर

‘मनसे सोबत युती नुकसानकारक, हे मी भाजपाला सांगणार आहे’ – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे रविवार दि.२९ ऑगस्ट रोजी कल्याणमध्ये आले होते. आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ समाजसेवक देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सवास ते उपस्थित राहिले होते. यावर त्यांना मनसे आणि भाजपा युती बाबत माध्यमांकडून रिपाईची भूमिका काय असेल अशी विचारणा केली होती. त्यावेळी ही युती अशक्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

मनसेची भूमिका ही मराठी माणसाप्रति कट्टर आहे. भाजपा हा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यामुळे मनसेशी युती करणे हे भाजपला परवडणारे नसून या युतीमुळे भाजपचे नुकसान होईल असा तर्क केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी लावला आहे. जर मनसे सोबत युती करण्याचे विचार भाजपा कडून होत असेल तर मी युती न करण्याबाबत त्यांना सांगणार आहे. रिपाई असताना राज ठाकरेंच्या पक्षाची काही आवश्यकता नाही. मुंबईत इतर भाषिक लोक आहेत आणि त्यांचं समर्थन आमच्या युतीला आहे.

आगामी काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत देखील रिपाई भाजपा सोबतच असणार आहे. आमच्या पक्षाला जागावाटपात अधिकाधिक जागा मिळण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत. असे आठवले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. त्याचबरोबर राज्यात शिवसेना, भाजपा, रिपाई महायुतीचं सरकार पुन्हा येऊ शकतं असाही दावा त्यांनी यावेळी केला.

-संतोष दिवाडकर

पुन्हा येऊ शकतं शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुती सरकार; कल्याण मध्ये रामदास आठवलेंनी केला दावा

राज्यातील राजकारणात शिवसेना, काँग्रेस राष्ट्रवादीने महाविकास आघाडी तयार करून सत्ता स्थापन केलेली आहे. पण त्या अगोदर अनेक वर्षे शिवसेना भाजप एकत्र राहिली आहे. आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये. मला असं वाटत की शिवसेना, भाजप आणि आरपीआय महायुती सरकार पुन्हा येऊ शकते. अडीच वर्षांच्या फॉर्म्युल्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. एकत्र बसून पुन्हा काही मार्ग काढता येतो का त्यावर चर्चा होऊ शकते असे प्रतिपादन केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज कल्याण येथे केले। आहे.

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते देवचंद अंबादे यांच्या अमृत महोत्सव प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना आठवले यांनी उद्गार काढले. मलंगगड रोडवरील हॉटेल कशीश इंटरनेशनल येथे आज (दि.२९ ऑगस्ट) या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले  होते. दरम्यान यावेळी भाजप शिवसेनेच्या वादात होणारे शाब्दिक चकमक वर भाष्य करीत  प्रतिक्रिया दिली. शिवसेना व नारायण राणे यांच्यात सुरू असलेल्या वादावरून रामदास आठवले यांनी बोलताना सांगितले की, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटला पाहिजे. अशा पध्दतीचे वाद आपल्याला चालणार नाही. महाराष्ट्राच्या विकासासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. केंद्र आणि राज्यमार्फत हा वाद मिटला गेला पाहिजे.

नारायण राणे यांच्या वरील कारवाई ही सत्तेचा गैरवापर असून  हा  नारायण राणे यांच्यावर अन्याय आहे. असे या प्रसंगी त्यांनी बोलताना सांगितले. अशा पध्दतीने कारवाई करणे योग्य नाही असेही ते म्हणाले. शिवसेनेकडून वापरण्यात येणारी भाषाच नारायण राणे  बोलले. ही भाषा ही शिवसेनेची भाषा आहे व यांच्यातच त्यांचे आयुष्य गेलेलं आहे. त्यांचे एवढे वक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नव्हती. दोघांकडून एकमेकांवर आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. असे ही शेवटी बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले. क.डों.म.पा. निवडणूक काही महिन्यांवर आली असून आरपीआयची देखील तयारी सुरू झाली असे म्हणायला हरकत नाही.

-रोशन उबाळे

तथाकथीत महिला पत्रकाराला खंडणी प्रकरणी अटक; हॉटेलच्या कारभारावर देखील प्रश्नचिन्ह

कल्याण डोंबिवलीत खंडणीखोर तथाकथित पत्रकारांमुळे खऱ्या व इमानदार पत्रकारांना नामुष्की सहन करावी लागत आहे. एका तथाकथित महिला प्रतिनिधीला १ लाख रुपयांची मागणी केल्यानंतर २० हजार रुपये घेतांना खडक पाडा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. हॉटेल मालकाकडे दरमहिन्याला १ लाख रुपये देण्याची धमकी देत हॉटेल बंद करण्याचा इशारा तिने दिला होता. यानंतर हॉटेल मालकाने तक्रारी नंतर २० हजार रुपये घेताना योगिता जोशी हिला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली मध्ये युट्युब चॅनल बनवून त्या व्दारे खंडणी वसुलीचा प्रकार मोठ्या प्रमाणात फोफावत असून खऱ्या पत्रकारांना यांच्यामुळे काही प्रमाणात नामुष्की आणि मुसकट दाबी होतांना दिसत आहे.

कल्याण पश्चिमेतील मुक्तीनगर मध्ये  चस्का हॉटेल मालका कडे दरमहा १ लाख रुपये देण्याची धमकी दिली होती. नाही दिले तर हॉटेल चालू देणार नाही अशी बतावणी केली होती. यानंतर मालकाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर प्रतिनिधी महिला योगिता जोशी हिला २० हजार रुपये घेतांना पोलिसांनी अटक केली. मात्र या चस्का हॉटेल मध्ये असे नेमके काय चालते की मालका कडे युट्युब चॅनल चालवणारी तथाकथित महिला पत्रकार १ लाख मागते याकडे ही सर्व कल्याणकराचे लक्ष गेले आहे. त्यामुळे महिलेच्या चौकशी बरोबरच या हॉटेलच्या कारभाराची देखील चौकशी होणे गरजेचे आहे. योगीता जोशी हिने मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन साठी अर्ज केला होता मात्र न्यायालयाने तो फेटाळला असल्याने शनिवारी दुपारी खडक पाडा पोलिसांनी तिला अटक केली आहे.

-रोशन उबाळे

मलंगगड भागात डोहात बुडून तरुणाचा मृत्यू; दीड महिन्यांत पाचवा बळी

मलंगगड भागातील कुशिवली नदीच्या डोहात एका तरूणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली आहे. मागील दीड महिन्यातील बुडून मृत्यू होण्याची ही तिसरी घटना आहे. या अगोदर चार लोकांचा बळी गेला होता व त्यानंतर आता आणखी एकाला जलसमाधी मिळाली आहे.

डोंबिवली सागाव मधील हा तरुण या ठिकाणी विकेंड निमित्त पर्यटनासाठी आला होता. याचदरम्यान नदीपात्रात पाय घसरून त्याचा तोल गेला आणि तो पाण्यात पडला. पोहता येत नसल्याने या तरुणाचा बुडून झाल्याचे सांगण्यात येते. विवेक मेहरा असं बुडालेल्या तरुणाचं नाव आहे. तो आपल्या एका मित्रासह या ठिकाणी आला होता. दोघेजण विकेंडचा आनंद घेण्यास आले होते मात्र त्यांचा हा आनंद दुःखात परिवर्तित झाला. डोहात बुडून या तरुणाला आपले प्राण गमवावे लागले. यानंतर हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पर्यटकांच्या बेजबाबदारपणामुळे मलंगगड भागात या वर्षी मृत्यूंची शृंखला सुरू असल्याचे दिसत आहे. या अगोदर याच भागातील दोन स्थानिक नाबालिकांचा नेवाळी जवळील तलावात बुडून मृत्यू झाला होता. व त्यानंतर कल्याण पूर्वेतील दोन तरुणांचा बंधारा भागात बुडून मृत्यू झाला होता. या दोन घटनांत चार जणांनी प्राण गमावले होते. व त्यानंतर आज अशाचप्रकारची ही तिसरी घटना समोर आली आहे. यामुळे ही मालिका थांबवावी कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

-संतोष दिवाडकर

दुर्बुद्धी सुचली आणि डोंबिवली ठाकुर्ली रेल्वे रुळावर मांडली दगडं

डोंबिवली व ठाकुर्ली स्थानका दरम्यान गुरुवारी एक धक्कादायक घटना घडली. रेल्वे रुळावर कोणीतरी भरपूर दगड मांडून ठेवल्याचे सुरुवातीला निदर्शनास आले. यानंतर प्रशासनाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि हे दगड बाजूला केले. हे कृत्य कुणी केले याबाबत सुरुवातीला मात्र पोलिसांकडे कसलीही माहिती नव्हती.

गुरुवार २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ च्या सुमारास रेल्वेच्या ट्रॅकवर १५-२० दगड ठेवल्याचे आढळले होते. आरपीएफ, जीआरपी आणि स्टेशन मास्तर यांनी घटनेचे परीक्षण केले. यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीगार वापरून तांत्रिक शोध घेत एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. त्याच्या साथीदाराच्या मदतीने डोक्यात दुर्बुद्धी आली म्हणून खोडसाळपणाने त्याने असे केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र त्याच्या या खेळामुळे मोठा अनर्थ देखील होऊ शकला असता. त्यामुळेच डोंबिवली रेल्वे पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू ठेवला असून दुसऱ्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे. या अगोदर रेल्वेवर खोडसाळपणे दगडफेक केली जात होती मात्र आता चक्क रुळाखालची दगडीच रुळावर मांडल्याने खळबळ माजली आहे.

स्टेशन मास्तरांनी स्लॉ डाऊन ट्रॅकवर दगडं ठेवली असल्याची माहिती दिली. यानंतर आम्ही आरपीएफ, जीआरपी आणि स्टेशन मास्टर अशा सर्वांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ट्रॅक खाली लहान मोठी दगडं असतात. असे १५-२० दगडं त्यावेळी ट्रॅकवर होते. या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी तपासादरम्यान परिसरातील फुटेज काढल्यानंतर एका संशयिताला ताब्यात घेतलं. हा आरोपी अल्पवयीन आहे. आता या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे. इतर आरोपी सापडल्यास त्यांच्यावरही पुढील कारवाई करण्यात येईल.

– मुकेश ढगे (पोलीस निरीक्षक)

-संतोष दिवाडकर

लसीकरण केंद्रावर टोकनचा काळाबाजार? कमी टोकन देत असल्याचा नागरिकांचा आरोप

कोरोना पासून बचावासाठी आवश्यक असणाऱ्या लसींचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासात राज्य सरकारने मुभा दिल्यानंतर लसीकरण केंद्रांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळत आहे. मात्र या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध लसींच्या तुलनेत कमी टोकन देत असल्याने लसींच्या टोकनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

      कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत लसींचा तुटवडा नेहमीच जाणवत असतो. आठवड्यातून केवळ २ ते ३ दिवसच लस उपलब्ध होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. २७ गावांमध्ये असलेल्या पिसवली प्रभागात मोठी लोकसंख्या असून येथील नागरिकांच्या सोयीसाठी पेन्थोन स्कूल याठिकाणी शुक्रवारी लसीचे ३०० डोस उपलब्ध करण्यात आले होते. यामध्ये २० डोस हे ऑनलाईन पद्धतीसाठी तर उर्वरित २८० डोस हे ऑफलाईन पद्धतीने नागरिकांसाठी ठेवण्यात आले होते. असे असतांना २०० नागरिकांना देखील लसीचे टोकन देण्यात आले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिक रणजीत उघाडे यांनी केला आहे.

      प्रत्येक लसीकरण केंद्रावर देण्यात येणाऱ्या लसींच्या तुलनेत नागरिकांना कमी टोकन देण्यात येतात. तसेच स्थानिक नागरिकांव्यतिरिक्त बाहेरील नागरिक देखील या लसीकरण केंद्रावर येत असल्याने स्थानिकांना मात्र लसीपासून वंचित रहावं लागत आहे. याबाबत लसीकरण केंद्रावरील संबंधित अधिकाऱ्यांना नागरिकांनी विचारले असता काही डोस हे पालिका कर्मचाऱ्यांसाठी ठेवले असल्याचे सांगण्यात आले. लसीकरण कार्यक्रम सुरु होऊन कित्येक महिन्यांचा कालवधी लोटला असतांना अद्यापही पालिका कर्मचारी लसीपासून वंचित कसे असा सवाल या नागरिकांनी उपस्थित केला आहे. तसेच महापालिकेने आधी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचा उपरोधिक टोला देखील स्थानिक नागरिक रणजीत उघाडे यांनी लगावला आहे.

-कुणाल म्हात्रे

आता सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र असणार सुरु

ग्राहकांना वीजबिलाचा भरणा करणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी सार्वजनिक व साप्ताहिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्याचे निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडल कार्यालयांतर्गत महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुटीच्या दिवशी सुरु राहतील. ही उपलब्ध सुविधा किंवा डिजिटल माध्यमाचा वापर करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करून सहकार्य करण्याचे कल्याण परिमंडलाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.

वीजबिल भरणा केंद्रांसोबतच थकीत वीजबिल वसुलीची कारवाई सुट्टीच्या दिवशी सुरु राहणार आहे. अधिकृत वीजबिल भरणा केंद्राशिवाय महावितरणच्या मोबाईल अँपवर वीजबिल भरणा तसेच इतर सर्व सुविधा हाताच्या बोटावर उपलब्ध आहेत. www.mahadiscom.in या संकेतस्थळावर केवळ बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून नेट बँकिंग, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड आदींच्या माध्यमातून वीजबिल भरता येते. याशिवाय विविध पेमेंट वॉलेटचा (फोन पे, पेटीएम, गूगल पे) उपयोग करून घरबसल्या वीजबिलाचा ऑनलाईन भरणा करण्याची सुविधा आहे. तसेच वीजबिलावर दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही थेट पेमेंट गेटवेवर जाऊन वीजबिल भरणे सुलभ होते. अखंडित वीज सेवेसाठी उपलब्ध सुविधांचा उपयोग करून चालू व थकीत वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहन मुख्य अभियंता औंढेकर यांनी केले आहे.

-कुणाल म्हात्रे

डोंबिवलीत पालिकेने चढवला अतिधोकादायक इमारतींवर जेसीबी

पावसाळ्याच्या कालावधीत अतिधोकादायक इमारती कोसळून होणारी दुर्घटना टाळण्याच्या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभागक्षेञ अधिकारी यांना अतिधोकादायक इमारती निष्कासित करणेबाबतचे निर्देश यापूर्वीच दिले होते. त्यानुसार विभागीय उपआयुक्त सुधाकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पश्चिम येथील ह प्रभाग क्षेत्रातील महात्मा फुले रोडवरील सुनंदा निवास व चिंतामण बिल्डींग या दोन अतिधोकादायक इमारतीच्या निष्कासनाची कारवाई आज सुरू करण्यात आली.

सुनंदा निवास ही इमारत तळ +2 मजल्याची असून 1974 साली बांधलेली होती. या इमारतीमध्ये 6 भाडेकरू आणि 3 व्यावसायिक गाळे होते. सदर इमारतीस 2018 पासून दरवर्षी नोटीस बजावण्यात येत होती. त्याचप्रमाणे चिंतामण बिल्डींग(तळ+2) ही 30 वर्षे जुनी असून त्यामध्ये 4 भाडेकरु आणि 2 व्यावसायिक गाळे होते. सदर इमारतीस सन 2018 पासून नोटीस बजावण्यात येत होती. सदर दोन्ही इमारतींमधील रहिवाश्यांना भोगवटा प्रमाणपत्र देऊन, रहिवास मुक्त करून आज निष्कासनाची कारवाई ह प्रभागक्षेञ अधिकारी सुहास गुप्ते यांनी अतिक्रमण निर्मुलन पथकाचे 20 कर्मचारी/कामगार, 1 जेसीबी, 1 पोकलेन , महापालिकेचे पोलिस कर्मचारी व विष्णूनगर पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने पूर्ण केली.

-कुणाल म्हात्रे