Ganesh Vidya Mandir शाळेतील विद्यार्थ्यांची महाराष्ट्र लंगडी संघात निवड

Ganesh Vidya Mandir : शिर्डी व कोपरगाव येथे नुकत्याच राज्यस्तरीय लंगडी स्पर्धा पार पडल्या. शिर्डी येथे १८ वर्षे वयोगटा खालील तर कोपरगाव येथे १४ वर्षाखालील मुलांची स्पर्धा पार पडली. या स्पर्धांमध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेंतर्गत १४ वर्षाखालील मुलांचा संघ उपविजेता ठरला. यानंतर आता १८ वर्षाखालील मुलांची राष्ट्रीय लंगडी स्पर्धा आंध्र प्रदेश येथे व १४ वर्षाखालील मुलांची राष्ट्रीय लंगडी स्पर्धा तामिळनाडू येथे होणार आहे. या दोन्ही वयोगटात होणाऱ्या स्पर्धेत कल्याणच्या गणेश विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या संघात स्थान मिळाले असून ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे.

महाराष्ट्राच्या १८ वयोगटा खालील संघात गितेश काकडे व लवेश क्षेत्री तर १४ वर्षाखालील संघात साईराज मळेकर यांची निवड करण्यात आली आहे. नागरीक सेवा मंडळ संचलित गणेश विद्यामंदिर या शाळेत शिक्षणासह त्यांचे कला,गुण व खेळाला महत्त्व दिले जाते. त्यामुळेच शाळेतील विद्यार्थी मोठी मजल मारतात अशा भावना यावेळी शाळेचे शिक्षक मिलिंद धंबा यांनी व्यक्त केल्या. सदर विद्यार्थ्यांना त्यांनी लंगडी खेळ तसेच स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले असून ते स्वतः लंगडीचे राज्य पंच आहेत.

शाळेच्या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भगवान बोरसे, सेक्रेटरी दीपक पाटील, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका स्मिता मराठे, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पांजली शेनवी यांच्यासह प्राथमिक विभागाच्या व माध्यमिक विभागाच्या सर्व शिक्षकांनी महाराष्ट्र संघात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली लंगडी असोसिएशनचे सचिव प्रवीण खाडे, कार्याध्यक्ष अविनाश नलावडे यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांचे अभिनंदन करीत पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या संघात निवड झालेले गितेश काकडे, लवेश क्षेत्री, साईराज मळेकर व मार्गदर्शक शिक्षक मिलिंद धंबा यांचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Selection of students from Ganesh Vidya Mandir School in Maharashtra Langdi team

MSRTC Union : रापम ठाणे विभागात एकनाथ शिंदेंच्या कामगार संघटनेचा झंझावात

MSRTC Union : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील ठाणे १, ठाणे २, कल्याण, विठ्ठलवाडी व वाडा आगारानंतर मुरबाड व शहापूर आगारात एकनाथ शिंदेंच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेने जोरदार संघटना बांधणी केली आहे. किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली एसटी महामंडळामध्ये सध्या सर्व महाराष्ट्रामध्ये सभासद वाढ होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. नव्यानेच मुरबाड शहापूर आगारातील ५० हून अधिक कामगारांनी राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये प्रवेश केला आहे.

मुरबाड आगारात एकनाथ शांताराम मोरे, जितेंद्र भराडे, रामचंद्र खुडके, संतोष हेमाडे, जिवन कापडी, अमोल देशमुख व अशोक पालवे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रीय कर्मचारी सेनेत जाहीर प्रवेश केला. तर शहापूर आगारात रमेश कुडव, राजेंद्र विशे, रोहिदास भालके, राहुल पडवळ, रविंद्र जागले, शशिकांत धापटे, जब्बार पठाण, प्रविण पाटोळे, राजेश पाटील, ज्ञानेश्वर लोहकरे, विजय घुडे, बाबुराव मोजे, दिनेश भोजणे आदींनी प्रवेश केला.

संघटना प्रवेशदरम्यान पंकज वालावलकर, दत्ता अडागळे, स्वप्नील गुरव, योगेंद्र कदम, गणेश तावडे, नितीन खंडागळे, प्रभाकर कानगुले व बाळू शरणागत यांनी मुरबाड व शहापूर आगारात दौऱ्या दरम्यान भेट दिली. आगारातील कामगाराच्या समस्या, अडचणी ऐकून घेतल्या व त्याबाबत कामगारांना योग्य मार्गदर्शन करून त्याच्या शंका दूर करण्यात आल्या. त्याच बरोबर राष्ट्रीय कर्मचारी सेनेची ध्येय धोरणे सांगितली असल्याची माहिती यावेळी संघटनेचे पदाधिकारी योगेंद्र कदम यांनी एमएच मराठीशी बोलताना दिली.

Eknath Shinde’s workers’ Union clash in MSRTC Thane division

Thakurli bridge : ठाकुर्ली उड्डाणपूलाच्या उर्वरित कामाचा मार्ग मोकळा

Thakurli bridge : डोंबिवलीचे आमदार व भाजप प्रदेश कार्यध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी महानगर पालिका प्रशासनास डोंबिवली पूर्व पश्चिम जोडणाऱ्या स.वा. जोशी शाळेसमोरील उड्डाणपुलाच्या म्हासोबा चौकापर्यंतच्या विस्ताराचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पुलामुळे बाधित ६० रहिवाशांना पर्यायी घरांची वाटप पत्रे (अलॉटमेंट लेटर) वितरित करण्याचा कार्यक्रम कल्याण डोंबिवली महानगर प्रशासनाने आज दुपारी तीन वाजता आचार्य अत्रे रंगमंदिर येथे आयोजित केलेला आहे.

सदर पुलामुळे विस्थापीत होणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे सदर उड्डाणपुलाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झालेला आहे. आता काम वेगाने पूढे जाईल असे चव्हाण म्हणाले.

Clear the way for remaining work of Thakurli bridge

लग्न समारंभासाठी कल्याणहुन गावी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; पती पत्नीसह चिमुरडीचा अपघात

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील नांदीवली येथे वास्तव्यास असणाऱ्या घुघे परिवाराचा सोमवारी दि.२० जानेवारी रोजी दुर्दैवी अपघात झाला. अमोल घुघे (वय २५) हे आपली पत्नी प्रतीक्षा घुघे (वय २२) व आपली मुलगी स्वरा घुघे (वय ४) यांच्या समवेत कल्याणहून आपल्या गावी जायला निघाले होते. त्यांनी नुकतीच नवीन रिक्षा घेतली होती व त्याच रिक्षाने ते गावी निघाले होते. याचदरम्यान नाशिक जिल्ह्यातील घोटी सिन्नर महामार्गावर त्यांचा भीषण अपघात झाला.

नाशिक जिल्ह्यातील स्थानिक वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार घुघे परिवार व त्यांच्या समवेत त्यांचे सासरे मार्तंड आव्हाड (वय ६०), सासू कलावती आव्हाड (वय ५८) रिक्षाने प्रवास करीत होते. याचदरम्यान ओव्हरटेक करताना रिक्षाचालक अमोल यांना समोरून येणारा कंटेनर न दिसल्याने हा अपघात घडला. या अपघातात अमोल घुघे यांच्या सह त्यांची मुलगी स्वरा व त्यांचे सासरे मार्तंड आव्हाड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर पत्नी प्रतीक्षा घुघे व सासू कलावती आव्हाड या मायलेकी गंभीर जखमी असून त्यांच्यावर तेथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर कंटेनर चालक राहुल कुमार प्रजापती (वय २८, झारखंड) हा सध्या वाडीवऱ्हे पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस या अपघाताचा सखोल तपास करीत आहेत. मात्र झालेल्या अपघातानंतर घुघे व आव्हाड या दोन्ही कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. अमोल हे एका नामांकित वित्तसंस्थेत इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होते. कुटुंबाच्या भवितव्यासाठी त्यांनी नुकतीच १ जानेवारीला नवी रिक्षा खरेदी केली होती व याच रिक्षाने ते प्रवास करीत होते. दुर्दैवाने याच रिक्षाने त्यांच्या जीवन प्रवासाचाही शेवट ठरला. या दुर्घटनेमुळे नातेवाईक, शेजारीपाजारी व ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

A family traveling from Kalyan to Nashik died in an accident on the highway

वाडा एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचा राष्ट्रीय कर्मचारी सेना मध्ये जाहीर प्रवेश

राष्ट्रीय कर्मचारी सेना : ठाणे विभागातील वाडा आगारातील संपूर्ण कष्टकरी जनसंघ संघटना कार्यकारणी बरखास्त करून सर्व कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. या संघटना सध्या एसटी महामंडळामध्ये विश्वासास पात्र ठरली असून सभासद वाढीमध्ये धुमाकूळ घालणारी संघटना बनली आहे. ठाणे जिल्ह्यातील स्वाभिमानी कष्टकऱ्यांना हा एक चांगला आदर्श घालून दिला असल्याचे यावेळी संघटनेचे पदाधिकारी योगेंद्र कदम म्हणाले.

याप्रसंगी पंकज वालावलकर, दत्ता अडागळे, सचिन पवार, स्वप्नील गुरव, हेमंत घुले, योगेंद्र कदम या पदाधिकाऱ्यांनी वाडा आगारात भेट दिली. आगारातील कामगारांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या व त्याबाबत कामगारांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या शंका दूर करण्यात आल्या. त्याच बरोबर राष्ट्रीय कर्मचारी सेनेची ध्येय धोरणे देखील समजावून सांगितली. राष्ट्रीय कर्मचारी सेनेत आल्यानंतर मोठा आधार मिळाला असल्याच्या भावना यावेळी कामगारांनी व्यक्त केल्या.

Wada ST Depot employees into Rashtriya Karmchari Sena
Kalyan Development Plan : कल्याण लोकसभा क्षेत्रातील वाहतुकीचा बदलणार चेहरामोहरा; MMRDA मुख्यालयात झाली आढावा बैठक

Kalyan Development Plan : कल्याण लोकसभा मतदारसंघासह आसपासच्या भागात वाहतूक आणि दळणवळणाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या प्रकल्पांची उभारणी सुरू आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी कल्याण रिंग रोड, मेट्रो मार्ग १४ चा सविस्तर प्रकल्प आराखडा, मेट्रो ५ आणि मेट्रो १२ ची प्रगती, ठाणे फ्री वे तसेच उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण-डोंबिवली परिसरात सुरू असलेल्या अनेक विकासकामांचा आढावा घेतला.

कल्याणचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी सर्व प्रकल्पांचा आढावा घेत त्यांच्या पूर्णत्वासाठी योग्य त्या सूचना दिल्या. तसेच या प्रकल्प उभारणीतील अडचणींवर तोडगा काढत हे प्रकल्प नियोजित वेळेत मार्गी लावण्यास सांगितले. महत्वाचे प्रकल्प आणि त्यासाठी आवश्यक जमीन अधिग्रहण, कामांची पूर्तता आणि प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी येत असलेल्या अडचणी या विषयांवर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. प्रकल्पांना गती द्यायची असेल तर लवकरात लवकर जमीन अधिग्रहण करा, अशी सूचनाही यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना खासदार शिंदे यांनी केल्या.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व भागातील ‘यू टाईप’ रस्त्यांना गती देण्याच्या सूचना केल्या. महापालिकेच्या हद्दीतील ३८० कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या इतर रस्त्यांच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील वर्दळीच्या शहाड उड्डाणपूल रुंदीकरणाची निविदा जाहीर करण्यात आली असून त्यासाठी आवश्यक जागेचे अधिग्रहण तातडीने करण्याच्या सूचना उल्हासनगर मनपा आयुक्तांना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी दिल्या. तसेच मनपा क्षेत्रातील प्रमुख ७ रस्त्यांच्या कामाचा आढावाही घेण्यात आला.

बदलापूर – कांजुरमार्ग मेट्रो मार्ग १४ चा फायदा अधिकाधिक भागाला कसा होईल, त्यासाठी मार्गाच्या आरेखनात बदल करता येईल का? याची चाचपणी करण्याची सूचना केली. तसेच कल्याण फाटा उड्डाणपूल आणि ऐरोली काटई फ्री वे या प्रकल्पांसाठी वेगाने जागा अधिग्रहीत करण्याची खासदार शिंदे यांनी सूचना केली.

या बैठकीला अतिरिक्त आयुक्त मुद्गल, अतिरिक्त महानगर आयुक्त मनुज जिंदाल, कल्याण-डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड, उल्हासनगर महापालिका आयुक्त जमीर लेंग्रेकर, ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे तसेच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे, शहरप्रमुख निलेश शिंदे, माजी नगरसेवक नवीन गवळी, अरुण आशान, राजेंद्र चौधरी, वामन म्हात्रे आदी पदाधिकारीही उपस्थित होते.

मागील काही काळापासून शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यादृष्टीने येथील वाहतुकीवर मोठा ताण आलेला आहे. शिवाय शहरातील वाहतुकीत जर बदल झाले नाहीत तर येत्या काळात रस्त्यांवर वाहने चालवणे अशक्य होऊन बसेल. खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी असे बरेच महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी कंबर कसली असून आढावा बैठकीत त्यांनी कामाला वेग मिळण्याकरिता अधिकाऱ्यांना सूचना देखील केल्या आहेत. अशी माहिती शिवसेनेचे कल्याण पूर्व विधानसभा प्रमुख प्रशांत काळे यांनी दिली आहे.

Kalyan Development Plan : The face of traffic in Kalyan Lok Sabha area will change; A review meeting was held at MMRDA headquarters

New District in Maharashtra : राज्यात नव्याने होणार २१ नवे जिल्हे?

New District in Maharashtra : महाराष्ट्र राज्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता येथील यंत्रणेवर प्रचंड ताण निर्माण होत आहे. याकरिता राज्यात २१ नवे जिल्हे बनविणार असल्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. या यादीत ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्याचा देखील समावेश असून आता लवकरच कल्याण हा नवा जिल्हा होण्याची शक्यता आहे. याबाबत २६ जानेवारी रोजी अधिकृत घोषणा होणार असल्याचे समजते. त्यामुळे २६ जानेवारी नंतर राज्यातील जिल्ह्यांची संख्या ३६ हुन ५७ पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ असे चार तालुके कल्याण तालुक्याला जोडलेले असून, कल्याण शहर हा सगळ्यांचा केंद्रबिंदू आहे. शिवाय आरटीओ, प्रांताधिकारी, न्यायालय, प्रादेशिक पोलिस विभाग अशी अनेक सरकारी कार्यालये कल्याण शहरात आहेत. त्यामुळे सगळ्याच दृष्टीने कल्याण सोयीस्कर पडत असून, कल्याण हा स्वतंत्र जिल्हा झाल्यास त्याचा लाखो लोकांना फायदा होणार आहे.

ठाणे जिल्ह्याचे या अगोदरही विभाजन होऊन पालघर जिल्हा वेगळा झाला होता. त्याच पालघर मधून जव्हार देखील अलिप्त होण्याचा प्रस्ताव आता ठेवण्यात आला आहे. तसेच ठाण्यातून कल्याण व मीरा भाईंदर देखील वेगळे होण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे सर्वात मोठ्या ठाणे जिल्ह्याचे मागील काही वर्षांत पाच भागांत विभाजन होत असल्याचे पहायला मिळत आहे. कल्याण सह आणखीन २० नव्या जिल्ह्यांचे प्रस्ताव असून अधिकृत घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र अशी शक्यता दरवर्षी वर्तवण्यात येते परंतु प्रत्यक्षात घोषणा मात्र केली जात नसल्याचे दिसून येत आहे.

प्रस्तावित २१ नवे जिल्हे:-
कल्याण (ठाणे), मीरा भाईंदर (ठाणे), जव्हार (पालघर), महाड (रायगड), बारामती (पुणे), मंडणगड (महाड), माणदेश (सांगली,सातारा,कोल्हापूर), मालेगाव (नाशिक), कळवण (नाशिक), भुसावळ (जळगाव), उदगीर (लातूर), अंबेजोगाई (बीड), किनवट (नांदेड), खामगाव (बुलडाणा), पुसद (यवतमाळ), अचलपूर (अमरावती), साकोली (भंडारा), शिर्डी (अहमदनगर), संगमनेर (अहमदनगर), श्रीरामपूर (अहमदनगर), अहेरी (गडचिरोली).

New District in Maharashtra : Will there be 21 new districts in the state?

नाना पटोलेंच्या वक्तव्यावर राजेश दाखिनकर यांनी व्यक्त केला तीव्र शब्दांत निषेध

कल्याण : नागपूर सभागृहात काही दिवसांपूर्वी कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी वाल्मिक कराड यांच्यावर भाष्य करताना अरुण गवळी यांच्या नावाचा उल्लेख केला होता. १९९९ साली विधानभवनात अरुण गवळी यांच्या शेजारी कुणीही बसत नव्हते त्याचप्रमाणे उद्या वाल्मिक कराड आले तर नवीन काय? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. मात्र त्यांच्या या विधानावर आता अरुण गवळी यांच्या अखिल भारतीय सेनेने मात्र तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले अरुण गवळी हे २००४ साली निवडणुक जिंकून विधानसभा सदस्य झाले होते. चांगल्यासाठी चांगले आणि वाईटासाठी वाईट ही त्यांची खरी ओळख असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. त्यामुळेच लोकांनी त्यांना निवडून दिले होते असेहि ते म्हणतात. नुकतेच नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा गवळी समर्थकांनी तसेच त्यांच्या पक्षाने अखिल भारतीय सेनेने निषेध नोंदवला असून नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे. अरुण गवळी यांच्या पत्नी आशा गवळी यांनीही पटोलेंच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली.

अखिल भारतीय सेनेचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजेश दाखिनकर यांनी देखील नाना पटोले यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला आहे. नाना पटोले यांनी स्वतःची पायरी ओळखून अशी वक्तव्य करावीत, डॅडींचं नाव घेऊन राजकारण करू नये, पुन्हा अशी वक्तव्य केल्यास रस्त्यावर उतरून उत्तर देऊ असा ईशारा यावेळी दाखिनकर यांनी दिला आहे. नाना पटोले यांनीच काँग्रेसचे वाटोळे केले आहे असे विधान करीत राजेश दाखिनकर यांनी नाना पटोले यांचा खरपूस समाचार घेतला आहे. अरुण गवळी हे सध्या नागपूर कारागृहात असून नागपूर खंडपीठाने त्यांची २८ दिवसांची संचित रजा मंजूर केली आहे. त्यामुळे लवकरच ते स्वगृही परतणार आहेत.

Rajesh Dakhinkar strongly condemned Nana Patole’s statement

कल्याण अत्याचार प्रकरणातील विशाल गवळी कुणाचा कार्यकर्ता? दोन गटांत रंगलं राजकारण

विशाल गवळी : मागील काही दिवसांपूर्वी कल्याण मध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनं राज्यात खळबळ माजली आहे. विशाल गवळी नावाच्या विकृतीने कल्याण पूर्वेतील एका नाबालीके चे अपहरण करून तिची हत्या केली. मुलीवर अत्याचार केले गेल्याचे सांगत शहरात निदर्शने देखील करण्यात आली. सदर आरोपीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून आता तो पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र याच विशाल गवळीवरून आता या प्रकरणाला राजकीय रंग आला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार असलेले महेश गायकवाड यांनी हा आरोपी व त्याचे कुटुंबीय भाजपचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी काही फोटो व्हिडिओ देखील पुरावे म्हणून माध्यमांसमोर सादर केले. मात्र भाजपने या सर्व आरोपांचे खंडन करून हा आमचा कार्यकर्ता नव्हता असे स्पष्टपणे सांगितले असून त्यांनी हा आरोपी महेश गायकवाड यांचाच असल्याचा पलटवार करीत एका फेसबुक पोस्टचा स्क्रीनशॉट माध्यमांसमोर दाखवला आहे. मात्र याच स्क्रीनशॉटवर आता नानाविध सवाल उपस्थित केले जात आहेत.

भाजपने सादर केलेला स्क्रीनशॉट हा विशाल गवळीने निवडणुकीत केलेली पोस्ट असल्याचा दावा केला आहे. या पोस्टमध्ये महेश गायकवाड यांना आमदार करा असे आवाहन गवळी याने केल्याचे दिसत आहे. मात्र त्याचबरोबर या पोस्टचा स्क्रीनशॉट 13 मिनिटानंतर घेतल्याचे देखील स्क्रीनशॉट मध्ये स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे हा स्क्रीनशॉट लगेचच 13 व्या मिनिटाला कशासाठी घेण्यात आला? सदर पोस्ट ही नेमकी कधी केली गेली आहे? सदर व्यक्तीचे प्रोफाईल आयडी काय आहे? याबाबत मात्र कोणतीही माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे सदर पोस्टचा स्क्रीनशॉट चर्चेत आला असून तो खरा की बनावट यासाठी सदर पोस्टची तपासणी करावी लागणार आहे.

विशाल गवळी सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर गंभीर कारवाई करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे स्थानिक आमदार सुलभा गायकवाड यांनी म्हटले आहे. तर तो भाजपचा कार्यकर्ता आहे त्याच्यावर कोणतीही कठोर कारवाई होईल याची शाश्वती नसल्याचे महेश गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यामुळे सध्या तरी विशाल गवळी कुणाचा माणूस? यावर शहरात राजकीय ढकलफेक सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. घडलेली घटना अत्यंत गंभीर असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई केली जावी अशी आशा मात्र कल्याणकरांना लागून आहे.

Vishal Gawli in the torture case of which party?

कल्याण १३ वर्षीय चिमुरडीच्या हत्ये प्रकरणी आरोपीला अटक

कल्याण : शहराच्या पूर्व भागातील चक्कीनाका परिसरात एक १३ वर्षीय चिमुरडी बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी पोलीस स्थानकात नोंदवली होती. त्यानंतर बापगाव येथे एक मृतदेह मिळाल्याचे पोलिसांना समजल्यानंतर मुलीच्या वडिलांनी हा मृतदेह आपल्याच मुलीचा असल्याचे पोलिसांना सांगितले. या अपहरण व हत्या प्रकरणा नंतर कल्याण पूर्वेत एकच खळबळ माजली.

सदर घटनेचे तीव्र पडसाद उमटत असताना पोलिसांनी २४ तासांच्या आत या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याला शेगाव बुलढाणा येथून अटक केली आहे. गवळी याने तिचे अपहरण करून तिची हत्या करत तिचा मृतदेह रिक्षाचालकाच्या मदतीने बापगाव येथे विल्हेवाट लावण्यासाठी नेला असल्याचे सांगितले जात आहे. या चिमुरडीवर अत्याचार केला गेल्याचे सांगत या घटने विरोधात कल्याण पूर्वेत मूक मोर्चा काढण्यात आला होता.

प्राप्त माहिती नुसार, विशाल गवळी याच्यावर अगोदरही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. छेडछाड, बलात्कार, बलात्काराचा प्रयत्न, लहान मुलांचे लैंगिक शोषण यामुळे परिसरातील काही लोकांनी स्थलांतर केल्याचेही सांगितले जात आहे. विशाल गवळीला राजकीय वरदहस्त असल्याने त्याला पाठबळ देणाऱ्या राजकीय व्यक्तीलाही सहआरोपी बनवावे अशी मागणी आंदोलनकर्ते करू लागले आहेत. गवळी सह आणखीन दोघांना ताब्यात घेतले असल्याची माहिती असून संपूर्ण घटनेचा पुढील तपास आता पोलीस प्रशासन वेगाने करीत आहे.

kalyan 13 year girl murder