कल्याणमध्ये नारायण राणें विरोधात पेटून उठली शिवसेना; तीव्र आंदोलनात पुतळा, चपला आणि कोंबड्या

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्या मध्ये मागील काही दिवसांपासून शाब्दिक चकमकी सुरू होत्या. मात्र आता हा वाद विकोपाला गेला असून टीकेची पातळी देखील खालावताना दिसतेय. राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शिवसेनेकडून निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रभर तीव्र आंदोलने केली जात आहेत. कल्याण मध्येही विविध ठिकाणी शिवसैनिकांनी तीव्र आंदोलने करीत राणेंच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

एकेकाळचे शिवसेनेचे मुख्यमंत्री नारायण राणे ते भाजपाचे केंद्रीय मंत्री असा राजकीय प्रवास केलेले नारायण राणे हे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडे जन आशीर्वाद यात्रेवर असल्यापासून राणे आणि शिवसेना यांच्यात शाब्दिक चकमकी सुरू होत्या. शेवटी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल शिवसैनिकांनी राज्यभर आंदोलने केली आहेत. कल्याण मध्ये शिवसेनेचे मोठे वर्चस्व असल्याने या शहरात देखील या आंदोलनाचे तीव्र असे पडसाद उमटले आहेत. शहरातील ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून ही आंदोलने करण्यात आली.

कल्याण मध्ये शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले. ज्यात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या एका कार्यालयाचे नुकसान केल्याचे समोर आले. डोंबिवलीत देखील शिवसेनेकडून राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमार आंदोलन केले. तर दुसरीकडे शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कल्याण पूर्वेत शिवसेना शाखेसमोर राणें विरोधात घोषणाबाजी करीत रोष व्यक्त करण्यात आला. तर माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या कार्यालयाबाहेरही शिवसैनिक एकवटले होते. यावेळी नारायण राणेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा झोड देण्यात आला. तसेच या आंदोलनात कोंबड्या दाखवून निषेध करण्यात आला.

एकीकडे इंधनाचे दर आणि महागाई प्रचंड वाढली आहे आणि हे जन आशीर्वाद यात्रा काढत आहेत. या जन आशीर्वाद यात्रा नसून जन शाप यात्रा आहेत. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांनी कल्याण मध्ये येऊन यात्रा काढून दाखवाव्यात असे खुले आव्हान महेश गायकवाड यांनी राणे यांच्यावरील रोष व्यक्त करताना दिले आहे. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप राणेंच्या पाठीशी असल्याचे सांगितले. मात्र नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्याला भाजपचे समर्थन नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर भाजप कार्यालयाची नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

नारायण राणें विरोधात तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांना अटक करण्यासाठी पोलीस रवाना झाले. याचदरम्यान राणे यांनी अटकपूर्व जामीन देखील केला होता. मात्र न्यायालयाने राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्या नंतर पोलिसांनी आता नारायण राणेंना अटक केली आहे.

-संतोष दिवाडकर

किकबॉक्सिंग स्पर्धेत टिटवाळयातील खेळाडूंची यशस्वी किक

ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिएशन आणि फ्रॅपर फोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मराठा मंदिर हॉल, मुलुंड येथे शनिवारी प्रथमच अल्टिमेट मुंबई विभाग स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत टिटवाळ्यातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करत यश मिळविले आहे.

कोरोना विषाणू च्या प्रादुर्भावामुळे गेल्या एक ते दीड वर्षापासून क्रीडा क्षेत्रातील अनेक खेळांच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक खेळाडू खेळाच्या सरावापासून व स्पर्धे पासून वंचित होते. परंतु तब्बल १८ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधी नंतर पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यात शासनाने नेमून सर्व नियमांचे पालन करून विभाग स्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई विभागातील सुमारे २०० पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेसाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

 टिटवाळा येथील विनायक मार्शल आर्ट्स आणि फिटनेस झोन येथे मुख्य प्रशिक्षक विनायक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेणारे गौरी तिटमे, मृण्मयी भोजणे, यश राठोड आणि भुषण जाधव हे ४ खेळाडू देखील या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. या स्पर्धेत अतिशय उल्लेखनीय कामगिरी करत या खेळाडूंना अनुक्रमे गौरी तीटमे – सुवर्ण पदक, मृण्मयी भोजने – रौप्य पदक, भुषण जाधव – रौप्य पदक, यश राठोड – सहभाग असे १ सुवर्ण, २ रौप्य पदके प्राप्त झाले. या स्पर्धेत राष्ट्रीय किक बॉक्सिंग खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक हरीष वायदंडे आणि गणेश गायकवाड यांनी पंच म्हणून कार्य केले.

          ऑलिंपिक खेळाच्या पार्श्व भूमीवर अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त युवक व युवतींनी सहभागी होऊन नक्कीच पुढील ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना सहभागी होण्यासाठी क्रीडा प्रशिक्षक प्रयत्न करत आहेत. या स्पर्धेचे आयोजक व ठाणे जिल्हा किकबॉक्सिंग असोसिशनचे अध्यक्ष मोहन सिंग आणि सचिव संजय कटोडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

-कुणाल म्हात्रे

शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे नावाच्या तुलसीदासाचे हात टिटवाळ्यात दाखल

शिवशाहिर बाबासाहेब पुरंदरे यांनी नुकतेच वयाच्या शतकोत्तर वर्षात पदार्पण केलंय. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं पासुन समाजातल्या वेगवेगळ्या स्तरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरु झालायं. या बाबासाहेब पुरंदरे नावाच्या तुलसीदासाच्या हाताचे ठसे टिटवाळा येथील संस्कृती संग्रहालयात संग्रहीत करण्यात आले असून ते सगळ्यांनाच पहायला मिळणार आहेत. 

गेली ७ दशकं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवाजी महाराजांच्या चरित्राचा बाबासाहेब पुरंदरे कधी शिवचरीत्राच्या माध्यमातुन तर कधी जाणता राजा महानाट्यातुन, कधी व्याख्यानातुन तर कधी शिवकल्याण राजाच्या  माध्यमातुन जागर करताहेत. शुक्रवारी संस्कृती संग्रहालय, टिटवाळासाठी याच शिवशाहिरांच्या हाताचे ठसे घेण्यात आले आहेत. पुण्याला बाबासाहेबांच्या निवासस्थानी मुर्तीकार प्रशांत गोडांबे, संस्कृती संग्रहालयाचे संचालक अविनाश हरड, संकल्पक युवासेना पदाधिकारी ॲड. जयेश वाणी व संग्रहालयाच्या कायदेशिर सल्लागार दिव्या ठाकुर यांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या हाताचे ठसे आणि त्यावर त्यांची स्वाक्षरी घेण्यात आली.

श्रीमहागणपतीच्या टिटवाळा या पावन नगरीत संस्कृती संग्रहालय आकाराला येत आहे. याच संग्रहालयात महारष्ट्राच्या समाजकारणात, कलाक्षेत्रात, क्रिडाक्षेत्रात, धार्मिकक्षेत्रात व राजकारणात महाराष्ट्राला योगदान देणाऱ्या दिग्गज व्यक्तिंच्या हातांचे ठसे पुढच्या पिढ्यांसाठी प्रेरणा म्हणुन संवर्धित करण्याचे काम सुरु आहे. जगातील या एकमेव अशा प्रकारच्या संग्रहालयात आता बाबासाहेबांचे प्रेरणादाई हात सगळ्यांनाच पहायला मिळतील.

-कुणाल म्हात्रे

लसीकरणाच्या बाबतीत कल्याण पूर्वेशी दुजाभाव ? पालिका प्रशासनावर सामाजिक संघटनांचा रोष

कल्याण पुर्वेचा भाग हा महापालिका क्षेत्रातील इतर भागांच्या तुलनेत विकासापासून वंचित राहिला आहे अशी एक नेहमीची ओरड आहे. कल्याण पूर्वेला स्वतंत्र आमदार आहे. दोन महापौरही याच भागात होऊन गेले. कोटींच्या महागड्या गाड्या घेणारे तसेच अनेक नामांकित बांधकाम व्यावसायिक कल्याण पूर्वेत राहतात. मात्र कोरोना काळात या कल्याण पूर्वेत लसीकरण केंद्रे जर पहायला गेलात तर कधी चार तर कधी कधी एकच केंद्र दिलं जातं. इतर परिसराच्या मानाने लोकसंख्या ही ४ लाखांच्या वर आहे त्यामुळे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी विरोधात सामाजिक संघटना रोष व्यक्त करताना दिसत आहेत.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांसाठी लसीकरण केंद्रे उभारण्यात आली आहेत. एकूण २४ केंद्र तर काही वेळेस १९ उभारली जातात. मात्र त्यात कल्याण पूर्वेला झुकते माप देऊन जेमतेम तीन ते चार केंद्रे दिली जातात. काही दिवशी तर १९ पैकी एकच लसीकरण केंद्र कल्याण पूर्वेत दिले जाते. त्यामुळे विकासाच्या बाता मारणारे नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आणि बाकीचे राजकीय पक्ष आहे कुठे असा संतप्त सवाल सामाजिक संघटना उपस्थित करत आहेत.

१९ केंद्रावर लसीकरण होत असताना

कल्याण पूर्व – १
कल्याण पश्चिम – ६
डोंबिवली मधे – ११
टिटवाळा – १

अशी केंद्र कधी कधी पालिका प्रशासन देते. आणि त्यामुळे कल्याण पूर्वेतील नागरिकांना कल्याण पश्चिम किंवा डोंबिवली मध्ये जावे लागत आहे. त्यात लसीच्या दुसऱ्या मात्रेसाठी पूर्वेकर मोबाईल लसीकरणाची वाट पाहूनही थकले आहेत.

लसीकरण सुरू झाल्यापासून असेच सुरू आहे. हे कल्याण पूर्वेला भिक दिल्या प्रमाणे लसीकरण केंद्र देत असतात हा अन्याय आहे. कल्याण पूर्वेचे लोक अतिशय शांत सुस्वभावी आहेत. आपल्या पक्षाला, माणसाला मतदान करणारे आहेत. याचा गैर फायदा प्रशासन घेत आहे की काय ? डोंबिवली चे विशेष कौतुक कारण ते मात्र बरोबर मिळवतात सर्व काही.

उदय रसाळ (माजी नगरसेवक)

दरम्यान आरोग्य अधिकारी डॉ अश्विनी पाटील यांना याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केले असता कल्याण पूर्व साठी फिरते लसीकरण केंद्रे उभारण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कल्याण डोंबिवली परिसरात केंद्रे उभारण्याचे काम उपायुक्त पल्लवी भागवत यांच्या कडे आहेत असे स्पष्ट केले. भागवत यांना संपर्क केला असता त्यांना फोनचा स्वीकारच करता आला नाही. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.

-रोशन उबाळे

कल्याण पुर्वेत रक्षाबंधना निमित्त धर्मवीर आनंद दिघे उद्यानात वृक्षारोपण; “रक्षा वृक्षांची” दिला संदेश

आरक्षित भुखंडावर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आरक्षित भुखंडाच्या सीमेवर झाडे लावून  भुखंड सुरक्षित ठेवण्याबाबत निर्देश दिले असल्याने आरक्षित भुखंडावर झाडे लावण्यात येत आहेत. कल्याण पुर्वीतील “ड” प्रभाग क्षेत्रातील आमराई विजय नगर परिसरातील धर्मवीर आनंद दिघे उद्यान या आरक्षित भुखंडावर विदर्भ युवक मंडळ यांच्या आयोजना नुसार रक्षा बंधन व नारळीपोर्णिमेचे औचीत्त साधुन विभागीय उप आयुक्त अनंत कदम यांच्याहस्ते वृक्षरोपण करण्यात आले. याप्रसंगी “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल, स्थानिक नगरसेविका माधुरी काळे, माजी नगरसेवक प्रशांत काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

कल्याण पूर्व मध्ये रक्षाबंधन दिवशी वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षांची रक्षा करणे हे आजच्या निसर्गाच्या नियमांची गरज भासली आहे. वृक्षतोडीमुळे अनेक ठिकाणी निसर्गाचा नियम पायमल्ली झाल्यामुळे जीवित हानी पासून सृष्टीची हानी देखील सुरू आहे, माणसाने आपल्या सोयीनुसार अनेक बांधकामं, रस्ते तयार केलेत  आणि भरमसाठ वृक्षतोड झाली. ऑक्सिजनची कमतरता शहरांमध्ये भासत आहे. याकरिता सृष्टी रक्षा हेच “रक्षाबंधन व्हावं” या उद्देशाने कल्याण पूर्व मध्ये माधुरी प्रशांत काळे यांनी  सामाजिक संस्थेसोबत वृक्षारोपण घेवून मोलाचे कार्य केले आहे.

या भव्य वृक्षारोपण कार्यक्रमात प्रभागातील नागरिकांनी नगरसेविका माधुरी काळे यांनी स्वेच्छेने  वृक्षारोपणासाठी झाडे ,फुलझाडे देण्याच्या मागणीस चांगला प्रतिसाद दिला. नागरिकांनी दिलेली ही झाडे त्यांच्या नावाने लावण्यात येणार आहेत. यावेळी ड प्रभाग अधीक्षक संजय कुमावत, विदर्भ युवक मंडळाचे संस्थापक पी. डी. चौधरी, अध्यक्ष उत्तम पाटील, सचिव सुरेश ढगे, विश्वस्थ विजय गैगावली, सुरेखा कपले, कासार, सिद्धिविनायक सामाजिक संस्थेच्या संचालिका सुरेखा गौरे, आशा चौधरी, विजय नगर हौसिंग फेडरेशनचे सचिव प्रदीप तांबे, खजिनदार, वासुदेव कदम, संचालक कानसे, संभाजी माने, नरेश कासार, किरण गौरे, विनय ठोकळे आदींसह नागरिक उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी दिवा जंक्शनहून विशेष रेल्वे गाड्या सोडा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी

गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी दिवा जंक्शन वरून विशेष रेल्वे गाड्या सोडाव्यात अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मध्य रेल्वे यांच्याकडे केली असून त्याबाबतचे पत्र सुद्धा दिले आहे.

याबाबत मनसे आमदार यांनी सांगितले की कोकणातील बहुतांश रहिवासी नोकरी व्यवसायानिमित्त दिवा, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा-खोपोली राहतात. दरवर्षी सहकुटुंब गणेशोत्सवानिमित्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधील आपआपल्या मुळ गावी जाऊन पारंपारीक पद्धतीने सण साजरा करतात. गेल्या दिड वर्षापासून कोविडचे संकट सुरु आहे. त्यामुळे पहिला लॉकडाऊन सुरु लागल्यापासून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना वरदान ठरणारी दिवा-सावंतवाडी पॅसेंजर व दिव्याला थांबा असणारी दादर-रत्नागिरी पॅसेंजर या गाड्या बंद करण्यात आलेल्या असून अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. आता गणेशोत्सवानिमित्त रेल्वेकडून काही विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु त्यामध्ये दिवा जंक्शनमधून एकही गाडी सोडण्यात आलेली नाही. त्यामुळे कोकणकर संभ्रमात पडले आहेत.

कोविडची तिसरी लाट गृहीत धरुन शासनाकडून रेल्वे प्रवासालाही अटी घालण्यात आलेल्या आहेत. त्यामध्ये दोन डोस घेतलेल्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सद्यस्थिती पाहता बहुतांश जणांना दोन डोस नाहीच पण एकही डोस अजून पर्यंत मिळालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये दिवा ते अगदी खोपोली, कसारा पर्यत राहणाऱ्या कोकणकरांना गावी जाण्यासाठी ठाणे, दादर, सीएसएमटी किंवा पश्चिम रेल्वे स्टेशनपर्यंत प्रवास करणे शक्य होणार नाही. त्यामुळे आधीच कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या नागरिकांचे हाल होणार आहेत.

त्यामुळे कोकणात जाण्यासाठी जवळपास रेल्वे सेवा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. तरी रेल्वेने याची तातडीने दखल घेऊन कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी सोयीचे ठरणाऱ्या दिवा जंक्शनवरुन दिवा-सावंतवाडी व दादर-रत्नागिरी पॅसेंजरसह जास्तीत जास्त गणेशोत्सव स्पेशल ट्रेन सोडून प्रवाशांची सोय करावी अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.

-कुणाल म्हात्रे

ऑनलाईन इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉप; ११९४ विद्यार्थ्यांनी साकारला आपला बाप्पा

ऑनलाईन इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉपमध्ये ११९४ विद्यार्थ्यांनी आपला बाप्पा साकारत पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा करण्याचा मूलमंत्र दिला आहे. आविष्कार एज्युकेअर फाउंडेशन, एनजीओ गेल्या दहा वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करत आले आहे. प्रेत्येक वर्षी असंख्य विदयार्थी या वर्कशॉपच्या माध्यमातून प्रत्यक्षरीत्या आपल्या कलेला नवीन आयाम देत असतात. नावीन्य पूर्ण कौशल्य आत्मसात करत असतात.

        यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्षात वर्कशॉप घेणे शक्य नसल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने जागतिक इकोफ्रेंडली गणेशा मेकिंग वर्कशॉप आविष्कारच्या माध्यमातून घेण्यात आला. यातून ११९४ विद्यार्थ्यांनी आपल्या घरी बसून इकोफ्रेंडली गणेशा (आपला बाप्पा) बनवण्याचा आनंद घेतला.  कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात सकारत्मक ऊर्जा आणि कार्य, नाविन्यपूर्ण कला शिकण्याची ही सुवर्णसंधी विद्यार्थ्यांना आविष्काने दिली.  यातूनच आपण सर्व एकत्र येऊन पर्यावरण संवर्धन करू शकणार आहोत. पर्यावरण संवर्धनाच्या आमच्या प्रयत्नांना जन्सामण्यांमधून खूप उत्तम प्रतिसाद, साथ मिळत आहे.  सर्व सहभागी विद्यार्थ्यांना  सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

या तीन दिवसीय वर्कशॉप मध्ये पहिल्या दिवशी मनीष व्यापारी या गणेशमूर्ती कलाकार तसेच कलाशिक्षक यांनी हाताने गणपती बाप्पा कसा बनवायचा हे शिकवले. दुसऱ्या दिवशी गणेश गव्हाणकर यांच्या गणेशमूर्ती वर्कशॉमध्ये शाडूच्या मातीपासून साच्याच्या माध्यमातून गणपती कसा बनवायचा त्याचे फिनिशिग, अलंकार, सजावट कशी करायची हे शिकविण्यात आले. तर तिसऱ्या दिवशी आपण बनवलेल्या बाप्पाचे रंगकाम, सजावट, डोळ्याची आखणी व घरच्या घरी इकोफ्रेंडली पद्धतीने बाप्पाचे विसर्जन कसे करावे हे सांगण्यात आले. यासाठी गणेशमूर्ती कलाकार गणेश गव्हाणकर यांनी मोलाचे सहकार्य केले.

       शाडूची भिजवलेली माती किंवा लाल भिजवलेली माती, चमचा, पेन रिफिल व इतर, बाप्पासाठी पाठ, सुती कापड, प्लॅट ब्रश, पाण्यासाठी वाटी किंवा मग अशा साहित्याचा उपयोग करण्यात आला.  या वर्कशॉमध्ये धुळे, जळगाव, मलकापूर, पुणे, कोल्हापूर, नागपूर, आनंदवन, सांगली, सातारा, औरंगाबाद, वाशी, पनवेल, मुंबई अश्या विभागातून अवघ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी साहबाग नोंदवला.

       या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून माजी तहसीलदार रतीलाल चव्हाण, उत्तर महाराष्ट्र खानदेश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, आविष्कार फाऊंडेशनचे अध्यक्ष सचिन जाधव, खजिनदार गिरीश मंजुळे, दलजीत बोन्स, स्पूर्ती फाऊंडेशनचे बजरंग तांगडकर, प्रणय काटे, अदिती कदम, हे उपस्थित होते. आविष्कार चे संस्थापक सचिव विनोद शेलकर यांनी सूत्रसंचालन केले. रोहित माळी आणि तन्मय चव्हाण यांनी हा संपूर्ण कार्यक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मोलाची कामगिरी केली.

-कुणाल म्हात्रे

गावातच ११ वी १२ वीचे वर्ग सुरु करण्याची कल्याण तालुक्यातील फळेगाव ग्रामस्थांची मागणी

कल्याण तालुक्यातील फळेगाव, नडगाव, दानबाव, रुंदे, उशीद, हाल, मढ, आंबीवली या गावांतील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी गोवेली किंवा कल्याण मधील कॉलेज असे दूर अंतरावर जावे लागते. त्यामुळे येथे जाण्यासाठी  लागणारा वेळ, मुलां-मुलींची सुरक्षितता, पालक वर्गाला बसणारा आर्थिक फटका या सर्व बाबींचा विचार करून नुकतच फळेगाव येथे ११वी आणि १२ वीचे आर्ट्स, कॉमर्स व सायन्सचे वर्ग सरू करण्याबाबत छत्रपती विद्यालय यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी गावातील सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी इयत्ता १० वी च्या विद्यार्थ्यांना वह्या देखील वाटप करण्यात आल्या. भविष्यात फळेगाव येथे ११ वी, १२ वी चे वर्ग लवकरात लवकर सुरु व्हावेत अशी भावना अनेक पालकानी व्यक्त केली आहे.

-कुणाल म्हात्रे

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कुस्तीच्या खेळाडूंना उपलब्ध करून दिली आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट

कल्याण पूर्व भागातील नांदिवली परिसरातील जय बजरंग तालीम संघाला खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कुस्ती खेळण्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची मॅट दिली आहे. कल्याण मधील नांदीवली गावात असलेल्या जय बजरंग तालीम संघाने आजवर अनेक कुस्ती खेळाडू घडवले आहेत. आधी कुस्ती मातीत खेळली जात होती. आता वेळ आणि काळ बदलला असून स्पर्धा  वाढली आहे. त्यासाठी मॅट उपलब्ध करुन देण्याची मागणी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्याकडे  नांदवली गावचे माजी सरपंच रामदास ढोणे, पंढरीनाथ ढोणे व खेळाडूंनी केली होती.

 या मॅटचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी मुलांनी मॅटवर कुस्तीची प्रात्याक्षिके दाखविली. या मॅटवर उत्तम सराव करुन उत्तम खेळाडू घडतील. केवळ महाराष्ट्रात नाही तर भारताच्या बाहेर नाव कमाविण्यासाठी त्यांना उर्जा व प्रशिक्षण मिळेल असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. तसेच जय बजरंग तालीम संघाच्या व्यायाम शाळेच्या जागेत कुस्तीगीरांना आणि परिसरातील नागरिकांना नियमित व्यायामाकरिता लागणारे व्यायामशाळा साहित्य देखील उपलब्ध करुन दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

या लोकर्पण कार्यक्रमाप्रसंगी कल्याण डोंबिवली कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंढरीनाथ ढोणे, उल्हासनगर महापालिका गटनेता धनंजय बोडारे, तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, कल्याण पंचायत समिती माजी सभापती सदाशिव गायकर, माजी नगरसेवक महेश गायकवाड, मारुती पाटील, विभागप्रमुख रामदास ढोणे, मदन चिकणकर, उपमहाराष्ट्र केसरी व आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर युवराज वाघ  तसेच कल्याण व ठाणे जिल्ह्यातील कुस्तीगीर व वस्ताद उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

आपल्याच पोलीस ठाण्यातील सहकाऱ्याला अटक करण्याची डोंबिवलीच्या पोलिसांवर आली वेळ; गंभीर दुष्कृत्य केल्याने हवालदार निलंबित

डोंबिवलीच्या राम नगर पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शेतच जर कुंपण खायला लागले तर सामान्य नागरिकांनी जायचे कोणाकडे असा प्रश्न पडला आहे. या अगोदर सचिन वझे आणि पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या गाजलेल्या प्रकरणा मुळे पोलीस खात्यावर विविध प्रश्न उपस्थित राहिले होते. त्यातच डोंबिवलीतील घटनेने पुन्हा पोलीस खाते वाईट गोष्टीसाठी चर्चेत आले आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारी नंतर राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून. दुष्कृत्य करणाऱ्या पोलीस हवालदाराला अटक करण्यात आली आहे. ज्या रामनगर पोलीस ठाण्यात तो कार्यरत होता त्याच पोलीस ठाण्याने त्याला अटक केली आहे. सतीश कारले असे या पोलीस हवालदाराचं नाव असून आता त्याच पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे.

या घटनेमुळे कल्याण डोंबिवलीत एकच खळबळ उडाली आहे. पोलीस अधिकारी भीमराव घाडगे यांनी विविध कलमा अन्वये या पोलिस हवालदारावर गुन्हे दाखल केले आहेत. अश्या निकृष्ठ वृत्तीच्या पोलिसांमुळे समाजातील इतर चांगल्या व इमानदार पोलिसांना देखील नाईलाजास्तव खाली मान घालावी लागते. त्यामुळे संपूर्ण पोलीस खात्यावर प्रश्नचिन्ह उठण्या पूर्वी अशा वृत्तीच्या पोलिसांचा निकाल लावणे गरजेचे ठरू लागले आहे.

-रोशन उबाळे