केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची १६ ऑगस्ट पासून जन आशिर्वाद यात्रा

केंद्र सरकारमधील नवनियुक्त केंद्रीयमंत्री १६ ते २० ऑगस्ट दरम्यान जन आशिर्वाद यात्रा देशभरात काढणार असून केंद्रीय राज्यमंत्री  कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा १६ ऑगस्ट ते २० ऑगस्ट पर्यंत सुरू असणार आहे. कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर शहरात ते १८ तारखेला यात्रेतुन फिरणार आहेत.

या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनाबाबत कल्याणमधील आचिवर्स कॉलेजमध्ये भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला आमदार संजय केळकर, किसन कथोरे, यात्रा प्रमुख आमदार निरंजन डावखरे, सहप्रमुख माजी आमदार नरेंद्र पवार, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार महेश चौगुले तसेच सर्व मंडळ अध्यक्ष, विविध आघाड्या, मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत जन आशिर्वाद यात्रेचा मार्ग तसेच इतर नियोजनाबाबत सुक्ष्म नियोजन करून पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

ही जन आशिर्वाद यात्रा कल्याण पश्चिम, उल्हासनगर, अंबरनाथ व बदलापूर मधील विविध भागातून जाणार असून मोदी सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहचविण्यासोबतच जनतेचे आशिर्वाद घेतले जाणार आहे. या यात्रेत आत्मनिर्भर भारत रोजगार योजना, पंतप्रधान जनधन योजना, प्रधानमंत्री उज्वला योजना, कौशल्य विकास, पीक योजना, कृषि सिंचन योजना, पंतप्रधान युवा योजना यासह केंद्र सरकारने अन्य गरीब कल्याणकारी योजना सुरू केल्या या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम या जन आशिर्वाद यात्रेतून केले जाणार आहे.

केंद्र सरकारमधील ३९ नवनियुक्त  केंद्रीयमंत्री जन आशिर्वाद यात्रा काढणार असून २१२ लोकसभा क्षेत्रातून १९ हजार ५६७ किलोमीटर चा प्रवास करून केंद्राच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्याचे व जनतेचा आशिर्वाद घेण्याचे काम करणार आहे.

-कुणाल म्हात्रे

लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरुवात

PC – रोशन उबाळे

लोककवी वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षास कल्याणमधून सुरवात होत आहे. १४  ऑगस्ट रोजी कल्याणमधील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन केले जाणार असल्याची माहिती या समितीचे स्वागताध्यक्ष तथा कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिली.

या वेळी ज्येष्ठ कवी प्रा. प्रशांत मोरे, साहित्यिक गिरीष लटके, ज्येष्ठ नाटय़ अभिनेते आणि कवी सुधीर चित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. १४ ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमास वामनदादा कर्डक यांच्या गावचे सरपंच दत्ताराम डोमाडे यांच्यासह जे. जे. आर्ट स्कूलचे गणेश तरतरे,  कायद्याने वागा चळवळीचे प्रमुख राज असरोंडकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटना निमित्त कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.

ह्या लोककवीला मानवंदना म्हणून पुल कट्टा, कल्याणने त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्याचा मानस केला आहे. यास्तव कल्याण नगरीतील समविचारी सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते यांनी एकत्रित येत जन्मशताब्दी महोत्सव समिती स्थापन केली आहे. कवी-कथाकार किरण येले यांची जन्मशताब्दी समिती अध्यक्षपदी आणि प्रा. प्रशांत मोरे यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असून स्वागताध्यक्षपदी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांची निवड करण्यात आली आहे.

वामनदादा याचे साहित्य आणि कार्य जनसामान्य आणि नव्या पिढी पर्यंत पोहोचवणे या उद्देशाने समितीने वर्षभर जन सहभाग केंद्रस्थानी ठेवून काही अभिनव संकल्प केले आहेत. करोना काळात सर्व नियम आणि मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करीत ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने हे कार्यक्रम केले जाणार आहेत.

जन्मशताब्दी निमित्ताने उदघाटन व समारोप समारंभ होणार असून  जलसा, शॉर्टफिल्म, वामनदादा कर्डक यांच्या गीतांचे गायन स्पर्धा, वक्तृत्व, चित्रकला, कॅलिग्राफी, एकांकिका, आठवणी संकलन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक संस्था, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने दिंडी वामनदादाच्या जन्म गावांतून डिसेंबर २०२१ मध्ये निघेल व जानेवारी २०२२ मध्ये कल्याण येथे सांगता होईल. यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, जळगाव, अमरावती, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा समावेश असणार आहे.

-कुणाल म्हात्रे

मनसे आमदार राजू पाटील दिल्ली दौऱ्यावर; दिवा-पनवेल रेल्वे लोकल व इतर मागण्यांसंदर्भात मंत्र्यांच्या भेटीगाठी

मनसे आमदार राजू पाटील हे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी रेल्वे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली. राजू पाटील यांनी दिवा ते पनवेल रेल्वे लोकल सेवा सुरु करावी अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येणाऱ्या ठाणे व रायगड मधील रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

दिवा ते पनवेल लोकलसेवा सुरु व्हावी अशी नागरिकांकडून वारंवार मागणी होत आहे. दिवा ते पनवेल दरम्यान दातिवली, निळजे, तळोजा पंचानंद, नावडे रोड, कळंबोली, पनवेल अशी स्टेशन येत असून हा भाग मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येत असल्याने नागरी वस्ती वाढत आहे. सध्या दिवा ते रोहा दरम्यान रेल्वे शटल सेवा सुरु असून दर दिवशी ठराविक वेळेतच या गाड्या सुटतात. त्यामुळे नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, ठाणे येथे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. दातिवली, निळजे, तळोजा पंचानंदसह अगदी कळंबोली पर्यंत मोठमोठे गृहप्रकल्प झालेले आहेत. तसेच काही प्रकल्पांची कामे सुरु असून दिवसेंदिवस येथील लोकसंख्या वाढत आहे.

निळजे, तळोजा येथील नागरिकांना लोकल रेल्वेने प्रवास करायचा झाल्यास कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा या स्टेशनवर गेल्याशिवाय कोणताही पर्याय उपलब्ध नाही. सदर स्टेशन गाठण्यासाठी प्रवाशांना जवळ जवळ सात ते आठ किमी प्रवास करावा लागतो त्यामुळे वेळ, पैसा वाया जातोच व प्रवाशांची प्रचंड गैरसोयही होते. त्यातच परिवहन सेवाही अपुरी असून या परिसरातून मुंबई-ठाणे परिसरात नोकरी व्यवसायासाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रचंड हाल होतात. सध्या नवी मुंबई विमानतळाचेही काम सुरु झालेले आहे. त्याचाही बराचसा भाग या परिसराला जोडलेला आहे. तसेच या परिसरातून केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मल्टीमॉडेल कॉरिडॉर जाणार असून त्याचेही काम सुरु आहे.

अशा मोठमोठ्या प्रकल्पांमुळे लोकसंख्य वाढत असताना सोयीस्कर दळणवळणाच्या दृष्टीकोनातून लोकलसेवा सुरु करणेच हाच उत्तम पर्याय आहे. असे मनसे आमदार यांनी रेल्वे राज्यमंत्री दानवे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच मुंबई महानगर प्रादेशिक विकास क्षेत्रात येणाऱ्या ठाणे व रायगड मधील रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करण्यासाठी सर्वंकष आराखडा तयार करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केंद्रीय राज्यमंत्री दानवे यांच्याकडे दिल्लीत जाऊन केली आहे.

दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांची सुद्धा भेट घेतली. यावेळी त्यांनी कपिल पाटील यांना शुभेच्छा दिल्या. तसेच काही ठाणे जिल्ह्यातील काही महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली.

-कुणाल म्हात्रे

गोकुळधाम सोसायटीच्या रहिवाश्याला बिल्डरकडून मारहाण; पाणी कनेक्शन कापल्याचा विचारला होता जाब

पाणी कनेक्शन का कापले अशी विचारणा करणा-या रहिवाशी मनोज प्रजापती (वय 33) यांना बिल्डर रामप्रताप सिंग आणि विकास रामप्रताप सिंग या पिता-पुत्राने रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना पिसवली येथील अमरदीप कॉलनीतील गोकुळधाम सोसायटीत सोमवारी घडली. मनोज यांच्या तक्रारीवरून मानपाडा पोलिस ठाण्यात सिंग पिता-पूत्र विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

मनोज हे गोकुळधाम सोसायटीत गेल्या पाच वर्षापासून पत्नी आणि मुलासह राहतात. सोमवारी ते संध्याकाळी पाच वाजता कामावरून घरी आले. त्यावेळी घरी पाणी नसल्याचे समजले असता ते सोसायटीच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी असलेले बिल्डर रामप्रताप सिंग यांना माझ्या घरात पाणी नाही तुम्ही माझे पाणी कनेक्शन का तोडले अशी मनोज यांनी विचारणा केली. यावर रामप्रताप यांनी आधी मेंटेनन्स भर तेव्हा पाणी चालू करतो असे सांगितले.

मी ५ हजार रूपये सोसायटीसाठी दिलेले आहेत तुम्ही आधी माझे पाणी कनेक्शन चालू करा असे मनोज बोलले असता रामप्रताप यांनी त्याला शिवीगाळी करीत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. मनोज यांनी प्रतिकार करताच रामप्रताप यांनी त्यांचा मुलगा विकासला फोन करून कार्यालयात बोलावून घेतले. त्याठिकाणी आलेल्या विकासने लोखंडी रॉडने डोक्याला, हाताला व पायावर प्रहार केला. यात मनोज यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

-कुणाल म्हात्रे

कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची आढावा बैठक संपन्न; आघाडी असली तरी राष्ट्रवादीचा महापौर करणार -मेहबूब शेख

राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यामध्ये केलेल्या विकासकामांच्या आणि पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जी घोडदौड सुरू आहे. त्या घोडदौडींकडे पाहता आगामी कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत शंभर प्लस जागांचा नारा देत महापौर राष्ट्रवादीचाच बसेल यात संदेह नसावा असा आत्मविश्वास युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी व्यक्त केला.

कल्याण मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन रविवारी करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना युवक जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले की, कल्याण-डोंबिवली महापालिकेत राष्ट्रवादीला पोषक वातावरण आहे. आता जनता युतीच्या करनाम्यांना कंटाळली असून केवळ राष्ट्रवादी हा पर्याय समोर असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच पक्षामध्ये युवकांचा प्रवेश मोठ्या प्रमाणामध्ये होत असून आजच्या मेळाव्याला आलेली उपस्थिती हे त्याचं प्रतिक आहे. असाच उत्साह कार्यकर्त्यांनी मनामध्ये बाळगून एकमेकांशी सहकार्याची भावना घेऊन पुढे जावं असे आवाहन त्यांनी केले.

यानिमित्ताने महिलांना देखील उमेदवारी मध्ये संधी देऊन मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरणाचा विचार यावेळी पुढे आला. त्याचे उपस्थितांनी स्वागत केले. तसेच पक्षाला तीन आकडी बळ देण्यास आम्ही सज्ज आहोत असा नारा देखील दिला. तसेच अधिकाऱ्यांशी बोलताना स्पष्ट आणि रोखठोक बोलावे असे मोलाचे मार्गदर्शन यावेळी कार्यकर्त्यांना करण्यात आले. नागरिकांमध्ये वावरताना त्यांच्या अडचणी व समस्या सोडवताना प्राधान्य द्यावे असे यावेळी सूचित करण्यात आले. शहरांमधील नागरी समस्या काय आहेत याचा अभ्यास करून त्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यावर त्यांनी भर द्यावा असे आवाहन उपस्थितांना करण्यात आले.

ग्रामीण भागातील पाणी समस्या तसेच शहरी भागातील खड्डे, कचरा, प्रदूषण, रेल्वे प्रवाशांच्या समस्या, शाळांच्या फी वाढीबद्दलच्या समस्या या सर्वांवर प्रकाशझोत टाकल्यास नागरिकांमध्ये विश्वास निर्माण होईल. आणि त्या माध्यमातून एक सक्षम कार्य देखील होऊ शकत. आपली नाळ नागरिकांशी असून त्यानिमित्ताने सगळ्यांनी निवडणूकीच्या धागा पकडून पुढे जायला हवं हे सूत्र लक्षात घेऊन कामाला लागावे असे आवाहन करून युवकांना मार्गदर्शन करण्यात आले. या निमित्ताने लोकसभा, विधानसभेला जशी बुथ रचना चांगली केली होती. तशीच पुन्हा मोट बांधण्याचे कार्य ज्येष्ठांनी करावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष सक्षम करावा असा विचार पुढे आला.

राष्ट्रवादी काँग्रेसने १००+ जागा तसेच आघाडी असली तरी पक्षाचा महापौर बसेल असा दावा या बैठकीत उपस्थित केला. क.डों.म.पा. निवडणुकीत सध्या १२२ प्रभाग असून याच जागांसाठी २०१५ मध्ये निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठे नुकसान झाले होते. काँग्रेस बरोबर आघाडी असूनही राष्ट्रवादीला फक्त दोन जागी विजय मिळाला होता. तर चार जागा काँग्रेसला मिळाल्या होत्या. सर्वाधिक ५२ जागांसह शिवसेनेने पुन्हा आपला महापौर बसविला होता. मात्र आता येथील सर्वात मोठा पक्ष शिवसेने सोबत राज्यात आघाडी असल्याने राष्ट्रवादी कोंग्रेसला कल्याण डोंबिवलीत त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण राज्यातील सध्याची कारकीर्द ही समाधानकारक व स्थिर असल्याचे दिसत आहे.

-कुणाल म्हात्रे

वडवली अटाळी रिंग रोड प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याच्या कामाला गती; विकासकामात बाधित झाडांची कत्तल

महत्वाकांक्षी वडवली अटाळी रिंगरोड प्रकल्पातील ६०० मीटर प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला असून रिंग रोड प्रकल्पाच्या अंतिम टप्प्याच्या कामाला आता गती मिळाली आहे. या विकासकामासाठी बाधित होणाऱ्या झाडांची दुर्दैवाने कत्तल करावी लागली असून त्यापूर्वी १५ हजार झाडांचे वृक्षारोपण केल्याचा दावा प्रशासनाने केलेला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सतत होणा-या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी वडवली अटाळी महत्वकांक्षी रिंगरुट प्रकल्पाचे काम सुरु असून ते आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचाच एक भाग म्हणून वडवली नदी पासून अटाळी पर्यंत रस्ता रुंदीकरणाचे काम स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे प्रलंबित राहीले होते. बुधवारी ११ ऑगस्ट रोजी नदीच्या पुलापासून ते अटाळी हद्दीपर्यंत ६०० मीटर रिंगरुट प्रकल्पात बाधीत होणारी झाडे वृक्ष प्राधिकरण समितीच्या मंजुरीनुसार महापालिकेच्या विभागीय उपआयुक्त अर्चना दिवे, मुख्य उद्यान अधिक्षक संजय जाधव, एमएमआरडीएचे अधिकारी, ‘अ’ प्रभागक्षेत्र अधिकारी राजेश सावंत, महापालिकेचे पोलिस कर्मचारी व खडकपाडा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांचे उपस्थितीत तोडण्याचे काम हाती घेण्यात येऊन लगेचच रस्त्यालगतच्या गटारीचे कामकाजास प्रारंभ करण्यात आला.

रिंगरुट प्रकल्पात बाधीत झालेली झाडे तोडण्यापूर्वी पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या उद्देशाने आंबिवली टेकडी येथे सुमारे १५ हजार झाडे लावण्यात आलेली आहेत आणि आज तिथे घनदाट जंगल उभे रहात आहे. रिंगरुट प्रकल्पात बाधीत होणा-या झाडांपैकी ताडांच्या झाडासाठी प्रती झाड रुपये १० हजार मोबदला महासभेच्या ठरावानुसार यापूर्वी तोडण्यात आलेल्या ताडांच्या बदल्यात संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. यापुढे ही तोडलेल्या झाडांपैकी ताडांच्या झाडांसाठी प्रती झाड रु.१० हजार मोबदला संबंधित शेतकरी लाभार्थ्यांच्या दिला जाईल अशी माहिती महापालिकेचे मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव यांनी दिली आहे.

शहरातील वाहतूकिवरील ताण कमी व्हावा यासाठी हा प्रकल्प केला जात आहे. मात्र वृक्षतोड करून केलेला विकास पर्यावरण प्रेमींच्या पथ्यावर पडत नसून. झाडांवर प्रेम करणाऱ्यांमध्ये यावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण पर्यावरणाशी छेडछाड केल्याने काय होते ? हे प्रकृतीने मानवाला या अगोदर अनेकदा दाखवून दिले आहे. त्यातीलच कोकणातील तळीये दुर्घटना हे एक ताजे उदाहरण म्हणता येईल.

-संतोष दिवाडकर

कल्याणच्या आधारवाडी तुरुंगातील बॅरेकमध्ये आढळला मोबाईल; पोलीस डि.सी.आर मधून माहिती उघडकीस

कल्याण येथील आधारवाडी कारागृह नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा हे कारागृह एका वेगळ्या प्रकारामुळे चर्चेत आले आहे. कारण येथील स्वच्छतागृहातून पोलिसांनी एका मोबाईल फोनसह विद्युत वायर, स्टील पिन आणि इतर वस्तू जप्त केल्या आहेत. याप्रकरणी खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली असल्याचे निष्पन्न झाले आहे. ठाणे पोलीस डि.सी.आर. (दैनंदिन गुन्ह्यांची नोंद वही) मध्ये गुन्ह्याची नोंद असल्याने ही गंभीर बाब उजेडात आली आहे.

आधारवाडी कारागृहातील कर्मचा-यांनी शुक्रवारी अचानक तुरुंगांची पाहणी केली. यावेळी एका बॅरेकमध्ये पाहणी करण्यासाठी हे कर्मचारी गेले. पाहणी करताना या बॅरेकमधील शौचालयात त्यांना दोन पाण्याच्या ड्रममध्ये लोणच्याचे भांडं नजरेस पडले. लोणच्यासाठी वापरले जाणारे हे जार त्यांनी तपासणीसाठी उघडले असता त्यांना त्यात चक्क एक मोबाईल फोन आढळून आला. या बरोबरच एक इलेक्ट्रिक वायर, २५ ते ३० स्टील पिन, इलेक्ट्रिक सर्किट बोर्ड आणि सीलंटची दोन पाकिटे त्यात ठेवले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हे इतके सामान व मोबाईल फोन तुरुंगातील बॅरेकमध्ये कसे पोहोचले ? याचा शोध घेण्याचा पोलीस प्रयत्न करत होते. यानंतर संबंधीत कलमांखाली अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र या वस्तू कारागृहाच्या आत कशा पोहचल्या ? व त्या कशासाठी जमा करण्यात आल्या होत्या ? हे प्रश्न अद्याप गुलदस्त्यातच आहे.

यासंदर्भात खडकपाडा पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी गुन्हा दाखल केल्याचे मान्य केले. परंतु याबाबतची अधिक माहिती आम्ही देऊ शकत नाही तुम्ही कंट्रोल रूममधून माहिती घ्या असे उत्तर दिले. तर वरिष्ठ अधिका-यांनीही आम्ही माहिती देऊ शकत नाही तुम्ही कारागृहाच्या अधिका-यांकडून माहिती घ्या असे सांगितले. तर जेल अधीक्षक ए. एस सदाफुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे गुन्हा दाखल होऊनही इतक्या गंभीर विषयावर पोलिसांनी माहिती देण्यास टाळाटाळ का केली? हा प्रश्न उपस्थित झाला आहे. स्थानिक पोलीस यंत्रणा काहीवेळेस गंभीर गुन्ह्यांबाबत वाच्यता करण्यास टाळाटाळ करताना दिसतात. मात्र ठाणे पोलीस डी सी आर मध्ये रजिस्टर गुन्ह्यांची रोज नोंद केली जाते आणि याच माहितीच्या आधारे आधारवाडी कारागृहातील प्रकार उघडीस आला आहे आणि प्रसिद्धी माध्यमात याचे वृत्त आले आहे. पाच वर्षांपूर्वीही याच कारागृहात मोबाईल सापडल्याचा प्रकार समोर आला होता.

-रोशन उबाळे

वालधुनी आणि उल्हास नद्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी केंद्राकडे १२०८.४७ कोटी रुपयांच्या निधीची खासदारांनी केली मागणी

कल्याण लोकसभा मतदारसंघातील वालधुनी आणि उल्हास या दोन नद्या पाच शहरांमधून जात असून सुमारे ५० लाख नागरिकांच्या पाण्याची तहान भागवत आहेत. तसेच या नद्यांच्या पाण्याचा वापर पिकांसाठीही केला जातो. मात्र या नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाल्याने लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ‘नमामि गंगे’ च्या धर्तीवर या नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी स्थानिक स्वराजांकडून उल्हास नदी प्रदूषणमुक्तीसाठी २११.३४ कोटी तर वालधुनी नदी प्रदूषणमुक्तीसाठी ९९७.१३ कोटीच्या एकूण १२०८.४७ कोटी रुपयांचा आराखडा तयार करून राज्य शासनामार्फत केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला आहे. त्यास तातडीने मंजुरी देण्यात यावी अशी मागणी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केंद्रीय जल-शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र सरकारने राज्यातील २१ नद्यांचे ‘मिशन फॉर क्लीन रिवर्स इन महाराष्ट्र’ या मोहिमे अंतर्गत पुर्नजिवितकरण करण्याचे जाहीर केले असून कल्याण लोकसभा मतदारसंघातील वालधुनी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी ९९७.१३ कोटी आणि उल्हास नदी प्रदूषणमुक्तीसाठी २११.३४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. केंद्र सरकारकडे सदर निधी मंजुरीकरिता महाराष्ट्र शासनाने अहवाल पाठवला आहे. तरी ‘नमामि गंगे’च्या धर्तीवर वालधुनी आणि उल्हास नद्यांना प्रदूषणमुक्त करण्यासाठी निधी जलशक्ति मंत्रलयाने लवकरात लवकर मंजूर करावा. त्याचबरोबर भविष्यात या नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) सारख्या त्रयस्थ संस्थेकडे सदर कामाच्या लेखापरिक्षणाचे काम देण्यात यावे. जेणेकरुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (NEERI) सारख्या संस्थांना अहवाल सादर करतील. याकडे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान जलशक्ती मंत्रालय दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून जल-शक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.

कल्याण-उल्हासनगर परीसरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत आजूबाजूच्या वस्तीमधून सांडपाणी सोडले जाते. अनेक टाकाऊ वस्तू व नदी परिसरातील काही कंपन्यांकडून रसायन मिश्रित पाणी नदीत राजरोसपणे सोडले जाते. यामुळे या दोन्ही नद्या मोठ्या प्रमाणावर प्रदुषित झाल्या असून येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नदीतील पाणी तसेच नदीखालील भूस्तर प्रदुषित होत असून या प्रदुषित पाण्यामुळे नदीचे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत सुद्धा दूषित होण्याचा मोठा धोका संभवत असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले. या दोन्ही नद्यांचे पुर्नजिवितकरण हा खूप खार्चिक भाग असून तो खर्च स्थानिक स्वराज्य संस्थांना परवडणारा नाही. आणि म्हणूनच केंद्राकडे यासाठी मागणी करण्यात आलेली आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये टवाळखोरांचा उच्छाद; एकीकडे मारहाण तर दुसरीकडे गाडीचे नुकसान

कल्याण पोलीस परिमंडळ -३ मधील दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या कारणाने मारहाण झाल्याची घटना घडली आहे. यात दोन्ही घटनांमध्ये टवाळखोरांनी आपली दहशत दाखविली असल्याचे दिसत आहे. या दोन्ही घटना सोमवारी ९ ऑगस्ट रोजी घडल्या आहेत.

कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार ओव्हटेक केल्याच्या कारणावरून अज्ञात कार चालकाने ओव्हरटेक का केली या कारणाने कार ची समोरची काच फोडली तर त्याच गाडीमागे असणाऱ्या दोन दुचाकी स्वारांना मारहाण करीत मोबाईल आणि पैश्याचे पॉकेट हिसकावून नेले. तर दुसरीकडे कल्याण पश्चिम स्टेशन परिसरामध्ये  महात्मा फुले पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तिघांवर पाच ते सहा जणांच्या टोळक्यांनी  चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात तिघे जन गंभीर जखमी झाले.

एकाच दिवशी घडलेल्या दोन्ही घटनांमुळे कायद्याचे भय कल्याण मध्ये राहिले की नाही हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे. आनंद दिघे पूलाखाली कोळसेवाडी पोलिसांची हद्द संपते म्हणूंन  महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात पीडित याना पाठवण्यात आले. एकाच दिवसात पाठोपाठ तीन घटना घडल्याने कोरोना काळात आधीच पिचलेल्या नागरिकांत या प्रकारामुळे दाहशतीचे वातावरण पसरलेले दिसत आहे. पोलिसांनी रेल्वे स्टेशन परिसरात वारंवार घडणाऱ्या घटना कमी करण्यासाठी पोलिसांची अधिक गस्त वाढवण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

-रोशन उबाळे

उबेर चालकाची हत्या करून कार केली लंपास; महात्मा फुले पोलिसांकडून दोघांना अटक

ओला उबेर सारख्या खाजगी वाहनाने प्रवास सुरक्षित असल्याचा लोकांचा एक समज आहे. मात्र अशा प्रवासी वाहनावरील चालक देखील सुरक्षित नसल्याचे आता एका घटनेतून समोर आले आहे. काही वेळेस प्रवाश्याची हत्या होते तर कधी वाहन चालकाची हत्या होते. त्यामुळे सुकर प्रवास करावा कसा ? असा पेच निर्माण झाला आहे. खाजगी वाहनातून प्रवास करणे धोकादायक बनले असल्याचे या घटनेवरून समोर आले आहे.

कल्याण ते धुळे या प्रवासासाठी आरोपींनी उबेर कंपनीची गाडी बुक केली. या गाडीच्या प्रवासा दरम्यानच त्या आरोपी प्रवाशांनी चालकाची हत्या केली आणि त्याचा मृतदेह कसारा घाटात फेकून दिला. नंतर त्याची कार चोरून तिथून पोबारा केला. मात्र या हत्येतील दोन आरोपीना महात्मा फुले पोलिसांनी मोठया शिताफीने तपास करीत ताब्यात घेतले आहे. राहुलकुमार गौतम आणि धर्मेंद्रकुमार गौतम या आरोपींनी केलेल्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. अमृत गावडे असे या दुर्दैवी उबेर चालकाचे नाव असून तो नवी मुंबई मधील दिघा, ऐरोली मधील रहिवासी आहे.

पोलिसांनी या प्रकरणी राहुलकुमार गौतम, धर्मेद्र्कुमार उर्फ वकील गौतम, विशालकुमार गौतम, करणकुमार गौतम, बचई गौतम, अमन गौतम या आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उबेर चालकाच्या हत्येच्या या घटनेने सध्या खळबळ माजली आहे. दरम्यान या घटनेने खासगी प्रवास करणे अधिकच धोकादायक बनले आहे याचा सारासार विचार करण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर एसटीचा प्रवास सुखाचा प्रवास असे का म्हणतात ? हे देखील तितकेच अधोरेखित झाले आहे.

-रोशन उबाळे