कोळसेवाडी महिला मारहाण प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक ; कोळसेवाडी पोलिसांवर व्यक्त केली नाराजी

कल्याण कोळसेवाडी येथे काल रात्रीच्या सुमारास एका तरुणीला व तिच्या दोन मित्रांना मारहाण झाली होती. एक रिक्षाचालक आणि त्याने जमवलेल्या तरुणांनी या तिघांना मारहाण केली होती. यासंदर्भात गुन्हा का दाखल झाला नाही ? असा सवाल करत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कोळसेवाडी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली आहे.

काल रात्रीच्या सुमारास एक तरुणी रिक्षाने प्रवास करीत होती. याच रिक्षाच्या चालकाने तिची छेड काढली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या तरुणीने तिच्या दोन मित्रांना बोलावून घेतले. हे दोन्ही मित्र रिक्षाचालकाला जाब विचारण्यासाठी आले होते. मात्र असे असताना रिक्षाचालकाच्या संबंधित जमावाने राहुल गडेकर आणि बंटी प्रधान या दोघांना मारहाण केली. त्यांच्या समवेत त्या तरुणीला देखील अमानुष मारहाण करण्यात आली. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक इसम पट्ट्याने मारहाण करताना देखील दिसत आहे.

तरुणीला मारहाण केल्याची घटना संपूर्ण महाराष्ट्रात पसरली. मात्र तरीही दुपार पर्यंत मारेकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला नाही. यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाणे पोलीस आणि कोळसेवाडी पोलीस स्थानक यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. झालेली घटना निंदनीय असून पोलीस कशाची वाट पाहत आहेत असा सूर उमटवला गेला आहे.

“कल्याण कोळसेवाडीतील संतापजनक घटना व त्यावर ठाणे शहर पोलिसांची अजब कार्यपद्धती. बचावाला येणार्यांनाचं पोलिसांनी पोलिस स्टेशनला बसवून ठेवलयं व मारेकरी अद्याप मोकाट आहेत. अशाने संकटात सापडलेल्यांना मदत करायला लोक पुढे धजावतील का ? नियम कायदे ढिगाने बनवलेत हो. पण त्याची अंमलबजावणी कधी होणार ??”

– चित्रा वाघ (भाजप प्रदेश उपाध्यक्षा)

-संतोष दिवाडकर

फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भुषण जाधव बिनविरोध

कल्याण तालुक्यातील प्रसिद्ध असलेली फळेगाव सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे संचालक भूषण जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या निवडीने फळेगाव पंचक्रोशीतील गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

      शुक्रवारी फळेगाव सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून स. रा. भांगे तसेच सेवा सोसायटीचे सचिव भानुदास कोंडे होते. चेअरमन पदासाठी भूषण जाधव यांचा एकमेव अर्ज आल्याने अर्जाची छाननी करून चेअरमनपदी भूषण जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. फळेगाव सेवा सोसायटीचे सदस्य सुदाम पाटील, राजाराम चौधरी, दिनेश जाधव, आनंता जाधव, आत्माराम तारमळे, सुनील जाधव, दर्शना जाधव, सुनंदा देसेकर हे आहेत.

 फळेगाव सेवा सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन भूषण जाधव यांना शुभेच्छा देण्यासाठी शिवसेना तालुका प्रमुख वसंत लोणे, कल्याण पंचायत समितीचे सदस्य रमेश बांगर, फळेगाव गाव कमिटीचे अध्यक्ष गोपाळ जाधव, पोलिस पाटील प्रकाश जाधव, बंचू बांगर, चिमा भोईर, जगन जाधव, उपतालुका प्रमुख बंधू जाधव, माजी सभापती मिनाक्षी जाधव, चंद्रकांत भोईर यांच्यासह सेवा सोसायटीचे सदस्य उपस्थित होते.

-कुणाल म्हात्रे

शिक्षक परिषद पाच जुलै रोजी करणार राज्यव्यापी आंदोलन

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने सोमवार दिनांक पाच जुलै रोजी एक दिवशीय राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या अध्यक्षतेखाली सभेत घेण्यात आला.

पाच जुलैला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  काळ्या फिती लावून काम करणार आहेत. तर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग व तहसील कार्यालयात निवेदन देण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक परिषदेचे पदाधिकारी गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी लोकप्रतिनिधी व संघटनेमार्फत पाठपुरावा करून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. म्हणून पाच जुलै रोजी राज्यस्तरीय आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाचे पत्र शिक्षक परिषदेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड व शिक्षण सचिवांना पाठविण्यात आले आहे. राज्य सरकार शिक्षक-शिक्षकेतर यांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाही अनेक ज्वलंत प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वेळा पाठपुरावा करून त्याची दखल घेण्यात आलेली नाही. सदर प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षक परिषद प्रयत्नशील आहे या राज्यव्यापी आंदोलनात शिक्षक-शिक्षकेतर यांनी  सहभाग नोंदवून राज्य सरकारकडे आपला असंतोष व्यक्त करावा असे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी सांगितले. 

 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना विनाविलंब पूर्वलक्ष्यी प्रभावाने जुनी पेन्शन योजना लागू करणे. मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दहा, वीस, तीस वर्षे सेवेनंतर आश्वासित प्रगती योजना लागू करणे, कोरोनाग्रस्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विशेष गरजा व प्राधान्य अनुकंपा योजना लागू करणे, शिक्षकांना शाळाबाह्य कामे देऊ नये, भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठरलेल्या 59 शिक्षणाधिकारी  यांच्याविरुद्ध कठोर स्वरूपाची कारवाई करणे. शिक्षण विभागात रिक्त पदे तात्काळ भरणे.   शिक्षकेतर यांची पदे पूर्ववत ठेवून याबाबतचा शासन निर्णय रद्द करणे. अशा विविध एकतीस मागण्यांचा समावेश असलेले निवेदन देऊन राज्यस्तरीय आंदोलन केले जाणार आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण शिळरोडलगत एमआयडीसीचे खोदकाम ; पाईपलाईनच्या खोदकामामुळे नागरिकांची गैरसोय

डोंबिवली वरून पेंढारकर कॉलेज, ऊस्मा पेट्रोल पंप मार्गे कल्याण शीळ रोडकडे जाणारा मार्ग हा कल्याण शीळ रोड लगत एमआयडीसीच्या पाण्याच्या पाईपलाईन खोदाईमुळे गेल्या दहा दिवसांपासून वाहतूक आणि लोकांचा रहदारीसाठी बंद असल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे.

या  कामामुळे येथून जाणारी येणारी सार्वजनिक बस वाहतूक, लोकांचा जाण्या येण्याचा  मार्ग बंद झाल्याने त्या सर्वांना मोठा वळसा घालुन जावे लागत आहे. हे काम पावसाळ्यात करायचे होते तर लवकर पूर्ण करणे गरजेचे होते. कारण हा मार्ग वाहतुकीचा दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वसामान्य जनतेसाठी लोकल ट्रेन बंद असल्याने रस्ते वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन याचे नियोजन करणे गरजेचे होते.

जर अचानकपणे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर येथे दरवर्षी पावसाळी पाणी तुंबण्याचे प्रकार होत असल्याने त्याचा फटका अधिक तीव्रतेने येथे होईल. हे काम व्यवस्थित आखणी करून केले असते तर ते चार दिवसात पुरे करता आले असते. आतातरी हे काम लोकांसाठी एमआयडीसीने तातडीने लवकर पूर्ण करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया सामजिक कार्यकर्ते राजु नलावडे यांनी दिली आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये आता मिळणार ऑनलाइन रिक्षा ; ‘ऑटो कॅब’ अँप रिक्षा चालक नोदंणीला सुरवात

ओला उबर च्या धर्तीवर रिक्षा चालक मालक असोसिएशन संचलित आँटो कॅब अँप रिक्षा चालक नोदंणीला सुरवात झाली आहे. यामुळे आता कल्याणकर नागरिकांचा प्रवास जास्त सुरक्षित होणार आहे.

शासनाने मुक्त केलेले रिक्षा परवाने यामुळे वाढलेली रिक्षांची अफाट संख्या त्याच प्रमाणात वाढलेली विना लायसन्स बॅच रिक्षाचालंकाची संख्या व कोरोनाचे संकट यामुळे रेल्वे लोकल व वाहतुकीवर असलेले निर्बधं विविध कारणास्तव रिक्षा व्यवसायावर विपरीत परीणाम झालेला आहे.

विना लायसन्स अनाधिकुत रिक्षाचालकांमुळे निर्माण होणार्या समस्या प्रवाशी नागरीकांच्या तक्रारी निराकरण व प्रवाशी नागरीकांना दर्जेदार सुरक्षित रिक्षा प्रवास सोयीसुविधा उपलब्ध व्हावी व अधिकुत रिक्षाचालकांना शाश्वत रिक्षा व्यवसाय उपल्बधता या करीता रिक्षा संघटनेने ओला उबरच्या धर्तीवर आँटो कँब मोबाईल अँप विकासित केले आहे. कल्याण पश्चिमेतील मोरया हाँल, बैलबाजार येथे प्रातनिधिक स्वरुपात मोबाईल अँप रिक्षा प्रवास सुविधा समाविष्टता या करीता रिक्षा चालक नोदंणी अभियान शुभारंभ करण्यात .

याप्रसंगी उपस्थितीत रिक्षाचालकांना मोबाईल अँप रिक्षा प्रवास सुविधा भविष्यातील उपयुक्ता व माहीती जितेद्रं पवार व बिनाँय बाबु यांनी दिली. संतोष नवले व प्रतिक पेणकर यांनी जास्तीत जास्त रिक्षाचालकांनी व प्रवाशी नागरिकांनी मोबाईल अँप रजिस्टर्ड व डाऊनलोड करावे असे आवाहन केले. याप्रसंगी विलास वैद्य, अजगर कुरेशी, विजय डफळ, प्रंशात धनावडे, संजय बागवे,  बंडु वाडेकर, बापु चतुर, महीला रिक्षाचालक कल्पना वाघमारे  व अन्य रिक्षाचालक उपस्थितीत होते.

दरम्यान कल्याण रेल्वे स्टेशन येथील संघटनेच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी 11 ते 1  आणि सायंकाळी 6 ते 8 वाजेपंर्यंत 15 दिवस रिक्षाचालक नोदंणी सुरु राहणार आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये युवासेना पदाधिकाऱ्यांनी मनगटावरील शिवबंधून सोडून घातले घड्याळ ; क.डों.म.पा. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची पक्षबांधणी

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असले तरी कल्याण डोंबिवलीमध्ये या महाविकास आघाडीत केडीएमसी निवडणुकीच्या आधी फुट पडण्याची चिन्हे दिसत आहेत. याचे कारण हि तसेच असून  शिवसेनेचा भाग असलेल्या युवा सेनेतील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणाला जोर आला आहे.   

कल्याण पश्चिममधील शिवसेना युवा सेना कार्यकर्त्यांनी नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.  राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री अदिती तटकरे, चिपळूणचे आमदार शेखर निकम व कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कल्याण डोंबिवली जिल्हा कार्याध्यक्ष डॉ.वंडारशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (युवा सेना) कल्याण पश्चिम येथील युवासेना विभाग अधिकारी निखिल कदम,  युवासेना उपविभाग अधिकारी रिकी चक्रवर्ती, युवासेना उपशाखा अधिकारी रोहन सोनवणे, समाजसेवक ब्रिजेश कांबळे यांच्यासह युवासेनेच्या गट अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

झालेल्या या प्रवेशामुळे आगामी काळात होणाऱ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला एकप्रकारे सुरवात झाली असून निवडणुकीत शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस एकत्र लढणार कि स्वतंत्र याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान शिवसेना युवासेनेतील स्थानिक राजकारणाला कंटाळून या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असून त्यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसची विचारसरणी पटली आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद कल्याण मध्ये अधिक प्रमाणात वाढेल यात तिळमात्र शंका नाही अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राष्ट्रीय सरचिटणीस व महाराष्ट्र प्रदेश कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांनी यावेळी दिली.

-कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा.च्या वतीने डॉक्टर दिवस साजरा

डॉक्टर्स आर्मी, फॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर या संकल्पनांची सर्व देशभरात वाहवा झाली, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांनी आज काढले. आजच्या डॉक्टर्स डे  चे औचित्य साधून वसंत व्हॅली येथील महापालिकेच्या प्रसुतीगृहात आयोजिलेल्या डॉक्टरांच्या गौरवपर कार्यक्रमात ते बोलत होते.

 मी रुजू झाल्यावर कोविड सुरु झाला, परंतू डॉक्टर्स संघटनांनी ऊत्साह वाढविला, आशा दिल्या त्यामुळे ‘डॉक्टर्स आर्मी’ ही संकल्पना कल्याण डोंबिवलीत रुजली, रुळली.  डॉक्टर्स आर्मी, फॅमिली डॉक्टर्स कोविड फायटर  ही संकल्पना आता सर्व देशभर वाखाणली गेली आहे. अत्यंत अल्प कालावधीत जॅंम्‍बो फॅसिलीटी उभारणारी महाराष्ट्रातील ही एकमेव महापालिका आहे. अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. व्हॅलेंटाईन दिनाला रुजू झालो कारण काम हेच माझे व्हॅलेंटाईन आहे. अशी‍ मिश्किल पुस्ती देखील त्यांनी यावेळी जोडली.

  कोविडच्या दुस-या लाटेनंतर आता महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयात मॉडयुलर ओटी सुरु होणार असून सर्व शस्त्रक्रिया तिथे करण्याचा आमचा प्रयत्न आहे. वसंतव्हॅली, शक्तिधाम, विठ्ठलवाडी आणि रुक्मिणी प्लाझा या  ४  ठिकाणी आता कायम स्वरुपी रुग्णालये सुरु केली जाणार आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेची १६  नागरी आरोग्य केंद्रे असून आता नागरिकांच्या सेवेसाठी सध्या एकुण २५  आणि भविष्यात ३६  नागरी आरोग्य केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत. महापालिकेमार्फत डायलेसिस सेंटरही सुरु केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवंशी यांनी यावेळी दिली.

     या कार्यक्रमात महापालिकेचे डॉक्टर्स,  आयएमए, कॅम्पा,   निमा,   होमिओपॅथिक इ. वैदयकीय संघटनांच्या पदाधिका-यांचा व कोविड काळात इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी मदत करणाऱ्या इंजिनिअर्सचा प्रातिनिधिक स्वरूपात महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यंवशी यांच्याहस्ते तुळशीचे रोप व भेटवस्तू देवून गौरव करण्यात आला. डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून ऑपरेशन थिएटर, ओपिडी इ. सुविधांयुक्त प्रसुतिगृह वसंत व्हॅली येथे आज सुरु करण्यात आले आणि एक बाळंतपणही सुखरुपरित्या पार पडले.

क.डों.म.पा. क्षेत्रात चार दिवसांपासून लसीकरण बंद ; १० दिवस सुरू आहे लसींचा तुटवडा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मागील १० दिवसांपासून लसीकरणाचा वेग मंदावला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. महापालिका क्षेत्रात शेवटचे लसीकरण २८ जून रोजी झाले होते. व त्यानंतर चार दिवसांपासून लस उपलब्ध न झाल्याने लसीकरण ठप्प झाले आहे.

केंद्र सरकार आणि राज्य सरकार नागरीकांना वारंवार लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन करीत आहे. मात्र प्रत्यक्षात लस उपलब्ध होत नसल्याने कल्याण डोंबिवलीकर वैतागले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर लसीकरणाला वेग आला होता. तिसरी लाट येण्यापूर्वी लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रशासनाने म्हटले होते. अस असले तरी प्रत्यक्षात मात्र लसीकरण केंद्र चार दिवसापासून बंद पडली आहेत.

क.डों.म.पा. क्षेत्रात २३ जून पासून लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. २३ जून ते २६ जून या चार दिवसांत आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण व सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली या दोनच ठिकाणी लसीकरण सुरू होते. त्यानंतर २७ जूनला लसीकरण पूर्णपणे बंद झाले. २८ जून रोजी महापालिकेला लस उपलब्ध झाल्याने या दिवशी २५ लसीकरण केंद्रांवर लोकांना लस देण्यात आली. त्यांनंतर २८ जून पासून २ जुलैपर्यंत महापालिकेला शासनाकडून कोणताही लसींचा पुरवठा झाला नाही. परिणामी चार दिवस लसीकरण बंद ठेवावे लागले आहे.

क.डों.म.पा.ला नुकताच कोव्हीड इन्होव्हेशन पुरस्कार भारत सरकारकडून मिळाला असल्याने आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर त्यांनी महापालिका क्षेत्रातील टाटा आमंत्रा हे कोव्हीड सेंटर आता बंद केले आहे. त्यामुळे तिसरी लाट येणार नसल्याचा हा शुभ संकेत असू शकतो असेही ते म्हणाले होते. मात्र असे जरी असले तरी कल्याण डोंबिवली करांचे लसीकरण लवकरात लवकर करून देण्याच्या प्रयत्नात जरी ते असले तरी शासनाकडून काही कारणाअभावी लसींचा पुरवठा उपलब्ध होत नाही ही निराशाजनक बाब म्हणावी लागेल.

-संतोष दिवाडकर

मलंगगड भागात प्रसृतीसाठी रुग्णालय बंद असल्याने नवजात बालकाचा मृत्यू ; टेम्पो मध्ये झाली कातकरी महिलेची प्रसृती

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड भागात रात्रीच्या सुमारास एका महिलेची चक्क टेम्पो मध्ये प्रसृती झाली. परंतु मुल जन्माला येताच त्याचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ग्रामीण भागातील राजकीय चंगळीतुन बंद असलेल्या सरकारी रुग्णालयामुळे एका बालकाचा बळी गेला आहे का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

कल्याण शहरा पासून काही किमी च्या अंतरावर असलेला मलंगगड हा ग्रामीण भाग. या भागात मांगरूळ येथे एक सरकारी रुग्णालय आहे. मात्र स्थानिक राजकीय स्वार्थ आणि वादावादीमुळे डागडुजीचे कारण पुढे करत हे रुग्णालय सदा न कदा बंदच असते अशी येथे ओरड आहे. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास मलंगगड भागातील म्हात्रेपाडा कातकरी वाडीतील वंदना लक्ष्मण वाघे या महिलेला प्रसृतीकळा सुरू झाल्या. रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने टेम्पो मधून तिला मांगरूळ येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र हे रुग्णालय चक्क बंद अवस्थेत होते. त्यानंतर या महिलेला उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात नेण्यात आले. मात्र वाटेतच या महिलेची प्रसृती झाली. आणि या महिलेच्या पोटी जन्म घेताच व्यवस्थित उपाययोजना न झाल्याने ते बाळ दगावले.

वर्षभरात अश्या ३ घटना घडल्या असल्याचे येथील लोक सांगत आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांनी तपासणीसाठी महिलेला ९ महिन्यातून फक्त एकच इंजेक्शन दिले असल्याचा संतापजनक आरोप देखील नागरिकांनी केला आहे. ग्रामीण भागातील ही आरोग्य केंद्र आणखी किती लोकांचा जीव घेणार आहे असा प्रश्न गावकरी विचारत आहेत.

अंबरनाथ तालुक्यातील मलंगगड ग्रामीण भागात सतत राजकीय पुढाऱ्यांची रेलचेल सुरू असते. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी नुकतेच नेवाळी येथे फिरत्या दवाखान्याचे लोकार्पण केले होते. मात्र असे जरी असले तरी या भागात आरोग्याचा प्रश्न काय आहे ? हे या घटनेतून पुढे आले आहे. स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी आरोग्य सोयी सुविधां साठी आणखीन गांभीर्याने विशेष लक्ष देणे देखील तितकेच गरजेचे दिसत आहे. या भागात आपत्कालीन परिस्थिती ओढावली तर एकही रुग्णालय उपलब्ध नाही. विशेष म्हणजे मांगरूळ येथील रुग्णालय हे डागडुजीचे कारण देऊन लोकांच्या आरोग्य आणि जीवाशी हेळसांड करीत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याचा हा गंभीर प्रश्न सोडवणार तरी कोण ? गरिबांचा वाली आहे तरी कोण ? की नुसताच राजकीय स्वार्थातून असे बळी जात राहणार ? असा सवाल येथील गावकरी आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारला विचारत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आता स्वतःच अश्या गोष्टींची गंभीरपणे दखल घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

-संदेश दाभणे

कोविड-19 इन्होवेशन पुरस्काराबद्दल केडीएमसी आयुक्तांचा विविध व्यापारी संघटनांनी केला नागरी सत्कार

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला मिळालेल्या कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा कल्याण मधील विविध व्यापारी संघटना, महाविद्यालयांचे प्राचार्य, राजकीय, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांनी एकत्र येत नागरी सत्कार केला.

      भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये कोविड-19 इन्होवेशन पुरस्कारासाठी केलेल्या सादरीकरणाबाबत,  भारत सरकारतर्फे “वाराणसी आणि कल्याण डोंबिवली” या शहरांना संयुक्तपणे विजेते घोषित केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला भारत सरकारचा कोविड-19 इन्होवेशन पुरस्कार मिळाल्याबद्दल केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्यावर विविध स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

      आज देखील अशाच प्रकारे कल्याण मधील विविध व्यापारी संघटना, महाविद्यालयांचे प्राचार्य, राजकीय सामाजिक संघटनांनी एकत्र येत आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन नागरी सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सेक्रेटरी, मुथा कॉलेज चेअरमन, ज्वेलर्स असो अध्यक्ष प्रकाश मुथा, माजी नगरसेवक तथा अग्रवाल कॉलेज व्हॉईस चेअरमन ओमप्रकाश पांडे, माजी नगरसेवक इफ्तेकार खान, कल्याण शहर काँग्रेस ओबीसी अध्यक्ष तथा खवा व्यापारी संघटना सचिव जयदीप सानप, डॉ गिरीश लटके, कपडा व्यापारी असो. हशुभाई शाह, ज्वेलर्स असो वीरेंद्र मुथा, मुथा कॉलेज मुख्याध्यापिका साधना गाधिया, दिपाली मॅडम, स्याम्युल चार्ल्स, महेन्द्र शंकलेशा, जयंतीला शंककलेशा, जयराज सर, किशोर खराटे, राजा सुदाम जाधव केबल व्यावसायिक उपस्थित होते.     

संपूर्ण देशाची कोरोना परिस्थिती कशी आहे, कल्याण डोंबिवली महानगर पालिकेची कोरोना स्थिती कशी होती हे सर्वाना माहिती असून अशा परिस्थितीत केडीएमसी आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमने  अतिशय चांगले काम केलं असून त्याबद्दल भारत सरकारच्या वतीने पुरस्कार देण्यात आला आहे. हि अभिनंदनाची बाब असून त्याबद्दल आम्ही हा नागरी सत्कार केला असल्याची प्रतिक्रिया प्रकाश मुथा यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे