पोलीस उपायुक्तांच्या हस्ते अलका सावली प्रतिष्ठानच्या गरजूंना छत्री वाटप उपक्रमाचा शुभारंभ

बेघर आणि गरजू लोकांचे पावसापासून रक्षण व्हावे यासाठी कल्याण पश्चिमेतील ‘अलका सावली’ प्रतिष्ठान या संस्थेमार्फत दरवर्षी गरजू लोकांना छत्री वाटप करण्यात येते. यावर्षी देखील संस्था हा उपक्रम राबवत असून कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याहस्ते काही लोकांना छत्री देऊन आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक सुधीर वायले यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अलका सावली प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेचे मार्फत वर्षभर असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्यात आरोग्य शिबिर, आदिवासी पाड्यावरील लोकांना कपडे, गरजूंना अन्नधान्य  वाटप व करोना काळातही ज्या वस्तूंची गरज ती म्हणजे मास्क, सॅनीटायझर, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य,  गरजू विद्यार्थ्यांना सायकली, लहान मुलांसाठी विविध स्पर्धा, खेळणी वाटप, गरजू महिलांसाठी अनेक उपक्रम ही संस्था नेहमी राबवत असते.

विद्यार्थ्यांसाठीही विविध उपक्रम त्यात चित्रकला, निबंध, रांगोळी, वक्तृत्व स्पर्धा असे उपक्रम घेतले जातात. अलका सावली प्रतिष्ठान हि संस्था सतत पाच वर्षापासून अखंड कार्यरत असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सुधीर वायले यांनी दिली. आज या छत्री वाटप उपक्रमाचा शुभारंभ पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी पोलीस उपायुक्तांनी देखील या संस्थेच्या कार्याचे कौतुक करत इतर संस्थांनी देखील असा आदर्श घेण्याचे आवाहन केले.

 संस्थेने राबवलेल्या विविध समाज उपयोगी उपक्रमांचे नागरिकांकडून नेहमी कौतुक होत असते. यावेळी संस्थेचे संस्थापक सुधीर वायले यांच्यासह, कला शिक्षक यश महाजन, सागर वाघ, आकाश वायले, बंड्या कराळे, शरद शेलार, अनिकेत वायले, दीपक सिन्हा यांच्यासह संस्थेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

गुड न्यूज ! कल्याण डोंबिवलीत आज आढळले फक्त ३२ रुग्ण

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातला होता. आता ही लाट पूर्णपणे ओसरून गेली असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. आज दि.१९ जून रोजी या दोन्ही शहरात एकूण ३२ रुग्ण आढळले आहेत.

क.डों.म.पा. क्षेत्रातून कोरोना कमी होत असल्याने सध्या येथील शहरवासीय मास्क हटवून मोकळा श्वास घेऊ इच्छित आहेत. कारण दुसऱ्या लाटेने सर्वांचाच जीव भांड्यात पडला होता. दिवसागणिक २० हुन अधिक लोकांचे जीव जात होते तर दिवसाला २४०० रुग्ण सापडल्याचा ही रेकॉर्ड बनला होता. मात्र आता हे आकडे पूर्णतः वधारले आहेत. मागील दोन दिवसात कोणत्याही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद देखील झालेली नाही. तर आज १२५ रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला आहे. शिवाय आज फक्त ३२ रुग्ण आढळले आहेत. यातील निम्मे रुग्ण कल्याण तर निम्मे रुग्ण डोंबिवलीचे आहेत. महापालिकेने केलेल्या विभागवारी नुसार कल्याण पूर्वेत ६, पश्चिमेत १० तर डोंबिवली पूर्वेत १० आणि पश्चिमेत ६ रुग्ण आढळले आहेत.

आज दि.१९ जून रोजीच्या नव्या आकडेवारी नुसार आता महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे एकूण १३०६ रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. तर दुसरीकडे महापालिका प्रशासन लसीकरण मोहीम वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाची लाट ओसरली असली तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासन करीत आहे.

-संतोष दिवाडकर

वीज बिल भरून सहकार्य करण्याचं महावितरण कडून आवाहन

महावितरणच्या कल्याण परिमंडळात पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या वीजजोडणीची थकबाकी १३५ कोटी रुपयांच्या घरात पोहचली आहे. तर सर्वच वर्गवारीतील सुमारे दहा लाख ग्राहकांकडे ५५२ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. वीजबिल भरून कठीण आर्थिक परिस्थितीत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

कल्याण परिमंडळ अंतर्गत ठाणे व पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पथदिव्यांच्या १७३१ वीजजोडण्यांचे १२४ कोटी २० लाख रुपयांचे वीजबिल थकले आहे. तर परिमंडलात शहरी भागातील पथदिव्यांच्या २०१७ वीजजोडण्यांचे ५१ कोटी रुपये वीजबिल येणे बाकी आहे. पाणीपुरवठा योजनांच्या १०३१ वीजजोडण्यांची थकबाकी ४ कोटी ४० लाखांवर गेली आहे. दोन्ही सार्वजनिक सेवांचे थकीत वीजबिल भरून अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा. अन्यथा या सेवांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे महावितरणने सूचित केले आहे.

परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ९ लाख ९९ हजार ग्राहकांकडे ४४१ कोटी रुपयांचे वीजबिल थकीत आहे. थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. गैरसोय टाळण्यासाठी महावितरणकडून उपलब्ध सुविधांचा लाभ घेऊन चालू व थकीत वीजबिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये दहावीच्या निकालाचे काम करणाऱ्या शिक्षकांवर ‘बीएलओ’च्या कामाचा भार

एकीकडे दहावीच्या निकालाची शाळेत कामे सुरू असून दुसरीकडे शिक्षकांना बीएलओच्या कामाला जुंपण्यात आले असून शिक्षकांना या कामातून वगळण्याची मागणी भाजपा शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी केली आहे.

कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघातील शाळांमधील अनेक शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) च्या कामाचे आदेश काढण्यात आले असून यामध्ये शिक्षकांना मतदार यादीचा अभ्यास करणे, यादीतील दुरुस्ती करणे,  दुबार, मयत, स्थलांतरीत व मतदान छायाचित्र चिटकविणे, मतदारांना आपल्या ताब्यातील नोटिसा बजावणे इत्यादी कामे करावी लागणार आहेत.

यंदा दहावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे अंतर्गत गुणांवर आधारित निकालाची कामे शिक्षण मंडळाने शिक्षकांवर सोपविली आहेत. दिलेल्या मुदतीत ही सर्व कामे करायची असल्याने सर्व शाळांमध्ये शिक्षकांची निकालाची धावपळ सुरू आहे त्यातच बीएलओची कामे शिक्षकांच्या माथी मारल्यामुळे निकालाची कामे करायची की बीएलओची ? असा संतप्त सवालही अनिल बोरनारे यांनी प्रशासनाला विचारला असून तातडीने अशैक्षणिक कामे बंद करण्याची मागणी केली आहे.

-संतोष दिवाडकर

डोंबिवलीत पोलीस चौकी समोरील मेडिकल चोरट्यांनी फोडलं

डोंबिवलीतील मानपाडा मुख्य रस्त्यावरील ऑप्टिलाईफ हॉस्पिटल शेजारील शिवाजी उद्योग नगर पोलीस चौकी समोरील शिवम मेडिकल दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी रोकड आणि सामानाची चोरी केली. भर रस्त्यावर चोरी झाल्याने व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे.

डोबिवली शहरातील दुधनाथ यादव यांच्या शिवम मेडिकलचे शटर उचकवून चोरट्यांनी सकाळी ५  च्या दरम्यान दुकानात प्रवेश केला. दुकानातील १५ हजाराची रोकड आणि कॉस्मेटिक सामान चोरले. शहराच्या सदैव वर्दळ असणाऱ्या भागात हि घटना घडल्याने चोरांची हिम्मत वाढविल्याचे दिसून येत आहे. दुकानाच्या बाजूला २४ तास चालणारे ऑप्टिलाईफ हॉस्पिटल आहे. या भागात सदैव पेशंटची येजा असते असे असतांना देखील चोरांनी केलेली हिम्मत चिंताजनक आहे.

दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये चोराचा चेहरा दिसून येत असून रोकड आणि सामान पिशवी मध्ये भरतांनाचे फुटेज मिळाले आहे. याबाबत दुकानदाराने पोलिसांकडे प्राथमिक तक्रार दिली असून फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.

-कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा. क्षेत्रात आज कोरोनाचा एकही मृत्यू नाही ; दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच अशी नोंद

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज कोरोनाने एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. मागील आठवड्यात हाच मृत्युदर दिवसाला २० च्या वर गेला होता. मात्र आता हाच दर शुन्या पर्यन्त आला आहे. दुसऱ्या लाटेनंतर प्रथमच असे घडले आहे.

मागील दिड वर्षांपासून क.डों.म.पा. हद्दीत कोरोनाचा उद्रेक सुरू होता. रणरणत्या उन्हाळ्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि लोकांना हॉस्पिटल मध्ये बेड मिळणे कठीण होऊन बसले. बेड, ऑक्सिजन, इंजेक्शन या सर्वांचाच तुटवडा आणि त्यात लॉकडाऊनने सामान्य नागरिकांचे कंबरडे कोरोनाने पार मोडून टाकले. अलीकडे लॉकडाऊनच्या नियमांमध्ये काहीशी शिथिलता आली असून कोरोना रुग्ण संख्या देखील आटोक्यात येताना दिसत आहे. यातच इतक्या महिन्यानंतर प्रथमच क.डों.म.पा. क्षेत्रात शून्य कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत.

आज महानगरपालिका क्षेत्रात १२७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचबरोबर ७९ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. या बेरीज वजाबाकीच्या आकडेवारीसह आता महापालिका क्षेत्रात १३९९ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. महापालिका क्षेत्रात आतापर्यंत २२०० हुन अधिक लोकांनी कोरोनाने जीव गमावला असून १ लाख ३१ हजार ३४३ रुग्ण बरे झाले आहेत.

-संतोष दिवाडकर

कोरोनाने मृत पावलेल्या मुलाच्या समरणार्थ कुटुंबियांनी लावली झाडं

दुःखातून सावरुन आपल्या लाडक्या मुलांच्या स्मृती प्रित्यर्थ परिजातकांची २६ झाडांची लागवड करीत भविष्यात त्या झाडांच्या फुलांचा सुगंध परिसरात दरवळवा. क्राँक्रीटच्या जगंलात नैसर्गिक समतोल साधवा या सामाजिक जाणिवेतून कल्याण मधील जामदार कुटुबीयांनी वृक्षारोपण केले आहे.

कल्याण येथे राहणारे सामाजिक कार्यकर्ते उल्हास जामदार यांचा २६ वर्षीय मुलगा योगेश याला गेल्या वर्षी कोरोणाची लागण झाली होती. त्याला इतर व्याधी असल्याने त्याची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. मंगळवारी त्याचा २६ वा वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त त्याच्या स्मरणार्थ जामदार कुटुंबीयांनी कल्याणात वृक्षारोपण केलें. केडीएमसीच्या बारावे येथील एसटीपी प्लांट परिसरात २६ वृक्षांची जामदार कुटुंबियांनी लागवड करून नैसर्गिक वातावरण जतन होण्यासाठी खारीचा वाटा उचलत एक अगळा संदेश समाजात रूजविला आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याणमध्ये भर चौकात शेकडो बुलेटच्या सायलेन्सरवरून वाहतूक पोलिसांनी फिरवला रॉलर

कल्याणमध्ये वाहतूक पोलिसांनी मॉडीफायकेलेल्या बुलेट सायलेन्सरवर रोलर फिरवला असून गेल्या तीन दिवसांपासून कल्याण वाहतूक शाखेच्या वतीने मॉडीफाय बुलेट सायलेन्सरवर कारवाई सुरू होती. जवळपास १०४  बुलेटवर कारवाई करून मॉडीफाय सायलेन्सर काढून घेण्यात आले होते. त्या सायलेन्सरवर दुर्गाडी चौकात रोलर फिरवून कायमस्वरूपी निकामी करण्यात आले. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील, पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील आदीजण उपस्थित होते.

वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी बुलेट मोटार सायकल वाहनांचे यांत्रीक भाग व तांत्रिक रचनेत बदल  केलेल्या तसेच काळया काच लावणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सोमवारपासून शहर वाहतुक उपशाखा, कल्याण मार्फत कल्याण परिसरातील दुर्गाडी, सुभाष चौक, शहाडनाका, व पत्रीपुल या भागात वेगवेगळी पथके तयार करुन बुलेट मोटार सायकल वाहनांचे यांत्रीक भाग व तांत्रिक रचनेत बदल केलेल्या एकुण ११६ वाहनांवर कारवाई करुन १०४ सायलेन्सर ताब्यात घेण्यात आले.

त्यांच्यावर प्रचलीत मोटार वाहन कायदयानुसार कारवाई करुन एकुण १ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. तसेच काळी फिल्म लावणाऱ्या एकुण ६४ वाहन चालकांवर कारवाई करुन वाहनांच्या काचेवर लावलेले काळी फिल्म काढुन घेवुन त्यांच्यावर कारवाई करुन एकुण १२ हजार ८०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. हि कारवाई कल्याणचे वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील,  मसपोनि सुनिता राजपुत, पोउपनि तुकाराम सकुंडे व पोलीस अंमलदार यांनी केलेली असुन यापुढे देखील कारवाई सुरु राहणार आहे.

 बुलेट मोटार सायकलच्या यांत्रीक भाग व तांत्रिक रचनेत बदल केल्यामुळे होणाऱ्या कर्कश आवाजामुळे वायु व ध्वनी प्रदुषण तसेच वाहने रस्त्यावरुन कर्णकर्कश आवाज करीत अनियत्रीत वेगाने चालविल्याने पादचारी, जेष्ठ नागरीक व लहान मुलाच्या आरोग्यास तसेच सुरक्षितेतेस निर्माण होणारा धोका तसेच सार्वजनिक शांततेचा भंग होणारा नाही. याबाबत कल्याण परिसरात पी.ए सिस्टीमव्दारे नागरीकांना आव्हान करुन जनजागृती करण्यात आली आहे.

-कुणाल म्हात्रे

क.डों.म.पा. ‘ब’ आणि ‘ई’ प्रभागात अनाधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या  निर्देशानुसार आणि विभागीय उपआयुक्त उमाकांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण पश्चिम येथील ब प्रभाग क्षेत्रातील कल्याण स्पोर्टस क्लबच्या मागील बाजूस चालू असलेल्या १० चाळीच्या रुमचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची धडक कारवाई ब प्रभागक्षेत्र अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी महापालिकेचे पोलिस कर्मचारी व महापालिकेचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे १० कामगार यांच्या मदतीने आज केली.

ई प्रभागातही प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी डोंबिवली पूर्व येथील देसलेपाडा, नांदीवली येथे चालू असलेले जी+ 3 या इमारतीचे अनधिकृत बांधकाम निष्कासनाची कारवाई आज केली. सदर कारवाई ई प्रभागातील अतिक्रमण निर्मूलन विभागातील २०  कर्मचारी व १०  पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने तसेच १  जेसीबी, ४ कॉम्प्रेसर, गॅस कटर यांचे सहाय्याने करण्यात आली.

-कुणाल म्हात्रे

“ड” प्रभागातील अती धोकादायक इमारतीवर निष्कसनाची कारवाई

अतीधोकादायक इमारतीमुळे  संभाव्य दुर्घटना घडु नये म्हणून मनपा प्रशासनाने अतिधोकादायक इमारतीवर निष्कसनाच्या कारवाई चा बडगा उचला असुन “ड” प्रभाग क्षेत्रातील अतिधोकादायक इमारतीचे पाडकामास प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने गुरुवारी सुरुवात केली. धोकादायक इमारती मधील रहिवाशांचे स्थलांतरित करण्याचे आदेश  कल्याण डोंबिवली पालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत.

उप आयुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ड’ प्रभागाच्या वतीने कल्याण पुर्वेतील हनुमान नगर परिसरातील विश्वास विघालय या अतिधोकादायक तळ +दोन मजले इमारतीचे पाडकामास “ड” प्रभागक्षेत्र आधिकारी सुधीर मोकल यांच्या पथकाने गुरुवारी सुरुवात केली.  या अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम कर्मचारी वर्ग, हातोडा, ईलेक्टीकल ब्रेकर यांच्या मदतीने करण्यात येत आहे.

-कुणाल म्हात्रे