दुर्गा फाउंडेशनतर्फे आदिवासी पाड्यात अन्नधान्याचे वाटप

दुर्गा फाऊंडेशनच्या माध्यमातून पनवेल मधील अत्यंत दुर्गम आदिवासी वाड्यात शेकडो गरीब कुटुंबाला अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. या आदिवासी पाड्यातील जनतेला शासकीय योजनांचा लाभ होतो किंवा शासकीय योजना यांच्यापर्यंत पोहचतात का ? असा प्रश्न मनात येत असल्याची भावना शोभा भोईर यांनी व्यक्त केली आहे.

पहील्या लॉकडाऊन काळात पिचलेला आदिवासी बांधव अजूनही सावरलेला नाही. मागील कोरोना काळात दुर्गा फाऊंडेशन मार्फत अन्नधान्य,मास्क, सॅनिटायझर यांचे वाटप करण्यात आले होते. तर दुसऱ्या लॉकडाऊन काळात आदिवासी वाड्यात पुन्हा अन्नधान्याचे वाटप करण्यासाठी दुर्गा फाऊंडेशनच्या संथापिका अध्यक्षा शोभा भोईर यांच्या मनात आल्याने त्यांनी आदिवासी भागात अन्नधान्य वापट करून शेकडो गरिबांच्या घराची चूल पेटवून मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या या मदतीने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.

यावेळी दुर्गा फाऊंडेशन संस्थापिका अध्यक्षा शोभा भोईर,रसिका म्हाञे, ज्योती चिवे, सुरेखा माने,सारिका ठाकुर, सिदधी श्रीवास्तव, अश्विनी पाटील आदी पदाधिकारी याप्रसंगी उपस्थिती होत्या.

-कुणाल म्हात्रे

KDMC हद्दीतील ३३ खाजगी रुग्णालयांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून मान्यता ; गृहसंकुलातही सशुल्क लसीकरणाला परवानगी

कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे तसेच महापालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 संभाव्य तिस-या लाटेचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी लसीकरण वेगाने करणे आवश्यक असल्यामुळे शासनाच्या धोरणानूसार खाजगी रुग्णालयांनादेखील कोविड लसीकरणा संबंधी मान्यता देणे बाबतचे धोरण महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केले असून त्यानुसार  सदर रुग्णालयांनी स्वखर्चाने वितरकाकडून लस खरेदी करुन योग्य ते शुल्क आकारुन लसीकरण करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेने 33 खाजगी रूग्णालयांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.

ज्या आस्थापना व गृहसंकुले वय वर्षे १८ व त्यापुढील नागरिकांसाठी सशुल्क लसीकरण करून घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सदर रूग्णालयांशी संपर्क करून लसीकरण करून घ्यावे. मान्यताप्राप्त खाजगी रूग्णालयांनी वितरकांकडून लस खरेदी करून, लस उपलब्ध असल्याची माहिती प्रसिद्ध करावी. या खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक प्रशिक्षित  मनुष्यबळ, अनुषंगिक वैद्यकीय सामग्री उपलब्ध करून शासनाच्या  कोविन पोर्टल मध्ये लाभार्थ्यांची आवश्यक माहिती भरून लसीकरण करावे.

लसीकरणासाठी परवानगी दिलेल्या खाजगी लसीकरण केंद्रांच्या माहितीबरोबरच सदर धोरण हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

-कुणाल म्हात्रे

केडीएमसीच्या वतीने सिटी पार्कमध्ये १४०० झाडांच्या लागवडीला सुरवात

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने सिटी पार्कमध्ये १४०० झाडांच्या लागवडीला सुरवात करण्यात आली असून  जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांनी किमान एका वृक्षाची लागवड करावी, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज केले. आजच्या जागतिक पर्यावरण दिनी, सिटी पार्क परिसरात स्व:हस्ते वृक्षारोपण करतांना त्यांनी हे आवाहन केले.

महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी तसेच नागरिकांनी आजच्या दिवशी शक्य असेल तिथे किमान एका वृक्षाची लागवड करावी, महापालिकेच्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आजपासून स्वत:पासूनच घरातला ओला व सुका कचरा वेगळा करण्याची सुरुवात करावी, जेणेकरून हा चांगला संदेश महापालिकेच्यावतीने सर्व नागरिकांना जाईल, असेही ते पुढे म्हणाले. नागरिकांनीदेखील आपला ओला व सुका कचरा वेगळा करावा म्हणजेच पर्यावरण दिनाचे सार्थक होईल, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

सिटी पार्क परिसरात विविध प्रकारची सुमारे १४०० झाडे लावली जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बारावे येथील एकात्मिक घनकचरा प्रकल्प येथेही वृक्षारोपण केले आणि सदर ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरणही केले. वाडेघर येथील एस.टी.पी. प्लॅन्ट येथेही महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी घकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा, उपअभियंता भालचंद्र नेमाडे, प्रभागक्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते, सुधिर मोकल, राजेश सावंत, दिपक शिंदे व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.

-कुणाल म्हात्रे

कोरोनामुळे पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांचा उचलणार शैक्षणिक भार ; कुणाल पाटील फाउंडेशनचा उपक्रम

कोविड मुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत करत पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च कल्याण मधील तत्कालीन नगरसेवक कुणाल पाटील हे करणार आहेत. त्याचप्रमाणे कोविड योद्धा सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि  गरीब गरजू कुटूंबाना जिवनावश्यक अन्नधान्य देखील वाटप केले आहे. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त कुणाल पाटील फाउंडेशनच्या माध्यमातून  त्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

गेल्या वर्षभरात कोरोनामुळे लाखो लोकं बाधित झाले आहेत तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या देखील मोठी आहे. अशातच अनेक कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्याने या कुटुंबियांसमोर उदर निर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा या कुटुंबांना मदत करण्यासाठी कुणाल पाटील फाउंडेशन पुढे आलं असून कल्याण ग्रामीण भागातील कोविड मुळे मृत्यू झालेल्या कुटुंबाला आर्थिक मदत तसेच पालकांचे छत्र हरपलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खर्च करण्याचा निर्णय तत्कालीन नगरसेवक कुणाल पाटील यांनी घेतला आहे. कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाला सुरवात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोविड योद्धा सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि  गरीब गरजू कुटूंबाना जिवनावश्यक अन्नधान्य देखील वाटप केले आहे.

सध्या संपूर्ण जगावर ओढावलेली परिस्थिती अत्यंत वाईट असून कोविडमुळे अनेकांचे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. अशा कुटुंबांना मदत करून आधार देणे हे आपले कर्त्यव्य असून या कर्तव्यातून आपण हि मदत करत असून इतर नागरिकांनी देखील अशा कुटुंबाना मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन तत्कालीन नगरसेवक कुणाल पाटील यांनी केले आहे. यावेळी समाजसेवक अनिल पाटील हे देखील उपस्थित होते.

– कुणाल म्हात्रे

वाहतूक पोलिसांच्या वतीने कल्याणमध्ये गोरगरिबांना अन्नदान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तालय, शहर वाहतूक उपशाखा कल्याण, स्वामी नारायण हॉल, कच्छ युवक संघ अंतर्गत कल्याण स्टेशन परिसारत गोरगरिबांना मोफत अन्न वाटप करण्यात आले.

कोविड संदर्भात सर्व नियमांचे पालन करीत अन्न वाटप करण्यात आले. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोणताही नागरिक उपाशी राहू नये यासाठी पोलीस आयुक्तालय ठाणे शहर अंतर्गत वहातुक शहर उपशाखा कल्याण व स्वामी नारायण हॉल, कच्छ युवक संघ यांच्या तर्फे सकाळी व संध्याकाळी दोन टाईम अन्न वाटप करण्यात येईल.

यावेळी वाहतूक पोलीस वरिष्ठ निरीक्षक कल्याण सुखदेव पाटील,  सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील उपस्थित होते.

-कुणाल पाटील

कल्याण डोंबिवलीत मास्क परिधान न केलेल्या व्यक्तींकडून ‘इतका’ दंड वसूल

कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने प्रभावीपणे अमंलबजावणी सुरू ठेवली असुन मनपा दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत असूनही अजून काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना मास्क न घालता फिरत असल्याचे दिसून येत आहे.  मे महिन्यात घराबाहेर विना मास्क फिरणा-या ४८४५ व्यक्तींकडून मनपा कर्मचारी पथकाने पोलिसांच्या मदतीने तब्बल २२ लाख ९३ हजार रुपये इतका दंड वसूल केला आहे.

नागरिकांनी घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी अथवा गर्दीच्या ठिकाणी वावरतांना मास्क परिधान करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात आले आहे. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना नियमावलीचे पालन होणे बाबत प्रशासन कठोर अमंलबजावणी करीत सार्वजनिक ठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई चा बडगा उचलीत दंडात्मक कारवाई प्रभावीपणे राबवित आहे.

-कुणाल म्हात्रे

कल्याण पूर्वेत अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम

कल्याण पूर्वेत अतिधोकादायक इमारतीचे पाडकाम शुक्रवारी मनपा प्रशासनाने केले. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांच्या निर्देशानुसार उपायुक्त अनंत कदम यांच्या  मार्गदर्शनाखाली प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांनी या अतिधोकादायक इमारतीवर निष्काशनाची कार्यवाही केली.

“ड” प्रभागातील भरत अपार्टमेंट नावाची धोकादायक इमारत निष्कासनाचे काम शुक्रवारी सकाळी  सुरू करण्यात आले. या इमारतीमध्ये ६ रहिवासी होते. या रहिवाशांना भोगवटा दाखला देण्यात येईल या बाबत आश्वस्त केल्यावर त्यांनी या इमारतीतील त्यांची घर रिकामी करून दिली आहेत. या निष्कासनाचे या पुढील काम जमीन मालक स्वतः करून घेणार आहेत. निष्कासनाचा झालेला खर्च जमिन मालका कडुन वसुल करण्यात येणार आहे.

हि इमारत व जमीन मालकास दि.१६/८/२०१७ रोजी म.म.अ.कलम २६५(अ)अन्वये नोटीस बजावण्यात आली होती. स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट नुसार अतिधोकादायक घोषित करण्यात येऊन अतिधोकादायक ईमारत धारकास व रहिवासी यांना नोटीस बजावण्यात आल्या. इमारत रिकाम्या करून दिल्या आज इमारतीच्या भोवताली नागरिक वस्ती असल्यामुळे सदर इमारत म्यनुअली व इलेक्ट्रीक ब्रेकरच्या सहाय्याने निष्काशन करण्यात येत आहे. या कारवाईत १२ पोलीस कर्मचारी क.डो.म.पा  अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी होते.

कुणाल म्हात्रे

उल्हास नदीवरील जलपर्णीचं साम्राज्य झालं कमकुवत ; लवकरच नष्ट होणार जलपर्णी ?

गेल्या काही दिवसांपासून उल्हास नदीच्या वरप, कांबा, आपटी या भागांतील जलपर्णी सैल होऊ लागल्याचे दिसून आले आहे. जलपर्णीवर प्रक्रिया केल्याने जलपर्णीचा विळखा सैल झाला असून ती आता पिवळी पडू लागली आहे. येत्या काही दिवसांत ही जलपर्णी नष्ट होण्यास सुरुवात होईल असे या प्रकल्पाचे प्रमुख चंद्रशेखर भडसावळे यांनी स्पष्ट केले आहे.

काही आठवडय़ांपूर्वी उल्हास नदीतील जलपर्णी काढण्यासाठी नदीपात्रात मोठे आंदोलन झाल्यानंतर त्याची दखल घेत जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जलपर्णी काढण्यासाठी सगुणा रुरल फाऊंडेशनची मदत घेत कामाला सुरुवात केली होती. उल्हास नदीत मिसळणाऱ्या नागरी आणि औद्योगिक सांडपाण्यामुळे नदी प्रदूषित होत असून त्यामुळे नदीपात्रात जलपर्णी तयार होत असल्याचे समोर आले होते. ‘मी कल्याणकर’ सामाजिक संस्थेचे नितीन निकम , कैलास शिंदे, उमेश बोरगावकर यांनी नदीपात्रात या जलपर्णी काढण्यासाठी मोठे आंदोलन केले होते. त्याची दखल घेत जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, कल्याण-डोंबिवली महापालिका आणि उल्हासनगर महापालिका आयुक्तांसह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याठिकाणी भेट दिली होती. त्यानंतर सगुण रुरल फाऊंडेशनच्या मदतीने या जलपर्णीवर जैव तंत्रज्ञानाच्या साहाय्याने उल्हास नदी जलपर्णीमुक्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली होती. याच्या पहिल्या टप्प्यात उल्हास नदीच्या रायते येथील पात्रात विविध प्रकारचे मासे सोडण्यात आले होते. त्यानंतर या जलपर्णीवर प्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यात मोहने बंधारा, वरप, कांबा, आपटी येथील बारवी आणि उल्हास नदीचा संगम आणि बदलापूर या भागांत जलपर्णीवर प्रक्रिया करण्यात आली.

मे महिन्याच्या मध्यावधीत ही प्रक्रिया केल्यानंतर जून महिन्याच्या सुरुवातीलाच वरप, कांबा या भागांतील जलपर्णी सैल होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. जलपर्णीचे घट्ट आच्छादन हळूहळू वेगळे होत असून जलपर्णीचा रंग बदलून पिवळा होऊ लागल्याचे उल्हास नदी बचाव कृती समितीचे अश्विन भोईर यांनी सांगितले आहे. यापूर्वी जलपर्णीचा रंग गडद हिरवा होता. तो आता बदलू लागला असून ही जलपर्णी नष्ट होण्याची प्रक्रिया असल्याचेही भोईर यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात जलपर्णी संपण्यास सुरुवात होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे.

उल्हास नदीच्या जलपर्णीवर मे महिन्यात प्रक्रिया करण्यास सुरुवात केली होती. यापूर्वी चंदेरी आणि गवत्या प्रजातीचे मासे नदीपात्रात सोडण्यात आले होते. त्यांच्या मदतीने पाण्यातील शेवाळ आणि जलपर्णीला खाद्य देणाऱ्या वनस्पती संपवण्याचा प्रयत्न सुरू होता. जलपर्णीवर प्रक्रिया केल्याने वरूनही जलपर्णी संपवण्याचा प्रयोग केला. येत्या १५ दिवसांत ही जलपर्णी सैल होऊन नष्ट होण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
चंद्रशेखर भडसावळे, सगुणा रुरल फाऊंडेशन यांनी आश्वस्त केले आहे. राज्यात पहिल्यांदाच नदीतल्या वाहत्या पाण्यातील जलपर्णी हटवण्यासाठी प्रकल्प हाती घेतला होता. ह्या मोहिमे साठी सीएसआर योजनेतुन निधी उपलब्ध करुन दिला आहे. जैविक प्रक्रियेतून त्याचे बहुतांशी काम झाले आहे. करोनाच्या संकटात काही अडथळे आले होते. मात्र आता जलपर्णीबाबत झालेले काम दिसू लागले आहे. या कामाची नोंद नियमितपणे घेतली जाते आहे. असे ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे म्हणणे आहे.

-शरद शिंदे

गेल्या दोन दिवसांत क.डों.म.पा. क्षेत्रात परदेशी जाणाऱ्या ३४४ विद्यार्थ्यांचे झाले लसीकरण

क.डों.म.पा. क्षेत्रात दि. २ व ३ जून रोजी परदेशी शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष लसीकरण करण्यात आले होते. कल्याण पश्चिम लाल चौकी येथील आर्ट गॅलरीमध्ये ३४४ विद्यार्थ्यांना कोविशिल्डची पहिली लस देण्यात आली.

कोरोना लसींचा तुटवडा पाहता सध्या लसीकरण अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. बऱ्याच वेळेस लस उपलब्ध न झाल्याने क.डों.म.पा. प्रशासनाला लसीकरण बंद ठेवावे लागत आहे. महानगरपालिका क्षेत्रात बरेच विद्यार्थी हे परदेशात शिकायला जातात. ज्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत व ते परदेशी जाणार आहेत अश्या विद्यार्थ्यांसाठी बुधवार दि २ जुन व गुरुवार दि. ३ जून रोजी आर्ट गॅलरी येथे लसीकरण ठेवण्यात आले. या विद्यार्थ्यां व्यतिरिक्त इतर कुणालाही लस मिळाली नाही. कोवीशिल्डचा पहिला डोस या विद्यार्थ्यांना देण्यात आला. महापालिका क्षेत्रातील ३४४ विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेतला आणि लसीकरण करून घेतले.

– संतोष दिवाडकर

६ महिन्यांत बारावे वर्गीकरण केंद्रावर ओला कचरा टाकणे होणार बंद ; केवळ सुख्या कचऱ्याचे होणार वर्गीकरण

येत्या ६ महिन्यांत कल्याणमधील बारावे येथील कचरा वर्गीकरण केंद्रावर ओला कचरा टाकणे पूर्णपणे बंद होणार असून याठिकाणी केवळ सुख्या कचऱ्याचे वर्गीकरण करण्यात येणार असल्याचे आश्वासन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांनी बारावे प्रकल्पाविरोधात लढणाऱ्या नागरिकांच्या शिष्टमंडळास दिले आहे.

बारावे कचरा वर्गीकरण केंद्रावर ओल्या कचऱ्याचा ढीग साचला असल्याने या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत गोदरेज हिल परिसरातील नागरिकांनी याठिकाणी धडक देत केडीएमसी घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त रामदास कोकरे यांना काही दिवसांपूर्वी जाब विचारला होता. त्यानंतर याठिकाणी नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कोर्टाने दिलेल्या आदेशांची अमलबजावणी करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागीतली होती. यावर चर्चा करण्यासाठी येथील नागरिकांना देखील बोलविण्यात येणार होते. त्यानुसार मंगळवारी  दुपारी  मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांच्या नेतृत्वाखाली बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे आणि इतर सदस्यांनी घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांच्याशी भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी कोकरे यांनी या शिष्टमंडळाला सर्वप्रथम एन.जी.टी कोर्टाच्या नियमाप्रमाणे लवकरात लवकर तेथे उंच भिंत बांधण्यात येईल. एन.जी.टी कोर्टाच्या नियमाप्रमाणे ५ जून २०२१ पासून उंच झाडे लावण्यात सुरूवात करण्यात येईल. ओल्या कचऱ्यातून निघणाऱ्या लिचड वर लवकरात लवकर प्रक्रिया चालू करणार. आत्ता जो कचऱ्याचा ढीग आहे त्याचे स्क्रिनिंग करून स्टेप बाय स्टेप संपवणार तो पर्यंत तेथे नवीन कचरा टाकण्यास बंद करणार. आत्ता जो दिवसा व रात्री जास्त दुर्गंधी येते त्यासाठी दोन शिप मध्ये कल्चर फवारणी केली जाणार जेणे करून दुर्गंधी येणार नाही.

२ ते ३ महिन्यात महानगरपालिकेचा प्रयत्न असेल की ओला कचरा बारावे प्रकल्प येथे पूर्णतः टाकण्यास बंद करणार व फक्त सुख्या कचऱ्याचे वर्गीकरण तेथे केले जाणार, जो कचरा रिसायकल करण्यासाठी बाहेर मार्केट मध्ये विकला जाणार. जास्तीत जास्त ६ महिन्यात १०० टक्के ओला कचरा बारावे येथे टाकायचे बंद करणार असल्याचे आश्वासन उपायुक्त रामदास कोकरे यांनी दिले.

कोकरे यांचा इतर नगरपालिका व महानगरपालिकांचा अनुभव पाहता ते नक्कीच बारावे, गोदरेज हिल रहिवासी यांना या दुर्गंधीतून मुक्त करतील अशी खात्री बाळगत असल्याची माहिती बारावे गोदरेज हिल सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुनिल घेगडे यांनी दिली.

-कुणाल म्हात्रे