दिलासादायक ! कल्याण डोंबिवलीत चार दिवसांत ७५२२ रुग्णांना डिस्चार्ज

क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोनाचा आकडा कडक निर्बंधांनंतर काहीसा वधारलेला दिसत आहे. दिवसाला २ हजारांपर्यंत जाणारी रुग्णसंख्या साधारण १२०० पर्यंत आटोक्यात येत आहे. याहून दिलासादायक बाब म्हणजे मागील चार दिवसांत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील ७५२२ रुग्ण हे बरे होऊन आपापल्या घरी सुखरूप परतले आहेत.

राज्य सरकारने महाराष्ट्र भरात कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांनुसार जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर फिरणाऱ्या लोकांना व सेवा पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी नेमून दिलेली वेळ देखील कमी करण्यात आली आहे. यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात काहीसे यश प्रशासनाला मिळत आहे. यामुळे गेल्या काही दिवसांत डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची संख्या ही नव्या रुग्णांपेक्षा अधिक होत आहे.

मागील चार दिवसांत एकूण ७५२२ रुग्ण बरे झाले आहेत. या तुलनेत ५५७३ नव्या रुग्णांची नोंद चार दिवसांत करण्यात आली आहे. तर कोरोनाने महापालिका क्षेत्रात ३० लोकांचा जीव याच चार दिवसांत गेला आहे. या सर्व आकड्यांबरोबर आजच्या घडीला महानगरपालिका क्षेत्रात एकूण १४२५१ रुग्ण आता उपचार घेत आहेत. अनावश्यक कारणासाठी फिरणे टाळा, मास्क आणि सेनीटायजरचा वापर करा, स्वतःची आणि कुटुंबियांची काळजी घ्या असे आवाहन क.डों.म.पा.च्या वतीने वारंवार करण्यात येत आहे.

१ एप्रिल पासून २० दिवसांत क.डों.म.पा. ने मास्क कारवाईत जमावाला लाखोंचा दंड

क.डों.म.पा. ने १ एप्रिल ते २० एप्रिल या २० दिवसांत मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांकडून लाखोंचा दंड वसूल केला आहे. २० दिवसांच्या या कालावधीत २४१३ लोकांवर ही कारवाई झाली आणि या लोकांकडून महानगरपालिका प्रशासनाला रु.१२,०६,५००/- रुपयांचा दंड प्राप्त झाला आहे.

कोरोनाची साथ नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीने महापालिका दररोज विना मास्क फिरणा-या लोकांवर कारवाई करत आहे. असे असताना अजूनही काही नागरिक रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी फिरतांना अगदी बेजबाबदारपणे मास्क न घालता फिरत असल्याचे दिसून येत आहे. काल दिवसभरात देखिल एकुण १२६ व्यक्तीकडून रु.६३,०००/- इतका दंड वसूल करण्यात आला आहे. तरी नागरिकांनी घराबाहेर, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना न चुकता मास्क परिधान करण्याची दक्षता घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

राज्यभरात लसीकरण केंद्र सुरू करा ; मनसे आमदार राजू पाटील यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्र होरपळून जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. अश्या परिस्थितीत रुग्णांना इंजेक्शन पासून बेड पर्यंत कोणत्याही सुविधा मिळत नसल्याचे दिसत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी वेकसिनेशन होणे खूप गरजेचे आहे. याकरिता राज्यभरात पातळी पातळीवर लसीकरण केंद्र उभारावीत अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.

राजू पाटील यांनी पत्राद्वारे केलेली मागणी :-

केंद्र सरकारने दिनांक १ मे पासून १८ वर्षावरील सर्वांना लस देण्याची परवानगी दिलेली आहे. तसेच महाराष्ट्र सरकारला राज्यातच हाफकिन संस्थेला लस निर्मितीची परवानगी दिलेली आहे. व आता राज्यांनाही थेट उत्पादकांकडून कोरोना लस खरेदी करता येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात राज्याला कोरोना लसींचा पुरवठा मुबलक प्रमाणात होईल अशी शक्यता असून लसीकरणही वेगाने होईल. परंतु राज्य सरकारने त्यासाठी युद्धपातळीवर पूर्व तयारी करणे आवश्यक आहे.

सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा,तालुका व अगदी ग्रामीण स्तरावर जास्तीत जास्त लसीकरण केंद्र उभारुन लसीकरण हाती घ्यावे लागेल. या लसीकरणकेंद्रांचा जिल्हा, महानगरपालिका, तालुका पातळीवर संयुक्त डॅशबोर्ड तयार करावा व लस उपलब्धतेबाबत माहिती उपलब्ध करुन प्रत्येक तासाला सोशल मिडियासह विविध चॅनलवर द्यावी. तसेच ज्या व्यक्तीने लसीसाठी नाव रजिस्टर केले असेल त्यालाही द्यावी. जेणेकरुन त्याचाही वेळ वाचेल व लसीकरणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण होईल.

कोरोना महामारीमध्ये कोविड सेंटर, रुग्णालये महत्त्वाची आहेतच परंतु त्याच बरोबर लसीकरणही तेवढेच वेगवान केल्यास कोरोनाच्या संकाटावर मात करणे शक्य होणार आहे. यासाठी राज्यात लसीकरण गतीमान करण्यासाठी आधीच पूर्वतयारी व नियोजन केल्यास खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यामध्ये ‘लस उत्सव’ साजरा होऊ शकतो. तरी कृपया आपण राज्यभरात जिल्हा, तालुका, महानगरपालिका व ग्राम स्तरावर नवीन लसीकरण केंद्रे उघडण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, ही विनंती.

खासदार श्रीकांत शिंदे दुसऱ्यांदा कोविड पोजिटिव्ह ; हॉस्पिटलमधून व्हडिओद्वारे साधला संवाद

कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांना आता दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना काळात काम करताना अनेक लोकांशी संपर्क होत असल्याने कोरोनाने दोन महिन्या नंतर पुन्हा श्रीकांत शिंदेंना ग्रासले आहे. सध्या श्रीकांत शिंदे यांची प्रकृती ठीक असून ते बरे होत असल्याचे त्यांनी रुग्णालयातुन व्हडिओ द्वारे सांगितले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आपण सर्वांनी कोवीड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्याला कोरोनाशी लढायचेही आहे आणि जिंकायचेही आहे असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्यांदा कोवीड पॉझिटिव्ह झालेल्या खासदार शिंदे यांच्यावर गेल्या आठवड्यापासून ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी त्यांनी सोशल मिडियाद्वारे लोकांशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला.

व्हडिओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://www.facebook.com/watch/?v=313468003465846

नवा नियम ; सकाळी ११ नंतर जीवनावश्यक सेवांची दुकान बंद !

महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असलेली दिसत आहे. यासाठीच राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले होते. मात्र या बरोबर हे निर्बंध आता आणखीनच कठोर करावे लागले आहेत. जीवनावश्यक सेवांची दुकाने आता सकाळी ११ पर्यंतच सुरू राहणार राहणार असून त्यानंतर सर्व काही बंद असणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत या निकषावर चर्चा करण्यात आली. किराणा खरेदीच्या नावाखाली लोक बिनधास्तपणे बाहेर फिरतात व त्यामुळे कोरोना आटोक्यात येण्यात अडचण होत आहे असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. ‘ब्रेक द चेन’ या मिशन नुसार राज्य सरकारने आता निर्बंध आणखी कडक केले आहेत.

सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत जीवनावश्यक सेवांची दुकाने जसे की किराणा, दूध डेअरी, चिकन-मटण, मासे अशी सर्व दुकाने फक्त चार तास खुली ठेवण्याची परवानगी दिली गेली होती. मात्र आता हीच वेळ सकाळी ७ ते ११ अशी करण्यात आली असून ४ तासांतच खरेदी विक्री करता येणार आहे. तर रात्री ८ वाजेपर्यंत होम डिलिव्हरीला परवानगी असणार आहे.

नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत लॉकडाऊन बाबतही विचार करण्यात आला आहे. यानुसार काही तासांत राज्यभरात कडक लॉकडाऊन होण्याची देखील शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पालकमंत्री आहेत कुठे ? मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल ; क.डों.म.पा. आयुक्तांची घेतली भेट

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या एक लाखाच्या वर गेली आहे. मृत्यू दर देखील वाढताहेत. रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सीजन मिळत नाही. व्हेटीलेटर मिलत नाही. या गंभीर परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी मनसे आमदार राजू पाटील, डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील बिकट झालेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काही सूचना राजू पाटील यांनी या भेटीदरम्यान आयुक्तांना केल्या आहेत. मुख्यत: लसीकरणाच्या कामासाठी जी काही मदत लागेल ती करण्याची तयारी राजू पाटील यांनी दर्शविली. लसीकरण काही केंद्रावर सुरु आहे मात्र लसीचे डोस कमी प्राप्त होत आहेत. तेव्हा आधी केंद्रे जास्त उभारा. त्यानंतर डोस प्राप्त झाल्यावर लसीकरण थांबणार नाही.

मुंबई आणि पुण्यात महापौर, पालकमंत्री आणि आयुक्त एकत्रित येऊन बैठका घेतात. मात्र क.डों.म.पा. मध्ये प्रशासक म्हणून आयुक्तच आहेत. महापौर पद अस्तित्वात नाही. अशा परिस्थितीत पालकमंत्री कुठे आहेत ? असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी उपस्थित केला आहे.

कल्याण : ९७ वर्षांच्या पंजोबांनी कोरोनाला मारला पंजा ; बरे होऊन सुखरूप घरी

कल्याण शहरातील ९७ वर्षीय पंजोबानी कोरोना सोबत पंजा लढवून कोरोनावर मात केली आहे. कोरोनातून ठणठणीत बरे होवून त्यांना काल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडेच नकारात्मक परिस्थिती असताना कल्याण शहरातील ९७ वर्षांच्या पंजोबांनी मात्र कोरोना वर यशस्वी मात करत एक सकारात्मक संदेश दिला आहे. रामचंद्र नारायण साळुंखे असे या या पंजोबांचे नाव असून आपल्याला कोरोनाशी न घाबरता त्याच्याशी लढून त्याला हरवायच आहे असा संदेश त्यांनी दिला आहे.

गेल्या महिन्याभरापासून कल्याण-डोंबिवलीत कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे. दररोज वाढणारे रेकॉर्डब्रेक रुग्ण आणि फुल होणारे बेड तसेच ऑक्सिजन व इंजेक्शनचा तुटवडा पाहता परिस्थिती गंभीर असल्याचे दिसत आहे. परंतु नकारात्मक परिस्थितही कल्याण मधील ९७ वर्षीय रामचंद्र नारायण साळुंखे या पंजोबानी कोरोनाला थेट धोबीपछाड दिला आहे. त्यांच्यावर कल्याण पश्चिम लाल चौकी येथील महानगरपालिकेच्या आर्टगॅलरी कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले आणि त्यांनी देखील त्या उपचाराला खंबीरपणे साथ देत कोरोना वर मात केली आणि आज ते आपल्या घरी सुखरूप परतले आहेत.

कल्याण डोंबिवलीतील ‘ही’ आहेत ६१ कोवीड हॉस्पिटल्स ; महापालिकेने प्रसिद्ध केली यादी

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने दिवसाला २००० हजरांपर्यंत रुग्ण नोंदवले जात आहेत. अश्या परिस्थितीत कोणत्या रुग्णालयात जावं असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडून असतो. महानगरपालिका प्रशासनाने महानगरपालिका क्षेत्रातील ६१ कोविड हॉस्पिटल्स तसेच उपचार केंद्रांची यादी प्रसिद्ध केली आहे.

क.डों.म.पा. ने प्रसिद्ध केलेल्या यादीत ६१ कोविड उपचार केंद्रांची नावे आणि ठिकाणे समाविष्ट आहेत. या यादीत हॉस्पिटलचे नाव,पत्ता,संपर्क क्रमांक,रुग्णालय प्रमुखाचा संपर्क,खाटाची संख्या, तसेच ICU व व्हेंटिलेटरची माहिती देण्यात आलेली आहे. या यादीत एकूण ५ जम्बो कोविड हॉस्पिटल्स तर ५६ खासगी रुग्णालयांचा समावेश आहे.

६१ कोविड हॉस्पिटल्सची यादी खालीलप्रमाणे :-

क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळाबाजर सुरू असल्याचे देखील निष्पन्न होऊ लागले आहे. महानगरपालिका क्षेत्रात आज (दि.१३ एप्रिल २१ रोजी) दिवसभरात एकूण ११८८ नवे कोरोना रुग्ण नोंदवले गेले आहेत. तर आज १२४९ रुग्णांना डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. याचबरोबर ४ जणांना कोरोनाने जीव गमवावा लागला आहे. यानंतर आता महापालिका क्षेत्रात एकूण १६३८८ रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात जवळपास लाखभर लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आकडे सांगत आहेत.

कल्याण-डोंबिवलीत रेमडेसिवीरचा काळाबाजार ? आमदार गणपत गायकवाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोनावर परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर शहरात तुटवडा जाणवत आहे. यामुळेच हे औषध मूळ किंमती पेक्षा तीन चार पटींने अधिक किंमतीत काळ्या बाजारात विकले जात आहे. असे पत्र कल्याण पूर्व आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे.

मागील काही दिवसांपूर्वी रेमडेसिवीरच्या तुटवड्या बाबतची धक्कादायक बाब समोर आली होती. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतल्यानंतर रातोरात औषधांचा पुरवठा करण्यात आला. मात्र सध्या कल्याण डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात काही माफिया हे इंजेक्शन मूळ किमती पेक्षा तीन चार पटीने विकून त्याचा काळाबाजार करीत आहेत. आपल्या माणसांचा जीव वाचवण्यासाठी लोक किंमत मोजायला तयार होतात व औषध विकत घेतात. अश्या प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्र्याना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.

कोरोना काळात उधोगधंदे ठप्प झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यामुळे अगोदरच आर्थिक संकटात पिचलेल्यानी काय करावं ? असाही सवाल उपस्थित करण्यात आला आहे. शिवाय रेमडेसिवीर सहज उपलब्ध होत नसल्याने त्यासाठी नातेवाईकांना लांब लांबचे अंतर भर उन्हात कापावे लागत आहे. तरी रेमडेसिवीरचा पुरेसा साठा मेडिकल मध्ये उपलब्ध करून द्यावा व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार गायकवाड यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

ठाणे जिल्ह्यात कोरोनाने अक्षरशः कहर केला आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच कोरोना बाधित रुग्णांसाठी परिणामकारक असलेल्या रेमडेसिवीर या औषधाचा ठाणे जिल्ह्यात विशेषतः कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असुन या औषधाचा मुबलकसाठा उपलब्ध करून देण्याबाबत तसेच या औषधाचा काळाबाजार करून मुळ किमती पेक्षा तीन ते चार पट वाढीव दराने विक्री करणाऱ्यावर कडक कारवाई करण्याबाबतची मागणी मुख्यमंत्री मा. ना.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.श्री.राजेशजी टोपे साहेब, मा.श्री.राजेशजी नार्वेकर साहेब जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे केली.

गणपत गायकवाड (आमदार,कल्याण पूर्व)
KDMC चा दंडात्मक कारवाईवरच भर ; उपाययोजना कागदावर – मनसे आमदार राजू पाटील

मनसेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी क.डों.म.पा. प्रशासनाच्या कामकाजावर असंतोष व्यक्त केला आहे. पालिका प्रशासन फक्त दंडात्मक कारवायाच करण्यावर भर देत असून कोरोनासाठी करावयाचा उपाययोजना फक्त कागदावरच आहेत असे म्हणत राजू पाटील यांनी क.डों.म.पा. ची तुलना नवी मुंबई महानगरपालिकेशी केली आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रा अंतर्गत आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी काही निर्बंध लादले आहेत. शिवाय राज्य सरकारने देखील कठोर निर्बंध लादले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाया करीत आहेत. पोलीस स्थानकात गुन्हे दाखल होत आहेत. परंतु याच बरोबर पालिका प्रशासनाने कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनावर जास्तीत भर द्यावा असे राजू पाटील म्हणत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका कशा पद्धतीने काम करते हे त्यांनी त्यांच्या फेसबुकद्वारे सांगितले आहे.

“कल्याण-डोंबिवली व नवी मुंबई या दोन्ही महापालिकांमध्ये प्रशासक म्हणून आयुक्तच सर्वेसर्वा आहेत. हाताशी असलेली यंत्रणा कमी अधिक असू शकते परंतु कामाची पद्धत पण महत्वाची आहे. नवीमुंबईत आरोग्यसेवक भरती करून लसीकरण केंद्र वाढवून कोरोनाशी लढा द्यायचा चाललेला प्रयत्न दिसत आहे. सोबतच पोलिस प्रशासनाला बरोबर घेऊन लोकांच्या हालचाली मर्यादीत करण्यावर तिकडे भर दिला जात आहे. तर आमच्या केडिएमसीत फक्त दंडात्मक कारवाईवर भर दिलेला दिसत आहे. बाकीच्या उपाययोजना फक्त कागदावरच दिसत आहेत. आधीच आरोग्यसेवेचा बोजवारा उडालेला असताना आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी असे करण्यात काय अर्थ आहे ? केडिएमसी प्रशासनाने जास्तीत जास्त लसीकरणावर भर द्यावा, उगीचच ‘टार्गेट’ दिल्याप्रमाणे व्यापारी व दुकानदारांना त्रास देऊ नये. पालिकेला हेच ‘टार्गेट’ मध्ये अडकलेले मनुष्यबळ इतर ठिकाणी लसीकरण केंद्र व दवाखान्यात वापरता येतील. लोकांनी पण घालून दिलेले बंधन पाळलेच पाहिजेत व ते आता गंभीरपणे पाळताना पण दिसत आहेत. मग अश्यावेळी आठवड्यातून २/३ दिवस दुकाने उघडण्यास परवानगी द्यायला काय हरकत आहे ? त्यानंतरही नियम तोडले गेले तर कडक कारवाई जरूर करावी. परंतु प्रशासनाने प्राधान्याने जास्तीत जास्त लक्ष व वेळ आरोग्यसेवा व लसीकरणावर द्यावा. आता या कोरोनाचा प्रसार लॅाकडाऊन नाही तर लसीकरणानेच कमी करता येईल.”

राजू पाटील (आमदार,कल्याण ग्रामीण)