नियम मोडल्याने KDMC प्रशासनाने केली छोटी-मोठी दुकाने सील

क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोना निर्बंध नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अनेक छोटी मोठी दुकाने रोज सील केली जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही अत्यावश्यक सेवेतील बाबी वगळून इतर सर्व आस्थापना ३० एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी निर्गमित केले आहेत. सदर आदेशाच्या अनुषंगाने प्रभागक्षेत्र अधिकारी यांनी आपापल्या प्रभागात परिस्थितीची पाहणी केली.

‘ब’ प्रभागात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ६ दुकाने सील करण्यात आली. ‘क’ प्रभागात २ मॅरेज लॉन्स ३० एप्रिल पर्यंत सील करण्यात आले आहेत. ‘फ’ प्रभागात मानपाडा रोडवरील इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंचे व टेलर अशी २ दुकाने तसेच ९० फुटी रोडवरील ३ दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली. ‘ग’ प्रभागात सत्यम सोशल क्लब व आणखी २ दुकाने सील करण्यात आली. त्याचप्रमाणे ‘ई’ प्रभागक्षेत्रात नियमांचे उल्लंघन केल्यामुळे प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार यांनी ई प्रभागातील डी-मार्ट तसेच २ वाईन शॉप सील करण्याची धडक कारवाई केली.

कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी महापालिका यंत्रणा अथक काम करीत असताना या कामात महापालिकेच्या नागरिकांनी देखील कोरोना नियमावलीचे पालन करून महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. मात्र नियम मोडल्यास कारवाई अटळ आहे. मागील काही दिवसांपूर्वी शेकडोंच्या संख्येने लग्नसोहळा पार पडलेला मॅरेज लॉन्स तसेच संयोजक व आयोजकांवरही पोलीस स्थानकात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उल्हासनदीत सोडली दोन विभिन्न प्रजातीची २० हजार माशांची पिल्ले

उल्हासनदी जतन व संवर्धनासाठी नदीमध्ये ग्रास कार्प व सिल्वर कार्प जातीच्या २०,००० माशांची पिल्ले आज सोडण्यात आली आहेत. सध्या या नदीत ठिकठिकाणी जलपर्णी वनस्पती इतक्या मोठ्या प्रमाणात पसरली आहे कि त्यामुळे येथील मासेमारी करणारे ते सर्व साधारण स्थानिक पासून ते पालकमंत्र्यापर्यंत सर्वच सामाजिक घटक चिंतीत आले आहेत.

ग्रास कार्प व सिल्वर कार्प या दोन जातीचे मत्स्यबीज एकूण २०,००० नग कलकत्त्याहून विमानाने मुंबई पर्यंत आणण्यात आले. आज पहाटे रायते ब्रीज येथे या सर्व माशांची पिल्ले पोहोचली. या अभियानात लहानग्या पासुन मोठ्या पर्यंत, विविध समाजसेवी संस्थानी सहभाग दर्शविला.

कृषिरत्न चंद्रशेखर भडसावळे, कल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडे, सामाजिक कार्यकर्ते, माजी नगरसेवक नितिन निकम, उल्हास नदी बचाव कृती समिती चे अश्विन भोईर, रविंद्र लिंगायत, विवेक गंभीरराव व वालधुनी बिरादरी चे शशिकांत दायमा, उल्हास नदी च्या दोन्ही बाजूच्या ग्रामपंचायत सदस्य. म्हारळ, वरप, कांबाचे बरेच नवनिर्वाचित सदस्य, द वॉटर फाउंडेशन चे पंकज गुरव व कुमार रेड्डीयार, तसेच अश्वमेध प्रतिष्ठान चे अविनाश हरड, तुषार पवार, दत्ता बोंबे आदि पर्यावरणप्रेमी, ऊमाई पुत्र या अभियानात सामील झाले होते.

उल्हास नदीचे वाढते प्रदूषण व त्यावरील उपाययोजना यावर कृषिरत्न  चंद्रशेखर भडसावळे, सगुणा बाग नेरळ यांनी प्रमुख मार्गदर्शन केले तसेच प्रशासकीय पातळीवर उल्हास नदी बचावासाठी शक्य अश्या सर्व उपाययोजना व मदत केली जाइल अशी ग्वाही कल्याण तालुका तहसीलदार दिपक आकडे यांनी दिली. 

मासे म्हटले की, फक्त खाण्यासाठी उपयोगात येत नसून ते पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी ही उपयोगी असतात असे नमूद करतांना मासे नदीत सोडत लहानग्यांनी सुद्धा सहभाग नोंदवला. आज सोडण्यात आलेल्या दोन्ही प्रजातींचे मासे हे पर्यावरणच नव्हे तर स्थानिकांचा रोजगार देखील बनणार आहे. तसेच या माश्यांची उत्पत्ती वाढल्याने हे मासे आसपासच्या गावातील लोकांच्या आहारात देखील सामावले जाऊ शकतात. या दोन्ही प्रजातींचे मासे हे एका वर्षाने एक किलो वजनाचे होऊ शकतात. तर हाच मासा जास्त जगला तर ४ किलो पर्यंत देखील भरू शकतो असा दावा केला गेला आहे. त्यामुळे या माशांची उत्पत्ती वाढली तर पुढच्या वर्षी मोठं मोठे मासे या नदीतून मिळतील हे नक्की.

कल्याण डोंबिवलीत विनामास्क फिरणाऱ्यांना पोलीस टाकणार हॉस्पिटलमध्ये ; पोलिसांनी महापालिकेला सांगितला आपला निर्णय

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे आकडे भलतेच वाढताना दिसत आहेत. मात्र असे असतानाही लोकांचा यावर विश्वास नसल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. मात्र पालिका प्रशासन याबाबतीत कठोर निर्णय घेताना दिसत आहे. आता पालिके बरोबर पोलीस प्रशासनाने देखील आपली भूमिका पालिका आयुक्तांकडे मांडली आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात आजपासून सरकारच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी होणार आहे. या साठी पालिका मुख्यालयात आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, दोन्ही सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच महापालिका अधिकारी यांची बैठक पार पडली. निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी काय केले पाहिजे यावर बराच वेळ चर्चा झाली. कोरोनाचे प्रादूर्भाव रोखण्यासाठी जे काही करायचे ते सरकार करणार आहे. महापालिका आयुक्तांनी सांगितले की, निर्बधाच्या अंमलबजावणीसाटी प्रशासन सज्ज आहे. मंगल कार्यालय आणि भाजी मंडईवर विशेष नजर ठेवली जाईल. नियमांचे उल्लंघन केल्यास तर मंगल कार्यालये ३० एप्रिलर्पयत सिल करण्यात येतील.

विनामास्क फिरणाऱ्यांची होऊ शकते रुग्णालयात रवानगी :-

महापालिका अधिका:यांसोबत पोलिस सुद्धा निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी सज्ज झाले आहेत. विना मास्क फिरणा:या नागरीकांवर केवळ दंडात्मक कारवाई करणार नाही तर त्यांना पोलिस ठाण्यात नेऊन त्यांची प्रथम अँटीजेन टेस्ट केली जाईल. यामध्ये व्यक्ती पॉझीटीव्ह आझळल्यास त्याची रवानगी थेट रुग्णालयात केली जाईल असा निर्णय कल्याण पोलिसांनी घेतला आहे. अशी माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.

आईच्या स्मृतिदिनी मा.नगरसेवक महेश गायकवाड यांनी गरजू महिलांना दिला साडी चोळीचा मान.

कैलासवासी गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या २१ व्या स्मृति दिनानिमित्त घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणार्‍या महिलांसाठी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यातर्फे साडी-चोळी व धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कल्याण पूर्व मधील प्र.क्र.८८ संतोष नगरचे शिवसेना मा. नगरसेवक महेश गायकवाड ३ एप्रिल रोजीचा आपल्या मातोश्रीचा पुण्यतिथी दिन हा स्मृतिदिन म्हणून साजरा करतात.
आयोजित कार्यक्रमात मातोश्री गुंजाई यांना उपस्थितांकडून आदरांजली वाहण्यात आली. दीनदुबळ्यांसाठी मदतीचा हात पुढे करणारे म्हणून नगरसेवक महेश गायकवाड ओळखले जात आहेत. आजच्या दिवशी आपल्या मातोश्रीची आठवण म्हणून, अतिशय हलाखीचे जीवन जगत असलेल्या तर कचरा जमा करून, घरकाम करून कुटुंब उदर निर्वाह करणाऱ्या महिलांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे करून मान्यवरांच्या हस्ते साडीचोळी आणि धान्य वाटप केले.

कोविड महामारीच्या काळात अनेक घरकाम करणाऱ्या महिलांना,बेरोजगार कुटुंबांना,मदत करण्याचा प्रयत्न शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड सातत्याने करत होते. कोविड महामारीच्या काळात सर्वप्रथम कल्याण पूर्वेत मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे अन्नदान तसेच धान्य वाटप कार्यक्रम राबावून गोरगरिबांना दिलासा दिला होता. मातोश्री गुंजाई फाउंडेशन तर्फे मातोश्री गुंजाई दशरथ गायकवाड यांच्या स्मरणार्थ विविध लोकपयोगी कार्यक्रम ते राबवत असतात. कोणतीही महिला व तिचे कुटुंब उपासमारीचे बळी पडू नये म्हणून आपल्या कार्यालयाचे दार सदैव उघडे आहे असे मातोश्रींच्या एकविसाव्या स्मृतिदिनी त्यांनी सांगितले.

मातोश्री गुंजाई दशरथ गायकवाड स्मृतिदिन कार्यक्रमाला नगरसेवक महेश गायकवाड, नगरसेवक राजाराम ऊर्फ आप्पा पावशे, आडवली माजी सरपंच राहुल पाटील,
मधुर म्हात्रे युवासेना अंबरनाथ, शंकर पाटील उपविभाग प्रमुख,महिला विभाग प्रमुख वंदना तांबे, महिला उपविभागप्रमुख सुजाता शिंदे, कलाकार बजरंग बादशाह, गायिका चंद्रकला दासरी,शाखा प्रमुख प्रशांत बोटे, शाखाप्रमुख प्रतिक महिले,संतोष नवगिरे, समाजसेविका वैशाली ठाकूर ,सुजाता पवार, योगेश चव्हाण, सुरेश रसाळ, कार्यालय प्रमुख निलेश रसाळ तसेच शिवसैनिक व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

मा. नगरसेवक महेश गायकवाड यांनी या स्मृतिदिनी आई बद्दल भाष्य केले असता उपस्थित महिलांना देखील गहिवरून आले होते. पहा व्हिडीओ.

मनसे आंदोलकांवर गुन्हे दाखल मग उदघाटन करणाऱ्या गर्दीवर गुन्हे का नाहीत ? पोलिसांनी पक्षपात करू नये. – आमदार राजू पाटील

एप्रिल फुल म्हणजे १ एप्रिल रोजी मनसे कार्यकर्त्यांनी डोंबिवली येथे ‘एप्रिल फुल डब्बा गुल’ आंदोलन केले होते. या आंदोलनातुन पुलाच्या संथगतीने होत असलेल्या कामावर निशाणा साधला होता. मात्र कोरोना निर्बंधांचे उल्लंघन झाल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वडवली पुलाच्या उदघाटनावेळी गर्दी झाली होती तर मग त्यांच्यावर गुन्हे का नाहीत ? पोलिसांनी पक्षपातीपणा करू नये असे ट्वीट मनसे आमदार राजू पाटील यांनी केले आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात सध्या अनेक पुलांची कामं झालेली आहेत व काही सुरू देखील आहेत. ही काम अत्यंत संथ गतीने होत असल्याचे म्हणत मनसेने १ एप्रिल ला केक कापून आंदोलन केले होते. ‘एप्रिल फुल डब्बा गुल कधी होणार कोपर पूल?’ अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या. मात्र महापालिकेने आखलेल्या निर्बंधांचे उल्लंघन झाल्याचे म्हणत त्यांच्यावर आता गुन्हे दाखल केले गेले आहेत.

मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याने मनसे आमदार राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मनसेला गृहीत धरू नये. प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या हातचे बाहुले बनू नये. तसेच पोलिसांबद्दल आम्हाला आदर आहे आणि पोलिसांनी पक्षपातीपणा करू नये असे ट्विट राजू पाटील यांनी केले आहे. आयुक्त व डीसीपी यांच्या उपस्थितीत वडवली पुलाचे उदघाटन झाले यावेळी झालेली गर्दी तसेच कोपर पुलाच्या गर्डर लॉंचिंगला गर्दी करणाऱ्यांवर गुन्हे कधी दाखल करणार ? असा सवाल त्यांनी केला आहे.

कल्याण मधील युवकाचा अपघाती मृत्यू की घातपात ? नातेवाईकांसमवेत आमदारांचा यंत्रणेवर गंभीर आरोप

धुलीवंदनाच्या दिवशी चिंचपाडा कल्याण येथील आनंद मुकुंदे हा युवक होळी खेळायच्या निमित्ताने बाहेर गेला असता अचानकपणे बेपत्ता झाला. मात्र दुसऱ्याच दिवशी त्याचा मृतदेह अंबरनाथ चिखलोली धरणाच्या काठावर आढळून आला होता. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची नोंद पोलिसांनी केली असली तरी त्याची हत्या झाली असल्याचा आरोप त्याचे नातेवाईक करीत आहेत. यादरम्यान आनंद राहत असलेल्या ठिकाणचे स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनी देखील संबंधीत यंत्रणेच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

३० मार्च रोजी एक मृतदेह धरणा काठी आढळून आला होता. ओळख न पटल्याने शिवाजी नगर पोलिसांनी पंचनामा करीत तो मृतदेह शवविच्छेदनासाठी सेंट्रल रुग्णालयात पाठविला होता. यानंतर पोलिसांनी फोटो व्हायरल करताच तरुणाची ओळख पटली. हा मृतदेह आनंद मुकुंदे या युवकाचा असल्याचे निष्पन्न झाले. यावेळी आनंदच्या नातेवाईकांनी त्याच्या शरीरावर जखमा असल्याचे सांगत त्याची हत्या झाली असून पोलीस व रुग्णालय प्रशासनाने खोटा अहवाल बनवत हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप केला आहे. शिवाय आनंद बेपत्ता असल्याची तक्रार घेण्यास देखील पोलिसांनी टाळाटाळ केली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली आणि आनंद सोबत घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला. मृतदेह सापडल्यानंतर ओळख पटे पर्यंत किमान दोन दिवस वाट पाहणे अपेक्षित असताना पोलिसांनी तात्काळ बेवारस जाहीर करीत शवविच्छेदन केले कसे ? असा सवाल आमदारांनी उपस्थित करत पोलीस अधिकारी आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. संबंधित अधिकार्यांवर कारवाई करण्याच्या मागणी बाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी मात्र सर्व आरोपांचे खंडन करीत आनंदचा मृत्यू पाण्यातच बुडून झाला असून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले. सध्या नातेवाईकांच्या मागणीनुसार मृतदेह शिवविच्छेदनासाठी जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणाचा पुढील उलगडा होणार आहे.

संपूर्ण व्हिडीओ मध्ये पहा काय केलेत नातेवाईक आणि आमदारांनी आरोप :-

Report by Aadiraj Media
कल्याण डोंबिवलीत कोरोनाची ऐशी तैशी; आज पुन्हा नवा रेकॉर्ड.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून कोरोना हाय स्कॉर रेकॉर्ड बनवत आहे आणि दुसऱ्या दिवशी मोडत आहे. क.डों.म.पा. क्षेत्रात आज दि.२५ मार्च २०२१ रोजी ९८७ नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. आणि आता हा नवा उच्चांक बनला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक वाढताना दिसत आहे. एकीकडे सचिन वाझे प्रकरण तर दुसरीकडे कोरोनाचे वाढते आकडे याच चर्चा योगायोगाने महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत लाखोंच्या सभा पाहायला मिळतात. मात्र कोरोना महाराष्ट्रातच आहे का ? असा संतप्त सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. देशातील टॉप १० कोरोना हॉटस्पॉट शहरांच्या यादीत महाराष्ट्रातीलच ९ शहरे समाविष्ट आहेत. यातील पुणे शहर देशात पहिल्या स्थानावर आहे.

कल्याण डोंबिवलीत वाढत्या कोरोनाच्या अकड्यामुळे होळी सणावर देखील निर्बंध लादण्यात आले आहेत. यामुळे अनेकांमध्ये नाराजी देखील आहे. शिवाय वाढत्या बेसुमार आकड्यांवर देखील नागरिक सवाल तसेच शंका उपस्थित करीत आहेत.

“मागच्या वर्षी सरकारने लावलेलं लोकडाऊन सर्वसामान्य जनतेनं मान्य केलं होतं. आताचे आकडे पाहता नक्की कोरोना आहे का ? हाच मोठा प्रश्न पडतो. बिल्डिंगमध्ये एखादा पोजिटिव्ह सापडला तर त्याच्या आजूबाजेचे देखील पकडले जातात. आणि त्यांनाही कोरोना निष्पन्न होतो. मुळात कोविड टेस्ट यंत्रणा आहे का ? हे कफ काऊंट करत आहेत का ? म्हणजे बॉडी मध्ये थोडा जरी कफ असल्यास तो पोजिटिव्ह येतोय. वाढणाऱ्या आकड्यांमुळे सर्वसामान्यांच्या आर्थिक बाबीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. लोकांना आता कोविड सोबत जगायची सवय लागली आहे त्यामुळे लोकडाऊन लावण्याला अर्थ नाही. वाढत्या आकड्यांतच मुळात संभ्रम आहे. ते नक्की खरे आहे की खोटे हे काही खात्रीशीर सांगता येत नाही.”

– प्रथमेश सावंत
(अध्यक्ष, जाणीव सामाजिक संस्था)

होळीचा बेरंग ! कल्याण डोंबिवलीत धुलीवंदन प्रतीबंधात्मक आदेश जारी

क.डों.म.पा. क्षेत्रात आज ८८१ कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा वाढता प्रकोप लक्षात घेता महानगरपालिका प्रशासनाने होळी, धुलीवंदन या सणांवर बंधने लादली आहेत.

महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जारी केलेल्या परिपत्रकानुसार महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना होळी व धुलिवंदन खाजगी तसेच सार्वजनिक जागेत सार्वजनिकरित्या साजरा करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीकोनातून खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. ‘मी जबाबदार’ मोहिमे अंतर्गत वैयक्तिकरित्या देखील उत्सव टाळावा असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर साथीरोग नियंत्रण कायदा तसेच आपत्ती निवारण कायद्या अनव्ये कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे. दि.२८ मार्च रोजी होळी तर २९ मार्च रोजी धुलिवंदन असून यावर प्रशासनाची नजर असणार आहे. त्यामुळे यावर्षी रंगाचा बेरंग होऊ शकतो यात शंका नाही.

आता तर हद्दच पार ! कल्याण डोंबिवलीत कोरोनाने कालचा रेकॉर्ड मोडीत गाठला अनपेक्षित आकडा

कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत कोरोनाचा वाढता कहर शहरवासीय आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरू लागला आहे. कालच्याच दिवशी दि. २३ मार्च २०२० रोजी कोरोनाने शहरातील आतापर्यंतचा हाय स्कोर आकडा दिला होता. ७११ रुग्ण काल नोंदवले गेले होते. परंतु आज पुन्हा कोरोनाने तो आकडा मोडून लांब उडी घेतल्याने प्रशासनाला हादरून सोडले आहे.

क.डों.म.पा. क्षेत्रात आज दिवसभरात कल्पनेपेक्षाही अधिक तब्बल ८८१ रुग्ण आढळून आले आहेत. काल प्रथमच ७०० चा आकडा पार करीत हाय स्कोर रचला होता. मात्र हा रेकॉर्ड मोडीत काढीत कोरोना जवळ जवळ ८०० चा आकडा पार करीत सरळपणे ९०० ला येऊन खेटला आहे. आजच्या या आकड्यामुळे प्रशासन देखील हादरले आहे. महापालिका क्षेत्रात निर्बंध लागू असतानाही वाढलेला प्रकोप हा चर्चेचा विषय बनला आहे.

आज आलेल्या आकड्या नंतर महापालिका क्षेत्रात आता एकूण ५९२९ कोरोनाबाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. आजच्या दिवसात दोघांनी जीव गमावला असून ४०९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज सापडलेल्या ८८१ रुग्णांपैकी सर्वाधिक २७१ रुग्ण कल्याण पश्चिमेतील आहेत. यानंतर २६३ रुग्ण डोंबिवली पूर्व, १४९ रुग्ण कल्याण पूर्व, १४४ डोंबिवली पश्चिम, ३८ मांडा टिटवाळा, १५ मोहना तर १ रुग्ण पिसवली येथील आहे. आजचा आकडा हा महापालिका क्षेत्रातील सर्वोच्च आकडा बनला आहे. यामुळे प्रशासन आता काय करतंय याचीच भीती येथील व्यापारी आणि नागरिकांना लागून आहे.

शहरात वाढलेल्या आकड्यांवरून मनसेनं मात्र आता थेट सवाल केला आहे.

“गंभीर परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने शहरात वेकसिनेशन सेंटर वाढवावीत. बंद केलेली कोरोना हॉस्पिटले पुन्हा सुरू करावीत. अख्या देशात कोरोना फक्त महाराष्ट्रातच आहे का ? कोलकत्ता मध्ये विविध पक्षांच्या लाखोंच्या सभा होतात. हजारोंचे मोर्चे आसाम,पश्चिम बंगाल, केरळ मध्ये निघतात. तिकडे कोरोना नाही का ? ताप हा फक्त कोरोनाचाच असतो का ? डेंगू, मलेरिया हे प्रकार गेले कुठे ? लोकांना घाबरवायचे धंदे बंद करा. लोकांना जगू द्या लोक आधीच वर्षभर पिचलेले आहेत. आणि जगाला वॅक्सिन पुरवण्या आधी देशातील नागरिकांना वाटा.”

मनोज घरत (मनसे शहराध्यक्ष, डोंबिवली)
Shocking !!! कल्याणमध्ये कोरोनाने तोडले सर्व रेकॉर्ड – झाली विक्रमी नोंद

क.डों.म.पा. क्षेत्रात कोरोनाचा नुसता हाहाकार माजला असल्याचे दिसून येत आहे. मागील काही आठवड्यापासून वाढते आकडे थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आज मंगळवार दि. २३ मार्च २०२१ रोजी कोरोनाच्या आकड्याने विक्रमी नोंद केली आहे. महानगरपालिका क्षेत्रात आज तब्बल ७११ कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ७०० चा आकडा प्रथमच पार झालेला असून हा कोरोनाचा हायस्कोर बनला असून संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनू लागला आहेत.

२२ मार्च २०२० रोजी लोकडाऊन घोषित करण्यात आले होते. सध्या लोकडाउनमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी महापालिका आयुक्त विजय सुर्यवंशी यांनी कडक निर्बंध बनविले होते. मात्र इतके करूनही कोरोनाचा आकडा काही केल्या थांबताना दिसत नाही. मंगळवारी सायंकाळी आकडा बाहेर पडताच पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. यानंतर आता पालिका आयुक्त कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे.

आजच्या ७११ रुग्णांसह महापालिका क्षेत्रात आता एकूण ५४५९ कोरोना संक्रमित रुग्ण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात कोरोनाने तीन रुग्ण दगावल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. वाढलेल्या आकड्या समवेत ४०४ रुग्णांना आज डिस्चार्ज देखील देण्यात आलेला आहे. मात्र असे असले तरी अधिक काळजी घेणे आता गरजेचे ठरू लागले आहे.