दिवा : महाराष्ट्रातील राजकारणात मागील पाच वर्षांपासून अनेक राजकीय भूकंप होत असल्याचे जनतेने पाहिले आहे. मात्र या सतत होणाऱ्या राजकीय बदलांना आता जनता कंटाळली आहे की काय असे चित्र पहायला मिळू लागले आहे. हेच कारण पुढे करीत दिव्यात आज असंख्य तरुणांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या उपस्थितीत मनसे मध्ये प्रवेश केला आहे. येत्या काळात हेच चित्र महाराष्ट्रभर सुरू राहील असे यावेळी मनसेच्या पदाधिकार्यांकडून सांगण्यात आले.
शंभरहुन अधिक आमदार असलेल्या भाजप पक्षाने सुरुवातीलाच अजित पवारांना सोबत घेऊन पहाटेचा शपथविधी आटोपला होता. मात्र यानंतर पुन्हा राजकीय भूकंप होऊन शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने अडीच वर्षे महाविकास आघाडीत सरकार चालवले. मात्र यानंतर एकनाथ शिंदेंनी केलेला मोठा बंड पाहता हे सरकार कोसळले आणि शिंदे भाजप सरकार सत्तेत आले. वर्षभरानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन भाग होऊन अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर महाराष्ट्रातील जनता मात्र चांगलीच संभ्रमात पडली आहे.
राज ठाकरेंचा मनसे पक्ष हा कोणत्याही युती आघाड्यांमध्ये नसून वेळोवेळी राज ठाकरे चालू स्तिथीवर भाष्य देखील करीत आहेत. मनसे हा सत्ता संघर्षापासून अलिप्त असलेला पक्ष असल्याने जनमानसात आमची एक वेगळी ओळख निर्माण होत असल्याचे सांगत कार्यकर्ते समाज माध्यमांवर व्यक्त होऊ लागले आहेत. त्याचबरोबर मनसे आणि राज ठाकरे हाच एकमेव उरलेला पर्याय असल्याचा पोस्ट समाज माध्यमांवर पहायला मिळत आहेत. याच विचारांतून मनसेत इनकमिंग सुरू असल्याचा दावा आता मनसे पदाधिकारी करू लागले आहेत.
–संतोष दिवाडकर
In the presence of Raju Patil, the youth entered the MNS party