Kalyan : शिवसेना उबाठा पक्षाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे ( Sushama Andhare ) यांनी नुकताच कल्याण लोकसभा क्षेत्राचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी कल्याण डोंबिवलीत विधानसभा निवडणुक लढवणाऱ्या उमेदवारांसाठी प्रचारसभा केल्या. मात्र याच प्रचारसभेत त्यांनी उपस्थित केलेला एक मुद्दा कल्याण पूर्व अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांच्यासाठी चांगलाच पचनी पडला असून एक व्हिडिओ महेश गायकवाड समर्थक प्रचंड शेअर करीत आहेत.
कल्याण पूर्व मतदारसंघात भाजपाकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, शिवसेना उबाठा पक्षाचे धनंजय बोडारे आणि अपक्ष उमेदवार महेश गायकवाड हे तिरंगी लढत लढवत आहेत. पोलीस स्थानकातील गोळीबार या मुद्द्यावर कल्याण पूर्वेची निवडणूक सुरू असल्याचे वारंवार समोर येत असून महाविकास आघाडीचे उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ आलेल्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील कल्याण पूर्वेत सभा घेउन हाच मुद्दा उपस्थित केला. पोलीस स्थानकात गोळीबार करणाऱ्यांच्या कुटुंबीयांनाच भाजपा उमेदवारी देते का? असा सवाल करीत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
कल्याण पूर्व महाविकास आघाडी उमेदवार धनंजय बोडारे यांच्या प्रचारार्थ सभा घेणाऱ्या अंधारे यांनी गोळीबार मुद्दा उपस्थित करताना अपक्ष उमेदवार महेश गायकवाड यांचेही नाव घेतले. ही क्लिप महेश गायकवाड समर्थकांनी प्रचंड शेअर केली असून सुषमा अंधारे नेमक्या कुणाचा प्रचार करून गेल्या? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. बोडारे यांच्यासाठी घेतलेल्या सभेत सुषमा अंधारे यांनी महेश गायकवाड यांचे नाव घेतल्याने प्रचार सभेचे गणित उलटे फिरले असेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
Kalyan : Sushama Andhare came to campaign for Bodare; But Mahesh Gaikwad campaigned?