कोरोना साथीचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण व्हावे तसेच महापालिका क्षेत्रामध्ये कोविड-19 संभाव्य तिस-या लाटेचा प्रादुर्भाव होण्यापूर्वी लसीकरण वेगाने करणे आवश्यक असल्यामुळे शासनाच्या धोरणानूसार खाजगी रुग्णालयांनादेखील कोविड लसीकरणा संबंधी मान्यता देणे बाबतचे धोरण महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केले असून त्यानुसार सदर रुग्णालयांनी स्वखर्चाने वितरकाकडून लस खरेदी करुन योग्य ते शुल्क आकारुन लसीकरण करण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेने 33 खाजगी रूग्णालयांना खाजगी लसीकरण केंद्र म्हणून मान्यता दिली आहे.
ज्या आस्थापना व गृहसंकुले वय वर्षे १८ व त्यापुढील नागरिकांसाठी सशुल्क लसीकरण करून घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी सदर रूग्णालयांशी संपर्क करून लसीकरण करून घ्यावे. मान्यताप्राप्त खाजगी रूग्णालयांनी वितरकांकडून लस खरेदी करून, लस उपलब्ध असल्याची माहिती प्रसिद्ध करावी. या खाजगी रुग्णालयांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ, अनुषंगिक वैद्यकीय सामग्री उपलब्ध करून शासनाच्या कोविन पोर्टल मध्ये लाभार्थ्यांची आवश्यक माहिती भरून लसीकरण करावे.
लसीकरणासाठी परवानगी दिलेल्या खाजगी लसीकरण केंद्रांच्या माहितीबरोबरच सदर धोरण हे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
-कुणाल म्हात्रे