महानगरपालिका निवडणूक : महाराष्ट्रातील लांबणीवर पडलेल्या महानगरपालिका निवडणुक केव्हा होणार असा प्रश्न सध्या अनेकांना पडला आहे. राज्यातील चार महानगरपालिका वगळता सर्व महानगरपालिकांचा कार्यकाळ संपून त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट सुरू आहे. मात्र आता राज्यातील सत्ता संघर्षानंतर हालचालींना वेग आला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणार असल्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून असे संकेत देण्यात आले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या राजपत्रात निवडणुकीचा उल्लेख करण्यात आल्याने सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये निवडणूकांचा धुरळा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकींसाठी मतदार याद्या तयार करण्यासाठी अधिसूचित काढण्यात येत असल्याचा देखील उल्लेख यामध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे अडीच वर्षे लांबलेल्या निवडणुका आता लवकरच पार पडण्याची शक्यता आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे संकेत दिले होते.
मागील वर्षी २०२२ पर्यंत २७ पैकी २३ महानगरपालिकांचा कार्यकाळ पूर्ण झाला. तर त्याअगोदरच २०२० साली कल्याण डोंबिवली, नवी मुंबई आणि आणखीन तीन मनपाचा कार्यकाळ संपला होता. राज्यातील राजकारणात मागील पाच वर्षांत प्रचंड उलथापालथ झाल्याने आता महानगरपालिका निवडणूकीत कोणता पक्ष याचा फायदा घेईल हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शिवसेना भाजपाची युती तुटणे, पुढे महाविकास आघाडी तयार होणे, पुन्हा शिवसेना व राष्ट्रवादीचे विभाजन होऊन भाजप सोबत सत्तेत जाणे या सर्व गोष्टींचे पडसाद महापालिका निवडणुकीत उमटणार आहेत.
–संतोष दिवाडकर

Municipal elections in Maharashtra are likely to be held in these months